सीमंतिनी भाग ३४

सीमंतिनी तिची लढाई जिंकू शकले का?

भाग ३४


मकर संक्रांत होऊन आज दोन दिवस झाले होते आणि मीराच्या वागणुकीत बराच बदल दिसत होता. तिने सीमंतिनीला मुद्दाम त्रास द्यायचे बंद केले होते. मीरा समीरच्या बोलण्यामुळे चांगलीच घाबरली होती. आज मोहितला फोन करून मीराने त्याला भेटायला बोलावले होते. मोहितला वाटले की काम फत्ते झाले असावे म्हणून त्याला मीराने भेटायला बोलावले आहे. सीमंतिनीने कदाचित मीराच्या त्रासाला कंटाळून हार मानली असेल आणि ती त्याच्याकडे परत यायला तयार झाली असेल. दोघेही पुन्हा एका गार्डनमध्ये भेटले.

मोहित,“बोला मीरा वहिनी काम फत्ते झालेले दिसतेय. सीमा जर तुमच्यामुळे घरी परत आली तर तुम्हाला मी पैशाच्या राशीवर बसवेन.” तो म्हणाला.

मीरा,“तसं काहीच झालेलं नाही मोहितराव. उलट मी तुम्हाला तुमचे पैसे परत करायला आले आहे.” ती म्हणाली.


मोहित,“पण का? एक लाख कमी वाटतात का तुम्हाला? मी अजून पैसे देऊ शकतो.” तो म्हणाला.

मीरा,“मोहितराव मला पैसे हवे होते पण ते माझ्या नवरा आणि मुलासाठी. जर तेच माझ्या आयुष्यात राहणार नसतील तर मी पैशाचे काय करणार आहे? तुमचं ऐकून आणि तुमच्याकडून पैसे घेऊन मी खूप मोठी चूक केली आहे. समीर सीमा बरोबर मी जे वागले त्यामुळे मला घटस्फोट द्यायला निघाला आहे. जर त्याला कळले की मी हे सगळं तुमच्या सांगण्यावरून पैशासाठी केलं तर तो मला एक मिनिट देखील घरात थांबू देणार नाही. मी असेन पैशाला हापापलेली कारण मी खूप गरिबी पाहिली आहे पण माझं समीरवर आणि माझ्या मुलावर खूप प्रेम आहे. माझा संसार पणाला लावून मला काहीच नको आहे. हे तुमचे पैसे!” असं म्हणून तिने चेक मोहितच्या हातात दिला आणि ती त्याच्या उत्तराची वाटही न पाहता निघून गेली.

मोहितसाठी मात्र सीमंतिनीच्या बाबतीत ही दुसरी हार होती. त्याने रागाने चेक फाडून फेकून दिला आणि तो धुमसतच तिथून निघून गेला.
★★★

सीमंतिनी माहेरी येऊन आज दोन महिने झाले होते. तिचं रुटीन व्यवस्थित सुरू होतं. समीरच्या धमकीमुळे मीराने सीमंतिनीला त्रास देणं बंद केलं होतं त्यामुळे सीमंतिनीच्या आईने सुटकेचा निःश्वास सोडला. आज ती नेहमीप्रमाणे ऑफिसला निघाली होती आणि तिला रस्त्यात मोहितने अडवले.

मोहित,“मला तुझ्याशी बोलायचे आहे.”

सीमंतिनी,“पण मला तुमच्याशी बोलायचे नाही.”

मोहित,“जास्त शहाणपणा नाही करायचा माझ्यासमोर. आज देखील तू कायद्याने माझी बायको आहेस हे विसरू नकोस. मी मनात आणले तर तुझ्या घरच्यांना देखील उडवू शकतो; ज्यांच्या जीवावर तू इतकी उडत आहेस. माझ्या बरोबर गप्प घरी चल नाही तर..” तो धमकी देत म्हणाला.

सीमंतिनी,“नाही तर काय करणार तुम्ही?” तिने त्याला रोखून पाहत विचारले.

