सीमंतिनी भाग ३७

सीमंतिनीला कोण कोणत्या पातळ्यांवर लढा द्यावा लागणार होता?


भाग ३७

आज कोर्टाची तारीख होती आणि मोहित त्याच्या वकीलासह कोर्टात हजर होता. सीमंतिनी आणि तिची वकील देखील कोर्टात हजर होती. कोर्टाची कार्यवाही सुरू झाली आणि मोहितच्या वकिल राणेंनी बोलायला सुरुवात केली.

राणे,“माझे आशील मोहित सुरेश खोत यांच्यावर त्यांच्या सुविद्य पत्नी सीमंतिनी मोहित खोत यांनी लावलेले आरोप साफ खोटे आहेत. सीमंतिनीचा मोहित यांच्याबद्दल बराच गैरसमज झाला आहे. घरगुती भांडणांच्या रागातून सीमंतिनी खोत या कोर्टात आल्या आहेत. मी कोर्टाला विनंती करतो की कोर्टाने माझ्या आशिलास एक संधी देऊन सीमंतिनी खोत यांना मोहित खोत यांच्याकडे नांदायला पाठवावे. त्यामुळे त्यांच्यात असलेले गैरसमज दूर होऊन एक संसार मोडायचा वाचेल.”

मोहितच्या वकिलांचे बोलणे ऐकून सीमंतिनी अवाक होती. ते असं काही बोलतील असे सीमंतिनीला वाटले नव्हते. तिने गवळी मॅडमकडे पाहिले त्यांनी तिला डोळ्यांनीच आश्वस्थ केले आणि त्या बोलू लागल्या.

गवळी मॅडम,“साहेब माझ्या आशीलाला मोहित खोत यांच्याकडून फारकत हवी आहे. त्यांना नांदायला जाण्याची इच्छा नाही, त्यामुळे माझे वकील मित्र राणे जी विनंती करत आहेत त्या विनंतीला काहीच अर्थ नाही.” त्या म्हणाल्या.

जज, “जर सीमंतिनी खोत यांना मोहित खोत यांच्याकडे नांदायला जाण्याची इच्छा नसेल तर कोर्ट त्यांना तशी जबरदस्ती करू शकत नाही. त्यामुळे मोहित खोत यांच्या वकिलांची विनंती कोर्ट फेटाळत आहे आणि सीमंतिनी खोत यांनी मोहित खोत यांच्यावर जे आरोप लावले आहेत ते सिद्ध करण्यासाठी पुढच्या तारखेला त्यांनी ठोस पुरावे कोर्टात सादर करावेत असा आदेश त्यांना कोर्ट देत आहे.” ते म्हणाले आणि कोर्टाची कार्यवाही संपली.

इकडे मीडियात मात्र प्रसिद्ध बिझनेसमन मोहित खोतच्या घटस्फोटाच्या केसची बातमी मात्र वणव्यासारखी पसरली. मीडियात त्याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. कोर्टातून मोहित बाहेर पडला तसे मोहितला मीडियाने घेराव घातला. मोहित कसाबसा त्यांच्यातून सटकला आणि गाडीतून निघून गेला. सीमंतिनी मात्र त्या घोळक्यात अडकली. गवळी मॅडम आणि समीरने तिला कसेबसे बाहेर काढले आणि समीर तिला घरी घेऊन गेला. आता जी गोष्ट अजून गुलदस्त्यात होती ती गोष्ट मीडियामुळे जग जाहीर झाली होती. त्याचा त्रास मात्र सगळ्यात जास्त सीमंतिनीला होणार होता. कारण आपला समाज पुरुषाची चूक असली तरी स्त्रीलाच वेठीस धरतो. स्त्रीनेच काहीतरी चूक केली असेल असे गृहीत धरले जाते आणि तिला समाज टोमणे द्यायला सज्ज होतो. या कामात सगळ्यात अग्रेसर तर स्त्रियाच असतात.
★★★

सीमंतिनी आज नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली तर ऑफिसमध्ये सगळे तिला विचित्र नजरेने पाहत होते आणि आपापसात कुजबुजत होते. सीमंतिनी मात्र शांतपणे तिच्या डेस्कवर जाऊन बसली आणि तिच्या कामात मग्न झाली. लंच ब्रेक झाला आणि सगळे लंचसाठी एकत्र जेवले. सीमंतिनी बरोबर काम करणाऱ्या काही मुलींना मात्र आता आयती संधी मिळाली सीमंतिनीला सूनवायची आणि घालूनपडून बोलायची.

“काय गं सीमा आपण एक वर्ष झाले एकत्र काम करतो पण आम्हाला कधी सांगितलं नाहीस की बिझनेसमन मोहित खोत तुझे मिस्टर आहेत ते. अगं इतक्या मोठ्या बिझनेसमनची बायको तू आणि अशी पन्नास हजारवर इथे काम करत आहेस. काल न्यूज पाहिली आणि धक्काच बसला मला तरी. अगं असं काय घडलं की तुमच्यात घटस्फोट होत आहे? उलट तूच नमतं घेऊन माघारी जायला हवं. इथे असं नोकरी करण्यात काय अर्थ आहे स्वतःचा इतका मोठा बिझनेस असताना? मी तर इतक्या श्रीमंत माणसाला कधीच सोडलं नसतं बाई.” ती तोंड वाकड करत बोलत होती.

“काही नाही गं देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी गत आहे.” दुसरी टोमणा मारत म्हणाली. सीमंतिनी त्यावर काही बोलणार तर त्यांच्याबरोबर काम करणारा विकास म्हणाला.

