सीमंतिनी भाग ४८(अंतिम)

सीमंतिनी जिने सीमोल्लंघन केले आणि नवीन क्षितिज काढले.


भाग ४८

सीमंतिनी घरी गेली तर सगळे तिचीच वाट पाहत होते. सीमंतिनी मात्र तिच्याच विश्वात रममाण होती. तिची आई तिच्यावर चांगलीच चिडली होती.

आई,“किती वाजले आहेत सीमे? घड्याळ बघ नऊ वाजून गेले. आम्ही इथे तुझी वाट पाहत काळजी करत आहोत त्याचं तरी भान आहे का तुला? मनात नाही नाही ते विचार येऊन गेले आमच्या. एकतर तो मोहित काय करेल सांगता येत नाही. कुठे होतीस तू? आम्ही तिघांनी किती फोन केले.” त्या रागाने तणतणत होत्या.

बाबा,“तिला घरात तर येऊ दे की! मीरा जा पाणी घेऊन ये सीमासाठी.” ते म्हणाले.

सीमंतिनी,“आई मी सांगितले होते ना की मला वेळ लागेल म्हणून मग काळजी काय करायची? मी राजसकडे गेले होते. उद्या तोही येणार आहे माझ्याबरोबर. तो मीडियाचा माणूस आहे त्यामुळे मोहित आणि राणे वकिलाला जरा वचक बसेल. त्याच्याबरोबर वेळ कसा गेला कळलेच नाही. तुम्ही जेवून घ्यायचं ना. बरं मी आले फ्रेश होऊन मग जेवू सगळे.” ती मीराने आणलेला पाण्याचा ग्लास घेऊन तिच्या रूममध्ये गेली.

समीर,“तुला मी म्हणालो होतो ना आई की सीमा कामासाठीच गेली असेल म्हणून? मीरा जेवण गरम कर.” तो म्हणाला.

सगळे जेवले आणि सीमंतिनी रूममध्ये गेली. आज ती भलतीच खुश होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या घरच्यांपासून लपला नव्हता पण काही असेल तर सीमंतिनी स्वतः सांगेल म्हणून सगळे शांत होते. सीमंतिनी बेडवर जाऊन पडली. तिने मोबाईल घेतला तर राजसचा मेसेज पडला होता. त्याचा मेसेज पाहून तिच्या चेहऱ्यावर हस्याची लकेर उमटली.
★★★

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सीमंतिनी, समीर, गवळी मॅडम, सानिका आणि राजस हॉस्पिटलमध्ये हजर होते. मोहितही राणे बरोबर आला होता. गवळी मॅडमनी तिच्या ओळखीचे पोलीस इंस्पेक्टर आणि डॉक्टर मेडिकलसाठी नेमून घेतले होते. मोहित मात्र खूप तणावात होता. त्याउलट सीमंतिनी मात्र खूप रिलॅक्स वाटत होती. मोहितला मेडिकलसाठी नेण्यात आले. तासाभराने मोहित बाहेर आला. आता सीमंतिनीची मेडिकलसाठी जाण्याची बारी होती. तिने आत जाताना राजसकडे पाहिले. त्याने खुणेनेच तिला धीर दिला. हे तिथे उपस्थित असलेल्या समीर आणि सानिकाच्या नजरेतून सुटले नाही. सानिका गालात हसत होती.

सीमंतिनीचीही टेस्ट झाली आणि दोघांचेही रिपोर्ट सीलबंद झाले. ते आता सगळ्यांना कोर्टात उद्या कळणार होते. सीमंतिनी निश्चिंत होती तर मोहित मात्र अस्वस्थ होता. जो माणूस सत्याच्या बाजूने असतो आणि जो सत्य बोलत असतो त्याला कशाचीच चिंता करण्याची गरज नसते कारण त्याला आपले पितळ उघडे पडेल याची कसलीच भीती नसते. याउलट जो माणूस खोटं बोलत असतो, खोटं वागत असतो त्याला सतत आपले खोटे बाहेर येईल याची भीती सतावत असते आणि तो सतत एका दडपणाखाली असतो. हाच तर फरक होता सीमंतिनी आणि मोहितमध्ये. सीमंतिनी सत्य बोलत होती. ती खरी होती तर मोहित खोटा होता आणि त्याचे खोटे बाहेर पडेल याची त्याला भीती होती. उद्या कोर्टात त्याचे सत्य बाहेर येणार याची त्याला भीती वाटत होती.

हॉस्पिटलमधून सगळे आपआपल्या कामाला निघून गेले. सीमंतिनी आणि सानिका सानिकाच्या घरी गेल्या. आज सीमंतिनीने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. दोघी सानिकाच्या घरी पोहोचल्या आणि सीमंतिनीला राजसचा फोन आला. तिचं आणि राजसच बोलणं झालं आणि सानिकाने तिला विचारले.

