श्यामची आई पुस्तक

Story Of Sham And His Mother


वाचाल तर वाचाल


पुस्तक - श्यामची आई.

लेखक - साने गुरुजी.

प्रकाशक - पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन.


"ग्रंथालयात आम्ही हजारो रस्त्यांच्या चव्हाट्यावर उभे असतो. एक रस्ता अनंताकडे जातो दुसरा रस्ता मानवी हृदयाच्या गर्भागारी जातो, आणि असे अनेक रस्ते, अनेक वाटा. ग्रंथालयात बसून कुठल्याही वाटेने धावत जा कुठेही अडथळा नाही" - रवींद्रनाथ टागोर.

बाराखडीच्या अ आ ई च्या पुस्तकाच्या वाचनापासून कुठल्याही लहान मुलाचा वाचनाचा प्रवास सुरू होतो. तसा तो माझाही झाला. इयत्ता सहावीच्या बालभारतीच्या पुस्तकात \"श्यामचे पोहणे\" हा धडा होता. त्या धड्यातून प्रथमच शाम आणि त्याची आई यांची भेट झाली.

पुढच्या इयत्तेत परत एकदा शाम भेटला. आईने श्यामला अंघोळ घातली अन आपल्या लुगड्याने त्याचे अंग पुसले. आई शामला म्हणाली -

आई -"जा देवासाठी फुले तोड."

शाम -"माझे तळवे ओले आहेत. त्यांना माती लागेल. तुझे ओचे खाली पसर त्यावर मी माझे पाय पुसतो." श्याम लहानपणी फार हट्टी होता म्हणुन आई त्याच्याशी अधिक न बोलता तिने आपले ओचे खाली पसरले. शामने त्याला पाय पुसले. श्यामच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून आईने आपले लुगडे ओले करून घेतले. श्याम देवघरात गेला तेव्हा आई म्हणाली -

आई -"बाळ, पायाला घाण लागू नये म्हणून तु जसा जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो."

किती सुंदर शब्द आणि किती सुंदर संस्कार! पुढे मोठे झाल्यावर मी अनेक पुस्तके वाचली ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, धार्मिक, कथा, कादंबऱ्या, कविता, अनंत,पण \"श्यामची आई\" मधला श्याम आणि त्याची आई मनात पक्क घर करून होते.

पुढे पहिल्या गर्भारपणाच्या वेळी खूप वाचन झालं. पण \"श्यामची आई\" पुस्तक हाती घेतल्यावर ते संपूर्ण वाचूनच खाली ठेवलं. या पुस्तकात साने गुरुजींनी त्यांच्या आई विषयीच्या आठवणी सांगितल्या आहेत. मातेची महती,तिचे ऋण तर आजन्म न फिटणारच आहे. पण तरीही मुलांना केवळ जन्म देऊन चालत नाही. त्यांच्या कोवळ्या मनावर सुसंस्कार करावेच लागतात. त्यामुळेच भावी पिढी देशाचे भविष्य घडविते. देशाचे भविष्य घडवण्याची खरी जबाबदारी तर त्या देशातील मातांच्या शिरी आहे हो ना!

साने गुरुजींनी \"श्यामची आई\" हे पुस्तक आपल्या आसवांनी लिहिले आहे. त्यातले प्रत्येक वाक्यंवाक्य दाटून आलेल्या गळ्यातून, दाबून ठेवलेल्या हूंदक्यातून निर्माण झाले आहे असे आचार्य अत्रे म्हणतात.


