सीमंतिनी भाग ७

कथा एका सीमंतिनीची जीने सीमोल्लंघन केले.
भाग ७

सीमंतिनी आणि सानिका कॉलेजमधून निघाल्या. सीमंतिनी दुपारी तीन वाजेपर्यंत घरी पोहोचली तर तिची आई आणि वहिनी तिचीच वाट पाहत होत्या.

आई,“किती वेळ लावलास गं सीमा? आता सगळं आवरून होईल का?” त्या चिडून म्हणाल्या.

सीमंतिनी,“आई अगं ते लोक पाच वाजता येणार आहेत आणि आत्ता तीन वाजले आहेत. तीन तास आहेत अजून.” तिनेही वैतागून उत्तर दिले.

मीरा वहिनी,“बरं ताई चला तुम्ही जेवण करा आणि थोडा आराम करा. तासाभराने तुम्हांला तयार करते. तोपर्यंत बाकीच आवरून घेते मी. आई या बंटीला बाबांच्याकडे द्या ओ.” ती तीन वर्षांच्या बंटीला आईकडे देत म्हणाली.

सीमंतिनी वहिनी बरोबर गेली. खरंतर सकाळी लवकर गेल्यामुळे आणि बसच्या प्रवसामुळे तिला खूप कंटाळा आला होता. तिने कसे बसे जेवण केले आणि ती तिच्या रूममध्ये आराम करायला निघून गेली. तिला दहाच मिनिटात झोप लागली. बरोबर चार वाजता तिची वहिनी तिला उठवायला आली. सीमंतिनी थोडी कुरकुर करतच उठली. पण मीरा वहिनीने तिचं काहीच ऐकले नाही. तिने सीमंतिनीला फ्रेश होऊन यायला लावले आणि मीरा तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेली.

तिच्या वहिनीने त्यांच्या ठेवणीतली जरीकठाची आकाशी रंगाची साडी तिच्यासाठी काढून ठेवली होती. तसेच स्वतःचा राणीहार, झुमके आणि मेकअपचे समान सगळं काढून ठेवले होते. सीमंतिनी ते सगळं पाहून तिला म्हणाली.

सीमंतिनी,“वहिनी अगं हे सगळं तुझं आहे. तू कशाला काढून ठेवले आहेस? माझ्याकडे आहेत ना साड्या आणि दागिने देखील आहेतच ना.” ती म्हणाली.

मीरा वहिनी,“हो, पण माझे घाला ना आज दागिने आणि साडी; ही साडी खूप सुंदर आहे तुम्हाला खूप सुंदर दिसेल आणि हा राणीहार, झुमके माझ्या आईने केले आहेत. चांगले घसघशीत आहेत हे चांगले उठून दिसतील तुम्हाला. चला आवरू लवकर.” ती म्हणाली.

मीराने सीमंतिनीला तयार केले. आकाशी रंगाची डॉलर बुट्टी असलेली साडी, लांब केसांची सागर वेणी, कानात झुमके, राणीहार, हातात मॅचिंग बांगड्या, कपाळावर मॅचिंग टिकली आणि लाईट मेकअप. ती खूपच सुंदर दिसत होती. तिने सीमंतिनीला तयार केले आणि खुश होत म्हणाली.

मीरा वहिनी, खूप सुंदर दिसताय ताई तुम्ही. माझीच नजर लागायची कुठे तरी.” असं म्हणून तिने तिला कानाच्या मागे काजळाची टिथ लावली आणि तिच्या अलाबला घेतल्या.

सीमंतिनी मीराच्या अशा वागण्यामुळे थोडीशी लाजली. मीरा तिला असं लाजताना पाहून हसली आणि निघून गेली. ठरल्याप्रमाणे पाहुणे बरोबर पाच वाजता आले. मोहित, त्याचे वडील आणि मॅरेजब्युरो मधील एक माणूस असे तिघे सीमंतिनीला पाहायला आले होते. समीर देखील आज हाफ डे घेऊन घरी आला होता. पाहुण्यांचा चहा-नाष्टा झाला आणि सीमंतिनीला तिची वहिनी घेऊन आली. मोहित तिच्याकडे पाहत होता. सीमंतिनी मात्र डोळ्याच्या कोनाड्यातून त्याला पाहत होती.

समीरने मोहितची जुजबी चौकशी केली तर सीमंतिनीला जुजबी प्रश्न विचारण्यात आले. मोहितच्या डोळ्यात सीमंतिनी त्याला पसंत आहे हे स्पष्ट दिसत होते तर सीमंतिनीला देखील मोहित आवडला होता. रीतीप्रमाणे आम्ही कळवू म्हणून ती मंडळी निघून गेली. सीमंतिनीच्या आईला वाटत होते की, दोन दिवसात मोहितकडून पसंतीचा फोन येईल पण आठ दिवस होऊन गेले तरी त्या लोकांचा फोन आला नव्हता. त्यामुळे सीमंतिनीची आई मनोमन खट्टू होती.

असेच एका संध्याकाळी सगळे चहा घेत होते आणि सीमंतिनीची आई बोलू लागली.

आई,“समीर अरे ते खोत आपल्या सीमाला पाहून गेले त्यानंतर आज आठ-नऊ दिवस होऊन गेले त्यांचा काहीच फोन नाही. तू जरा चौकशी कर ना.”

त्यांचे बोलणे ऐकून रुपेशराव म्हणजेच सीमंतिनीचे बाबा म्हणाले.

