Jan 23, 2021
Kathamalika

सिंधुचा पुर्वीचा प्रियकर(भाग 3)

Read Later
सिंधुचा पुर्वीचा प्रियकर(भाग 3)

सिंधुचा पुर्वीचा प्रियकर(भाग 3)

त्याने मम्माच्या पाठीवर हात ठेवला व लाडिकपणे तिच्या कुशीत तोंड खुपसत म्हणाला,"मम्मा,सॉरी गं. चल ना वाढ. मला भूक लागलीय भरपूर. टोमॅटोचं सार येतय डोळ्यासमोर." वीरचं बोलणं ऐकून मम्मा त्याही स्थितीत हसली. 

मग दोघा मायलेकरांनी इकडचंतिकडचं बोलत जेवण उरकलं. 

आत्ता पुढे--

पहाटेच वीरच्या आजीचा फोन आला. 

"हेलो आजी,"वीर म्हणाला.

"वीर जरा मोकळा आहेस का रे तू आज. मला जरा चेकअपला जायचं होतं. नेमकं ह्यांनाही बरं नाही. एकट्याने जायला सुधरत नाही रे हल्ली. तुझा मामा गेला आम्हाला टाकून परदेशात. इथे आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं!"

"असं का बोलते आजी! तुझ्यापुढे कोणतही काम महत्त्वाचं नाहीय मला. येतोच मी दोनेक तासात. येताना ढोकळा घेऊन येतो तुमच्या आवडीचा."

मम्माला सांगून विराज बाहेर पडलादेखील.

सिंधुला रात्री उशिरापर्यंत झोप नसल्याने तिला अंथरुणातून उठावसं वाटत नव्हतं. तिला थकवा आला होता. 

वासुअण्णांनी सिंकमधली रात्रीची भांडी घासली. सिंक लखलखीत केलं. चहा ठेवला. आलं किसून टाकलं त्यात. दोन वेलच्या कुटून घातल्या चहात. एकीकडे दूध उकळत ठेवलं.

 
सकाळी उठल्यावर पडदा बाजुला सारताच गाढ निद्रेतला सिंधुचा चेहरा त्यांनी पाहिला तेंव्हा तिच्या गालावर सुकलेले अश्रुंचे ओघळ पाहून त्यांना कसंसच झालं. 

श्या काय नवरा आहोत आपण. बाजूला बायको रडत होती आणि आपण खुशाल झोपलो होतो. काय दु:ख असेल हिला? का ते कालचं प्रकरण? का बरं नकार दिला असेल तिने वीरच्या पसंतीला? वासुअण्णांना त्यांचा लग्नानंतरचा प्रवास आठवला. लग्नानंतर वर्षभरात विराज झाला होता. विराजमधे सिंधु एवढी गर्क झाली की कधी कधी वासुअण्णांना वाटायचं,अरे आपण हिचे कोण लागतो की नाही! विराजची शाळा,अभ्यास,त्याचं खाणंपीणं यातच दिवस सरायचा तिचा. बऱ्याचदा रात्रीही विराज तिला घट्ट मिठी मारुन.  त्याची आजारपणंही तशी क्लेषदायक असायची. वर्षातून एकदा तरी हॉस्पिटलमध्ये मुक्काम व्हायचा नि त्यामुळे की काय सिंधु विराजबद्दल अधिकच हळवी बनली होती. 

कधी वासुअण्णा त्याला ओरडले तर हमखास विराजची बाजू घ्यायची जणू काही विराजचं वकीलपत्रच घेतलेलं तिने पण तरीही विराज लाडावलेला झाला नाही कारण तिची शिस्त. अति दंगा केला तर तीच त्याला धपाटे घालायची. तिने घातले तर चालायचे पण दुसऱ्या कोणी विराजवर हात उचललेला तिला कधीच खपला नाही. विराजही तिने कितीही मारलं तरी तिलाच मिठी मारुन रडायचा.

 उकळत्या चहाच्या बुडबुड्यांसारख्या कैक आठवणी वासुअण्णांच्या मनात डोकावू लागल्या. 'हिच्याशिवाय कोण आहे माझं! मुलगा काय उद्या जाईल त्याच्या पोटाच्यापाठी पण म्हातारपणीची ही काठी ठीक तर सारं काही ठीक. या काठीला जपायला हवं,'ते मनाशी म्हणाले.

 इतक्यात सिंधु मुखमार्जन करुन स्वैंपाकघरात आली होती. 

"अहो,उठवायचं होतं ना मला. काल जरा उशिरा झोप लागली."

"अगं असुदे गं. नाहीतरी रिटायर्ड माणूस मी. कुठे घाईय आपल्याला डब्याची,"असं म्हणत त्यांनी नाजूक कपांत कोरा चहा ओतला,त्यावर दूध घेतलं नि ट्रेमधे कपबशा,बिस्कीटं घेऊन ती दोघं टेरेसमधे गेली. धुक्याची चादर दूर करुन सुर्यनारायणाने पुर्वेला आपली उपस्थिती लावली होती. सकाळचं कोवळं उन्ह या थंडीत अंगाला हवंहवंस वाटत होतं. चहा घेता घेता वासुअण्णा म्हणाले,"सुधा एनिथिंग सिरियस?"

