सिंधुचा पुर्वीचा प्रियकर (भाग 2)

Sindhucha purvicha priyakar

सिंधुचा पुर्वीचा प्रियकर(भाग 2)

सिंधुच्या इडलीचीही तिने मनसोक्त तारीफ केली पण सिंधुने शेवटी धीर करुन जानूला तिचं पुर्ण नाव विचारलं. जान्हवी प्रभाकर विसे हे शब्द तिच्या कानावर अक्षरश: आदळले. सिंधू नखशिखांत हादरली. तिने कसंबसं 
स्वतःला सावरलं. जानूने तिला पाणी प्यायला दिलं. वाफाळता चहा करुन दिला.चहा पिल्याने तिला थोडी तरतरी आली. थोड्या वेळाने विराज जानूला सोडून आला. 

विराजने सिंधुच्या गळ्मात हात घालत लाडिकपणे विचारलं,"ममा,आवडली ना माझी आवड!"

आत्ता पुढे--

सिंधू म्हणाली,"तू दुसरी एखादी मुलगी शोध पण प्लीज हिला विसर."  बिचारा विराज हिरमुसला. साहजिकच होतं त्याचं हिरमुसणं. तो वयात आल्यापासून त्याच्या प्रत्येक निर्णयाला ममापप्पांनी पाठिंबा दिला होता. घरातल्या महतत्वाच्या निर्णयांमधेही त्याचा सल्ला घेत होते दोघं. 

वेळोवेळी त्यांनी विराजला सांगितलं होतं की तुझी निवड ही आम्हाला मान्य असेल. तू चुकणार नाहीस ही खात्री आहे आम्हांला आणि चुकलास तरी आम्ही आहोत पाठिशी.

सिंधू भूतकाळात गेली. तिला आठवलं,तिचं कॉलेज,कॉलेजचा केम्पस. मवामिमध्ये असणारा प्रभा. प्रभाकरचं गाणं,त्याचे नाटकातले संवाद,त्याचा अभिनय हे सारं पाहून सिंधू फिदा झालेली त्याच्यावर व त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी तिने मराठी वाङमय मंडळात प्रवेश घेतला होता.

 प्रभा तिचा सिनिअर होता. कॉलेजमधे वट होती त्याची. सिंधुचा डान्स परफॉर्मन्स, तिचं अदबीचं वागणं,मोहक रुप पाहून प्रभालाही सिंधू आवडू लागली होती. 

दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या,प्रेमाचं रोपटं रुजत गेलं. हळूहळू सिंधुच्या घरी ही कुणकुण लागली. सिंधुच्या भावाने सिंधूला प्रभाकरच्या स्कुटरवर त्याला बिलगून बसलेलं पाहिलं होतं. 

सिंधुच्या वडिलांनी तिच्या गालावर त्यांची पाचही बोटं उमटवली. पँटीचा पट्टा काढला नि सपासप मारत राहिले तिच्या अंगाखांद्यावर. सिंधुची आई मधे गेली,तिच्याही हातावर पट्टा सापकन बसला. 

सिंधुचं कॉलेज बंद झालं, त्यानंतर व तिचं लग्न तिच्या आत्तेभावाच्या मुलाशी म्हणजेच वासुशी लावण्यात आलं.   सगळं अगदी आठवडाभरात झालं. 

सिंधूने तिच्या मैत्रिणीकरवी प्रभाकरला पत्र पाठवून सांगितलं होतं,"प्रभा,मला विसरुन जा. तू लग्न कर नि सुखी रहा. ही दुनिया आपल्याला एक होऊ देणार नाही. माझ्यामुळे तुझे कोणी हाल केले तर ते मला पहावणार नाहीत." सिंधूचं लग्न झाल्यानंतर प्रभाला ही चिठ्ठी मिळाली. प्रभाकर अगतिक झाला. किती स्वप्नं पाहिलेली त्याने सिंधुसोबतच्या भावी आयुष्याची!

 सिंधूचं लग्न झालं यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता पण ते आसवांनी भिजलेलं पत्र सिंधुचंच होतं. तिचं वळणदार अक्षर तो पाणावलेल्या डोळ्यांनी बघत राहिला.

 तिचं लग्न झाल्यामुळे पुढे पाऊल उचलण्यात अर्थ नव्हता. प्रभा पुढच्या शिक्षणासाठी दूर त्याच्या मामाच्या गावी निघून गेला. सिंधूला विसरणं त्याला शक्यच नव्हतं पण  विवाहित स्त्रीचा विचार करणं हाही अपराध होता.

******

इकडे विराजला जानूचा फोन आला.

"काय मग आवडली नं सुनबाई तुझ्या ममाला. अरे आवडणारच. आपण म्हणजे आपणच आहोत. आपुन आपुनपेही खुष है आज. इतना अच्छा पती,सास और ससूर जो मिले है. खरंच विराज तुझ्या मम्माच्या हातचं इडली सांबार रे. काय अफलातून बनवतात त्या. 