बाबा,“काही गरज नाही. आपली सीमा त्यांना पसंत असती तर त्यांचा एव्हाना फोन आला असता. अजून त्यांचा फोन नाही म्हणजे आपली सीमा….” ते पुढे बोलणार तर सीमंतिनीची आई भडकली आणि बोलू लागली.

आई,“पसंत असती तर म्हणजे? माझ्या पोरीत काय कमी आहे? दिसायला सुंदर आहे, शिकलेली आहे, गुणी आहे.”

बाबा,“तुझं सगळं बरोबर आहे पण एक विसरत आहेस तू, अगं ते श्रीमंत लोक! त्यांच्या आणि आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती मोठी तफावत आहे. आपण सामान्य मध्यमवर्गीय लोक त्यांच्या पासंगाला पण पुरणार नाही म्हणून म्हणालो मी.” ते समजावत बोलत होते.

आई,“असतील ते श्रीमंत, पण माझी पोरगी काही कमी नाही. त्यांच्या घरात गेली तर त्यांच्या घराचे गोकुळ करेल. असं ही आपले पूर्वज म्हणायचेच ना? सून आणावी गरिबाघरची आणि लेक द्यावी श्रीमंता घरी.” त्या म्हणाल्या. इतका वेळ दोघांचे बोलणे शांतपणे ऐकणारी सीमंतिनी आता बोलू लागली.

सीमंतिनी,“तुम्ही दोघे बास करा बरं ही चर्चा आता. आई त्यांचा निरोप नाही आला म्हणजे याचा अर्थ त्यांना मी पसंत नाही असाच होतो ना? मग आपण कशाला उगीच स्वतःहून मागे लागायचे त्यांच्या? दादा तू काही चौकशी वगैरे करणार नाहीस.” ती असं म्हणून निघून गेली.

सीमंतिनी सगळ्यांच्या समोर बोलली तर होती, पण तिला देखील मोहित मनातून कुठेतरी आवडला होता. ती देखील आतुरतेने त्यांच्या निरोपाची वाट पाहत होती. पण आज नऊ दिवस होऊन गेले तरी त्यांच्याकडून कोणताही निरोप आला नव्हता त्यामुळे ती देखील मनातून खट्टू होती. तिचं मन कशातच लागत नव्हते. एक तर फायनल परीक्षा तोंडावर होती आणि त्यात हे सगळं घडत होतं. ती तिच्या रूममध्ये आली आणि स्वतःशीच बोलू लागली.

‛सीमा मॅडम स्वतःच्या मनाला आवर घाला जरा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. ते मोहितराव इतके श्रीमंत आणि देखणे आहेत. ते तुझ्यासारख्या सामान्य घरातील मुलीला का पसंत करतील बरं? मृगजळामागे धावणे बरे नाही. शेवटी हाती काहीच लागणार नाही तुझ्या. त्यापेक्षा आता अभ्यासात लक्ष घालावे. मनाला मुरड घालायला हवी. ही आई पण ना, हिचं मध्येच काहीतरी असतं. उगीच मोठी स्वप्न पाहण्यात काही अर्थ नसतो. आपण आपल्या पायरीने रहावं. पण मोहित मला ते श्रीमंत आहेत म्हणून नाही आवडले तर मला त्यांच्या डोळ्यांनी ओढ लावली आहे. त्यांचे ते मला रोखून पाहणारे डोळे खूप काही सांगत होते. त्यांची ती नजर मला घायाळ करून गेली, पण तूच एकटी घायाळ होऊन उपयोग काय सीमंतिनी? ते पण घायाळ झाले पाहिजे ना?कदाचित मी त्यांना पसंत नसेल. सोड आता तो विषय आणि लाग अभ्यासाला.’

तिने स्वतःला समजावले आणि ती पुस्तक उघडून बसली पण काही केल्या तिचे मन मात्र अभ्यासात लागत नव्हते. राहून राहून तिला त्या दिवशीचा प्रसंग आठवत होता आणि ती पुन्हा पुन्हा त्या प्रसंगात रमत होती. त्याचे ते तिला एकटक पाहणे. तिच्या मनात त्याच्या डोळ्यांनी घर केले होते आणि ते डोळे तिला गेल्या नऊ दिवसांपासून सतावत होते. कोणाला सांगताही येईना आणि सहताही येईना अशी विचित्र अवस्था तिची झाली होती. तिला सतत तिचे मन सांगत होते की मोहितच ती व्यक्ती आहे तिच्या स्वप्नातला राजकुमार. पण सध्या परिस्थिती मात्र नेमकी उलटी होती. तिला पाहून गेल्यापासून त्या लोकांचा कोणताच निरोप आला नव्हता. याचा अर्थ असाच होता की मोहतला सीमंतिनी पसंत नाही. या सगळ्यामुळे सीमंतिनीच्या मनाची मात्र घालमेल होत होती आणि ती घालमेल तिला कोणालाही म्हणजेच अगदी तिची बेस्ट फ्रेंड सानिकाला देखील दिसू द्यायची नव्हती. म्हणून ती प्रयत्नपूर्वक स्वतःला समजवून स्वतःचे सैरभैर झालेले मन शांत करत होती.

मोहितच्या घरून पसंतीचा निरोप का आला नसेल? मग मोहित आणि सीमंतिनीचे लग्न कसे झाले असेल?
©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all