Dec 01, 2023
सामाजिक

अनाथांच्या आई,सिंधुताई(माई)

Read Later
अनाथांच्या आई,सिंधुताई(माई)


"स्वामी तिन्ही जगाचा,आईविना भिकारी"

" माय काय असते? माय दुधावरची साय असते ."

आई या नात्याबद्दल असे कितीही बोलले तरी अपुरेचं...
आईची थोरवी,आईची महतीचं इतकी असते की ती शब्दांत व्यक्त करणं अशक्यचं.. आणि आई काय असते हे आपण आई होतो तेव्हा जास्त कळते...
लहानपणी आईचे आपल्याला रागावणे,बोलणे, कधीकधी मारणे, आपली जास्तचं काळजी घेणे,सारख्या सूचना देणे इ. अशा अनेक गोष्टी आवडत नसतं.तेव्हा आईचा राग ही येत असत.पण जेव्हा आपण आई होतो तेव्हा कळते खऱ्या अर्थाने आईपण!
आपल्याला तेव्हा समजते की आईला आपल्या वागण्याचा किती त्रास झाला असेल? जेव्हा आपली मुले आपल्याला त्रास देतात तेव्हा क्षणोक्षणी आठवण येते आपल्याला आईची...

खरचं स्त्रीसाठी मातृत्व हे तिला लाभलेले एक वरदानचं !ज्यामुळे तिचे आयुष्यचं बदलून जाते.
असे हे मातृत्वाचे वरदान लाभलेली माझी आई असो की तुम्हां प्रत्येकाची आई किंवा आपण स्वतः एक आई असो ..
आपलं आईचं प्रेम आपल्या मुलांपुरतचं असतं ,नाही का?
तरीही आपल्याला आपल्यातील मातृत्वाचा किती अभिमान असतो ! आनंद असतो!
मगं ज्यांनी अनेक अनाथ, निराधार अशा मुला मुलींना आईचे प्रेम दिले त्या आईला आपल्या मातृत्वाचा किती आनंद झाला असेल ? जरी जन्म दिलेला नसला तरी आईचे प्रेम देवून ,आईसारखी माया करून अनेक मुलामुलींच्या यशोदा माताचं झाल्या !
ज्यांना कोणीही सहारा दिला नाही, समाजाने दूर केले.गरीब,दीन-दुबळे,आजारी, रोगग्रस्त अशा अनेक मुलांना मातृत्व लाभले ते सिंधुताईंचे..
आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकताचं सर्वांना दुःखाचा धक्काचं बसला.प्रत्येकालाचं खुप दुःख झाले. प्रत्येकाने आपल्या दुःखद भावना आणि त्यांच्याबद्दलचे प्रेम,आदर आपल्या शब्दांतून व्यक्त केले.
शोकसंदेशातून,लेखातून, कवितेतून ताईंबद्दलची तळमळ व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली दिली.

ताईंचे वाक्य आहे
"माणसाला मोठं होण्यासाठी मरावं लागतं"

खरं आहे ना ?
आज ताई गेल्या आणि सर्वांना ताई म्हणजे काय? त्यांचे कार्य काय? हे खऱ्या अर्थाने समजत आहे...
ताई आणि त्यांची महती ही महाराष्ट्रातील जनतेलाचं नाही तर भारताला ,जगाला ही माहित आहे.
भारत सरकारने त्यांना \"पद्मश्री\" किताब देवून त्यांच्या कार्याचा गौरव ही केला आहे.
प्रत्येक यशस्वी व्यक्तीचे यश आपल्याला दिसते पण त्यासाठी त्याने घेतलेले कष्ट ,त्याला झालेला त्रास आपल्याला माहित नसतो.
ताईंचे ही कार्य असेचं आहे ,ताईंना आज सर्व जण ओळखता आहेत,त्यांना पुरस्कार मिळत आहे पण हे सर्व काही सोपे नव्हते त्यांच्या साठी!
त्यांचे सुरुवातीचे आयुष्य बघितल्यानंतर वाटते,त्यांच्या सारख्या कितीतरी स्त्रिया समाजात आहेत ज्या अन्याय, अत्याचाराला बळी पडून आपले जीवन संपवित आहे.कधी गरीबी, कधी आजारपण,कधी लाचारी, कधी फसवणूक अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे स्त्री ला हे जीवन नकोसे वाटते.
ताईंच्या जीवनात ही असे प्रसंग आले .
सासरच्यांनी चारित्र्यावर संशय घेऊन बाहेर काढले,माहेरच्यांनी तोंड फिरविले,कोणीही सहारा दिला नाही. तेव्हा ताईंनी चुकीचा मार्ग न निवडता आलेल्या प्रसंगाना,संकटाना धैर्याने तोंड देवून मार्ग काढला.
गोठा, रेल्वेस्टेशन, स्मशानभूमीत ही निवारा घेतला. प्रसंगी भीक मागितली पण स्वतः च्या मुली साठी ,समाजात दिसणाऱ्या अनाथ मुलांसाठी जगत राहिल्या.
स्वतः च्या मुली बरोबर इतर अनेक निराधारांच्या आई झाल्या.

