श्यामची आई

' श्यामची आई ' कादंबरीतील मला आवडलेल्या गोष्टी
श्यामची आई

लेखक :- पांडुरंग सदाशिव साने ( साने गुरुजी )

श्रेणी :- बोधपर, वैचारिक

प्रथम प्रकाशन :- अनाथ विद्यार्थी गृह
इ. स. १९३६ ( गुगलच्या माहितीवर आधारित )

या लेखात \" श्यामची आई \" या संपूर्ण पुस्तकाचा परिचय नाही. पुस्तक मी खूप लहान असताना माझ्या वाचण्यात आले होते. तेव्हा ते मला समजले नाही ; पण जसजसा सज्ञान होत गेलो, तसे त्यातील प्रत्येक शब्दाचे महत्त्व कळू लागले. तेव्हा माझ्याजवळ हे पुस्तक नव्हते. हळूहळू कथा विस्मरणात गेल्या. मात्र नंतर युट्यूब वर यातील कथा ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत, हे समजलं. मग काही कथा पुन्हा ऐकल्या. त्याच कथांबद्दल लिहीणार आहे.

थोर गांधीवादी समाजसुधारक व प्रतिभावान साहित्यिक, गीतकार पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आदरणीय साने गुरुजी यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना आपल्या सहवासीयांना आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या. नंतर त्यांच्या आग्रहावरून त्या आजच्याच दिवशी दि. ०९ फेब्रुवारी १९३३ रोजी लिहायला सुरुवात केली व मराठी साहित्य कृतींमध्ये अजरामर ठरलेलं, मानाचे स्थान प्राप्त केलेलं \" श्यामची आई \" साकार झाले. यात एकूण ४२ प्रकरणे सामाविष्ट आहेत. १९३६ मध्ये कादंबरी ची प्रथम आवृत्ती प्रसिद्ध झाली.

पहिल्या कथेचे नाव आहे सावित्री व्रत. श्यामच्या आई पतीसाठी सावित्री व्रत करीत असत. मात्र श्याम आठ-नऊ वर्षांचा असताना त्या आजारी पडल्या. वडाला 108 प्रदक्षिणा करणे त्यांना शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी आपण जमेल तितक्या प्रदक्षिणा करू, व मग इतर श्यामने कराव्यात अशी इच्छा श्याम कडे व्यक्त केली ; पण बायकांमध्ये प्रदक्षिणा करण्याच्या विचाराने लाज वाटून श्यामने नकार दिला. तेव्हा त्याही अवस्थेत आईने त्याला \" देवाच्या कामास लाजू नये, पाप करण्यास लाज वाटायला हवी. \" अशी बहुमोल शिकवण दिली.
\" मुकी फुले \" या कथेतून श्यामच्या आईने त्याला फुलांवर प्रेम करायला शिकवल्याची, मनात राग धरून आतातायी पणा न करता संयम ठेवायला शिकवल्याची आठवण सांगितली आहे. \" मथुरी \" या कथेतून घरी काम करणाऱ्यांना कमी न लेखता त्यांच्याशीही माणुसकीने आपुलकीने वागावं, त्यांचीही काळजी घ्यावी हे श्यामच्या आईंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. थोर अश्रू या कथेत शरीराच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या श्यामला त्याच्या आई \" शरीराला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो.\" असे सांगतात कथेच्या शेवटी श्यामने बोललेले शब्द अत्यंत मार्मिक आहेत. शरीरास कपड्यांस लागू नये यासाठी साऱ्यांचे प्रयत्न असतात. पण मनाला स्वच्छ राखण्या बद्दल आपण किती जपतो ? मन मळले म्हणून कधी रडतो का ? ते थोर अश्रू जगात दिसत नाहीत.
मुलाला घडवण्यासाठी वेळ पडल्यास आईला थोडं कडकपणा ही दाखवावा लागतो न जमणारे काम टाळल्यावर त्यात निष्काळजी पणा केल्यावर श्याम ला त्याच्या आईंनी थोडे कटु शब्द बोलून, जरासा धाक दाखवून आपले काम मनापासून आणि चांगल्या पद्धतीने करायला शिकवले भीती वाटणाऱ्या गोष्टींपासून पळू पाहणार्‍या श्याम ला प्रसंगी दोन फटके देऊन नीट ही बनवले. स्वावलंबनाची शिकवण या कथेत श्यामच्या आईचे शब्द ही आयुष्य जगताना प्रत्येकाने लक्षात ठेवावेत असेच आहेत त्या त्या मला सांगतात ज्याला बुद्धी आहे मनात निश्चय आहे त्याला त्याच्यासाठी सारं शक्य आहे मेहनत करून मोठा हो परावलंबी राहू नकोस दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक येत असेल तर त्यांना तुच्छ लेखू नकोस
कादंबरी द्वारे साने गुरुजींनी फक्त आईचीच थोरवी गायली आहे आई करवी झालेले संस्कार मिळालेली शिकवण मांडली आहे असे मात्र नाही घरची स्त्री मेहनतीने धुरात चुलीसमोर बसून स्वयंपाक करते. तो गोड मानून घ्यावा. त्यात खोट पाहू नये. असा आदर्श आपल्या कृतीतून आपल्या मुलांसमोर ठेवू पाहणारे, पत्नीने बनवलेला खरवस आपल्या मुलाला आवडतो म्हणून त्याच्यासाठी शाळेपर्यंत घेऊन जाणारे, खोटं बोलल्यावर रागावणारे ; पण राग शांत होताच मुलाला मायेने जवळ घेणारे वडील ही आपल्याला पाहायला मिळतात. उर्मटपणे बोलल्यावरही न रागावता श्यामला प्रेमाने पत्रावळ व द्रोण बनवायला शिकवणारी श्यामची थोरली बहीण, \" दुर्वांची आजी \" आणि \" मोरी गाय \" ही आपल्याला निरनिराळ्या कथांमधून दिसतात. या सर्वांकडून काही नं काही शिकायला मिळते.

साने गुरुजींच्या या कादंबरीवर याच नावाने मराठी चित्रपट १९५३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन थोर साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे यांनी केले होते. या चित्रपटाला १९५४ साली पहिला \" राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार \" मिळाला.

श्यामची आई या कादंबरीतील सर्व प्रकरणे अत्यंत उद्बोधक व वाचनीय आहेत. प्रत्येकाने वाचायलाच हवी अशी ही दर्जेदार, संस्मरणीय कादंबरी आहे. धन्यवाद.

@ प्रथमेश काटे