"का ओ. असं का विचारताय?"

"डोळे बघ किती सुजलेत रडूनरडून. त्या बीपीच्या गोळ्यांनी झोप येते गं लवकर नाहीतर काल एवढं रडू दिलं नसतं मी तुला. विराज उपाशी झोपला म्हणून रडलीस? अगं तो तर राग आला की उपाशी झोपतो,माहिती आहे नं तुला. आता आजीकडे गेलाय तर चांगला ताव मारुन येईल, बघ तू."

"अहो, उलट कधी नव्हे तो वीरचा रागोबा काल लवकर आवरला. स्वतःच अन्न गरम केलन. मला उठवलं नि छान गप्पा मारत जेवलो आम्ही."

"काय सांगतेस काय? बदलतोय आपला वीर. समजुतदार बनतोय. प्रेमात पडलाय म्हणून नाही ना असं! पोरगी चांगली दिसते ती पण  नेहमी त्याची बाजू घेणारी तू काल त्याच्या या निर्णयाला विरोध केलास,तेही कसलीही शहानिशा न करता.  खरं तर अशी नाहीस तू सिंधु. काय सलतय का तुझ्या मनात?"

सिंधु काहीच बोलली नाही.  निरभ्र आकाश बघत राहिली.

"टेक युवर ओन टाईम सिंधु, मला खात्री आहे तू लवकरच तुझ्या मनातलं मला सांगशील." असं म्हणत वासुअण्णांनी सिंधुच्या पाठीवर आश्वासक हात फिरवला.

*****

विराज आजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. बरेच पेशंट नंबर लावून बसले होते. आजीने तिची फाईल काऊंटरवर दिली व तिथल्या परिचारिकांना विराजकडे बोट दाखवत नातू माझा असं सांगितलं. विराजनेही त्यांना हसून सुप्रभात केलं. 

आजी वजनकाट्यावर उभी राहिली. वजनाचा काटा दोन किलोने पुढे सरकलेला बघताच आजीने तोंडावर बोटं ठेवली. अग्गोबाई,डॉक्टर ओरडतील आता,आजी म्हणाली. परिचारिका आजीची घाबरगुंडी पाहून हसल्या.

 "हसता काय गं. हल्ली थंडीतून फिरणं होत नाही तितकंस माझं. सांधे आखडतात त्याने काटा दोन घरं जास्त फिरला असेल इतकंच. आजीने परिचारिकांना लाडीक दम दिला. 

फाईल घेऊन ती दोघं खुर्च्यांवर जाऊन बसली. समोरच्या टिव्हीवर अगं बाई सासुबाई लागलं होतं. आजीने त्या बबड्याला चांगल्याच शिव्या घातल्या. सोबत बसलेल्या रुग्णांची हसून हसून पोटं दुखायला लागली. शेवटी एकदा आजीचा नंबर आला.

 विराज आजीला डॉक्टरांच्या केबिनमधे घेऊन गेला. डॉक्टरांनी आजीला नीट तपासलं. आजीच्या गप्पा चालूच होत्या. डॉक्टरांनी आजीला रक्तवाढीच्या गोळ्या लिहून दिल्या पण त्यावर आजीची तक्रार अशी कि या गोळ्यांनी परसाकडला होत नाही.

 डॉक्टरांनी तिला आयर्नचं इंजेक्शन दिलं शिवाय आहारात हिरव्या पालेभाज्या, चणे,गुळ,मनुका..असं बरंच घ्यायला सांगितलं.  डॉक्टरांच्या तब्येतीची चौकशी करुन आजी तिथून बाहेर पडली. विराजला म्हणाली,"वीरु पिझ्झा खावासा वाटतोय रे मला."

"अगं आजी त्यात काय. घरी गेल्यावर मागवतो की,"
विराज म्हणाला.

"नको घरी नको. बाहेरचं खाल्लं की हे ओरडतात. ते चीझ पाहून तर त्यांचं डोकंच उठतं. पिझ्झा म्हणे मैद्याचा,त्यापेक्षा भाकरी खा म्हणे. नेहमी काय रे भाकऱ्या खायच्या. मला म्हातारीला इवलासा चेन्ज हवा असतो रे. आमच्या हिटलरला कोण समजावणार!"

"आजी बघच तू आजोबांना सांगतो,तू ठेवलेलं त्यांचं नीक नेम हिटलर."

"तू गप रे. तसेच आहेत ते आणि चल आता गाडी डोमिनोजला वळव बघू."

 नववारी साडीमुळे आजीला मस्त सीटच्या दोन्ही बाजुंना पाय टाकून बसता आलं. वाटेत तिचं विराजला गाडी कशी सावकाश,लक्ष देऊन चालवायची यावर लेक्चर देणं चालू होतं.

विराजने पिझ्झ्याची व कोल्ड्रिंकची ऑर्डर दिली. दोघं  खुर्च्यांवर जाऊन बसले. आजीचं लक्ष त्या मुली पिझ्झ्याची भाकरी कशी लिलया थापतात मग त्यावर वेजीस,चीज कसे स्प्रेड करतात यावर होतं. इतक्यात जानुचा फोन आला. विराजने फोन उचलला.

क्रमशः

सौ.गीता गजानन गरुड.