मोहित,“तुझ्या समीर दादाचा कामावरून येताना अपघात होऊ शकतो. तुझे बाबा फिरायला जातात तेव्हा त्यांना एखादा ट्रक उडवू शकतो. आई भाजी आणायला जाते ती परत आलीच नाही तर?” तो तिला धमकावत म्हणाला.

सीमंतिनी,“तुम्ही आता मला माझ्या घरच्यांना मारतो म्हणून धमक्या देण्यावर उतरलात? बरं झालं हे सगळं तुम्ही बोललात. हे बघा मी सगळं रेकॉर्ड करून घेतलं फोनमध्ये. मी तुमच्या नावाची पोलीस कंप्लेट करेन. इतकंच नाही तर मीडिया बोलावून हे रेकॉर्डिंग ऐकवेन. मग तुमच्या अब्रूची लक्तरे सांभाळा तुम्ही. तुम्हाला काय वाटतं की मी तुमच्या धमक्यांना घाबरेन? गैरसमज आहे तुमचा तो! पुन्हा मला आडवे आलात तर बघा. आपली पुढची भेट मला कोर्टात अपेक्षित आहे. निघा तुम्ही!” ती शांतपणे म्हणाली.

मोहित,“ठीक आहे. तुझी तीच इच्छा आहे तर तसंच होईल. कोर्टात नाही तुला गुडघ्यावर आणली आणि फरपटत घरी नेली तर नावाचा मोहित खोत नाही मी.” तो रागाने म्हणाला.

सीमंतिनी,“गुडघ्यावर कोण येतं? ते कळेलच पण तोपर्यंत माझ्या घरच्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल इतकं लक्षात ठेवा.” ती म्हणाली आणि निघून गेली.

मोहितने खरंतर सीमंतिनीला ओळखायला चूक केली होती. ती त्याला सोशिक आणि अबला वाटली होती म्हणून तर त्याने तिला त्याच्या जाळ्यात ओढले होते पण सीमंतिनी जे वागत होती ते त्याच्या अपेक्षेच्या पूर्ण विरुद्ध होते. तिच्यावर त्याची कोणतीच मात्रा काम करत नव्हती. मोहित मात्र रागाने धुमसत होता पण तो काहीच करू शकत नव्हता. त्याचे सगळे डाव उलटे पडले होते, म्हणून त्याने आज रागाच्याभरात तिला प्रत्यक्ष धमकवण्याची चूक केली होती आणि सीमंतिनीने त्या चुकीचा फायदा घेत त्याचे बोलणे रेकॉर्ड करून घेतले होते. त्यामुळे मोहित आता चांगलाच तिच्या कचाट्यात अडकला होता.

सीमंतिनी मात्र मोहित आणि तिच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याची वाट आतुरतेने पाहत होती कारण एक वर्षानंतरच तर तिची खरी लढाई सुरू होणार होती आणि कायदेशीर रित्या तिला मोहितपासून सुटका मिळणार होती.
★★★

पाच महिन्यांनंतर

आज सीमंतिनी आणि मोहितच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आणि सीमंतिनी पुन्हा गवळी मॅडमला भेटायला गेली.

सीमंतिनी,“मॅडम आज आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. तुम्ही घटस्फोटाची प्रोसिजर सुरू करा.” ती म्हणाली.

गवळी मॅडम,“ठीक आहे पण सीमंतिनी हे सगळं इतकं सोप्प असणार नाही. कोर्टात एकमेकांवर चिखलफेक होते. तिथे मोहितचे वकील तुझ्यावर नाही नाही ते आरोप करू शकतात, तुझ्या चारित्र्यावर बोट ठेवू शकतात. तसेच तू आणि तुझे घरचे हे सगळं पैसा उकळण्यासाठी करत आहात असाही आरोप होऊ शकतो. मी हे सगळं तुला का सांगत आहे? कारण तू मानसिक दृष्ट्या या सगळ्याची तयार राहावं म्हणून. कोर्टात केस दाखल केल्यावर प्राथमिक तयारी होऊन मग केस कोर्टात उभी राहील. तिथे आपल्याला मोहित इंपोटंट आहे आणि त्याने तुला फसवले हे सिद्ध करावे लागेल. त्या संदर्भात तुला त्याचा वकील नको ते प्रश्न विचारू शकतो. या सगळ्यासाठी तू तयार आहेस ना?” त्यांनी विचारले.

