सिंधुचा पुर्वीचा प्रियकर(भाग 4)

Sindhucha purvicha priyakar

सिंधुचा पुर्वीचा प्रियकर(भाग 4)

नववारी साडीमुळे आज्जीला मस्त सीटच्या दोन्ही बाजुंना पाय टाकून बसता आलं. वाटेत तिचं विराजला गाडी कशी सावकाश,लक्ष देऊन चालवायची यावर लेक्चर देणं चालू होतं.

विराजने पिझ्झ्याची व कोल्ड्रिंकची ऑर्डर दिली. दोघं  खुर्च्यांवर जाऊन बसले. आज्जीचं लक्ष त्या मुली पिझ्झ्याची भाकरी कशी लिलया थापतात मग त्यावर वेजीस,चीज कसे स्प्रेड करतात यावर होतं. इतक्यात जानुचा फोन आला. विराजने फोन उचलला.

आत्ता पुढे--

"ए हेलो. मी किती वेळा फोन लावला तुला. स्वीच ऑफ लागत होता."

"अरे यार मी बाहेर होतो. आजीसोबत हॉस्पिटलमध्ये."

"अच्छा म्हणजे आज्जी सोबत आहे म्हणून मला अरेतुरे काय. थांब बघतेच तुला. डबल किस्सी घेणार तुझी. भेटच तू आता. आज्जीला बरं नाही का रे?"

"नॉर्मल चेकअप. अरे हो. पिझ्झा आला आमचा. आता फोन ठेव."

"ऊं हूं,तसा नाही ठेवणार. आधी जानु म्हण मला."

"अगं बाई का जीवावर उठतेस माझ्या. बरं म्हणतो ऐक,"
 मांजर डोळे मिटून दूध पितं तसं तोंडाजवळ हात न्हेत विराज लव्ह यू जानू म्हणाला. 

आज्जीच्या तीक्ष्ण कानांना 'लव्ह यू जानू' अगदी स्पष्ट ऐकू आलं आणि आज्जी खुसुखुसु हसू लागली अगदी डोळ्यातून पाणी येईस्तोवर.

विराजला कळलं,आज्जीने आपल्याला रंगेहाथ पकडलंय. आज्जीने डोळे मिचकावले मग विराजने आज्जीला जानू व त्याची मैत्री,प्रेम याबद्दल सारं काही सांगितलं व जान्हवीचा फोटोही दाखवला. 

आज्जीलाही नातसून म्हणून जानू आवडली. एव्हाना दोघांनी मिळून पिझ्झा फस्त केला होता. कोल्ड्रिंक पितापिता आजीने त्याला जानुचं नाव,गाव,शिक्षण विचारलं. 

जान्हवी ग्राफीक डिझायनर असून नुकतीच एका बड्या कंपनीत नोकरीला लागलीय हे सांगताना नातवाचा तिच्याविषयीच्या कौतुकाने बहरलेला चेहरा पाहून आज्जीला त्याचं कौतुक वाटलं. आज्जीच्या वेळी कुठे असं बायकोच्या शिक्षणाचं कौतुक वगैरे होतं पुरुषांना. काही निवडक पुरुष सोडले तर बाकी सगळेच पुरुषप्रधानसंस्क्रुतीच्या मळलेल्या वाटेवर चालणारे.

विराजच्या तोंडून जान्हवी प्रभाकर विसे हे नाव ऐकताच मात्र आज्जी दचकली. आज्जीच्या चेहऱ्यावरले भाव झरझर बदलले. 

"का गं आज्जी काय झालं दचकायला?"

"अरे सहज. तू तुझ्या मम्मा पप्पांकडे न्हेलेलस तिला?"

"हो गं आजी कालच घेऊन गेलो होतो जानूला पण आई कधी नव्हे ते माझ्या पसंतीला नाही म्हणाली."

"कारण आहे त्याला वीरु."

"आजी,तू तर जानुला भेटलीही नाहीस आणि मम्माच्या हो ला हो मिळवतेस!"

"नाही रे बाळा. तसं नाही. आता कसं सांगू तुला!"

"चल घरी मग बोलू."

विराज आज्जीला घेऊन घरी गेला. विराजचे आजोबा खिडकीत बसून त्यांची वाट पहात होते.

विराज आजोबांसोबत गप्पा मारत बसला तितक्यात आजीने आजोबांसाठी वरणभाताचं पान वाढलं. विराजही  त्यांच्यासोबत थोडं जेवला. आजीचं तर पोट भरलेलं होतं. आजीने भांडी लगोलग धुवून टाकली नि चटई घालून जरा निवांत पडली. 