कधी मनात येतं ,जर ताईंच्या जीवनात असे प्रसंग आले नसते तर...
ताई ही आपला संसार सुखाचा करीत राहिल्या असत्या,आपल्या मुलांच्या आई म्हणूनचं राहिल्या असत्या किंवा अजून काही वेगळे कार्य केले असते..
ज्या नवऱ्याने त्यांना घराबाहेर काढले होते त्यांनाच ताईंनी नंतर सहारा दिला आणि धन्यवाद ही दिले कारण त्यांच्या वागणुकीमुळे त्या आज इतक्या मुलांची आई झाल्या.
म्हणजे त्यांनी नेहमी वाईटातून चांगलेचं घेण्याचा प्रयत्न केला.

खरचं ,ताईंची महती सांगावी तितकी कमीचं!
ताईंनी वेगवेगळ्या कठीण प्रसंगातून स्वतः ला सावरून समाजातील अनाथ मुलांचे दुःख पाहून जीवनात काही तरी करण्याचे ठरविले आणि कार्याला सुरुवात केली .
आज त्या कार्याचे फलित म्हणजे \"ममता बाल सदन\" हे अनेक अनाथांचे आश्रयस्थान बनले आहे.
अनाथाश्रम चालविण्यासाठी पैशांसाठी त्यांनी कुणापुढे हात कधीच पसरवले नाहीत,त्याऐवजी त्यांनी सार्वजनिक व्यासपीठांतून प्रेरणादायी भाषणे केली आणि समाजातील वंचितांना, उपेक्षित वर्गांना मदत करण्यासाठी जनतेचा पाठिंबा मागितला.
मुलांच्या लाडक्या माईंनी अनाथ मुलांना वाढवले,शिक्षण दिले,जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले.त्यांची बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत.माझी मुले डॉक्टर,वकील, शिक्षक आहेत हे सांगताना त्यांचा चेहरा फुलुन यायचा.
सिंधुताईंना एकूण 273 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.ताईंच्या जीवनावर चित्रपट ही निघाला आहे.
पण एवढे सर्व मिळाले तरी त्यांचा खरा आनंद हा त्यांचा आपल्या मुलांसोबतचा सहवास याला चं मानतात..


खरचं \"टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही\"
या प्रमाणे ताईंचे नाव,त्यांची ख्याती, प्रसिद्धी, मिळालेले पुरस्कार पाहिल्यावर निश्चितचं सिद्ध होते.
त्यांनी शून्यातून आपले हे विश्व उभारले आणि त्यासाठी किती त्रास सहन केला ..
आपण ते वाचले तरी मनाला वेदना होतात.
त्यांनी तर ते सर्व सहन केले आहे.

खरचं धन्य त्या सिंधुताईं! आणि धन्य त्यांचे कार्य!

ताईंच्या कार्याचा आदर्श ठेवून ,प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे ,शक्य होईल तसे ,निःस्वार्थीपणे समाजासाठी काही तरी चांगले कार्य केले तर...
ताईंना खरचं आनंद होईल आणि हीचं त्यांच्या साठी खरी श्रद्धांजली ठरेल....
ताईंच्या निःस्वार्थ कार्याला मनापासून अभिवादन करून एवढेचं लिहावेसे वाटते...

अनेक अनाथ,निराधारांना
मिळाला तुमचा मायेचा सहारा
आणि आज पुन्हा अनाथ
झाला ममतेचा परिवार सारा
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//