सीमंतिनी भाग १०

गोष्ट एका सीमंतिनीची जीने सीमोल्लंघन केले.


मोहित आणि सीमंतिनीच्या सारखरपुड्याची तारीख एक महिन्यानंतरची ठरली. पण या काळात दोघांचे ही रात्र रात्र फोनवर बोलणे. बाहेर कुठे तरी कोणाला ही न कळू देता भेटणे सुरू होते. सीमंतिनी तर मोहितच्या प्रेमात पडली होती. त्याची प्रत्येक गोष्ट तिला आवडू लागली होती. मोहित देखील तिच्याशी छान वागत होता.तो किती ही बिझी असला तरी वेळात वेळ काढून तो तिला आठवड्यातून एकदा तरी भेटत असे. आज रविवार होता आणि असेच त्याने तिला भेटायला बोलावले होते. कारण उद्यापासून तिची परीक्षा सुरू होणार होती आणि त्यानंतर ती त्याला पंधरा दिवस तरी भेटू शकणार नव्हती. सीमंतिनी मैत्रिणीकडून नोट्स आणायच्या आहेत अशी थाप ठोकून घरून बाहेर पडली. ठरल्या प्रमाणे मोहित त्याची कार घेऊन चौकात उभा होता. सीमंतिनी चौकात आली आणि ती कारमध्ये बसली. संध्याकाळचे पाच वाजले होते त्यामुळे ऊने उरली होती आणि वातावरण आल्हाददायक होते. ती मोहित शेजारी बसून खिडकीतून बाहेरचे निसर्गसौंदर्य पाहत होती. मोहित ड्राइव्ह करत होता पण गाडी शहराच्या बाहेर पडली आहे असे तिच्या लक्षात आले आणि तिने मोहितला विचारले.

सीमंतिनी,“ मोहित आपण कुठे जात आहोत?”

मोहित,“ आपल्या फार्म हाऊसवर!( तो म्हणाला आणि सीमंतिनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला.ते मोहितच्या लक्षात आले आणि तो म्हणाला.) इतकं घाबरायला काय झालं सीमा? अगं मी तुला काही खाणार नाही. आपण पब्लीकप्लेसमध्ये भेटतो. तिथे खूप गोंगाट असतो व्यवस्थित बोलता ही येत नाही. डोन्ट व्हरी मी काही वावग वागणार नाही तुझ्याशी तासा-दीड तासात माघारी जाऊ.” तो तिला समजावत म्हणाला.

सीमंतिनी,“ तुमच्यावर तितका विश्वास आहे पण घरी मी लगेच येते म्हणून सांगितले होते.” ती म्हणाली.

मोहित,“ मग काय झाले? सांग घरी की काही क्युरी सॉर्ट करत होते मैत्रिणीकडे!” तो हसून म्हणाला.

सीमंतिनी,“हो का?” ती हसून म्हणाली आणि मोहित ही हसला.

शहरापासून थोडेसे दूर शांत ठिकाणी एक बंगला होता. त्याच्या चारी बाजूंनी शेत आणि मधोमध कंपाऊंडमध्ये असलेला टुमदार बंगला.एखाद्या चित्रातील सीन असावा असा तो बांगला होता. मोहितने हॉर्न वाजवला आणि वॉचमनने सलाम ठोकून गेट उघडले. मोहितने गाडी पार्क करण्यासाठी वॉचमनच्या हातात गाडीची चावी दिली आणि दोघे ही आत निघाले. सीमंतिनी सगळीकडे पाहत होती. बंगला आणि गेट यामध्ये जवळपास पंधरा-वीस फुटाचे अंतर होते. एका बाजूला सुंदर असा बगीचा आणि लॉन, मोगरा,जाई-जुई, ,गुलाब अशा फुलांची झुडपे! तर गुलमोर, कडुलिंब,चिकू, आंबा अशी मोठी वृक्षे देखील दिसत होती. हिरव्या गार लॉनवर एक नक्षीदार झोपाळा डौलात झुलत होता. आत गेले की समोर चार-पाच पायऱ्या चढून प्रशस्त असा पोर्च होता. आत मोठा प्रशस्त हॉल आणि तिथून वर जाणारा नागमोडी जिना! एका बाजूला किचन आणि काही खोल्या दिसत होत्या. मोहित तिला घेऊन हॉलमध्ये पोहोचला.मध्यम वयाचे एक जोडपे समोर हात जोडून उभे होते.

मोहित,“ या सीमंतिनी तुमच्या होणाऱ्या मालकीणबाई आहेत.(त्याने तिची ओळख करून दिली आणि त्या दोघांनी तिला पाहून हात जोडले.तिने ही स्मित करत हात जोडले.) आम्ही थोड्या वेळासाठी आलो आहोत तर लवकर नाष्टा आणि चहा घेऊन वर माझ्या बेडरूममध्ये या!” तो म्हणाला आणि दोघांनी मान डोलावली.

मोहित सीमंतिनीला घेऊन वर त्याच्या बेडरूममध्ये गेला. सुंदर आणि प्रशस्त बेडरूम होती. त्याच्या एका बाजूला गॅलरी होती. सीमंतिनी तिथे असलेल्या खुर्चीवर बसू लागली तर मोहित तिला म्हणाला.

मोहित,“ सीमा अग खुर्चीवर काय बसतेस बेडरूम आपली आहे बेडवर बस.” तो म्हणाला आणि ती जरा चपापली तरी ती बेडवर जाऊन बसली.

