सीमंतिनी भाग ६

कथा एका सीमंतिनीची जीने सीमोल्लंघन केले.


   आठ दिवसामधला एक एक दिवस सीमंतिनीने मोजून काढला होता. तसा मोहित तिला दिवसातून एकदा फोन करत असे, पण सीमंतिनीला त्याची ओढ लागली होती. आज मोहित परत येणार होता म्हणून सीमंतिनी मनोमन खुश होती. ती डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहत होती. मोहित साधारण पाच वाजता पुण्यात आला, पण सीमंतिनीच्या अपेक्षेप्रमाणे तिला न्यायला नाही आला तर त्याने सीमंतिनीच्या भावाला तिला उद्या घरी सोडायला सांगितले. सीमंतिनी मनातुन हिरमुसली आणि ती हट्ट करून तिच्या भावाला घेऊन घरी नऊ वाजता पोहोचली.

तिचा भाऊ तिला सोडून निघून गेला. मोहित आणि तिने जेवण केले आणि दोघे झोपायला गेले. मोहित लॅपटॉपवर काम करत होता आणि सीमंतिनीने त्याला येऊन मिठी मारली. मोहितने स्वतःला सोडवून घेतले आणि तो थोडा रागातच तिला म्हणाला.

मोहित, “सीमा प्लिज आज मी थकलो आहे. जेट लॅक झाला आहे मला. मेल चेक करून मी झोपणार आहे. प्लिज तूही झोप उगीच त्रास नको देऊ मला.”

सीमंतिनीचे डोळे पाण्याने गच्च भरले. ती तिच्या जागेवर जाऊन मोहितकडे पाठ करून झोपली पण काही केल्या तिला झोप लागत नव्हती. तिच्या काही महिन्यांपूर्वी म्हणजेच मोहितबरोबर तिचे लग्न ठरल्यापासूनच्या घटना डोळ्या समोरून तरळू लागल्या.

काही महिन्यांपूर्वी.….

सीमंतिनी एम्.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तसंही आता फक्त परीक्षा राहिली होती. तिला खरंतर इतक्यात लग्न करायचे नव्हते. तिला नोकरी करायची होती, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होत, पण तिच्या आईला हे सगळं मान्य नव्हतं. सीमंतिनीने लग्न करून तिच्या घरी जावं आणि तिथे काय करायचं ते करावं असं त्यांचं मत होतं म्हणूनच सीमंतिनी एम्.बी ए.च्या पहिल्या वर्षात असतानाच त्यांनी तिचं नाव मॅरेजब्युरोमध्ये नोंदवले होते.

सीमंतिनी अगदी मध्यम वर्गीय कुटुंबातील एक सामान्य मुलगी होती. हा पण दिसायला सुंदर होती. तिला कॉलेजमधील अनेक मुलांनी प्रपोज देखील केलं होतं पण तिला प्रेम वगैरेमध्ये रस नव्हता. आई-वडील, मोठा भाऊ आणि ती असे चौकनी कुटुंब आता भावाचं लग्न झाल्यामुळे षट्कोनी झाले होते. म्हणजेच वहिनी आणि तीन वर्षांचा भाचा असे मस्त कुटुंब होते. भाऊ एका खाजगी कंपनीत कामाला होता तर वडील रिटायर्ड सरकारी कर्मचारी होते पण त्यांना पेन्शन तुटपुंजी होती म्हणूनच कदाचित तिच्या आईला लवकरात लवकर तिचं लग्न करून तिच्या जबाबदारीतुन मोकळं व्हायचं होत.

सीमंतिनी अभ्यासात मग्न असताना अचानक एक दिवस मॅरेजब्युरोमधून फोन आला की, तुमच्या मुलीला स्थळ आलं आहे. सीमंतिनी निश्चिंत होती. कारण गेल्या एक वर्षभरात तिच्या आईला तिच्यासाठी मनासारखे स्थळ मिळाले नव्हते. त्यामुळे अजून तरी कोणतेच स्थळ तिच्यापर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे यावेळी देखील तसेच होईल असे ती गृहीत धरून होती. पण तिला काय माहीत होते की, यावेळी भलतेच घडणार होते.

