सीमंतिनी भाग ८

कथा एका सीमंतिनीची जीने सीमोल्लंघन केले.


सीमंतिनी अभ्यासात मन रामवण्याचा प्रयत्न करत होती आणि तिची आई एकदम तिला हाक मारायला लागली.

आई,“सीमा अगं सीमा बाहेर ये.” त्या ओरडत होत्या.

सीमंतिनी आणि तिची वहिनी मीराही आवाज ऐकून धावतच बाहेर आल्या.

सीमंतिनी,“ओरडायला काय झालं गं आई इतकं?” तिने थोडे रागानेच विचारले.

आई, “काय झालं काय विचारतेस? काय झालं नाही ते विचार?” त्या उत्साहाने म्हणाल्या. त्या खूप आनंदी दिसत होत्या.

त्याच्या बोलण्यावरून आणि एकूण हावभावावरून वाटत होते की, त्या फक्त आनंदाने नाचायच्याच बाकी आहेत. पण त्या इतक्या आनंदी का आहेत? हे त्या दोघींना देखील कळत नव्हतं. मीराने शेवटी न राहवून विचारलेच.

मीरा,“इतकं खुश व्हायला काय झालं आहे आई पण?”

आई,”अगं मिरे त्या मोहित खोतच्या घरून फोन आला होता की आपली सीमा त्यांना पसंत आहे. त्यांनी उद्या त्यांचं घर पहायला बोलवले आहे आणि लग्नाची बोलणी करायला देखील.” त्या आनंदाने म्हणाल्या.

सीमंतिनी,“काय सांगतेस काय? अगं पण आज दहा दिवस होत आले त्यांचा निरोप आला नव्हता आणि आज अचानक?” तिने शंका उपस्थित केली.

आई,“सीमे अगं वेळ लागतो कधी कधी असे निर्णय घ्यायला. बरं तुझे वहिनी- दादा, मी, बाबा आणि काका-काकू उद्या त्यांच घर पाहायला जाणार आहोत संध्याकाळी.” त्या म्हणाल्या.

मीरा,“म्हणजे सीमाताईंचे लग्न खोतांच्यात होणार तर. सीमा ताई नशीब काढलत तुम्ही तर.” ती सीमंतिनीला पाहत म्हणाली आणि सीमंतिनी लाजून तिच्या रूममध्ये निघून गेली.

पण सीमंतिनी खुश असली तरी देखील तिचं मन मात्र साशंक होतं, की इतक्या उशिरा त्या लोकांनी होकार कसा दिला? हा प्रश्न तिला सतावत होता आणि या प्रश्नाचे उत्तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकत होती ती म्हणजे मोहित! तिने मनोमन काहीतरी ठरवले. दुसऱ्या दिवशी अकराच्या सुमारास सगळे मोहितचे घर पहायला आणि लग्नाची बोलणी करायला गेले. सीमंतिनीची आई, वहिनी, भाऊ, बाबा, काकू, काका असे पाच लोक त्यांच्या घरी गेले होते. मोहितचे घर पाहून तर सीमंतिनीची आई, वहिनी आणि काकू हरखून गेल्या. इकडे मोठे दोन मजली घर. घर कसले टुमदार बंगला आणि सगळ्या अत्याधुनिक सोई-सुविधा होत्या. नोकर-चाकर दिमतीला. मोहितच्या घरून त्याची मावशी-काका, काका-काकू आणि वडील होते. मोहित स्वतः हजर होता. मोहितने स्वतः त्यांना सगळे घर फिरून दाखवले. चहा-पाणी, नाष्टा सगळे साग्रसंगीत झाले. आता लग्नाची बोलणी करण्याची वेळ आली आणि समीर आणि सीमंतिनीच्या बाबांना दडपण आले. कारण इतके श्रीमंत लोक म्हणजे त्यांच्या अपेक्षा ही तशाच असणार.

समीर, “बोला तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत?” त्याने अंदाज घेत विचारले आणि मोहितचे काका म्हणाले.

काका,“आमच्या तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाहीत पण एक अट आहे.” ते म्हणाले.

सीमंतिनीचे बाबा,“अट? कसली अट?” त्यांनी विचारले.

काका,“तुम्ही फक्त मुलगी घेऊन लग्नाला उभं राहायचं. सारखरपुड्यापासून दोन्ही बाजूचा सगळा खर्च आम्ही करू.” ते म्हणाले आणि मीरा-समीरचा चेहरा उजळला.

सीमंतिनीचे बाबा, “हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला पण सीमंतिनी आमची मुलगी आहे. तिच्या प्रति माझी कर्तव्य आहेच. मी माझ्या रिटायर्ड झाल्यावर माझ्या फंडातून सात लाख सीमाच्या लग्नासाठी तिच्याच नावावर ठेवले आहेत. त्यातून तिला हवे असतील ते दागिने करून मोहितरावांना सारखरपुड्यात अंगठी आणि लग्नात लॉकेट घालू.” ते हात जोडून म्हणाले.

मोहित,“मला काही नको. जे काही दागिने करायचे असतील ते तुम्ही सीमंतिनीला करा.” तो म्हणाला.

सीमंतिनीचे बाबा,“ठीक आहे पण सारखरपुड्यात अंगठी तरी घालूच.” ते म्हणाले आणि एकदाची लग्नाची बोलणी होऊन सुपारी फुटली.