आजोबा वीरुला म्हणाले,"जेवली नाही तुझी आज्जी. बाहेर काहीतरी खाऊन आली असणार नक्कीच. तुही कमीच जेवलास. तुही तिचाच चेला."

आज्जीने आजोबांना गोळ्या व पाण्याचा तांब्या दिला. 
आज्जी म्हणाली,"अहो तो प्रभाकर विसे आठवतो का तुम्हांला? "

"नाही बॉ.  माझ्या मित्रयादीत प्रभाकर राजबिंडे आहेत. विराज हा माणूस दिसायला काळाठिक्कर नि आडनाव राजबिंडे. कसं काय बुवा ती आडनावं ठरवतात!"

"अहो माझं ऐका आधी. तुमच्यामुळे आज विराज अडचणीत आला आहे."

"काहीतरी बडबडू नकोस. मी कसा माझ्या नातवाला त्रास देईन!"

"पुर्वकर्म हो तुमची. आगडोंब होता नुसते. जरा काही बिनसलं की घर डोक्यावर घ्यायचा तेंव्हा."

"पण आता मी ध्यानधारणा करुन माझ्या रागावर ताबा मिळवलाय बऱ्यापैकी. आधीचं उकरुन काढू नकोस. तुम्ही बायका पण ना.."

"आठवतय तुम्हांला, सिंधुचं प्रेमप्रकरण समजताच तिला फोडून काढली होती तुम्ही. किती वळ उठले होते पोरीच्या पाठीवर! तुम्हीच तिचं कॉलेज बंद केलं होतं आणि लगोलग तुमच्या बहिणीच्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं होतं.

 एवढी हुशार लेक माझी पण शिकू दिलं नाहीत तिला. वासुबद्दल माझं दुमत नाही पण एकदा शांत डोक्याने प्रभाकरविषयी विचार करायला हवा होता तुम्ही. 

मी म्हणेन तीच पुर्व दिशा असा लेकीविषयी तुमचा खाक्या लेकाबाबत  मात्र सॉफ्ट झाला. लेकाला हवं तेवढं शिकू दिलंत. 

परदेशात शिक्षण हवं म्हंटल्यावर तेही करु दिलंत. त्याच्या पसंतीची कदर केलीत. असा दुजाभाव स्वतःच्याच लेकरांबाबत!  आत्ता कुठे शांत आला आहात. सौ चुहे खाके बिल्ली चली हज असं झालंय तुमचं. "

आजोबानी डोळ्यांवरला चष्मा काढला अन्.पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसल्या. घसा खाकरला नि म्हणाले," खरंय तुझं. सिंधुवर तसा अन्यायच केला मी. माझी लेक स्वतः जोडीदार निवडते हे कुठेतरी माझ्या अहंला ठेच देणारं होतं. लेकीचं मन जपण्याऐवजी मी माझा अहं कुरवाळला,त्यात लेकीच्या प्रेमाची आहुती दिली.

 पाटीवर लिहिलेलं पुसता येतं तसं काही चुका सुधारता आल्या असत्या तर! असो, अगं पण आता सिंधुला काही कमी आहे का! सुखी आहे ना ती तिच्या संसारात."

"आपला वीरु प्रेमात पडलाय,"आज्जी म्हणाली.

"अरे व्वा!ही तर गोड बातमी आहे," विराजच्या पाठीवर थाप मारत आजोबा म्हणाले. 

"सिंधुचा पुर्वीचा प्रियकर म्हणजेच जान्हवीचे वडील,प्रभाकर विसे. आता बोला,"आज्जी आजोबांकडे एकटक बघत म्हणाली.

आज्जीच्या बोलण्यावरुन विराजला जान्हवीचं पुर्ण नाव, मम्माने तिला दिलेला नकार याची लिंक लागली. 

विराज अगतिकपणे म्हणाला,"आजोबा, मम्माने रेड सिग्नल दिला आमच्या प्रेमाला."

आजोबांनी डोळ्यातलं पाणी पुसलं नि काहीतरी मनाशी ठरवून सिंधुला फोन लावला. त्या दोघांनाही बोलवून घेतलं. विराजला म्हणाले,"तू नको काळजी करु. जे झालं ते झालं.  मी आत्ता पुढची गणितं तरी चुकू देणार नाही."

आजोबांनी जावयाला सिंधु व प्रभाकरचं पुर्वप्रेम व सिंधुला त्यांनी दिलेला मार व लवकरात लवकर लावून दिलेलं तिचं लग्न याबद्दल सांगितलं.

