सीमंतिनी भाग ३८

सीमंतिनीला रिमा शर्मा सापडेल का?


भाग ३८

सीमंतिनी आज लवकरच घरातून निघाली होती कारण तिला केस संदर्भात चर्चा करण्यासाठी गवळी मॅडमच्या ऑफिसमध्ये जावे लागणार होते आणि तिथून ती पुढे ऑफिसला जाणार होती. ती गवळी मॅडमच्या ऑफिसमध्ये गेली तर त्या तिचीच वाट पाहत होत्या.

गवळी मॅडम,“सीमंतिनी ये. बस.” त्या म्हणाल्या.

सीमंतिनी,“मॅडम फोन करून तुम्ही मला बोलावले? काही महत्त्वाचे काम होते का?” तिने विचारले.

गवळी मॅडम,“तसे महत्त्वाचेच काम होते. कोर्टाने आपल्याला पुढच्या तारखेला मोहित विरुद्ध पुरावे सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्याच संदर्भात तुझ्याशी बोलायचे होते.” त्या गंभीर होत म्हणाल्या.

सीमंतिनी,“हो माहीत आहे मला पण आपण काय आणि कसे पुरावे सादर करायचे मॅडम?” तिने विचारले.

गवळी मॅडम,“सीमा तुझ्यावर मोहितने हात उचलला तेव्हा तिसरी व्यक्ती तिथे हजर होती का? जी सांगू शकेल की त्याने तुझ्यावर हात उचलला?” त्यांनी विचारले.

सीमंतिनी,“नाही मॅडम कारण हे सगळं आमच्या बेडरूममध्ये रात्रीच्या वेळी घडले.” ती म्हणाली.

गवळी मॅडम,“मग त्याने तुझ्यावर हात उचलला हे आपण कसे सिद्ध करणार आहोत?” त्या चिंतीत होत म्हणाल्या.

सीमंतिनी, “मॅडम ते सिद्ध करणे तर अवघड आहे कारण त्याचे कोणतेही प्रूफ आपल्या जवळ नाही.” ती निराश होत म्हणाली.

गवळी मॅडम,“बरं ते आपण पाहू. मोहित इंपोटंट आहे हे मेडिकली सिद्ध करता येईल पण मोहित त्याची मेडिकल टेस्ट करायला इतक्या सहजासहजी तयार होणार नाही. सीमा त्याचा काही पास्ट वगैरे आहे का? कोणी मुलगी जिचं त्याच्यावर प्रेम वगैरे होते म्हणजे ती मुलगी आपल्या बाजूने मोहित विरुद्ध कोर्टात साक्ष देईल आणि त्या जोरावर आपण मोहितला मेडिकल टेस्ट करायला फोर्स करू.” त्यांनी विचारले.

सीमंतिनी,“हो मॅडम मोहितने मला त्याच्या पास्ट बद्दल सांगितले होते. त्याच जोरावर तर त्याने सुरवातीला माझी सहानुभूती मिळवली होती. रिमा शर्मा नावाची त्याची प्रेमिका होती इंदौरमध्ये असते ती. अमेरिकेत दोघे शिकायला होते तेव्हा दोघांमध्ये काहीतरी होते.” ती म्हणाली.

गवळी मॅडम,“त्या रिमा शर्माचा काही पत्ता आहे का?” त्यांनी विचारले.

सीमंतिनी,“अss रिमा शर्मा इंदौर मधील बिझनेस बेस्ड फॅमिलीमधील आहे. शर्माज अँड सन्स असं काहीतरी त्यांच्या बिझनेसच नाव आहे.” ती आठवत म्हणाली.

गवळी मॅडम,“मग नेटवर चेक कर. आपल्याला रिमा शर्माचा पत्ता मिळायला हवा. ती आपल्या केसमध्ये खूप महत्त्वाची साक्षीदार ठरू शकते.” त्या म्हणाल्या.

सीमंतिनी,“मी तिला शोधून काढेन मॅडम पण त्यासाठी वेळ हवा. आपण दोन किंवा तीन तारखा पुढे ढकलू शकतो का?” तिने काहीतरी विचार करत विचारले.

गवळी मॅडम,“कोर्टाचं मी सगळं पाहून घेईन. तुझ्या जवळ तीन महिने आहेत असे समज. तू त्या रिमा शर्माला शोध आणि तिला आपल्या बाजूने उभं रहायला तयार कर बास.” त्या म्हणाल्या.

सीमंतिनीने फेसबुकवर रिमा शर्मा नावाने सर्च केले पण तिथे अनेक रिमा शर्मा होत्या. त्यात ज्या मुलीला आपण पाहिले नाही त्या मुलीला शोधणे म्हणजे एक दिव्यच होते. या सगळ्या विचारात सीमंतिनी ऑफिसमध्ये पोहोचली.

तर एच.आर डिपार्टमेंटच्या हेडने मिटिंग बोलावली आहे असे तिला कळले आणि ती सरळ कॉन्फरन्स हॉलमध्ये पोहोचली. तर तिथे तिच्या डिपार्टमेंटचे तिघेच हजर होते. एक विकास आणि त्या दोन मुली ज्यांनी सीमंतिनीचा अपमान केला होता. सीमंतिनीला ते पाहून जरा आश्चर्य वाटले पण ती काहीच न बोलता आत गेली. सीमंतिनीला एच.आर. हेड पाटील यांनी पाहिले आणि ते म्हणाले.

पाटील,“या मिस मोहिते. तुमचीच वाट पाहत होतो मी. (ते म्हणाले आणि सीमंतिनी मनातून घाबरली. या तिघांनी तिच्याबद्दल काही तक्रार तर केली नसेल? अशी शंका तिच्या मनात डोकावून गेली आणि ती मनातून चरकली.) मिस्टर विकास काल ऑफिसमध्ये लंच एरिआमध्ये लंच ब्रेकच्या वेळी काय घडले सांगू शकाल?” त्यांनी त्याला रोखून पाहत विचारले. विक्रम मात्र आता चांगलाच घाबरला.

विकास,“सर मीनल आणि शुभांगी मॅडम सीमंतिनी मॅडमचा अपमान करत होत्या काल.” तो आवंढा गिळत म्हणाला.

पाटील,“आणि तुम्ही काय केलंत? मिस्टर विकास तुमच्यासारख्या पुरूषांमुळेच वर्किंग वुमेन्स सगळ्या पुरुषांना वाईट समजतात. तुम्हाला काय वाटतं एकटी स्त्री म्हणजे संधी असते का? तर चुकताय तुम्ही मिस्टर विकास (त्यांचा आवाज आता चढला होता.) आपल्या ऑफिसमध्ये महिला काम करतात तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. मिस मोहिते या ऑफिसच्या एंप्लोई आहेतच पण त्या मला मुली सारख्या आहेत. त्यांच्याबरोबर पुन्हा आगळीक करण्याचा प्रयत्न जरी केला तर गाठ माझ्याशी आहे. आत्ता तुम्हाला फक्त एक मेमो आणि आठ दिवसाचा पगार कापून सोडत आहे पण पुन्हा असं काही केलं तर याद राखा तुमची नोकरी तर जाईलच पण तुम्हाला कुठेच नोकरी मिळणार नाही याची खबरदारी मी घेईन.” ते म्हणाले. विकासच्या डोळ्यासमोर मात्र आता काजवे चमकायचे राहिले होते. मीनल आणि शुभांगीही आता पाटील सरांचा अवतार पाहून चांगल्याच घाबरल्या होत्या.


विकास,“सॉरी सर माझ्याकडून पुन्हा असे घडणार नाही.” तो आवंढा गिळत खाली मान घालून म्हणाला.

पाटील,“माफी माझी नाही मिस मोहितेंची मागायची. आणि तुम्ही दोघी! हे ऑफिस आहे आणि इथे काम करायला येता ना तुम्ही? की गॉसिपिंग करायला? गॉसिपिंग करायची असेल तर नोकरी सोडा आणि एखादी किटी पार्टी जॉईन करा. तुम्हाला कोणाच्याही पर्सनल लाईफवरून त्याला बोलण्याचा, टाँटटिंग करण्याचा अजिबात अधिकार नाही. पुन्हा जर मला कळले की तुम्ही असे काही केले आहे तर याद राखा तुम्हालाही मेमो आणि चार दिवसांचा पगार कट तुमचा.” ते रागाने म्हणाले. सीमंतिनीला मात्र हे सगळं पाटील सरांना कसे कळले? याचे आश्चर्य वाटत होते. ती त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होती.

सीमंतिनी,“पण सर मी तर यांच्या विषयी तक्रार केली नव्हती तुम्हाला कसे कळले हे?” तिने विचारले.

पाटील,“मिस मोहिते तुम्ही तक्रार केली नाही हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे पण जर यांच्यासारख्या लोकांना वेळीच आवर घातला नाही तर हे चांगलेच शेफारतील. आपल्या ऑफिसमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमरे आहेत आणि दिवस संपल्यावर त्याचे फुटेज माझ्याकडे येतात. मी एच.आर हेड असल्याने मला ऑफिसमध्ये काय काय घडते? याची सगळी माहिती ठेवावी लागते. तुम्हाला तुमच्या पर्सनल आयुष्यवरून जर पुन्हा कोणी छेडले तर तुम्ही माझ्याकडे तक्रार करा आणि तुम्ही तिघांनी माझ्या समोर मिस मोहितेंची माफी मागायची.” ते म्हणाले. तिघांनीही सीमंतिनीची माफी मागितली आणि ते निघून गेले

सीमंतिनी,“थँक्स सर!” ती आवंढा गिळत म्हणाली.

पाटील,“थँक्स नका म्हणू माझं काम आहे ते आणि अन्याय सहन न करता त्याला वाचा फोडून स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या स्त्रिया खूप कमी असतात. तुम्ही नक्कीच समाजासमोर एक मापदंड घालून द्याल. हॅट्स ऑफ टू यु यंग लेडी.” ते कौतुकाने म्हणाले.

सीमंतिनी,“थँक्स सर तुमच्यामुळे मला लढण्याचे आणखीन बळ मिळलाले.” ती डोळे पुसत म्हणाली.

सीमंतिनीला पाटीलसरांच्या सपोर्टमुळे चांगलाच दिलासा मिळाला होता आणि विकास सारख्या पुरुषांना आणि मीनल-शुभांगी सारख्या लोकांना अद्दल घडली होती. त्यामुळे सीमंतिनी निश्चिंतपणे तिच्या कामाला लागली पण रिमा शर्मा बद्दलचे विचार मात्र तिच्या मनात घोळत होते. तिला मोहित विरुद्ध हा लढा जिंकायचा असेल तर रिमा शर्माला शोधावे लागणार होते. तिला नुसते शोधून चालणार नव्हते तर मोहित आणि तिच्यात भूतकाळात काय झाले होते? हे जाणून घेऊन मोहित विरुद्ध साक्ष द्यायला रिमाला तयार करणे खूप गरजेचे होते.

सीमंतिनीला रिमा शर्मा सापडेल का? रिमा सापडली तरी ती मोहित विरुद्ध साक्ष द्यायला तयार होईल का?
©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all