सानिका,“कोणाचा फोन होता?”

सीमंतिनी,“राजसचा! हॉस्पिटलमध्ये सगळ्यांसमोर बोलता नाही आलं म्हणून फोन केला होता त्याने; टेन्शन घेऊ नको म्हणत होता. त्याची नजर आहे त्या इन्स्पेक्टर आणि खास करून डॉक्टरवर. तसे गवळी मॅडमनी योग्य लोक निवडले आहेत म्हणत होता. मोहितचं त्यांच्यासमोर काही चालणार नाही.” ती म्हणाली.

सानिका,“अरे पण राजस तर तुला मिळणाऱ्या पैशासाठी तुझ्या मागे लागला आहे असे म्हणणे होते ना तुझे? आणि मला आठवते राजसने तर मैत्री तोडली होती ना तुझ्याशी? मग हे सगळं?” तिने मुद्दाम विचारले.

सीमंतिनी,“माझं चुकलं सानिका मी राजसला दुखावले. मला वाटत होते की तो माझा मित्र आहे आणि त्याच्या वाचून माझे काही अडणार नाही पण तसं नाही. त्याने रागाने माझा फोन नंबर ब्लॉक केला आणि आठच दिवसात माझे मन सैरभैर झाले. राजस माझ्यासाठी माझा फक्त मित्र नाही तर माझेही प्रेम आहे त्याच्यावर मी स्वतःच्याच भावना ओळखायला चुकले.” ती म्हणाली.

सानिका,“पण तो तर खूप रागावला होता तुझ्यावर. कसं मनवलीस त्याला?” ती तिला धक्का मारत चिडवण्याच्या सुरात म्हणाली.

सीमंतिनी,“सानु गप्प बसतीस का आता? मनवले कसेतरी तुला काय गं?” ती लाजून खाली मान खालून म्हणाली.

सानिका,“हाय हाय मॅडम लाजत आहेत. सीमा मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. तुझ्या आयुष्यात इतके मोठे वादळ आले ते आता शमत आहे आणि तुला याच काळात अगदी योग्य व्यक्ती मिळाला. तुझ्यावर प्रेम करणारा, तुझी आणि तुझ्या स्त्रीत्वाची कदर करणारा. यु डिजर्व ऑल हॅप्पीनेस डार्लिंग. मी त्या परमेश्वराकडे कायम हीच प्रार्थना करत आले.” ती तिचा चेहरा हनुवटीला धरून वर करत म्हणाली आणि सीमंतिनीने तिला मिठी मारली.

सीमंतिनी,“तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली मला. मी खूप भाग्यवान आहे सानु. तू तेव्हा मला सावरलेस जेव्हा मी स्वतःही हार मानली होती. तू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. आज जे काही माझ्या आयुष्यात चांगलं घडत आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे.” ती तिचा हात धरून कृतज्ञपणे म्हणाली.

सानिका,“बास! बास! आभारप्रदर्शन आणि असं नाही सोडणार मी तुला आणि राजसला तुमच्या लग्नात पैठणी हवी मला कळलं का?” ती हाताची घडी घालून नाटकीपणे म्हणाली.

सीमंतिनी,“हो मॅडम तुम्हाला हवी तशी पैठणी घेऊ आपण.” ती हसून म्हणाली.
★★★★

आज कोर्टाची तारीख होती. कोर्टात आज सीमंतिनी आणि मोहीतच्या नात्याचे भवितव्य आणि सीमंतिनीचे भविष्य बंद लिफाफ्यामध्ये मोहर बंद होऊन जजच्या हातात आले होते. सीमंतिनी, गवळी मॅडम, समीर, सीमंतिनीचे आई, बाबा, सानिका, रिमा, राजस, असीम आणि मोहित, राणे वकील सगळेच आज कोर्टात हजर होते. आज तो क्षण आला होता ज्या क्षणासाठी सीमंतिनीने इतका मोठा लढा दिला होता. सगळ्यांच्या काळजाची धडधड वाढली होती. खासकरून मोहित सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये होता कारण त्याला आज जज काय निकाल देणार? हे आधीच माहीत होते. इतके दिवस तो नाकारत आसलेले सत्य आणि त्याने झाकून ठेवलेले नपुंसक असल्याची त्याच्यातील कमतरता आज जग जाहीर होणार होती. जरी तो टेन्शनमध्ये दिसत असला तरी त्याच्या चेहऱ्यावरचा माज अजूनही तीळ मात्र कमी झाला नव्हता.