 वासुअण्णा गप्प बसून ऐकत होते. ते एकटेच टेरेसमधे गेले. सिंधु घाबरली. ती त्यांना समजवण्यासाठी त्यांच्या मागे जाऊ लागली पण आज्जीने तिला थांबवून घेतलं.

 कठड्याला रेलून वासुअण्णा भुतकाळाची उजळणी करत होते. वासुअण्णांचे वडील त्यांच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. त्यानंतर त्यांच्या आईने शेती करुन त्यांना शिकवलं होतं,लहानाचं मोठं केलं होतं.

 वासुअण्णांच्या शिक्षणाचा,कपड्यालत्त्याचा खर्च त्याचे मामा म्हणजेच सिंधुच्या वडिलांनी केला होता. पदवी प्राप्त झाल्यावर ते सरकारी नोकरीत रुजू झाले होते. मामाबद्दल सार्थ अभिमान होता त्यांना. सुट्टीत मामाच्या घरी गेल्यावर ते इकडेतिकडे बागडणाऱ्या सिंधुला पहायचे. गोरीपान,चाफेकळी नाकाची,टपोऱ्या डोळ्यांची सिंधु दोन वेण्या हलवत इकडून तिकडे फिरायची तेव्हा वासुला ती श्रीदेवीच वाटायची. 

त्याचं प्रेम बसलं होतं तिच्यावर पण मामाच्या उपकाराच्या कर्जाखाली दबल्यामुळे त्याला आपलं प्रेम जाहीररित्या सांगता येत नव्हतं. शिवाय सिंधुला तो पसंत पडेल का हाही प्रश्न होताच आणि एके दिवशी अचानक मामाने येऊन सिंधुसाठी त्याचा हात मागितला तेंव्हा त्याला जणू  स्वर्ग दोन बोटं उरला होता. सिंधुच्या मनात आणखी कोण असेल का असे विचार करायलाही त्याचं मन धजत नव्हतं.

वासुअण्णांचं प्रेम वासुअण्णांकडे चालत आलं होतं पण सिंधुचं काय? क्षणभर त्यांना सिंधुचा रागही आला पण नंतर त्यांना आठवलं ते त्यांचं सहजीवन.

 लग्नानंतर एकही दिवस सिंधुने त्यांच्या प्रेमाची प्रतारणा केली नव्हती. मधे त्यांना क्षयरोग झाला होता तेंव्हा त्यांच्यासाठी उपासतापास केले होते. एकहाती संसार सांभाळत त्यांना जगण्याची उभारी दिली होती.

 वासुअण्णांच मन आत्ता नितळ झालं होतं. अनाहुतपणे ढवळला गेलेला मनाच्या डोहातला सगळा गाळ तळाला जाऊन बसला तसे ते घरात आले.  आजोबांपासनं सगळ्यांचच लक्ष आत्ता वासुअण्णांच्या प्रतिक्रियेकडे लागलं होतं.

वासुअण्णा सिंधुला म्हणाले,"सिंधु, जे झालं ते झालं. तू मला याची पुर्वकल्पना द्यायला हवी होतीस. लग्नानंतर तू माझ्याशी एकनिष्ठ राहिली आहेस. तुझं लग्नापुर्वीचं प्रेम  मी निश्चित समजून घेतलं असतं पण तुला असंही वाटलं असावं की मी तुला समजून नाही घेतलं तर. तू माझी अर्धांगिनी आहेस. माझ्या मनात तुझ्याविषयी यत्किंचितही किल्मिष नाही. तू निश्चिंत रहा.

वासुअण्णांचं बोलणं ऐकून सिंधुचा,तिच्या आईवडिलांचा जीव भांड्यात पडला. वासुअण्णा पुढे म्हणाले,"आपण मुलीच्या आईवडिलांना बोलवुया. कोणत्या न् कोणत्या प्रकारे नातं जुळतय हे विधिलिखित असावं."

आजोबा हात जोडत म्हणाले,"जावईबापू आभार,तुम्ही माझ्या लेकीला समजून घेतलंत."

वासुअण्णा म्हणाले,"आता सिंधु नि मी वेगळे कुठे आहोत. मी माझ्या सिंधुला अंतर देणं शक्यच नाही."

विराजने मग पप्पांच्या सांगण्यानुसार जानुला फोन लावला. तिला व तिच्या आईवडिलांना आज्जीआजोबांच्या घरी बोलवून घेतलं. 

क्रमशः

----सौ.गीता गजानन गरुड.

🎭 Series Post

View all