सीमंतिनी,“ खूप सुंदर आहे फार्म हाऊस आणि शांत देखील!” ती म्हणाली.

मोहित,“ हो बाबांनी बरीच वर्षे झालं घेतलं आहे. मला शहराच्या गोंगाटाचा कंटाळा आला की मी इथे येतो. तुला ही इस्टेट दाखवायची होती आणि शांतपणे बोलायचे होते म्हणून इथे घेऊन आलो आहे. गॅलरीत चल!(असं म्हणून तो तिला गॅलरीत घेऊन गेला.) इथून जिथं पर्यंत तुझी नजर जाते तिथं पर्यंत सगळे शेत आपले आहे.इथे एक वॉचमन, खाली पाहिले ते केअर टेकर जोडपे आणि मॅनेजर आहे. आणखीन शेतात काम करायला लागेल तसे गडी असतात.आवडलं का फार्म हाऊस तुला?” त्याने तिला विचारले.

सीमंतिनी,“ खूप सुंदर आहे.” ती म्हणाली.

मोहित,“ चल आत. तुला काही तरी द्यायचे आहे.(असं म्हणून त्याने त्याच्या ब्लेझरच्या खिशातून एक मध्यम आकाराचा बॉक्स काढला.) हे पेन आहेत सोन्याचा मुलामा दिलेले.तुझी एक्साम आहे ना उद्यापासून म्हणून तुला ऑल दि बेस्ट!” तो तिच्याजवळ बसून तिचा हात धरत म्हणाला.

सीमंतिनी,“ बाप रे अहो इतके महाग पेन्स ते ही दहा आहेत की एक पेन कितीचा?” तिने डोळे विस्फारून पेन पाहत विचारले.

मोहित,“ फार नाही ग एक पेन दहा तर हजाराचा आहे. प्रत्येक पेपरला एक पेन नको का? पण तुझे किती पेपर्स आहेत हे माहीत नव्हतं मला म्हणून सरळ दहा पेन घेऊन टाकले.असं ही नुसती पास झालीस तरी बास आहे तुला कुठं नोकरी करायची आहे? हा पण समाजाला दाखवायला डिग्री हवी ना!” तो हसून बोलत होता पण सीमंतिनीला त्याचे बोलणे आवडले नव्हते तरी ती शांत होती.

सीमंतिनी,“ तुम्ही नुसते पेनसाठी एक लाख खर्च केले?” तिने आश्चर्याने विचारले.

मोहित,“ हो! आपल्याकडे काही कमी आहे का? आणि आता तू मोहित खोतची बायको होणार आहेस तर पैशाचा विचार करायचा नाही. कळलं तुला!” तो तिच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाला आणि ती शहारली.

सीमंतिनी,“ बरं आणि थँक्स!” ती हसून त्याला म्हणाली.

मोहित,“असं कोरड थँक्स नको मला!” तो तिच्याजवळ जात म्हणाला आणि दारावर कोणी तरी नॉक केले. तो रागानेच “कम इन” म्हणाला.सीमंतिनीला मात्र हसू येत होते.


नोकर चहा आणि कटलेट घेऊन आले होते. दोघांनी ही चहा आणि नाष्टा केला. एव्हाना सात वाजत आले होते.

सीमंतिनी,“ चला ना मला घरी सोडा खूप वेळ झाला आहे.” ती म्हणाली.

मोहित,“ बरं चल.” तो म्हणाला आणि दोघे ही पुन्हा शहरात आले.

मोहितने कार नेहमीप्रमाणे चौकात थांबवली. सीमंतिनी कारमधून उतरली आणि समोर समीरला पाहून चांगलीच घाबरली. मोहित देखील त्यालासमोर पाहून भांबावला होता.

समीर,“ मोहितराव चौकातूनच निघालात घरी चला!” तो त्याला पाहत म्हणाला.

मोहित,“ नको खूप उशीर झाला आहे मी जातो.” तो आवंढा गिळत म्हणाला.

समीर,“असं कसं घराच्या इतक्या जवळ येऊन घरी न येता जाणार तुम्ही! चला! सीमा बस गाडीत मी टू व्हीलरवर आहे मागे.” तो म्हणाला.

सीमंतिनी घाबरून मोहितच्या शेजारी गुपचूप जाऊन बसली आणि मोहितचा देखील आता नाईलाज झाला. त्याची आणि सीमंतिनीची चोरी आज पकडली गेली होती. त्यामुळे दोघे ही आतून थोडे घाबरले होते. सीमंतिनीच्या डोळ्यात आता पाण्याचे तळे साचू लागले होते. दोघांच्या ही चेहऱ्याचा रंग उडाला होता.


‛आता घरचे काय म्हणतील लग्न ठरले असले तरी अजून साखरपुडा देखील झाला नाही आणि मी मोहितबरोबर घरी खोटं बोलून त्यांच्यापासून लपवून फिरत आहे. सीमे आज तुझे काही खरं नाही. मेलीस तू आज!’ तिच्या डोक्यातून वरुळातून मुंग्या बाहेर याव्यात तसे विचार येत होते.

मोहित मात्र शांत होता. तो ही घाबरला होता की आता सीमंतिनीच्या घरचे काय म्हणतील? याचा विचार करून पण त्याने चेहऱ्यावर तसं दाखवायचं नाही असं मनोमन ठरवले.

सीमंतिनी आणि मोहितच्या चोरून भेटण्यावर सीमंतिनीच्या घरचे कसे रियाक्ट होणार होते?
©स्वामिनी चौगुले



🎭 Series Post

View all