तिच्या आईने स्थळाची चौकशी केली. तिची आई आणि बाबा मॅरेजब्युरोमध्ये जाऊन आले. घरी आल्यावर आई भलतीच खुश होती. सीमंतिनी नुकतीच कॉलेजमधून आली होती. आईने तिला आणि तिच्या वहिनीला हाक मारली.

आई, “सीमाss मीराss बाहेर या लवकर.”

मीरा वहिनी आणि सीमंतिनी बाहेर आल्या.

सीमंतिनी,“काय गं आई? इतकं मोठ्याने ओरडायला काय झालं तुला?” तिने विचारले.

आई,“काय नाही झालं ते विचार. सीमे तुझ्यासाठी स्थळ आले आहे. तेही खूप मोठ्या घरचं. त्याचीच चौकशी करायला आम्ही गेलो होतो मॅरेजब्युरोमध्ये. अगं त्यांनी तुझा बायोडाटा पाहून स्वतःहून मागणी घातली आहे तुला. एकुलता एक देखणा मुलगा, घरात फक्त तो आणि त्याचे वडील असतात. पिढीजात श्रीमंत लोक आहेत ते. हा बघ बायोडाटा.” त्या म्हणाल्या आणि सीमंतिनीच्या आधी मीराने बायोडाटा घेतला. ती बायोडाटा वाचून म्हणाली.

मीरा,“मोहित खोत! अहो आई यांचा खूप मोठा बिझनेस आहे की स्पेअर पार्टचा. तसेच हे लोक जमीनदार आहेत. काही शे जमीन आहे यांची पुण्याच्या लगत एका गावात, तिथले आहेत हे लोक! मी कालपरवा त्या सुनंदाकडे गेले होते ना तर तिथेच एका बिझनेस मॅगझीनमध्ये वाचलं होतं यांच्याबद्दल. जर सीमाताईचं लग्न जुळलं यांच्याशी तर आपली लॉटरीच लागली म्हणायची.” ती खुश होत बोलत होती.

आई,“जुळलं तर नाही, नक्कीच जुळेल गं मीरा. उद्या ते लोक येणार आहेत सीमाला पाहायला तर तिला नीट तयार करायची जबाबदारी तुझी!” त्या उत्साहाने बोलत होत्या. इतका वेळ शांतपणे त्यांचं ऐकून घेणारी सीमंतिनी आता बोलू लागली.

सीमंतिनी,“काय? उद्या येणार आहेत ते? अगं आई उद्या माझं प्रोजेक्ट सबमिशन आहे. मला कॉलेजमध्ये जायचं आहे.” ती वैतागून म्हणाली.

आई,“ए बाई तू उगीच खोडा नको घालूस. सकाळी लवकर जा कॉलेजमध्ये आणि दुपारी दोन वाजेपर्यंत परत ये. ते लोक संध्याकाळी पाच वाजता येणार आहेत.” त्या म्हणाल्या.

मीरा,“सीमाताई काही काळजी करू नका. मी उद्या लवकर उठून नाष्टा तयार ठेवेन. तुम्ही नाष्टा करा आणि जा. आता चला आपण उद्या कोणती साडी नेसायची? कोणते दागिने घालायचे? ते सगळं ठरवू.” ती उत्साहाने बोलत होती.

सीमंतिनी मात्र तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती कारण मीरा तिची वहिनी सीमंतिनी तिला गेल्या चार वर्षांपासून ओळखत होती. सीमंतिनीला कॉलेजसाठी लवकर बाहेर पडायचे असायचे तर तिचा दादा समीर त्याचे ऑफिस अकरा वाजता असायचे जे ते राहत असलेल्या एरियात म्हणजे अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर होते. त्यामुळे तो डबा वगैरे घेऊन जात नसे. तो नाष्टा करून साडे दहा वाजता निघायचा आणि दुपारी दीडला लंच ब्रेकमध्ये जेवायला घरी यायचा. त्यामुळे मीरा वहिनीला सकाळी लवकर उठायची गरज पडायची नाही. मग सीमंतिनी स्वतःच लवकर उठून तिचा डबा आणि नाष्ट्याला करून जायची. संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा स्वयंपाक करायला तिने मदत करावी अशी मीरा वहिनीची अपेक्षा असायची पण तिची आई संध्याकाळी स्वतःच मीराला मदत करायची त्यामुळे सीमंतिनीची तिच्या कचाट्यातून सुटका व्हायची. तिचं मीरावहिनी आज तिला उद्या लवकर उठून नाष्टा तयार करते म्हणत होती. सीमंतिनी विचारत पडली की फक्त मला गडगंज स्थळ आले तर वहिनीच्या वागण्यात इतका बदल झाला आणि खरंच मला गडगंज स्थळ मिळाले तर काय होईल? ती या विचाराने स्वतःशीच हसली आणि तिने मान डोलावली.

