Aug 09, 2022
Kathamalika

सिंधुचा पुर्वीचा प्रियकर (अंतिम भाग)

Read Later
सिंधुचा पुर्वीचा प्रियकर (अंतिम भाग)

सिंधुचा पुर्वीचा प्रियकर (अंतिम भाग)

जानू गेली त्यादिवशी प्रभा खूप रडला. पद्माला दया आली त्याची तरीही त्याची समजूत घालण्याऐवजी खोचून बोलली,"तुमच्या प्रेयसीकडेच गेलेय ना जानू. कशाला एवढी काळजी करता!" प्रभा गप्प राहिला

--------

पूजा वगैरे झाल्यावर नवीन जोडपं हनिमुनला गेलं. 

सकाळी झाडांना पाणी घालताना वासुअण्णा म्हणाले,"सिंधू,जानूच्या आईवडिलांना एकटंएकटं वाटत असेल गं. लेकीचा विरह कसा सहन करत असतील दोघं! आपण त्यांना एकदा जेवायला बोलवुया."

"अहो,तुमचं मन इतकं निर्मळ म्हणून तुम्ही राग धरला नाहीत माझ्यावर. खरंतर प्रभाबद्दल तुम्हाला सांगायचं कितीवेळा मनात आलेलं माझ्या पण बाबांनी शपथ घातली होती ती आड आली हो. 

विराज व जानूकडून मला पद्माच्या संशयी स्वभावाबद्दल कळलं. खूप सहन केलंय प्रभाकरने नि आता प्रभा व माझं कॉलेजमधील प्रेमप्रकरण ऐकून तर ती अजुनच राग करु लागली आहे म्हणे प्रभाकरचा. माझं आयुष्य सुखी झालं पण प्रभाकर.."

"नको काळजी करुस सिंधू. काहीतरी मार्ग निघेल यातून."

********

दररोज झोपायच्या पुर्वी जानू मम्मापप्पांना फोन करुन त्यांची ख्यालीखुशाली घ्यायची. पद्माची चिडचिड दिवसेंदिवस वाढतच चालली होती. आत्तातर तिला आयतं कारण मिळालं होतं प्रभाकरवर चिडचिड करायला. प्रभाकर बिचारा खाली मान घालून ऐकून घ्यायचा. सहन होण्यापलिकडे झालं तर दूर कुठेतरी फिरायला जायचा. उगीचच वाट तुडवीत रहायचा. 

एकदा असंच सकाळी पद्मा नि प्रभाकरचं क्षुल्लकशा कारणावरुन वाजलं. प्रभाकर रागात घराबाहेर पडला. पद्माने राग निवळला तसं कामं आवरायला सुरुवात केली. पंख्यावर बरीच धूळ साचली होती. पद्मा मोठ्या स्टुलवर उभं राहून झाडूने धूळ झटकू लागली.

 गेले असतील त्या सिंधूकडे असं तोंडाने बडबडत असताना तिचा पाय निसटला नि काही कळायच्या आत ती खाली पडली. जोरात मार बसला होता तिला. जागचं हलताही येत नव्हतं. अर्धाएक तास ती तशीच पडून होती.

प्रभाकरने बेल वाजवली पण पद्मा दार उघडेना. त्याला वाटलं अंघोळीला गेली असेल पण बराच वेळ झाला तरी पद्मा दार उघडायला न आल्याने त्याने खालच्या बेडेकरांकडून चावी घेतली व दार उघडलं. 

पद्माला पडलेल्या अवस्थेत पहाताच त्याने आधी तिला उचलून बेडवर ठेवलं. तिचा उजवा हात व पाय बऱ्यापैकी सुजले होते. पद्मात बोलण्याचंही त्राण नव्हतं. शेजाऱ्यांच्या मदतीने प्रभाकरने पद्माला इस्पितळात दाखल केलं..

एक्स रे काढण्यात आला. पद्माच्या उजव्या हाताला प्लास्टर करण्यात आलं. प्रभाकर पद्माला घरी घेऊन याला. पद्मा पुरती परावलंबी झाली. घरातली सगळी कामं प्रभाकर करु लागला तेही शांततेत,कुठलाही त्रागा न करता.

 पद्माचा उजवा हात जायबंदी झाल्याने पद्माला स्पंजिंग करणं,तिला भरवणं,तिचे केस विंचरणं..ही सगळी कामं तो करत होता. जानूला पद्मा पडल्याबद्दल कळवलं. ती दोघं परमुलखात होती. प्रभाकरने जानूला आश्वासन दिलं कि तो तिच्या ममाची सर्वतोपरी काळजी घेईल. पद्माही लेकीशी रोज बोलत होती. घाबरण्याचं कारण नाही सांगत होती. आपल्यामुळे लेकीच्या मधुचंद्राचा विचका होणं हे तिला आवडणार नव्हतं. 

जानूनेही विचार केला,यानिमित्ताने का होईना दोघं एकमेकांच्या जवळ येतील. मम्मापप्पांतला दुरावा संपावा असं तिला मनापासून वाटत होतं. चारेक दिवसांनी सिंधू व वासुअण्णाही त्यांच्या घरी फेरी मारायचे. पदमाच्या तब्येतीची विचारपूस करायचे. 

सिंधूने तर पद्माची कंबर लवकर बरी व्हावी म्हणून तिच्यासाठी डिंकाचे व मेथीचे लाडू न्हेले होते. कधी अळीवाचे लाडू,अळिवाची खीर करुन न्हेई.

 वासुअण्णांचा विनोदी स्वभाव व सिंधु व वासुअण्णांमधला प्रेमाचा बंध पाहून पद्माला कळून चुकलं कि ती सिंधू व प्रभाकरवर संशय घेऊन उगीचच प्रभाकरला त्रास देत होती. 

असंच एकदा रात्री प्रभाकर पद्मालाला आमटीभात भरवत  होता तेव्हा पद्माचे डोळे भरुन आले. ती म्हणाली,"प्रभा, आपलं लग्न झाल्यापासून मी तुझ्यावर संशय घेत आले. तुझं प्रभावी व्यक्तिमत्त्व पाहून मला वाटायचं तुला कोणीतरी माझ्यापासून दूर न्हेईल. 

पद्माचं कळल्यापासून तर मला जास्तच भीती वाटू लागली होती कि तू परत पद्माकडे ओढला जाशील. खरंच माझ्या मनात मी नको ते विचार करत होते आणि तुला त्रास देत होते पण कदाचित माझे डोळे उघडावे यासाठीच मी पडले आणि माझा हात मोडला असावा.  तू मला माफ करशील का रे प्रभा?"

प्रभाकरने पद्माला जवळ घेतलं नि तिचे डोळे पुसले. तिच्या पाठीवरुन हात फिरवत राहिला. बाहेर आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. आता सगळं छान होणार याची जणू साक्ष देत होत्या.

समाप्त

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now