सीमंतिनी भाग ३६

राणे वकील आणि मोहित आता कोर्टात काय उत्तर देणार होते?


भाग ३६

आज कोर्टाची बाकी प्रोसिजर पूर्ण होऊन मोहित विरुद्ध सीमंतिनी आणि गवळी मॅडम दोषारोपपत्र दाखल करणार होत्या. सीमंतिनी आणि गवळी मॅडमनी बाकी कायदेशीर पूर्तता केली आणि त्या दोघी जज समोर उभ्या राहिल्या. दोघींनी जजला अभिवादन केले आणि गवळी मॅडम बोलू लागल्या.

“साहेब या माझ्या आशील सौ. सीमंतिनी मोहित खोत. त्यांना त्यांचे पती मोहित सुरेश खोत यांच्याकडून घस्फोट हवा आहे त्याचे हे दोषारोप पत्र त्यांच्या संमतीने मी दाखल करत आहे.

मिस्टर मोहित सुरेश खोतवर आय.पी.सी. सेक्शन 498A स्टेटस 10 नुसार घरगुती हिंसाचारचा आरोप माझी आशील सौ. सीमंतिनी मोहित खोत यांच्या वतीने दाखल करत आहोत.

हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 सेक्शन 12(1)(a) नुसार मिस्टर मोहित सुरेश खोत हे नपुंसक आहेत तरी त्यांनी सौ. सीमंतिनी मोहित खोत यांच्याशी लग्न केले आणि त्यांनी कलम 420 नुसार माझ्या आशीलाची फसवणूक केली आहे म्हणून आज मी ऍडव्होकेट वनिता गवळी; सीमंतिनी मोहित खोत यांच्या तर्फे मोहित सुरेश खोत यांच्या विरुद्ध खटला दाखल करत आहे.”


त्यांचं बोलणं जजने ऐकून घेतले आणि कागदपत्रे दाखल करून कोर्टात खटला उभा राहिला. लवकरच मोहितला कोर्टाकडून पुढच्या तारखेचे संमस मिळाले आणि त्याने राणे वकिलांचे ऑफिस गाठले. मोहितवर लावलेले आरोप राणेंनी वाचले आणि ते म्हणाले.

राणे,“मला त्या हे आरोप लावतील याचा अंदाज होताच. आपण त्यांना कोर्टात उत्तर देऊच याबद्दल, तुम्ही निश्चिंत रहा.” ते म्हणाले.

★★★

सीमंतिनीने कायदेशीर लढाईला सुरुवात केली होती पण या सगळ्याचा तिला कुठेतरी मानसिक त्रास होत होता. गवळी मॅडमच्या म्हणण्यानुसार मोहित तिच्या चारित्र्यावर देखील शिंतोडे उडवू शकतो या कल्पनेनेच ती थोडी अस्वस्थ होती. तिची अस्वस्थता ओळखून आज तिच्या आईने सानिकाला घरी बोलावले होते. सानिका आली तर सीमंतिनी तिच्या रूममध्ये होती. सानिका तिच्या रूममध्ये गेली तर सीमंतिनी शून्यात नजर लावून विचारात मग्न असलेली तिला दिसली.

सानिका,“काय सीमा मॅडम कुठे भटकताय?” तिने तिच्या जवळ बेडवर बसत विचारले.

सीमंतिनी,“कुठे नाही गं! पण तू कधी आलीस?” तिने भानावर येत विचारले.

सानिका,“आत्ताच आले मी. बरं चल ना आपण बाहेर फिरून येऊ जरा.” ती म्हणाली.

सीमंतिनी,“माझा मूड नाही गं तू जा ना एकटी.” ती म्हणाली.

सानिका,“मला एकटीलाच जायचं असतं तर मी माझ्या घरून इतक्या लांब तुझ्या घरी आले असते का? मूडच मला काही सांगू नकोस, चल आवर जा लवकर. काकू चहा करत आहेत चहा घेऊ आणि निघू.” ती हक्काने म्हणाली आणि सीमंतिनीचा नाईलाज झाला.

सीमंतिनी,“बरं बाई येते चल.” ती उसनं हसू आणत म्हणाली.

सानिका सीमंतिनी तयार होईपर्यंत तिथेच बसली. दोघींनी चहा घेतला आणि घरा बाहेर पडल्या. सानिकाने जुजबी खरेदी केली आणि तिने सीमंतिनीला बाप्पाच्या देवळात नेले.

सीमंतिनी,“सानिका आपण इथे का आलो आहोत?” तिने आश्चर्याने विचारले.

सानिका,“देवळात का येतात सीमा? मनःशांती मिळवण्यासाठीच ना? दर्शन घे आणि चल आपण थोडावेळ बाहेर बसू.” ती म्हणाली आणि सीमंतिनीने नुसती होकारार्थी मान हलवली.

दोघींनी देव दर्शन घेतले आणि प्रसाद घेऊन त्या मंदिराच्या आवारात असलेल्या एका बेंचवर बसल्या. सीमंतिनी शांतच होती.

सानिका,“तुझ्या मनात काय सुरू आहे सीमा?” तिने तिचा हात हातात घेत विचारले.

सीमंतिनी,“काही नाही.चल निघूयात का?” डोळ्यातले पाणी कसेबसे अडवत ती उठत तिला म्हणाली.

सानिका,“सीमा तुझ्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे. तू मला बेस्टफ्रेंड म्हणतेस ना मग मला नाही सांगणार का?” तिने तिचा हात धरून तिला पुन्हा बेंचवर बसवत विचारले.

सीमंतिनी,“काय सांगू सानिका तुला मी?” ती आवंढा गिळत म्हणाली.