मीरा वहिनी,“अहो ताई चला ना. हसताय काय अशा?” तिने तिला हलवत विचारले आणि सीमंतिनी भानावर आली.

सीमंतिनी,“हो चला वहिनी! पाहू आपण.” ती म्हणाली आणि दोघी गेल्या.

दुसऱ्या दिवशी सीमंतिनी ठरल्याप्रमाणे लवकरच तिची मैत्रीण सानिका बरोबर कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिशनसाठी गेली. दोघींनी प्रोजेक्ट सबमिट केले आणि त्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसल्या. सानिकाचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. ती सीमंतिनीची बेस्ट फ्रेंड होती.

सानिका,“काय गं सीमा रात्री फोन करून आज लवकर कॉलेजला जाऊन येऊ म्हणालीस. मी का विचारले तर भेटल्यावर बोलू म्हणालीस. काय आज पहायचा कार्यक्रम वगैरे आहे की काय?” तिने भुवया उडवत सीमंतिनीला चिडवत विचारले.

सीमंतिनी,“ हो गं सानू! या आईने नुसतं डोकं उठवलं आहे लग्नासाठी. आज कोणीतरी येणार आहे पाहायला खूप गडगंज आहेत म्हणे ते लोक.” ती कॉफीची ऑर्डर देत म्हणाली.

सानिका,“अगं मग चांगलं आहे की. तू तरी अजून किती दिवस त्या तुझ्या मूर्ख वहिनीच्या जाचात राहणार? तुमच्यात उलटंच झालं आहे बघ, तुझी वहिनी लग्न करून सासरी आली आणि सासुरवास तुला सुरू झाला. त्यात तुझी आई जास्त काही बोलत नाही तिला. चांगलं स्थळ पाहून घे. लग्न करून म्हणजे सुटशील तू.” ती म्हणाली.

सीमंतिनी,“तू म्हणते ते बरोबर आहे गं पण आई तरी काय करणार बिचारी? बाबा रिटायर्ड झाले आहेत त्यांना पेन्शन तुटपुंजी आहे त्यात दोघांच्या गोळ्या आणि दवाखाना. सगळं घर समीर दादाच चालवतो आणि तो मीरा वहिनीच्या ऐकण्यातला आहे त्यामुळे आई गप्प बसते. पण तुला खरं सांगू सानू? मला ना श्रीमंत नवऱ्याची अपेक्षा कधीच नव्हती आणि नाही. मला तर एक प्रेमळ आणि समजूतदार लाईफपार्टनर हवा आहे.” ती म्हणाली.

सानिका,“मॅडम पैसा आहे तर सगळं आहे. माझंच बघ ना, महेश तसा खूप चांगला आहे. माझ्यावर खूप प्रेम आहे त्याचे पण आमची आर्थिक परिस्थिती अगदी सामान्य आहे. एखादी आवडीची साडी घ्यायची म्हणजे बजेटचा विचार करावा लागतो. आता मी स्वतः नोकरीला लागल्यावर आमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार.” ती म्हणाली.

सीमंतिनी,“बरं मॅडम निघुयात आईचा फोन यायचा नाही तर.” ती हसून म्हणाली.

सीमंतिनी एक सामान्य स्वप्ने उराशी बाळगून जगणारी एक सामान्य घरातील मुलगी. तिची स्वप्ने खरंच पूर्ण होतील का?

©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all