
#सिंधुचा_पुर्वीचा_प्रियकर (भाग एक)
"विराज तू जान्हवीबत लग्न करु शकत नाहीस," विराजची आई सिंधु विराजला म्हणाली.
"कालपरवापर्यंत तर म्हणत होता तुम्ही दोघं की तुझ्या आवडीची कोण असेल,जिच्यावर तुझं प्रेम बसलं असेल तिला दाखवायला आण.
ममा, काय कमी आहे माझ्या जानुत जे तिला भेटल्याबरोबर तुमचा निर्णय बदलला. आता काय सांगू मी जानुला?
बरं काय खोट आहे माझ्या जान्हवीत ते तर सांगा. रुपाने गोरी आहे,उच्चशिक्षित आहे,प्रेमळ आहे,मनमिळाऊ आहे मग अजून काय पाहिजे तुम्हाला?"
विराज बोलत होता,बोलताबोलता अचानक थांबला नि सोफ्यावर बसला,डोक दोन्ही हातांनी गच्च् धरुन.
सिंधुने पानं वाढली पण तो जेवायलाही गेला नाही.
"जेवणावर राग काढू नये विराज, चल जेवायला."
विराज काही न बोलता त्याच्या खोलीत निघून गेला.
सिंधुने चार घास पोटात ढकलले. सिंधुचे यजमान वासुअण्णा कसलंतरी पुस्तक वाचत बसले होते.
त्यांना लवकर झोप आली.
सिंधुच्या डोळ्यासमोरुन सकाळपासूनचे क्षण चलतचित्रासारखे जात होते.
आज तिचा लाडका विराज त्याची प्रेयसी घेऊन येणार म्हणून किती खूष होती ती!
मऊ लुसलुशीत, पांढऱ्याशुभ्र इडल्या,खोबऱ्याची चटणी,चवदार सांबार अगदी दाक्षिणात्य मेन्यू केला होता तिने कारण विराजची प्रेयसी जानू हिला दाक्षिणात्य पदार्थांची आवड. विराजच्या बोलण्यातून सिंधूने जाणलं होतं ते. तिने मनात ठरवलं होतं,खूप प्रेम द्यायचं सुनबाईला.
जानूला तसं तिनं फोटोत पाहिलंच होतं पण काही म्हणा फोटोत पाहणं वेगळं नि प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला निरखणं,पारखणं वेगळं.
एखादा सरळ रस्ता असावा तसा केसाच्या मधोमध पाडलेला भांग,नुकतंच न्हाल्याने कानाच्या मागील दोन बटा घेऊन बांधलेली बटवेणी,मोकळे सोडलेले कुरळे केस,छोटीसी नाजूक टिकली,बोलके डोळे,मोत्यांसारखी लखलखणारी दंतपंक्ती,विराजच्या खांद्यापर्यंतची उंची,लांबसडक बोटं,लिंबूकलरचा चुडीदार,दोन्ही खांद्यावरती घेतलेली ओढणी..किती सात्त्विक रुप..डोळ्यात साठवावं असं.
जानूने सिंधुला व वासुअण्णांना नमस्कार केला व बोलण्यास सुरुवात केली.
तिला किती बोलू न् किती नको असं झालं होतं. वासुअण्णा तिच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देत होते.
सिंधू मात्र स्तब्ध होती. तिला वाटत होतं कि ती आधीपासूनच ओळखते जानूला पण असं लगेच कसं विचारायचं!
सिंधू स्वेंपाकघरात गेली तर तिच्यापाठोपाठ ते सळसळतं चैतन्यही आत गेलं. सिंधुशी हसतखेळत गप्पा मारतामारता तिने चौघांच्या डिश भरल्या व बाहेर घेऊन आली.
सिंधुच्या इडलीचीही तिने मनसोक्त तारीफ केली पण सिंधुचं त्याकडे लक्ष होतं कुठं!
सिंधुने शेवटी धीर करुन जानूला तिचं पुर्ण नाव विचारलं. जान्हवी प्रभाकर विसे हे शब्द तिच्या कानावर अक्षरश: आदळले. सिंधू नखशिखांत हादरली. तिने कसंबसं
स्वतःला सावरलं.
जानूने तिला पाणी प्यायला दिलं. वाफाळता चहा करुन दिला.चहा पिल्याने तिला थोडी तरतरी आली.
विराज व वासुअण्णाही सिंधुच्या जवळ आले. डॉक्टरांना बोलवू का ममा,विराजने विचारलं. सिंधुने त्याला हातानेच नको म्हणून सांगितलं.
थोड्या वेळाने विराज जानूला सोडून आला.
विराजने सिंधुच्या गळ्यात हात घालत लाडिकपणे विचारलं,"ममा,आवडली ना माझी आवड!"
क्रमशः
काय सांगेल सिंधू लेकाला? सिंधु विराजच्या प्रेयसीला बघून का दचकली? पाहुया पुढच्या भागात
सौ.गीता गजानन गरुड.