सानिका,“जे तुझ्या मनात साचले आहे ते.” ती रोखून पाहत म्हणाली.

सीमंतिनी,“सानिका मी कोर्टात कायदेशील लढाई लढायला तयार झाले. स्वतःची तशी मानसिक तयारी देखील मी केली आहे, पण माझे मन मात्र थऱ्यावर नाही गं. कोर्टात ही गोष्ट गेली म्हणजे अनेक प्रश्न उपस्थित होणार. उलट सुलट प्रश्न त्यावर होणारी चर्चा कदाचित माझ्या चारित्र्यावर देखील मोहित स्वतःला वाचवण्यासाठी शिंतोडे उडवले. काय दोष होता गं माझा? जे हे सगळं माझ्याच वाट्याला आलं. माझी स्वप्न आणि आशा एका मिनिटात वादळात अडकलेल्या पाल्यापाचोळ्या प्रमाणे उडून गेले. मी तर एक साधारण वैवाहिक आयुष्याची कामना केली होती पण मला काय मिळालं? बरं हे सगळं माझ्याच बाबतीत का? मीच का? सांग ना काय पाप केलं आहे मी?” ती रडत दुःखी होऊन बोलत होती. तिने तिच्या मनात असणारी खंत सानिकाला बोलून दाखवली होती.

सानिका,“सीमा इतक्यात थकलीस? अगं तुला तर अजून खूप मोठी लढाई लढायची आहे इतक्यात डगमगून कसे चालेल? कोर्टात लढाई लढायची म्हणजे आरोपप्रत्यारोप होणारच ना? आपण समोरच्या व्यक्तीवर वार केला तर तो त्याच्या परीने पलट वार करणारच. मग त्याला इतकं काय घाबरायचं? तू कशी आहेस हे आम्हाला सगळ्यांना, तुझ्या जवळच्या माणसांना माहीत आहे ना मग झालं तर आणि मीच का? हा प्रश्नच निरर्थक आहे सीमा. अगं बाप्पाही लढायला त्याच लोकांना निवडत असतो जे लढण्यासाठी पात्र असतात आणि तू पात्र आहेस लढण्यासाठीही जिंकण्यासाठीही. उगीच भलते विचार करून स्वतःला दुःखी करून घेऊ नकोस. तुला समाजासाठी एक आदर्श घालून द्यायचा आहे. स्त्री ही कसाही अन्याय सहन करायला अबला नाही तर ती सबला आहे हे मोहित सारख्या लोकांना दाखवून द्यायचे आहे. मोहित सारखे लोक पुन्हा असं वागताना दहा वेळा विचार करतील असा धडा शिकवायचा आहे. उगीच वेड्यासारखा विचार करू नकोस. या सगळ्यातून बाहेर पडून नवीन आयुष्याची सुरवात तू जेव्हा करशील ना तेव्हा मागे वळून पाहताना आपल्या बरोबर हे सगळं घडलं होतं का? असा विचार तुला पडेल.” ती तिचे डोळे पुसत म्हणाली.

सीमंतिनी,“हुंम! अवघड आहे माझ्यासाठी खरंतर हे सगळं तरी मी स्वतःला सावरून पुन्हा उभी राहीन. तुझ्यामुळे मला लढण्याचे बळ मिळते सानिका. थँक्स!” ती म्हणाली.

सानिका,“आभार प्रदर्शन नको चला आता मॅडम तुमचा मूड ठीक करण्यासाठी तुमचे आवडते बटर स्कॉच आईस्क्रीम खाऊ.” ती हसून म्हणाली.

सीमंतिनीने हसून नुसती मान डोलावली. सीमंतिनी कितीही कणखर असली तरी कितीही झालं तरी ती देखील एक सामान्य स्त्रीच होती. तिलाही मन, भावना होत्या. तिलाही एका सामान्य स्त्री सारखे सुखी वैवाहिक आयुष्य जगायचे होते मात्र त्या विधात्याने तिची निवड स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी केली होती. सामान्य असलेल्या तिच्यातील असामान्य गुण आणि लढण्याची क्षमता यांचा कस लागणार होता.

सीमंतिनीचे भावनिक दृष्ट्या कोलमडने साहजिक होते. तिला वाटणारी खंत आणि भीतीही साहजिकच होती. पण पुन्हा एकदा सानिकाने तिला सावरले होते. एक मैत्रीण म्हणून पुन्हा ती सीमंतिनीच्या पाठीशी ठामपणे उभी होती. सानिकासारखी मैत्रीण सीमंतिनीजवळ असणे म्हणजेच सीमंतिनीची ताकद होती. ती पुन्हा एकदा स्वतःच्याच मनातून खचली होती आणि सानिकाने तिला समजावले होते.

स्त्रीच स्त्रीची ताकद बनणे खरंतर आपल्या समाजात खूप कमी पहायला मिळते कारण जास्त करून आपल्या समाजात स्त्रीच स्त्रीची शत्रू बनते पण सानिका आणि सीमंतिनीची मैत्री म्हणजे या सगळ्या मापदंडाला अपवाद होती. सानिका तेव्हा सीमंतिनीच्या मागे उभी राहिली जेव्हा सीमंतिनीच्या मागे तिच्या रक्ताची नाती देखील उभी राहायला तयार नव्हती. सीमंतिनीला आज पुन्हा मानसिक आधारची गरज होती आणि सानिका पुन्हा सीमंतिनीचा भक्कम आधार झाली होती.

राणे वकिल आणि मोहित आता कोर्टात काय उत्तर देणार होते? सीमंतिनीला भीती होती तसे ते सीमंतिनीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील का?
©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all