विकास,“काय लावलं आहे तुम्ही लोकांनी? हे ऑफिस आहे इथे आपण काम करायला येतो. सीमंतिनीच्या पर्सनल आयुष्यात काय होत आहे याच्याशी आपला काहीच संबंध नाही. तुम्ही जर पुन्हा तिला त्रास दिला तर मी एच.आर. टीमकडे तक्रार करेन तुमच्या दोघींची.” तो म्हणाला आणि त्या दोघी तोंडं वाकडी करून निघून गेल्या.

सीमंतिनी,“थँक्स विकास” ती म्हणाली आणि निघून जाऊ लागली तर विकास तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला.

विकास,“सीमा मी तुझ्याबरोबर कायम आहे. तू काळजी नको करुस.”

त्याचा स्पर्श मात्र सीमंतिनीला वेगळाच वाटला. त्या स्पर्शात तिला अपेक्षा आणि वासना जाणवली. तिला त्याच्या वागण्याचा राग आला आणि तिला त्याच्या बोलण्यामागचा तसेच स्पर्शा मागचा उद्देश कळायला वेळ लागला नाही.

सीमंतिनी,“मिस्टर विकास तुमच्या सारख्या पुरुषांना एकटी स्त्री म्हणजे संधी वाटते. तिला थोडी सहानुभूती दाखवली की तुमचा खांद्यावरचा हात पुढे छातीवर सरकायला वेळ लागत नाही, पण मी एकटी नाही माझ्या मागे माझे वडील, भाऊ आणि सगळं कुटुंब आहे तर तुमच्या असल्या भिकार सहानुभूतीची मला गरज नाही. कळलं? पुन्हा जर तुझ्याकडून काही आगळीक झाली तर मात्र मला तुझी वरिष्ठांकडे तक्रार करायला वेळ लागणार नाही. त्या बायका परवडल्या! तोंड सुख घेऊन गप्प तरी बसतील आणि खरं कळल्यावर माफी देखील मागतील पण तुमच्या सारखे संधीसाधू पुरुष नकोत.” ती त्याच्यावर जळजळीत नेत्र कटाक्ष टाकून त्याचा हात झटकत म्हणाली आणि रागाने निघूनसुध्दा गेली.

विकास मात्र तिच्या अशा बोलण्याने चांगलाच चरकला. सीमंतिनीने आज समाजाचे दोन बीभत्स चेहरे पाहिले होते. दोन अशा सुशिक्षित स्रिया ज्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच माहीत नव्हतं तरी त्यांनी तिच्यावर तोंडसुख घेतले होते आणि एक असा पुरुष ज्याने एकट्या स्त्रीला संधी समजून तिला सहानुभूतीचे आमिष दाखवून तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता.

सीमंतिनी मानसिक कितीही स्ट्रॉंग असली तरी आज जे झाले होते त्याचे तिला दुःख होत होते, त्याही पेक्षा तिला त्यांचा राग येत होता. तिच्यासाठी ही लढाई नक्कीच सोपी नव्हती पण तिला न डगमगता निकराचा लढा द्यायचा होता. ती रागातच घरी गेली तर समोर तिचे काकू-काका हजर होते. त्यांना पाहून ती चांगलीच भडकली.

सीमंतिनी, “तुम्ही दोघेही न्यूज पाहून मला किंवा आई-बाबांना सूनवायला आला असाल तर घ्या तुम्हीही सूनावुन. मी कशी कर्म दरिद्री आहे वगैरे वगैरे…” ती रागाने तणतणली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. सीमंतिनीची काकू तिच्या मागे गेली.

काकू,“सीमा अगं आम्ही तुला चार शब्द ऐकवायला नाही आलो बेटा तर तुझी चौकशी करायला आलो आहोत. तुझ्या आईने आधीच सगळं आम्हाला सांगितले आहे. तुला लहानाचे मोठे होताना पाहिले आहे. मी या हाताने तुला नाहू माखु घातले, लाड केले तुझे आणि अशा कठीण प्रसंगी तुझ्याशी आम्ही असं वागू असं वाटलंच कसं तुला?” त्या डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या आणि सीमंतिनीने त्यांना रडत मिठी मारली.

सीमंतिनी,“सॉरी काकू मी तुला आणि काकाला असं बोलायला नको होतं.” ती म्हणाली.

काकू,“सॉरी कशाला म्हणतेस गं सीमे? मी समजू शकते तू सध्या कोणत्या मनःस्थितीतुन जात आहेस. जा फ्रेश होऊन ये मी तुझ्यासाठी तुला आवडतात म्हणून कोथिंबीर वड्या आणि मलई बर्फी आणली आहे.” त्या तिचे डोळे मायेने पुसत म्हणाल्या.


सीमंतिनी दुपारी काय झाले ते तात्पुरती का असेना विसरली होती पण रात्री झोपायला गेल्यावर तिला पुन्हा ते सगळं आठवलं. तिला सगळ्यात जास्त राग तर विकासच्या वागण्याचा आला होता. विकाससारखे पुरुष समाजात संधीच्या शोधत घात लावून बसलेले असतात आणि संधी मिळाली की ते स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न करतात हे तिने आज प्रत्यक्ष अनुभवले होते.

सीमंतिनीला अजून कोण कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार होता? आणि कोण कोणत्या पातळीवर तिला लढा द्यावा लागणार होता?

© स्वामिनी (अस्मिता) चौगुले.

🎭 Series Post

View all