सीमंतिनी,“हो मॅडम माझी सगळ्या गोष्टींची मानसिक तयारी आहे. जर आता आगीत उडी घ्यायचीच असे ठरवले तर मग किती आणि कुठे कुठे भाजेल? याचा विचार करणे म्हणजे मुर्खपणा आहे. तुम्ही प्रोसिजर सुरू करा.” ती ठामपणे म्हणाली.

गवळी मॅडम, “ठीक आहे. मी आजच मोहितच्या नावाने कायदेशीर नोटीस तयार करते. तू उद्या त्यावर सही कर आपण उद्याच त्याला नोटीस पाठवून देऊ. कोर्टात खटला दाखल करण्याची देखील मी तयारी करते. महिन्याभरात आपला खटला दाखल होईल कोर्टात आणि त्यानंतर दोन महिन्यातच तारखा सुरू होतील.” त्या म्हणाल्या.

सीमंतिनी,“ठीक आहे मॅडम.” ती म्हणाली आणि घरी निघाली.

ती गवळी मॅडमना माझी सगळ्याची तयारी आहे असं ठामपणे म्हणाली होती खरं पण तिचे मन आज भरून आले होते. एक वर्ष आधी याच दिवशी ती किती मोरपंखी स्वप्ने घेऊन बोहल्यावर चढली होती. तिने तेव्हा तिच्या आयुष्यात असं काही घडेल असा विचार देखील केला नव्हता. खरंतर आज तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि बाकी जोडप्यांप्रमाणे तिलाही तो सेलिब्रेट करायचा होता पण आज तिने वकिलांकडे जाऊन तेच लग्न मोडण्यासाठी प्रोसिजर सुरू करा म्हणून सांगितले होते.

तिने पाहिलेली सुखी संसाराची स्वप्ने मातीमोल झाली होती. नाही म्हणले तरी आज तिला खूप एकटं वाटत होते. ती रिक्षाने घराजवळच्या चौकात उतरली आणि तिथे जवळच असलेल्या देवीच्या मंदिरात तिची पावले आपसूकच वळली. तिने देवीचे दर्शन घेतले आणि ती तिथेच एका खांबाला टेकून बसली. ती मनातून देवीशी संवाद साधत होती.

‛आई तू तर जगन्माता आहेस. तुझ्यापासून काय लपले आहे? तू तर सर्वज्ञ आहेस. आज मला खूप एकटं वाटतंय. मी खूप स्वप्न उराशी घेऊन आजच्याच दिवशी तुझ्या साक्षीने मोहित बरोबर लग्न केले होते पण त्याने मला फसवले. तो माणूस नाही तर हैवान निघाला. त्याने माझा मानसन्मान, माझा स्वाभिमान, माझ्या भावना, माझं स्त्रीत्व पायदळी तुडवले. मला त्याची वस्तू समजून माझ्याशी वाट्टेल तसा वागला. त्याला वाटत होते की एक स्त्री त्याचं काय बिघडवणार? पण आई तो विसरला की एक स्त्री लक्ष्मी असते पण ती जर चिडली तर महाकाली देखील होऊ शकते. एका स्त्रीचा, तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करण्याचा परिमाण काय होऊ शकतो? हे त्याला कळलायला हवे. त्याने माझ्यावर केलेल्या अन्यायाचा जाब मागण्याची आणि त्याला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. आई मला शक्ती दे की मी त्याला धडा शिकवू शकेन आणि माझा मानसन्मान पुन्हा परत मिळवू शकेन.’ ती हे मनात बोलत होती आणि तिचे डोळे भरून आले होते. तिने डोळे पुसले आणि ती मंदिरातून बाहेर पडली.

आता सीमंतिनीच्या परीक्षेची खरी वेळ आली होती. ती न डगमगता या परीक्षेचा सामना करू शकेल का? सीमंतिनी तिची लढाई जिंकू शकेल का?

वाचकांच्या आग्रहास्थव रोज एक भाग टाकण्याचा प्रयत्न केला जाईल.


©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all