सीमंतिनी भाग १

ही कथा आहे एका सीमंतिनीची जिने सीमोल्लंघन केले.
भाग 1
मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरील एका आलिशान रिसॉर्टमध्ये बिचच्या अगदी जवळ लग्नाचीनुसती घाई उठली होती. त्या रिसॉर्टचा लॉन माणसांनी अगदी फुलून गेला होता. एकीकडे माणसांची घाई गडबड दुसरीकडे मंद स्वरात वाजणारी सनई आणि या सगळ्यांशी काहीच घेणं देणं नसणारा तो निळाशार खळाळनारा समुद्र! त्याच्याच मस्तीत तल्लीन झालेला. सीमंतिनी तयार होत होती. सीमंतिनी म्हणजेच जीच आज लग्न होते ती कुमारी सीमंतिनी रुपेश मोहिते आज सौभाग्यवती सीमंतिनी मोहित खोत होणार होती. सीमंतिनी दिसायला अगदी सौंदर्याची परिसीमाच जणू! गुलाबीसर गोरा रंग, कमळपुष्पासारखे डोळे, सरळ नाक, रेशमी मऊ काळे भोर केस आणि गुलाबाच्या पाखळ्यासारखी नाजूक जीवनी, गोबरे गाल, उजव्या गालावर पडणारी जीवघेणी खळी,सुडौल बांध्याची पण भरलेल्या अंगाची!

पाहता क्षणी कोणी ही प्रेमात पडावे असे व्यक्तिमत्त्व! त्यातून उच्चशिक्षित! आज तिचेच तर लग्न होते. तिला तर सगळे स्वप्नवत वाटत होते. सात वाजताच्या गोरज मुहूर्तावर लग्न होते आणि ती तयार होत होती. तिला तयार करणारी ब्युटीशीयन तिला म्हणाली.

“ मॅडम या गुलाबी नव्वारी साडीत तुम्ही एखाद्या महाराणी सारख्या दिसत आहात!”

आणि सीमंतिनी हसली. तिथे तिची काकू ती तयार झाली का पहायला आली होती आणि तिने त्या ब्युटीशीयनचे बोलणे ऐकले. ती तिला म्हणाली.

काकू,“ये बाई नजर लावशील आमच्या पोरीला बरं सीमा झालं का ग सगळं?मुहूर्तजवळ आला आहे. जावईबापू आत्ता येतील पारण्यावरून मग तुला असशील तशी घेऊन जातील ग मंडपात! त्या आधीच सगळं आवरून घे. बाकी तू मुळातच सुंदर आहेस म्हणा मोहितराव उगीच मोहित झाले का?” त्या मिश्किलपणे तिला चिडवत बोलत होत्या.

सीमंतिनी,“काय ग काकू!” ती लाजून म्हणाली आणि बाहेर वाद्यांचा आवाज सुरू झाला.

काकू,“ पारण्यावरून आले बघ मोहितराव! जाते मी आणि एकदा पाहून घे सगळं आणि ये बाई हिला काजळाची टिथ लाव. नजर नाही लागणार म्हणजे.” त्या म्हणाल्या आणि निघून गेल्या.


थोड्याच वेळात सीमंतिनीला मंडपात बोलावण्यात आले. ती मंडपात आली तर मोहित सहित सगळ्यांचे डोळे तिच्याकडे होते पण ती मात्र मोहितला पाहत होती. मोहित खोत, खानदानी श्रीमंत तरुण! दिसायला सावळा पण नाकीडोळी नीटस आणि अंगापिंडाने मजबूत, चेहऱ्यावर खानदानीपणाचे तेज आणि नाही म्हणले तरी डोळ्यात एक अहंकाराची छटा!

सगळे कुजबुजत होते की मोहितला खूप देखणी बायको मिळाली आणि सीमंतिनीने श्रीमंत नवरा मिळवून नशीब काढले. सीमंतिनीला तर सगळं स्वप्नवत वाटत होतं. कारण तिने कधीच विचार केला नव्हता की तिने तिच्या लग्नाबद्दल पाहिलेले हे सुंदर स्वप्न सत्यात उतरेल.

