अगदीच अनोळखी स्नेहश्री आणि गंधारचा एकमेकांना एसेमेस करायचा सिलसिला सुरु झाला. तिचा मेसेज आणि दिवसाची सुरुवात असं समीकरणच व्हावं या विचारात तो असतानाच होणाऱ्या अपघातातून वाचतो.....आता पुढे..
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र,त्यांची नावे,स्थळांची नावे कथेच्या परिणामकारकतेसाठी घेतली आहेत.योगायोग असतोच.)
सीमोल्लंघन : ५ – तू आलीस आणि...
बऱ्याच दिवसांनी स्नेहश्री आयुष्यात काहीतरी नवं घडतंय म्हणून खुश होती. पण आपण एका अनोळखी पुरुषाशी बोलतोय...तेही अचानक,अनवधानाने भेटलेल्या पुरुषासोबत.... हे जे काही आहे ते असंच राहील का नेहमीप्रमाणे एखादं वादळ घेऊन येईल काहीच माहिती नाही. अजून गंधारचा काहीच अंदाज येत नाही....एक दोन दिवसात,तेही एसेमेस वरून किती पारख करू शकतो आपण ? काहीही असो पण आपल्याला बोलावंसं वाटतयं हे खरे आहे.
मन मनास उमगत नाही.
उगा उसासा देह वाही....
सहज ओठावर ओळी आल्या तिच्या. पण अचानक डावी पापणी फडफडू लागली....स्मिताची जागा चिंतेने घेतली. काही होणार तर नाही ना...आपण नेहमी तुटणाऱ्या फांदीवर बसत आलोय...सुरुवाती पासूनच. मग झाड कोणतंही असूदे. उठून एक ग्लास पाणी पिले....आणि मोबाईल चेक केला. कोणताही मेसेज नव्हता. मन खट्टू झालं....करावा का मेसेज...? आपण आता तो कामात असेल.. अजून आपली म्हणावी तशी ओळख नाही शिवाय बरं दिसत नाही. तो विचार खोडून कामाला लागली ती.
................. ..................... ................ ...............
घाबरत घाबरतच ऑफिसमध्ये गेला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.....गंधार दचकला. आपण लेट झालोय म्हणून सार्वजनिक अपमान तर करायचा मूड नसेल ना सरांचा...? आणि सर स्वतः देखील टाळ्या वाजवत आहेत....तेही उत्साहाने आणि जोरजोराने. काय कळायला मार्ग नव्हता. गंधार रिसेप्शन कौंटर पर्यंत पोहोचायच्या आत सर स्वतः पुढे आले आणि हातात बुके दिला. अजूनही तो स्तिमितच होता.
“अभिनंदन गंधार, तुझं उत्कृष्ट काम आणि तुझी मेहनत नेहमीच पाहात आलोय....आज ती फळाला आलीय....तुझं प्रमोशन केलंय मी....आजपासून तू या केबिनमध्ये बसायचं...”
सरांनी एका केबिनकडे बोट करून सांगितले. आता गंधार भानावर आला....पाठीतल्या वेदना...तो अपघाताचा निसटलेला प्रसंग....सगळं विसरून गेला. आनंदाने सरांनी दिलेला बुके स्वीकारला...पुन्हा जोरजोरात टाळ्या वाजल्या....एक क्षण एक अनोळखी चेहरा डोळ्यासमोरून तरळून गेला.ओळख पटली नाही पण काही तरी जादू असल्याची खात्री पटली. सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देवून तो आपल्या नव्या केबिनकडे वळला...
काचेचा दरवाजा ढकलून आत गेला आणि दुसरा धक्का बसला गंधारला. ती प्रशस्त केबिन. बाहेरचा त्रास विसरायला लावणारी एसीची मंद हवा. आरामदायी आणि तितकीच स्टायलिश चेअर. समोर इंटरकॉम. एडव्हान्स डेक्स्टओप काम्पुटर.टेबलवर ठेवलेला भरगच्च फुलांचा आकर्षक बुके. प्रेसेंटेशन साठी छोटासा प्रोजेक्टर.......कितीतरी वेळ तो हे सगळे पुनःपुन्हा पाहून घेत होता. मनात आणि डोळ्यात साठवत होता. हे त्याचं श्रेय होतं. विनातक्रार,विनाविश्रांती अन कोणत्याही प्रकारची तडजोड न करता तो या जागेवर पोहोचला होता.कदाचित वेळ गेला असेल पण हे होणार याची खात्री होतीच त्याला. ओढल्यासारखा चेअरकडे गेला. पण एकवेळ सहज हात फिरवला....स्पर्श अनुभवला आणि मगच बसला तो....आणि थोड्या वेळासाठी डोळे मिटले त्याने....किमान काही वेळ त्याला कुणी डिस्टर्ब करणार नव्हतं.....
............. ................ .................. ............
रात्रीचे साडेनऊ झाले होते. सगळं आटोपून स्नेहश्री नुकतीच रेलली बेडवर. उशाशी रेडीओ होताच.....”तुम आ गये हो....नूर आ गया है....” कानावर पडत होते. एक मेसेज झळकला.
“सॉरी आज वेळ मिळाला नाही.काही सांगायचं आहे.एक गुड आणि एक बैड न्यूज आहे....कोणती आधी सांगू..?
तिच्या मनात दिवसभर आधीच गोंधळ चालू होता. डोळा....पापणी...फडफड...अन काय काय... त्यात हा असा काय प्रश्न विचारतोय...? घाईघाईतच तिने रिप्लाय दिला....
“आधी बैड न्यूज सांगा......पण लवकर...काळजी वाढवू नका.”
तिची बोटे स्क्रीनवर भिरभिरत होतीच...रिप्लाय आला.
“सकाळी ऑफिसला जाताना अपघात होता होता राहिला माझा....पण काळजी करू नका..मला अगदी खरचटलेलं देखील नाही....एका भल्या तरुणाने वाचवलं मला.”
वाचून जीव भांड्यात पडला आणि ती सावरून बसली. चिंता संपली आणि उत्कंठा लागली..
तिने पुन्हा मेसेज केला....
“गुड न्यूज सांगा ना...पटकन.”
काही वेळातच रिप्लाय आला.
“आजचा दिवस माझा होता हेच खरे.म्हणूनच कदाचित सुखाआधी एक झलक दाखवली त्याने. अपघाताचं निमित्त करून. मला आज ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं. एक साधा इम्प्लोयी आज एका प्रशस्त केबिनचा हक्कदार झाला. दोनेक वर्षे अविरत केलेल्या कष्टाचे चीज झाले.मला वाटतं...अगदी मनापासून वाटतंय तुम्ही मला भेटलात आणि मला गुड न्यूज मिळाली. तुम्हाला पटणार नाही पण हेच खरे आहे.”
मेसेज वाचून स्नेहश्री खूपच खुश झाली. तिने रेडिओचा आवाज मोठा केला. निवेदिका मधाळ आवाजात शेर ऐकवत होती.....
“ क्या करू जो मनमौजी हिरन बन जाऊं.
बडे सैलाब देखे है इन आंखों ने...अब कहता
है दिल ....तुम्हारी ख़ुशी का कारण बन जाऊं...!”
क्रमशः.......