Oct 21, 2021
कथामालिका

सिंधुचा पुर्वीचा प्रियकर(भाग 5)

Read Later
सिंधुचा पुर्वीचा प्रियकर(भाग 5)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

सिंधुचा पुर्वीचा प्रियकर(भाग पाचवा)

विराजने मग पप्पांच्या सांगण्यानुसार जानुला फोन लावला. तिला व तिच्या आईवडिलांना आजीआजोबांच्या घरी बोलवून घेतलं. 

सिंधूला असं अचानक पुढ्यात पाहून प्रभाकरला धक्काच बसला. 

विराजच्या आजोबांनी प्रभाकरची पुर्वी त्याला दिलेल्या नकाराबद्दल माफी मागितली व जानुचा हात नातवासाठी मागितला. 

 आजीने साजूक तुपातला शिरा बनवला सगळ्यांसाठी. 

प्रभाकर सिंधुला म्हणाला,"सिंधु माझ्या लेकीला सांभाळून घेशील ना!"

त्याच्या आर्जवी बोलण्यात व पाणावलेल्या डोळ्यांत सिंधुला पुर्वीच्या प्रियकराऐवजी थोड्याच दिवसांत लेक सासरी जाणार या विचाराने सदगदित झालेला व्याकूळ बाप दिसत होता.

सिंधुने त्याला म्हंटलं,"प्रभाकर,तुम्ही काही काळजी करु नका लेकीची. आणि एकाच शहरात तर रहातो आपण,येत जाईल ती अधुनमधून."

आज्जीच्या हातचा शिरा व चहा पिऊन बैठकीची सांगता झाली. विराज व जानुच्या लग्नावर शिक्कामोर्तब झालं. विराज जान्हवीला फिरायला घेऊन गेला. दोघंजणं आज खूप आनंदात होती. 

विराज म्हणाला,"जानु,मी जाम टरकलेलो गं. एका पॉइंटला मला वाटलं,आत्ता आपल्या वाटा वेगळ्या होणार." रेतीत वर्तुळं आखत जानु म्हणाली,"तुझ्या घरची सॉलिड्ड आहेत रे. आवडली मला. कधी एकदा लग्न होऊन तुझ्यासोबत रहायला येतेय असं झालंय मला पण पण पप्पा रे. मी तुझ्याकडे आल्यावर एकटे पडणार ते. मम्माचं नि त्यांचं विशेष पटत नाही. मम्माला कारणच हवी असतात पप्पांशी भांडायला."

"अगं चालायचंच. तू मात्र  प्रेयसीची बायको झालीस की कचाकचा भांडू नकोस हं माझ्याशी," विराज डोळे मोठे करत गोल गोल फिरवत हसतहसत बोलला तसं त्याच्या गालावर पडणाऱ्या खळीत बोट घालत जानु म्हणाली,कसली गोड आहे रे तुझ्या गालावरची खळी. थांब जरा तिचा किस घेते." तसा समजावणीच्या सुरात विराज म्हणाला,"अगं लोकं हैत की आजुबाजूला. 

तू आपलं कैतरी बोलून रहातेस नि मग रात्री मला गुदगुल्या होतात. स्वप्नात येतेस माझ्या. नीट झोपूही देत नाहीस." यावर जानु त्याचा हात हातात घेऊन खुदकन हसली. "म्हणजे मेडमना लाजताही येतं वाटतं! कसली ब्लश होतेयस!" जानूने तिच्या दोन्ही हातांचे तळवे तिच्या गुलाबी गालांवर धरले. सुर्य अस्ताला येऊ लागला तशी ती दोघं आपापल्या घरी परतली.

 
******

प्रभाकरच्या पत्नीला, पद्मालाही  प्रभाकरच्या व सिंधुच्या प्रेमाबद्दल काहीच कल्पना नव्हती.  खरंतर हे सारं ऐकून तिला प्रभाकरचा खूप राग आला होता पण लेकीसाठी ती गप्प राहिली. 

पद्मा रुपाने सावळी होती. थोडीसी ठेंगणी होती. तिच्या मानाने प्रभाकर दिसायला सरस असल्याने तिला नेहमी वाटायचं की प्रभाकरला ती आवडत नाही.