हो सीमंतिनीचे स्वप्न होते की तिचे लग्न समुद्राच्या साक्षीने व्हावे कारण ती लहानपणापासून अथांग सागराच्या प्रेमात होती. तिला कायम समुद्राची गाज त्याची अथांगता खुणावायची. तिचा पहिला प्रियकर तर हा समुद्रच तर होता आणि तिला या तिच्या प्रिय रत्नाकराच्या साक्षीने लग्न करायचे होते. लग्ना आधी तिने सहजच तसे मोहितला बोलून दाखवले होते आणि त्याने तिची इच्छा पूर्ण केली होती. तिचे स्वप्न सत्यात त्यानेच तर उतरवले होते. तिला आज स्वतःच्याच नशिबाचा हेवा वाटत होता.

ती बोहल्यावर उभी राहिली आणि लग्न सोहळा क्षितिजावरून अस्ताला जाणाऱ्या सुर्याच्या बरोबरीने सागराच्या साक्षीने पार पडला. सगळे विधी पार पडले आणि सीमंतिनी तिच्या सासरी निघाली. तिच्या बाबांनी मोहितच्या हातात विघ्नहर्त्याची मूर्ती दिली आणि ते हात जोडून म्हणाले.

बाबा,“ माझ्या लेकीला सांभाळून घ्या. आजपासून ती तुमच्या घरची झाली.”ते म्हणाले

मोहित,“ हात नका जोडू बाबा मी सांभाळून घेईन तिला, तुम्ही काळजी करू नका.”त्याने त्यांना आश्वस्त केले.

सीमंतिनीच्या आईने तिच्या हातात अन्नपूर्णेची मूर्ती दिली आणि ती म्हणाली.

आई,“ सीमा तुझं नाव मी सीमंतिनी ठेवलं कारण तू माझ्या पोटात असताना मी शिवलीलामृत वाचत होते आणि त्यातील एका अध्यायात मला सीमंतिनी भेटली. सीमंतिनी म्हणजे जिच्या सौंदर्याला सीमा नाहीत अशी आणि सीमंतिनी म्हणजे जिच्या पती प्रेमाला पारावार नाही अशी! तू आता खोतांच्या घरात सून म्हणून चालली आहेस. ते घर बिना बाईचे आहे इतके वर्षे झाली. मोहितराव आईच्या मायेपासून वंचित आहेत. तुला आता त्यांची बायको नाही तर आई देखील व्हायचे आहे. तुझ्या सासऱ्यांची सून नाही तर मुलगी बनून सेवा कर!” त्यांनी तिला सांगितले.

आणि सीमंतिनी उराशी सप्तरंगी स्वप्नाची आरास घेऊन तिच्या सासरी निघाली. ती गाडीत मोहित शेजारी बसून त्याच्याकडे चोरटा कटाक्ष टाकत होती. मोहतचे मात्र तिच्याकडे लक्ष नव्हते. पहाटे कधी तरी ते पुण्यात पोहोचले. घरात असलेल्या मोहितच्या मावशीने तिचे स्वागत केले आणि माप ओलांडून तिने गृहप्रवेश केला. ती आज पहिल्यांदा मोहितचे घर पाहत होती. घर कसले दोन मजली टुमदार बंगलाच तो! गेटमधून आत गेलं की छान बाग होती. तिथे वेगवेगळी फुलझाडे आणि वृक्ष दिमाखात उभे होते. एका बाजूला गाड्यांचे गॅरेंज समोर दोन-तीन पायऱ्या चढून गेलं की पोर्च,आत प्रवेश केला की मोठा प्रशस्त हॉल, एका बाजूला किचन आणि तीन रूम दिसत होत्या. तर वर ही बऱ्याच रूम होत्या. दिमतीला नोकर चाकर होतेच. सीमंतिनीला आणि तिच्याबरोबर पाठराखण म्हणून आलेल्या तिच्या आते बहिणीला वरची एक प्रशस्त रूम देण्यात आली. सगळेच प्रवास करून थकले होते. त्यामुळे सगळे झोपायला निघून गेले. सीमंतिनी आणि तिची आते बहीण मुक्ता देखील रूममध्ये जाऊन झोपल्या.

सीमंतिनीला अंमळ उशीराच जाग आली. तिने घड्याळ पाहिले तर दहा वाजून गेले होते. ती मुक्ताला उठवत म्हणाली.

