सीमंतिनी भाग ३

कहाणी सीमंतिनीची जीने सीमोल्लंघन केले.


भाग 3
पूर्वेकडे सूर्याचा लाल गोळा जास्वंदीच्या फुलाप्रमाणे वर येत होता. सीमंतिनीला जाग आली तर शेजारी मोहित निवांत झोपला होता. ती उठून बसली आणि ती मोहितकडे पाहत विचार करत होती.


“मोहित असा का वागतोय? माझी मैत्रीण सानू तर सांगत होती की पुरुष पहिल्या रात्री बायकोला मिठीत घेण्यासाठी अधीर असतात. त्यांना त्यांची बायको दिसायला कशी ही असली तरी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री वाटत असते कारण ती पुरुषाला समर्पण करते. जे सुख नवरा बायकोकडून हक्काने मागू शकतो ते सुख त्याला दुसरं कोणी नाही देऊ शकत. हा बाजारात खूप स्त्रीया पैसे देऊन भेटतात ही पण त्यांच फक्त शरीर ते विकतात त्यांचं मन त्यांचं समर्पण त्या विकत नाहीत म्हणूनच ते सुख खूप उथळ असते आणि पुरुषांना त्यातून हवं ते समाधान मिळत नाही म्हणे जे स्वतःच्या बायकोकडून मिळते. नेमकं मी कुठे चुकत आहे? मी खूप घाई करत आहे का? की मोहितकडून जास्तच अपेक्षा लावून बसले आहे. कारण वहिनी म्हणाली तसं प्रत्येक पुरुष वेगळा असतो पण तिचं तर म्हणाली ना की प्रत्येक नवऱ्याची त्याच्या बायकोकडून एकच अपेक्षा असते. मी खूपच विचार करत आहे. कदाचित मोहीतच असेल काही नवस वगैरे म्हणून ते असं वागले असतील.”

ती विचारात मग्न होती आणि मोहितने तिला हाक मारली.

मोहित,“अग उठून बसलीस काय अशी? आवर जा आपली अकरा वाजता फ्लाईट आहे गोव्यासाठी!” तो झोपल्या ठिकाणी तिला पाहून बोलत होता.

सीमंतिनी,“ हो आवरते लगेच!” ती उठत म्हणाली.

मोहित,“आणि हो ती साडी वगैरे नेसु नकोस बाई! सुटसुटीत ड्रेस वगैरे घाल.” तो म्हणाला.

सीमंतिनी,“हो ड्रेस घालते.” ती म्हणाली आणि बाथरूममध्ये निघून गेली.

ती अंघोळ करून ओले केस पुसत बाहेर आली आणि आरशा समोर उभी राहिली तर अचानक मोहितने येऊन मागून मिठी मारली.तो हळूच तिच्या कानात म्हणाला.

मोहित,“ कालपासून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय सीमा पण आता तुझं ओलेत सौंदर्य पाहून राहवत नाही.”

असं म्हणून त्याने तिला स्वतःकडे वळवून घेतले आणि तिच्या कपाळावरून ओठांवर आलेला पाण्याचा एक चुकर थेंब त्याने फुलावरून दवबिंदू टिपवा तसा त्याच्या ओठांनी टिपला आणि त्याचे ओठ खाली खाली येऊ लागले. ती अचानक कसल्याशा आवाजाने दचकली. मोहित मागून तिच्यावर ओरडत होता.

मोहित,“ सीमा आवर की लवकर काय त्या केसांच कौतुक ग? गोव्यावरून आले की ते केस पहिल्यांदा कापून ये!” मोहित रागाने तणतणत निघून गेला.

सीमंतिनीच्या लक्षात आले की तिने आत्ता अनुभवले ते तिचे दिवा स्वप्न होते.तिने तिच्या लांब रेशमी केसांकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले कारण तिच्या लांब मऊशार रेशमी केसांचा तिच्या मीरा वहिनीपासून ते मुक्ताताईपर्यंत आणि अनेक मैत्रिणींना हेवा वाटायचा. तिचे केस म्हणजे तिच्या सौंदर्याचे लक्षत तर होतेच पण तिला तिच्या केसांचा अभिमान देखील होता. तिची मैत्रीण तिला अनेक वेळा थट्टेने म्हणायची.