नाशिकच्या तुरुंगात असताना दिवसा काम करावे आणि रात्री जगन्मता, भारत माता व जन्मदात्री यांच्या त्रिवेणी संगमाच्या तीर्थातूनच श्यामच्या आईचा उगम झाला. अवघ्या पाच दिवसात त्यांनी हे पुस्तक लिहून काढले. \"श्यामचे पोहणे\" या कथेत शामला पोहायला येत नव्हते. मित्र बोलवायला आले तर तो जाण्यासही तयार नव्हता. वरती माळ्यावर लपून बसला होता. श्यामच्या आईने श्यामला चांगले मारून मारून पोहायला पाठवले. घरी आल्यावर शाम रागातच होता, त्यावर आई म्हणाली -

आई -"श्याम अरे उद्या चालून तुला कोणी भित्रा म्हटलेले मला आवडणार नाही. तुमची मुले भित्री आहेत असे कोणी मला म्हटले तर हा माझा अपमानच ना! आणि माझा अपमान तो तुझा अपमान होय ना?"

आपल्या मुलाला सर्व यावे. त्याने प्रत्येक गोष्ट शिकावी त्यासाठी श्यामच्या आईची ती सारी धडपड होती.

लहानपणी श्याम बाहेरगावी शिकत होता, तेव्हा त्याने डोक्यावर केस वाढवले. त्याच्या वडिलांना ते अजिबात आवडले नाही. त्यांनी शामला हजामत करायला सांगितले. शाम रडू लागला तेव्हा आई म्हणाली -

आई -"तुझे बाबा बोलले म्हणून एवढे रागावू नको. आज पर्यंत तुमच्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या त्यांनी. त्यांच्या धर्मभावांना दुखावू नकोस."

श्याम -"केसात ग कसला आला आहे धर्म?"

आई -"केस तू का वाढवतोस? मोह म्हणूनच ना! मोह सोडणे म्हणजेच धर्म."

धर्माची केवढी सुंदर सोपी व्याख्या आतापर्यंत कुणी केली असेल का? श्याम घरातल्या प्रत्येक कामात आपल्या आईला मदत करीत असे. डाळ-तांदूळ निवडणे, धुणे-धुणे, भांडी विसळणे या सर्व गोष्टी तो आईला मदत म्हणून करू लागेल. शेजारच्या बायका त्याला बायकी म्हणून हिणवत होत्या.

बायका -"तुम्ही आपल्या मुलाला अगदी बायकी करून ठेवले आहे हो!"

आई -"बायकांना पुरुषांची कामे आली पाहिजे आणि पुरुषांना बायकांची कामे ह्याचेच नाव लग्न. पुरुषांच्या हृदयात स्त्री गुण येणे व स्त्री जवळ पुरुष गुणी येणे म्हणजेच विवाह."

मुकी फुले, भूतदया, मोरी गाय यासारख्या गोष्टींमधून आपण निसर्गावर आणि पशु-पक्षी, फुला-पानांवर प्रेम करावे याची शिकवण मिळते. तर बाकीच्या इतर कथांमधून चोरी न करणे, खोटे न बोलणे, स्वाभिमान, स्वावलंबन अशा सद्गुणांची शिकवण.

\"श्यामची आई\" हे पुस्तक म्हणजे साने गुरुजींच्या त्यांच्या आई विषयीच्या आठवणी. त्या त्यांनी गोष्टी रूपाने सांगितलेल्या आहेत. दैनंदिन व्यवहारातून गुरुजींच्या आईने गुरुजींवर जे संस्कार केले, तेच या पुस्तकांमध्ये आहेत.

आजच्या आपल्या पिढीला अशा सुसंस्कारांची खूपच गरज आहे असं तरी सभोवतालची परिस्थिती पाहून मला तरी नक्कीच वाटते.

मातृत्वाची जबाबदारी शिरावर घेतलेल्या समस्त आदरणीय मातांनी हे पुस्तक नक्की वाचावे, आणि आपल्या संग्रही ठेवावे एवढे या पुस्तकाचे मूल्य आहे.

विनोबा भावेंनी आपल्या आईसाठी गीताई लिहिली, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, त्या दृष्टीने श्यामची आई ही समस्त भारतीयांसाठी \"अमर गीताई\"च आहे. -आचार्य अत्रे.


©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.