श्यामल काकी
शाळा सोडल्यावर तब्बल पंधरा वर्षांनी पुन्हा Reunion करायचे ठरले होते. सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटता येईल म्हणून लावण्या खूप उत्सुक होती. पटापट तयारी करून ती शाळेत पोचते. सारा कार्यक्रम आटोपून आपापल्या घरी जायला निघतात. लावण्या तिच्या स्वतःच्या Benz कारमध्ये बसते आणि शाळेबाहेर येते. तोच शाळेच्या गेटपाशी हातगाडी घेऊन उभी असलेली साधारण साठीतली बाई दिसली. आपसूकच तिची पाऊले त्या हातगाडीपाशी गेली. चेहरा ओळखीचा आहे हे खातरजमा करून ती लगेच बोलली, "श्यामलकाकी..! कशी आहेस गं? मला ओळखलं का?"
जरा प्रश्नार्थक नजरेने पाहत ती बोलली,"नाय गं पोरी..! हायस कोन तू?" काकीने आपल्याला ओळखलं कसं नाही म्हणून ती गाडीतून उतरून बाहेर आली. "काय गं काकी. तू मला कसं ओळखत नाहीस. मी लावण्या...! याच शाळेत शिकले."
कपाळाला हात लावत श्यामल काकी बोलते,"अगं पोरी या साळत कीती पोरं शिकतात. समद्यांना कसं लक्षात ठिवू. बरं तू काय विकत घेणार हायस का? मला घरला निघायचं हाय." हलकेच हसून लावण्या बोलते,"ते लाल गोळ्यांचं एक पाकीट आणि दहा रूपयांच्या चिंचेच्या गोळ्या दे."
लावण्या काकीकडून त्या गोष्टी घेत असताना तिची वर्गमैत्रिण किर्ती तिथे येते. "Lavanya it is so unhygienic. कशाला घेतेस?" जरा तिरकसपणे किर्ती बोलली. किर्तीचे वाक्य ऐकून श्यामलकाकी हातातल्या पुड्या पुन्हा जागेवर ठेवणार इतक्यात लावण्या बोलते,"काही होणार नाही थोडं खाल्लं तर. तसंही बाहेरचं आपण खातोच की." काकीकडून गोळ्या घेऊन लावण्या तिच्या बॅगेत ठेवते आणि श्यामल काकीजवळ जाऊन तिच्या पाया पडते. "काकी आशीर्वाद दे." श्यामल काकीला जरा नवल वाटतं. काकीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलली,"सुखी रहा आणि अशीच महागड्या चारचाकीतून फिरत जा." काकीचा निरोप घेऊन लावण्या तिचा मोर्चा किर्तीकडे वळवते. किर्तीचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. लावण्या काही बोलणार इतक्यात ती बोलते,"लावण्या..! काय गरज होती तिच्या पाया पडायची. ही लोकं चांगली नसतात." किर्ती अजून बरेच काही बोलते. लावण्या आपली निमूटपणे सारे काही ऐकत असते. शेवटी किर्ती शांत होते.
किर्ती बोलायचं थांबली तशी लावण्या बोलू लागली,"तुला माहित आहे किर्ती. मी जेव्हा आठवीत असताना सहामाही परीक्षेत मला फक्त साठ टक्के पडले तेव्हा आई बाबा खूपच चिडले होते माझ्यावर. शाळेत ओरडून झाले तरीही आई खूप रागात होती. बाहेर येऊन ती श्यामल काकीकडे बोट दाखवून बाबांना आणि मला बोलली की तुम्ही जर अशेच पोरीचे लाड कराल तर उद्या अशी चार चाकाची गाडी धरून बसावं लागेल. अभ्यासाच्या नावाने सगळी बोंब आहे. तेव्हा ही काकी बोलली आईला की तुम्ही पोरीला ओरडू नका. ती चार चाकाच्या गाडीतून फिरेल पण माझ्यासारख्या नाही. महागड्या...! तिले काय जमत नाय ते इचारा... समजावून सांगा. आसं ओरडू नगा. तुमचंच लेकरू हाय ते." तेव्हा आईने घरी आल्यावर मला नीट समजावून सांगितले. मी चांगला अभ्यास करू लागले. नंतर शाळेत दुसरा किंवा तिसरा नंबर मिळवत राहिले. तेव्हा येता जाता हीच श्यामल काकी मला "घ्यायची आहेेना महागडी चारचाकी गाडी" म्हणून सारखी अभ्यास करण्यासाठी एक प्रकारे प्रेरणा देत होती. आज मी ही माझ्या गाडीतून फिरते त्यात आई बाबांनंतर थोडाफार का असेना तिचापण हात आहे. तिचा आशीर्वाद घेताना मला काहीच कमीपणा वाटत नाही. लावण्याच्या बोलण्याने किर्ती निरूत्तर होते. ती पुढे काही बोलणार इतक्यात लावण्या तिच्या महागड्या गाडीत बसून भुर्र्कन निघून जाते.
~ऋचा निलिमा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा