सीमंतिनी भाग २

कथा एका सीमंतिनीच्या सीमोल्लंघनाची


भाग 2
      सीमंतिनी डोळ्यात प्राण आणून मोहितची वाट पाहत होती पण दुपारी मोहित घरी आलाच नाही. ती थोडी हिरमुसली. तिने पाहिलेल्या किंवा मनात रंगवलेल्या चित्रा पेक्षा हे काही तरी वेगळच घडत होते.कारण तिला वाटत होतं की मोहित तिच्या भोवती पिंगा घालेल. तिला हवं नको पाहिल पण हे सगळं तर सोडाच पण मोहितने तिला साधा फोन देखील केला नव्हता की मेसेज देखील केला नव्हता. शेवटी तिनेच न राहवून चारच्या पुढे मोहितला फोन केला. त्याने फोन उचलला.

मोहित,“ हा बोल ग सीमा!”तो म्हणाला.

सीमंतिनी,“काही नाही आज तुम्ही न भेटताच गेलात मला!” ती नाराजीने म्हणाली.

मोहित,“ अग महत्त्वाची मिटिंग होती म्हणून ऑफिसला यावं लागलं. दुपारी यावं म्हणलं होत घरी पण नाही जमलं ग! उद्यापासून मी आठ दिवस ऑफिसला येणार नाही तर मग वेळच वेळ आहे आपल्याकडे मॅडम!” तो तिला हसून म्हणाला आणि ती मोहरली..

सीमंतिनी,“ बरं ठेवते मग मी!” ती लाजून म्हणाली आणि तिने फोन ठेवला.
★★★

संध्याकाळी मोहित ऑफिसमधून आला. घरात बरेच पाहुणे होते. सगळे उद्या सत्यनारायणाची पूजा करून जाणार होते. त्यामुळे दोघांना ही तसा एकांत मिळाला नाही.दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेची गडबड सुरू होती. आज सीमंतिनीचे आई-बाबा, भाऊ-वहिनी देखील येणार होते. त्यामुळे सीमंतिनी खुश होती.

मोहित आणि सीमंतिनी पूजेला बसले. ठरल्याप्रमाणे तिच्या माहेरचे लोक बारा वाजेपर्यंत पोहोचले. पूजा साग्रसंगीतपणे पार पडली. जेवणाळी उठल्या. सीमंतिनीच्या माहेरच्या लोकांचा यथोचित मान सन्मान करण्यात आला. खरं तर रितीप्रमाणे पाठराखण करायला आलेल्या स्त्रीला साडी-चोळी देऊन पाठवण्याची पध्दत आहे पण मोहितने पाठरखीण म्हणून आलेल्या मुक्ताबरोबर त्याच्या मावशीला सांगून पूजेला आलेल्या सीमंतिनीच्या आईला, काकुला, वहिनीला आणि चुलत बहिणींना देखील पैठणीचे आहेर केले तसेच तिचे बाबा, भाऊ आणि बाकी पुरुषांना देखील चांगले कपडे घेतले. त्यामुळे सीमंतिनी बरोबर तिचे आई-वडील आणि बाकी लोक देखील खुश होते.

ते जायला निघाले आणि तिच्या आईने तिच्या वहिनीला सीमंतिनीला समजावून सांगायला रूममध्ये पाठवून दिले. तिच्याबरोबर मुक्ताताई देखील होती.

मीरा वहिनी,“ सीमाताई खरं तर हे सगळं सांगायची तुम्हाला गरज नाही कारण तुम्ही शिकल्या सवरलेल्या आणि चार मैत्रिणींमध्ये वावरलेल्या आहात तरी देखील मी तुम्हांला समजावून सांगायला आले आहे. आज तुमची पहिली रात्र आहे आणि उद्या तुम्ही फिरायला जाणार आहात. तर प्रत्येक पुरुष या बाबतीत वेळगा असतो पण सगळ्या पुरुषांची त्यांच्या बायकोकडून एकच अपेक्षा असते. ती म्हणजे तिने त्यांना शरीर सुख द्यावं. एखादा पुरुष समंजस असतो तर एखादा धसमुसळा आणि रांगडा! आता मोहितराव त्या बाबतीत कसे आहेत आपल्याला माहीत नाही तरी जर आज रात्री तुम्हांला काही त्रास झाला किंवा त्यांनी धसमुसळेपणा केला तर नाही म्हणायचं नाही किंवा तक्रार देखील करायची नाही. थोडा त्रास होईल पण पुन्हा सवय होऊन जाईल आणि तुम्हांला देखील ते सुख हवेहवेसे वाटायला लागेल फक्त थोडी कळ सोसावी लागेल. एक लक्षात ठेवा नवऱ्याला स्वतःच्या ताब्यात ठेवायचं असेल आणि संसार सुखाचा करायचा असेल तर त्याला हवं ते हवं त्यावेळी हवं तसं देणं खूप गरजेचं असतं. नवरा सुखी झाला तर तो तुम्हांला सुखी करेल.” त्या म्हणाल्या.

मुक्ता,“ मीरा बरोबर बोलत आहे ग सीमा! तू थोडं समजून घे. मग बघ मोहितरावांना तुझ्याशिवाय चैन पडणार नाही.” ती तिला हसून म्हणाली.

सीमंतिनी दोघींचे बोलणे शांतपणे ऐकत होती. पण आता तिच्या मनात पहिल्या रात्री विषयी थोडी भीती निर्माण झाली होती. मोहित तिच्याशी कसा वागेल हे तिला ही सांगता येत नव्हते. पण या दोघींचे बोलणे ऐकून तिने ठरवले होते की त्या म्हणतात तसेच करायचे. दोघी ही तिला त्यांच्या पध्दतीने समजावून बाकी सगळ्यांबरोबर निघून गेल्या. घरात असणारे बाकी पाहुणे देखील निघून गेले होते. घरात आता फक्त मावशी, सासरे, मोहित आणि नोकरचाकर होते. दिवस असाच निघून गेला. आता संध्याकाळ झाली. सगळ्यांची जेवणे झाली आणि मोहितच्या मावशीने तिला तयार केले. सीमंतिनी हिरवी जर्द पेशवाई नेसली होती. जी तिच्या हळदिने खुलून आलेल्या गोऱ्या रंगला खुलवत होती. केसात मोगऱ्याचे गजरे, कानात सोन्याचे झुमके, गळ्यात राणी हार,गंठन आणि मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा त्यात सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, तोडे हातावर चॉकलेटीसर रंग आलेली मेहंदी आणि चेहऱ्यावर नव्या नवरीचे तेज मेकअपची तर गरजच भासली नाही तिला! एकूण ती एखाद्या अप्सरे पेक्षा कमी दिसत नव्हती.

मावशीने सीमंतिनीची ओटी भरली आणि मोहितच्या सजवलेल्या रूममध्ये नेऊन सोडले. सीमंतिनी रूम न्याहाळत होती. प्रशस्त आणि टापटीप रूम,एका बाजूला दोन मोठाले वॉर्डरोब, एका बाजूला स्टडी टेबल, त्यावर मोहितची आणि त्याच्या आई-बाबांची फोटो फ्रेम होती. एका बाजूला गॅलरीत उघडणारे दार होते जे बंद होते. मधोमध गुलाबाच्या फुलांनी आणि पाखळ्यांनी सजवलेला मोठा बेड आणि त्याच्या दोन्ही साईडला कॉर्नरपीस होते. तिने तिच्या हातातला दुधाचा ग्लास कॉर्नरपीसवर ठेवला.

तिच्या पोटात भीतीने गोळा ही येत होता आणि फुलपाखरे देखील उडत होती. तिच्या लग्न झालेल्या मैत्रिणीने सांगितलेले अनुभव तर तिची वहिनी आणि ताई सांगत होती त्यापेक्षा वेगळे होते. तिच्या मैत्रिणीने तिचा अनुभव सांगितला होता त्यात तिच्या नवऱ्याने म्हणे तिला हळुवारपणे आणि तिच्या कलाने खुलवले होते. त्यामुळे लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी अविस्मरणीय झाली होती. मोहित तिच्याशी कसा वागेल हा प्रश्न तिला पडला होता. तो तिच्या कलाने घेईल की वहिनी म्हणते तसं वागेल? तिच्या मनात प्रश्न पिंगा घालत होते.शेवटी तिने स्वतःला समजावले जो माणूस आपल्या इच्छे खारत इतक्या लांब मालवणला लग्न करू शकतो. तो माणूस आपल्याला त्रास होईल असे कसा वागेल. तितक्यात दार उघडले आणि ती सावरून बसली.

मोहित आला होता.त्याने तिला पाहिले आणि स्माईल केले.तिला काहीच न बोलता तो चेंज करायला निघून गेला.तिला वाटले होते की मोहित तिला पाहून पाहतच राहील तिलाजवळ घेईल आणि तिच्या सौंदर्याची स्तुती करेल कारण आज सगळेच तिला पाहून मोहितला सुंदर बायको मिळाली असे म्हणत होते.मोहितची मावशी तर तिला तयार करताना म्हणाल्या होत्या.

“सीमंतिनी तुझं नाव तुझ्या आईने खरंच विचार करून ठेवले आहे. तू सौंदर्याची परिसीमा आहेस बघ! किती सुंदर दिसत आहेस.मी बाई असून तुझ्यावर मोहित झाले तर मग मोहित तर पुरुष आहे. आज तो तुला लवकर सोडणार नाही बघ तयार रहा.” त्या हसून म्हणाल्या आणि सीमंतिनी लाजेने आरक्त झाली होती.

पण मोहितने तर साधं तिला नीट पाहिलं देखील नव्हतं. तिच्या सौंदर्याची स्तुती करणं तर दूरच! या विचाराने ती थोडी हिरमुसली. पण पुन्हा तिने स्वतःला समजावले की तो आता येईल आणि तिला मिठीत घेईल आणि म्हणेल.

“ किती सुंदर दिसते आहे माझी बायको!”

या विचारानेच ती मोहरली. मोहित कपडे बदलून आला आणि बेडवर बसला. तो सीमंतिनीला पाहून म्हणाला.

मोहित,“ सीमा आज आपण पहिली रात्र नाही साजरी करू शकत कारण मी ठरवले आहे की जोपर्यंत आपण आपल्या कुलदेवीच दर्शन घेत नाही तोपर्यंत गृहस्थ जीवनात प्रवेश करायचा नाही. तू जा चेंज करून ये.किती दागिने घातले आहेस ते टोचत नाहीत का तुला? आणि ही हेवी साडी बाप रे तू कशी कॅरी करतेस!काढ ते सगळं आणि झोप उद्या आपल्याला देव दर्शनाला जायचे आहे. अनायासे गोव्याची म्हाळसा देवी आपली कुलस्वामिनी आहे तर देवदर्शन ही होईल आणि फिरणे देखील.” तो म्हणाला आणि झोपला देखील.

तिला अपेक्षित असे काहीच घडले नाही. तो तिला एकदा ही साधं छान दिसत आहेस इतकं ही म्हणाला नाही. तिला वाटणारी अधिरता, तिची मोरपंखी स्वप्ने सगळं सगळं आज मोहितच्या अशा वागण्यामुळे कोमेजून गेली. ती यांत्रिकपणे उठली आणि चेंज करून नाईट गाऊन घालून येऊन बेडच्या एका कडेला झोपली.

तिला मोहितच्या वागण्याचे आश्चर्य वाटत होते.कारण कोणता पुरुष त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्री त्याच्या बायकोशी असा वागतो? तिला प्रश्न पडला होता.

©स्वामिनी चौगुले



🎭 Series Post

View all