 
प्रभाकरच्या मनमिळावू स्वभावामुळे ऑफिसमधेही बऱ्याचजणी त्याच्याशी बोलायच्या. त्यावरुनही पद्मा प्रभाकरवर संशय घ्यायची. जरा घरी परतायला उशीर झाला की सतरा फोन करायची. 

प्रभाकरपद्माची लेक जानु मात्र वडिलांवर गेली होती. उंच,सडपातळ,कुरळे केस,टपोरे डोळे. अगदी पित्रुमुखी आणि स्वभावही प्रभाकरसारखाच मनमिळावू,आनंदी. 

घरी परतल्यावर पद्माने प्रभाकरची सालं काढली. खूप बोलली त्याला. कुठपर्यंत होते तुमचे संबंध असं विचारलं तेंव्हा मात्र प्रभाचा पंजा तिच्या गालावर उमटला. 

प्रभा म्हणाला,"पद्मा,आयुष्यभर तुझा संशयी स्वभाव,तुझा त्रागा सहन करत आलो मी,केवळ माझ्या जानूकडे बघून. सिंधू व मी एकेकाळी एकमेकांवर प्रेम केलं पण ते प्रेम मनापासून होतं. वासनेच्या पलिकडलं होतं. प्रेम म्हणजे नुसती शारिरीक जवळीक नव्हे पद्मा. असो. तुझ्या पाया पडतो पण माझ्या लेकीचं लग्न होईस्तोवर काही विघ्न आणू धकोस."

पद्मा प्रभाकरकडे पाठ करून झोपली. प्रभाकरला हे नवीन नव्हतच. 

सकाळी तो व जानु जॉगिंगला बाहेर पडले. काही अंतर पार केल्यावर जानू म्हणाली,"पप्पा,काल मम्मा भडकली असेल ना तुझ्यावर."

"काय सांगू तुला. यू नो हर व्हेरी वेल बेटा. तिला मी बजावून सांगितलय की माझ्या जानुचं लग्न होईस्तोवर कुठलाही वाद घालायचा नाही."

"पण खरंच पप्पा,तुमचं पहिलं प्रेम गॉजिअस होतं. किती क्युट दिसते नं माझी सासू. अजुनही फॉर्म टिकवून ठेवलाय तिने."

"ए बाई,बसं कर तुझ्या सासूचं कौतुक नाहीतर परत प्रेमात पडेन मी तिच्या."

"पप्पा तुम्हीपण ना"

********

विराज व जान्हवीच्या ऑफिसेसमधे सगळ्यांना जानू व विराजचं लग्न ठरल्याची बातमी कळली. कलिग्ज पार्टी मागू लागले. शेवटी सर्वांना पार्टी दिली. 

दागिने बनवण्यासाठी सिंधूने जानूला बोलावून घेतलं. तिच्या आवडीच्या डिझाइनचं मंगळसूत्र, अंगठी,नेकलेस घडवायला दिले. जानूच्या आवडीचा अंजिरी रंगाचा शालू, इतर साड्या सगळं घेऊन झालं. तिच्याच आवडीने पाहुण्यांच्या आहेरासाठीही साड्या व इतर कपडे घेतले गेले.

 प्रत्येक गोष्टीत सिंधू जानूला सहभागी करत होती,तिच्या मताला मान देत होती. पटलं नाही तर तिला आपलं म्हणणं समजावून सांगत होती. एक सुंदर नातं रुजत होतं. 

पद्मा मात्र जाणूनबुजून सिंधूकडे जाणं टाळत होती. अगदीच निकडीचं असलं तरच जात होती. तशी पद्माच्या तापट स्वभावामुळे  जानू वयात आल्यापासून पद्मापासून हळूहळू दूर होत गेली होती. पद्माला आता एकाकी पडल्यासारखं वाटत होतं. 

जानू व विराजच्या लग्नात मात्र  पद्माने चेहऱ्यावर कोणताही ताणतणाव दाखवला नाही. लग्नाचे चार दिवस तरी तोंडावर हसू पांघरलं. 

जानू सासरी गेली त्यादिवशी प्रभा खूप रडला. पद्माला दया आली त्याची तरीही त्याची समजूत घालण्याऐवजी खोचून बोलली,"तुमच्या प्रेयसीकडेच गेलेय ना जानू. कशाला एवढी काळजी करता!" प्रभा गप्प राहिला.

क्रमश:

-----सौ.गीता गजानन गरुड.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now