सीमंतिनी,“ मुक्ताताई अग उठ दहा वाजले आहेत.”

मुक्ता,“ खरंच की ग! चल बाई आवरून खाली जाऊ. आज काय आरामच आहे म्हणा, उद्या सत्यनारायण पूजा आहे पण सीमे नशीब काढलेस ग बाई! चांगलं समृद्ध सासर आणि मोहित सारखा देखणा नवरा मिळाला. त्यात सासू नाही म्हणल्यावर आता या घराची स्वामिनी तूच की! आता फक्त मोहितरावांना कस मोहित करायचं ते पहा बाई! तुझ्यासाठी ते काय अवघड आहे म्हणा निसर्गाने तुझ्या पदरात हे आरस्पानी सौंदर्य तर आधीच घातले आहे.” ती तिला चिडवत बोलत होती.

सीमंतिनी,“ काय ग ताई!”ती लाजत म्हणाली.

मुक्ता,“ आता हे लाजने मोहितरावांसाठी राखून ठेव बाई!” ती तिला पुन्हा चडवत म्हणाली.

सीमंतिनी,“ किती चिडवशील ताई? बास कर ना चल लवकर आवरून खाली जाऊ; नाही तर मला म्हणायचे सून किती आळशी आहे.” ती म्हणाली.

मुक्ता,“ हो चल!” ती म्हणाली.

आणि दोघी तयार होऊन खाली गेल्या तर सीमंतिनीची मावस सासू रेखा त्यांनाचीच वाट पाहत होती.

रेखा,“ ये ग सीमा. नाष्टा करा आधीच खूप उशीर झाला आहे. थोड्या वेळाने जेवणाची वेळ होईल.” त्या म्हणाल्या.

सीमंतिनी,“ ते रात्र प्रवासात गेली आणि पहाटे थकून झोप लागली. लवकर जागच नाही आली.” ती संकोचून बोलत होती.

रेखा,“ अग इतकं संकोचून काय सांगतेस? आज तूच काय सगळेच उशिरा उठले आहेत. मोहित ही आत्ताच उठून आणि ऑफिसला गेला. कसली मिटिंग आहे म्हणत होता.” त्या तिला म्हणाल्या.

सीमंतिनी,“ हे ऑफिसला गेले पण!” ती आतून खट्टू झाली पण तिने चेहऱ्यावर तसे दाखवले नाही.

रेखा,“ हो गेला. येईल दुपारपर्यंत घरी! तुम्ही दोघी नाष्टा करा आणि आराम करा. खूप दगदग झाली आहे सगळ्यांचीच!” त्या म्हणाल्या.

सीमंतिनी मात्र मनातून खट्टू झाली होती. ती मनात बोलत होती.

‛मोहित ऑफिसला निघून देखील गेले. मला एकदा भेटावस देखील नाही वाटलं त्यांना!मला तर वाटलं होतं कमीत कमी एकदा तरी रूमकडे येऊन जातील पण ते तर एकदा ही फिरकले नाहीत. कदाचित मुक्ताताई आहे म्हणून संकोचले असतील पण सीमंतिनी मॅडम चूक तर तुमची ही आहे. तुम्ही कुठं लवकर उठला आज! तुम्ही लवकर उठला असतात तर अशी चुकामुक झाली नसती. असो येतील दुपारून घरी!’

तिने स्वतःची समजूत घातली.

सीमंतिनी खुश होती. तिला कोणाला ही हेवा वाटावा असे सासर आणि नवरा मिळाला होता. ती मोहित बरोबरची सुख स्वप्ने पाहण्यात गढून गेली होती.
©स्वामिनी चौगुले

तर वाचक हो,
नमस्कार, आजपासून मी तुम्हांला घेऊन जाणार आहे एका नवीन प्रवासाला! एक नवीन कथा! नवीन पात्रे आणि एका नवीन कथेची सुरुवात आपल्या सीमंतिनी बरोबर! चला तर मग..

तुमचे लाईक्स आणि कमेंट्स माझ्यासाठी अमूल्य आहेत तर नक्की माझ्या कथेला लाईक आणि कमेंट करा आपल्या इरा पेजवर!







🎭 Series Post

View all