असं वाटतय त्या अण्णा लोकांना गोळा करुन तुझ्या मम्माकडे ट्रेनिंगला ठेवावं. कदाचित  आपलं लग्न झालं ना कि मी नोकरी सोडून देईन नि आम्ही सासूसुना मिळून एखादं दाक्षिणात्य उपहारगृह खोलू. काय बोलतोस! दिमाग है न मुझे डार्लिंग."

"जान,जरा ऐकून घेशील माझं?"

"हम्म. बोल ना वीर."

"आई नाही म्हणतेय. तीचं म्हणणं आहे तू नकोस तिला सून म्हणून."

"वीर काय बोलतोयस तू! असं होतं तर त्यांनी मला तुमच्या घरीच का नाही सांगितलं? तेंव्हा का गप्प बसल्या? मी आताच येतेय तुझ्या घरी वीदीन थर्टी मिनट्स."

"जान,वेडेपणा करु नकोस गं."

"मग हातावर हात धरुन बसून राहू! तू काही बोलणार नाही तुझ्या मम्माला आणि मी विचारेन तर तेही नाही म्हणतोस. ते काही नाही मी मम्मापप्पांना घेऊन येतेय तिकडे. बाय द वे माझ्या मम्मापप्पांना तू पसंत आहेस. ते तुझ्या मम्माचं मन नक्कीच वळवतील."

"बरं जान पण आता खूप रात्र झालीय गं. आज नको."

"उद्या सकाळीच येऊ का अंघोळीच्या अगोदर येऊन बसते. उपोषणच करते तुझ्या घरासमोर. मग कळेल तुझ्या मम्माला."

"जानू,तू तू यातलं काही करणार नाहीएस."

"बरं. जेवलास वीर?"

"अं हो."

"खोटं बोलतोयस तू . उपाशी आहेस. जा मम्माला सांग तुझ्या जेवण वाढायला."

"उद्या जेवेन मी."

"वीर मला माहितीय किती भुक्कड आहेस तू. भुक तुझ्या डोक्यात जाते आणि ममावर रे कसला राग तेही अजून लग्नाची न झालेल्या बायकोवरुन."

"कशी गं अशी तू!"

"मी नं मी अशीचय बघ. वीर,अरे आई आई असते रे. ती कितीही काहीही बोलली तरी रागवू नकोस तिच्यावर. तीही नीट जेवली नसणार. तिच्या नकाराचं कारण आपण काढू हळूहळू शोधून पण प्लीज जेव जा. तुच सगळं गरम करत ठेव आणि मग वाढ तिला."

"जानू किती गं गोड्ड आहेस तू. एक किस्सी दे बघू आता."

"जा जा आधी जेव जा. किस्सी हम आपको आपके घर आके आपके ममापपा के सामने देंगे."

"ए बाई आसलं काय करु नको. पाया पडतो तुझ्या. चल बाय."

"बाय स्वीट हार्ट"

जान्हवीचं म्हणणं विराजला पटलं. काहीतरी विशेष कारण असल्याशिवाय ममा नाही म्हणायची नाही. शट उगाच रागवलो अन्नावर,तो मनाशीच म्हणाला.

 वीराजने फ्रीजमधलं त्याच्या आवडीचं टोमेटोचं सार,फरसबीची भाजी काढली नि गरम केली. कुकरमधील भात पाहून त्याच्या लक्षात आलंच,ममा नीट जेवली नाही ते. 

त्याने कुकर गरम होत ठेवला नि तो बेडरुममधे गेला. पप्पा घोरत होते नि मम्मा. ती एका कुशीवर बिछान्याच्या कडेला होती. वीर दबक्या पावलांनी तिच्याजवळ गेला. मम्माच्या गालावरुन अश्रु ओघळत  होते. 

उशीचा एक कोपरा ओला झाला होता. 'म्हणजे ही कितीवेळ अशी रडतेय? का एवढा त्रास करुन घेतेय स्वतःला', विराज स्वत:शी पुटपुटला.

 त्याने मम्माच्या पाठीवर हात ठेवला व लाडिकपणे तिच्या कुशीत तोंड खुपसत म्हणाला,"मम्मा,सॉरी गं. चल ना वाढ. मला भूक लागलीय भरपूर. टोमॅटोचं सार येतय डोळ्यासमोर." वीरचं बोलणं ऐकून मम्मा त्याही स्थितीत हसली. 

मग दोघा मायलेकरांनी इकडचंतिकडचं बोलत जेवण उरकलं. 

क्रमश:

सौ. गीता गजानन गरुड.
(मग काय मंडळी,आवडतेय नं जानुविराजची जोडी! भेटुया पुढच्या भागात.)

🎭 Series Post

View all