सीमंतिनीच्या मनाची विचित्र अवस्था झाली होती. एकीकडे तिला आपल्याला न्याय मिळेल म्हणून आनंद तर झाला होता. दुसरीकडे मात्र तिचे मन विषन्न झाले होते कारण तिने मांडलेला संसाराचा एक डाव आज उधळला जाणार होता. तरी मनात कुठेतरी समाधान होते ते म्हणजे राजससारख्या व्यक्तीची साथ तिला इथून पुढे मिळणार होती.

कोर्टाची कार्यवाही सुरू झाली आणि जजने दोन्ही लिफाफे उघडून रिपोर्टस् वाचले. त्यांनी दोन्ही रिपोर्ट्स लक्षपूर्वक वाचून बाजूला ठेवले आणि ते गंभीरपणे बोलू लागले.

जज,“दोन्ही पक्षाचे मेडिकल रिपोर्ट्स पाहता कोर्ट या निर्णयाप्रत पोहोचले आहे की, मिसेस सीमंतिनी मोहित खोत यांनी मिस्टर मोहित खोत यांच्यावर केलेला इंपोटंट असलेला आरोप सत्य आहे. मोहित खोत यांचे मेडिकल रिपोर्ट्सच ते स्पष्ट करत आहेत. तसेच मिसेस सीमंतिनी खोत या विवाहित असून देखील कुमारी आहेत त्यामुळे हे कोर्ट मिसेस सीमंतिनी खोत यांची मोहित खोत यांच्यापासून घटस्फोटाची मागणी मान्य करत आहे आणि कायदेशीररित्या हा विवाह विच्छेदित झाला असे जाहीर करत आहे. तसेच मोहित खोत यांना ते इंपोटंट आहेत हे माहीत असूनही त्यांनी सीमंतिनी खोत यांच्याशी लग्न करून त्यांना फसवले आणि सीमंतिनी खोत यांना मानसिक, शारीरिक त्रास दिला. त्याबदल्यात सीमंतिनी खोत यांना नुकसान भरपाई म्हणून तीन कोटी रुपये द्यावेत असा आदेश देत आहे. तसेच मोहित खोत यांना सहा महिने साधा कारावास अथवा दहा लाख रुपये दंड म्हणून कोर्टात भरावे असा आदेश देत आहे. आजपासून सीमंतिनी खोत या मोहित खोत यांच्या कायदेशीर रित्या पत्नी असणार नाहीत. दोघांनीही घटस्फोटाच्या पेपर्स वर सह्या कराव्यात.” ते म्हणाले.

सीमंतिनीने आणि मोहितने घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्या. सीमंतिनी आणि बाकी सगळे कोर्टाच्या बाहेर पडले. सीमंतिनीने तिच्या स्त्रीत्वाचासाठी, तिच्या स्वाभिमानासाठी दिलेला लढा आज यशस्वी झाला होता. सीमंतिनी समाजासाठी एक उदाहरण बनली होती आणि मोहित सारख्या लोकांसाठी एक धडा.

स्त्री जेव्हा आई, बहीण, बायको, मैत्रीण या रुपात वावरत असते तेव्हा ती चंद्रासम शीतल आणि मोहक असते पण तीच स्त्री जेव्हा फक्त स्त्री म्हणून अन्यायाविरुद्ध उभी राहते तेव्हा ती सुर्यासारखी दाहक आणि ज्वलंत होते हेच सत्य आज सीमंतिनीने पुन्हा एकदा अधोरेखित केले होते.

स्त्रीवर जर तुम्ही प्रेम केले, तिचा आदर केला तर ती स्वतःला विसरून तुमच्यावर प्रेम करेल पण जर तुम्ही तिचा, तिच्या स्त्रीत्वाचा अपमान केलात; तिला तुमचा गुलाम समजलात तर मात्र ती तुम्हाला गाडूनही टाकेल.
★★★
आठ दिवसांनंतर..

आज सीमंतिनीचा लाईव्ह इंटरव्ह्यूव प्रक्षेपित होत होता आणि तो इंटरव्ह्यूव राजस घेत होता.

राजस, “सीमंतिनी मॅडम शेवटचा प्रश्न! तुम्ही जो हा खडतर लढा दिलात आणि तो जिंकलात देखील त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आणि समाजातील स्त्रियांना तुम्ही काय संदेश द्याल.

सीमंतिनी,“खरंतर माझ्यासाठी तुम्ही म्हणालात तसं हा लढा खूप खडतर होता कारण मला एका अशा माणसा विरुद्ध लढावे लागले जो माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत वरचढ होता पण मला माहित होतं माझी बाजू सत्याची आहे आणि सत्यच जिंकणार आणि झालेही तसेच.