“सीमे तुझा नवरा ना तुझ्या केसात अडकला ना तर त्याला बाहेर यायचे कळणार नाही. गुदमरून मरेल बिचारा तर त्याच्यावर केसांचे जाळे टाकताना जरा जपून!” आणि सीमंतिनी खळखळून असायची.

सीमंतिनीने डोळ्यातले पाणी पुसले आणि ती मोहितच्या भीतीने पटकन तयार झाली. तिने तिची बॅग लगेच पॅक केली. तोपर्यंत मोहित अंघोळ करून बाहेर आला आणि त्याच्या तालात तो तयार होऊ लागला. सीमंतिनीच्या असण्याचा आणि नसण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. ती बेडवर बसली होती. तर तो अंगावर डिओड्रंट मारत तिला म्हणाला.

मोहित,“ बसलीस काय इथेच? जा तुझी बॅग घेऊन खाली आणि नाष्टा कर आपल्याला नऊ वाजताच निघावं लागेल एअरपोर्टसाठी एक तर एअरपोर्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूप ट्रॅफिक असत.”

त्याच बोलणं तिने ऐकलं आणि ती बॅग घेऊन खाली गेली. तिचे सासरे नाष्टा करत होते. ती जाऊन त्यांच्या पाया पडली पण ते काहीच न बोलता नाष्टा करून निघून गेले. सीमंतिनीला हा दुसरा धक्का होता. तिचा उतरलेला चेहरा मावशींनी पाहिला आणि त्या तिला समजावण्याच्या सुरात म्हणाल्या.

मावशी,“ सीमा तू नको लक्ष देऊ भाऊजींकडे! या माणसाने स्वतःच्या बायकोला किंमत दिली नाही कधी तर हे सुनेला काय किंमत देणार आहेत. इतकी श्रीमंती इतका मानसन्मान पण माझ्या ताईला या घरात मोलकरीणीची पण किंमत नव्हती. ती या माणसाच्या असल्या वागण्यामुळेच झुरून झुरून मोहित दहावीला असताना गेली. तिला ब्रेन ट्युमर झाला होता पण या माणसाने तिच्याकडे लक्ष दिले नाही आणि आम्हाला कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता म्हणून आम्ही या घरची पायरी देखील इतकी वर्षे चढलो नाही. मोहितचे लग्न करायची वेळ आली आणि मग या दुष्ट माणसाला दाखण्यासाठी का होईना नातेवाईकांची गरज लागली मग मोहितकडून सगळ्यांना फोन केला या माणसाने आणि ताईच्या मुलासाठी म्हणून आम्ही लग्नाला आलो. मी ही आज जाणार आहे. तू मोहितला आत्ता पासूनच ताब्यात ठेव.” त्या सांगत होत्या. हे ऐकून सीमंतिनीला तर धक्काच बसला.

मोहितचे दोन दिवसांपासूनचे तिच्याबरोबरचे वागणे तिच्या डोळ्यांसमोरून गेले आणि तिला वाटले की मोहित त्याच्या बाबांच्या पावलावर पाऊल तर टाकणार नाही ना! हा विचार तिच्या मनात येताच तिच्या अंगावर भीतीने सरसरून काटा आला. पण तिने तो विचार पाल झटकावी तसा झटकून टाकला.तिने विचार केला की गोव्यात गेल्यावर नक्कीच मोहित आणि तिचं नातं पूर्णत्वास जाईल आणि एकदा का मोहित आणि तिचं नातं फुललं दोघांच्या नात्यात प्रेमाचा ओलावा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.आणि मोहितमध्ये आपल्या प्रेमाने सहवासाने आपण बदल घडवून आणू. मोहित मावशी सांगतात तसे त्याच्या वडिलांसारखा नक्कीच नाही कारण तसं असतं तर त्याने लग्न ठरल्यापासून आपल्याला महागडे गिफ्ट दिले असते का? जर त्याला आपली किंमत नसती तर आपल्या इच्छे खातर त्याने मालवनच्या समुद्र किनारी लग्न केले असते का?