सीमंतिनीच्या आई, काकू, वहिनीला मोहितच्या घरून आहेर म्हणून चांगल्या महागड्या साड्या देण्यात आल्या तर पुरुषांना भारीतील शर्ट-पॅन्टपीस देण्यात आले. जेवणात ही चांगले पंचपवान्न होते. ते सगळं पाहून सीमंतिनीची आई, बाबा, भाऊ, वहिनी खुश होते.आपल्या मुलीला अपेक्षेपेक्षा चांगले सासर मिळाले याचे समाधान त्यांच्या डोळ्यात दिसत होते. सगळे जायला निघाले आणि समीरला मोहितने बाजूला बोलावले.

मोहित,“दादा तुमची हरकत नसेल तर सीमंतिनीचा मोबाईल नंबर मला मिळेल का?” त्याने अदबीने विचारले. तसा समीर गालात हसला आणि म्हणाला.

समीर,“हो. का नाही? मोहितराव अहो सीमा तुमची होणारी बायको आहे आता घ्या.” म्हणून त्याने सीमंतिनीचा मोबाईल नंबर त्याला सांगितला आणि त्याने तो फीड करून घेतला.

सगळे संध्याकाळी चार-पाचच्या सुमारास घरी आले. सीमंतिनी कॉलेजमधून घरी आली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.तिने सगळ्यांना पाणी दिले.

सीमंतिनी,“चहा करून आणते.” असं म्हणून ती किचनकडे वळणार तर मीरा वहिनी पाणी पिऊन तिला म्हणाली.

मीरा वहिनी,“तुम्ही कशाला ताई? मीच करून आणते तुम्ही बसा.” ती म्हणाली आणि सीमंतिनीला तिच्या वागण्याचे आश्चर्य वाटले. तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य तिच्या आईच्या नजरेतून सुटले नाही आणि त्यांनी तिला डोळ्यांनीच खूण करून बसायला सांगितले.

आई,“सीमे तुझं नशीब उघडले बाई. इतकं श्रीमंत आणि चांगलं स्थळ तुला मिळालं. आमची तर चिंताच मिटली बघ.”

त्या खुश होत म्हणाल्या आणि तिथे घडलेलं सगळं त्यांनी सीमंतिनीला सांगितले. सीमंतिनी मनोमन खुश झाली कारण तिला आवडलेल्या मुलाशी तिचे आज लग्न ठरले होते आणि घरच्यांच्या म्हणण्यानुसार सगळं चांगलं होतं, पण तिच्या काही केल्या मनातली शंकेची पाल अजून ही चुकचुकत होती. तिला खरंतर मोहितचा मोबाईल नंबर हवा होता पण तो मागायचा कोणाकडे? हा प्रश्न होता. ती या विचारत होती आणि समीरने तिला हाक मारली आणि ती भानावर आली.

समीर,“सीमा अगं मोहितरावांनी तुझा मोबाईल नंबर आज माझ्याकडून घेतला आहे तर प्रायव्हेट नंबरवरून कॉल आला तर घाबरू नकोस.” तो म्हणाला.

आणि सीमंतिनी मनातून सुखावली मोबाईल नंबर घेतला आहे म्हणजे नक्कीच मोहित फोन करणार मग आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल. तिचा प्रश्न आपसूकच सुटला होता. तोपर्यंत मीरा चहा घेऊन आली. सीमंतिनीने चहाचा कप उचलला.

सीमंतिनी,“मी माझ्या रूममध्ये जाते. अभ्यास करायचा आहे मला.” असं म्हणून ती निघून गेली.

ती मनोमन खुश तर होती पण तिच्या मनात मात्र हुरहूर होती. तिला मोहितचा तिला फोन किंवा मेसेज केव्हा येईल असे झाले होते. तितक्याच तिचा फोन वाजला. तिने पहिले तर प्रायव्हेट नंबर होता. तिच्या हृदयाची मात्र धडधड वाढली. तिने फोन उचलला.

सीमंतिनी,“हॅलो!”

मोहित,“सीमंतिनी मी मोहित खोत बोलतोय.”तो म्हणाला.

सीमंतिनी,“ हो बोला ना.”ती म्हणाली.

मोहित,“काही नाही असंच फोन केला होता.” तो म्हणाला.

सीमंतिनी,“बरं पण तुमचा नंबर मला कसा कळणार तो तर प्रायव्हेट आहे ना?” तिने विचारले.

मोहित,“मी व्हॉटसअप मेसेज करतो तू सेव्ह करून घे.” तो म्हणाला.

सीमंतिनी,“मला तुमच्याशी बोलायचं होतं जरा. तुम्ही उद्या भेटू शकाल का?” तिने थोडं अडखळत विचारले.

मोहित,“बरं तू कुठे आणि कधी भेटणार मला सांग? आणि इतकं अडखळायला काय झाले? तू माझी होणारी बायको आहेस.” तो बायको या शब्दावर जोर देत म्हणला आणि सीमंतिनी लाजली.

सीमंतिनी,“मी उद्या कॉलेजमध्ये जाणार आहे तिथे जवळ बेस्ट कॅफे आहे तिथे भेटू. दुपारी दोन वाजता. तुम्हाला चालेल ना? म्हणजे वेळ आहे का?” तिने विचारले.

मोहित,“तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. मी उद्या पोहोचेन वेळेवर.” तो म्हणाला.

सीमंतिनी,“बरं!” ती म्हणाली आणि फोन ठेवला.

सीमंतिनी उद्या एकटीच मोहितला पहिल्यांदा भेटणार होती. त्यामुळे ती मनातून खुश तर होती पण तिला थोडी भीती देखील वाटत होती.

मोहित सीमंतिनीच्या प्रश्नाचे काय उत्तर देणार होता?
©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all