समाजातील स्त्रियांना मी संदेश देऊ इच्छिते की, तुम्ही कोणताही आणि कोणाचाही अन्याय सहन करू नका कारण अन्याय करणाऱ्या पेक्षा तो सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. उगीच समाज काय म्हणेल? म्हणून रडत बसू नका. जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध पेटून उठा. लढा आणि जिंकाही! दाखवून द्या या समाजाला की स्त्रीही अबला नाही तर ती सबला आहे. लवकरच मोहितकडून मिळालेल्या पैशातून मी एक ट्रस्ट स्थापन करणार आहे. ज्याव्दारे माझ्यासारख्या अन्याया विरुद्ध लढू पाहणाऱ्या महिलांना मदत केली जाईल.” ती म्हणाली आणि इंटरव्ह्यूव संपला.

★★★

सहा महिन्यानंतर…

मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्ताच्या वेळी.

सीमंतिनी आणि राजस समुद्र किनाऱ्यावर बसून सूर्यास्त पाहत होते. सीमंतिनी सूर्याचा तो शेंदुरी गोळा अस्त होताना भान हरपून पाहत होती आणि राजस तिला म्हणाला.

राजस,“सीमा बघ ना तो अस्ताला जाणारा दिवाकर जणू समुद्रातच विलीन होत आहे असा आभास निर्माण होत आहे.” तो तिला पाहत म्हणाला.

सीमंतिनी,“हुंम आपल्या आयुष्यात देखील असे अनेक आभास निर्माण होत असतात ना आणि आपण त्या आभासांना सत्य मानून भुलतो आणि फसतो, पण आभास आणि सत्य यामधील फरक करायला शिकलो की मग आयुष्य सुखकर होत ना राज? खरंतर सूर्य अस्ताला जात नाही, तर पृथ्वीचा हा भाग अंधारात जात आहे आणि हा रत्नाकर त्याचाच फायदा घेऊन सूर्य त्याच्यात सामावत आहे असा भास निर्माण करत आहे. हा फेसाळलेला रत्नाकर पण खट्याळ आहे तुझ्यासारखा.” ती हसून त्याला पाहत म्हणाली.

राजस,“हो का? आता मी काय खट्याळपणा केला गं?” त्याने तिला जवळ ओढत विचारले.

सीमंतिनी,“आता नाही केलास पण तू ना खट्याळच आहेस राज.” ती त्याच्या जवळून उठत म्हणाली.

राजस,“अच्छा चल तुला आता मी किती खट्याळ आहे ते सांगतो.”

असं म्हणून त्याने तिला दोन्ही हातावर उचलले आणि जवळच असलेल्या रिसॉर्टच्या रुममध्ये नेले.
★★★

नमस्कार वाचकहो!

मी ही कथा नारीवादी कथामालिका लेखन स्पर्धेसाठी लिहली. ही कथा सत्य घटनेवर आधारित असून कथा माझ्या कल्पकतेने रंगवली आहे. कथेचा विषय तसा खूपच बोल्ड आणि न बोलला जाणारा आहे कारण अनेक स्त्रिया या विषयी बोलायला घाबरतात. प्रत्येक स्त्रीची लैगिंक सुख ही शारीरिक आणि मानसिक गरज असते आणि त्यावर तिचा हक्क देखील असतो पण जर तिला ते सुख नवऱ्याकडून मिळत नसेल तर?

ती स्त्री लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? घरचे लोक काय म्हणतील? या सगळ्याचा विचार करून अतृप्त आयुष्य जगते कारण जर स्त्री लैगिंकते विषयी बोलली तर सरळ त्याचा संबंध तिच्या चारित्र्याशी सोडला जातो आणि मोहितसारख्या पुरुषांचे फावते. तो तिच्यावर अत्याचार करत राहतो. हा तर फक्त एकच मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे आणि अनेक लोक आपल्या अवतीभवती फिरत असतात. पण स्त्रियांनी लोक काय म्हणतील? याचा विचार न करता ठामपणे उभे राहिले पाहिजे. हाच संदेश देण्याचा सीमंतिनी हा छोटासा प्रयत्न.

तुम्ही माझ्या या कथेला देखील भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार असाच लोभ असावा. हमसफर्स पर्व 2 या कथेचे पुढचे भाग लवकरच प्रकाशित होतील आणि माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व 2 नक्की वाचा. लवकरच भेटू सनकी नाव जुने पर्व नवे या सस्पेन्स, थ्रिल कथेच्या माध्यमातून. शिवीन आणि ऋचाबरोबर!

तुमची लाडकी लेखिका,
©स्वामिनी(अस्मिता) चौगुले

समाप्त

🎭 Series Post

View all