या सगळ्या विचारत ती नाष्टा करत होती. तोपर्यंत मोहित तयार होऊन तिथे आला. मोहितने पटापट नाष्टा केला आणि दोघे एअरपोर्टसाठी निघाले. ड्रायव्हर त्यांना एअरपोर्टवर सोडून येणार होता. सीमंतिनी मोहतकडे चोरटा कटाक्ष टाकत होती पण मोहितचे तिच्याकडे लक्ष नव्हते. दोघे एअरपोर्टवर पोहोचले. एअरपोर्ट आणि तिथले वातावरण सीमंतिनीसाठी नवीन होते. तिने आजवर कधीच विमानाने प्रवास केला नव्हता. त्यामुळे ती थोडी गांगरून गेली होती. मोहित मात्र तिथे सराईतपणे वावरत होता. तो बोर्डिंग पास काउंटरवर गेला.

आणि बॅग चेकिंग काउंटरकडे वळला. ती त्याच्या मागे कशी बशी बॅग सावरत पळत होती. तिला तिथे गेल्यावर बॅग त्या तपासणी यंत्राच्या समोर कशी ठेवायची तेच कळत नव्हते. मोहितने रागानेच तिच्या हातातून बॅग हिसकावून घेतली आणि ती चेक करून घेतली. दोघे ही विमानाच्या दिशेने चालू लागले पण मोहीमच्या अशा वागण्यामुळे ती मनातून दुखावली गेली. तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यात अश्रूंचे तळे साचले.पण मोहित पुन्हा चिडेल म्हणून तिने ते अश्रू अवंढ्याबरोबर गिळले. ती मोहितच्या मागे जाऊन त्याच्या सीटच्या शेजारी बसली. विमानात सीट बेल्ट लावण्याची व तो कसा लावायचा याची सूचना एअर होस्टेस देत होती पण आधीच गांगरलेली सीमंतिनी तिला तो बेल्ड लावणे जमत नव्हते. शेवटी मोहितने तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि बेल्ट लावत तो तिच्या कानात पुटपुटला.

मोहित,“ तुम्हा मिडल क्लास मुलींचा हाच प्रॉब्लेम असतो. नुसतं देखणं रूप असून चालत नाही अक्कल ही असावी लागते जवळ!”

त्याच असं हिणवून बोलणं मात्र सीमंतिनीच्या काळजाला घरे पाडत होते. खरं तर विमान प्रवासाची तिची पहिलीच वेळ होती आणि विमान टेक ऑफ करताना तिच्या पोटात भीतीने गोळा आला होता. तिला खरं तर या सगळ्यात ज्या व्यक्तीचा आधार वाटायला हवा त्या व्यक्तीची भीती वाटू लागली. तिला वाटत होते की मोहित तिचा हात हातात घेईल आणि तिला धीर देईल पण तिची ही अपेक्षा आता लोप पावली होती. तिने डोळे बंद करून घेतले दोन्ही हातात सीटचे हॅन्डल गच्च पकडले आणि देवाचे नाव घेतले.मोहितचे मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हते ना तिची काळजी त्याला वाटत होती. तो तर कानात हेड फोन घालूल गाणी ऐकण्यात दंग होता.


लग्न झाल्यापासून मोहितचे वागणे सीमंतिनीच्या अपेक्षेच्या पूर्णपणे विरुद्ध होते. तो तिच्या बाबतीत पूर्णपणे बेफिकीर आणि बेजबाबदार वाटत होता. तसेच तिच्या प्रति एका नवऱ्याचे त्याच्या बायको विषयी वाटणारे आकर्षण देखील तिला या दोन दिवसात दिसून आले नव्हते. उलट तो तिला सतत टोचून बोलत होता आणि कमी लेखत होता. त्यामुळे सीमंतिनी आतल्या आत घुसमटत होती.

मोहित खरंच त्याच्या मावशीने सांगितल्या प्रमाणे त्याच्या बाबांसारखा असेल का? गोव्यात सीमंतिनीला अपेक्षित असे काही घडेल का?
©swamini chougule

🎭 Series Post

View all