श्वासात राजं

शिवराय आणि सवंगडी


श्वासात राजं..

गोष्ट छोटी डोंगराएवढी
मैत्री विशेष

" महाराज तुम्ही स्वतः आपल्या हाताने यावरचे आच्छादन दूर करा.." मोरोपंतांनी विनवले. महाराज पुढे झाले. त्यांनी हलक्या हाताने ते दूर केले.. आच्छादन दूर होताच ते सुवर्णसिंहासन चमकू लागले.. गागाभट्ट, जिजाऊ ,संभाजीराजे बघतच राहिले..
" कसले सुरेख सिंहासन झाले आहे.. अगदी शास्त्रोक्त आहे. पण यावर एवढी रत्ने?" गागाभट्टांनी आश्चर्याने विचारले..
" ती रत्ने आठवण करून देतात आम्हाला सोडून गेलेल्या एकेका नररत्नाची.." महाराजांचे डोळे पाणावले.. संभाजीराजांना मासाहेबांना त्यांच्या दालनात सोडण्याची जबाबदारी सोपवून महाराज तिथून निघाले. सातमहालाला लागून असलेल्या पठारावर जाऊन बसले. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे एकेक सवंगडी उभे राहू लागले.

" बाजी आजोबा, तुमचा वार खोल आहे. तुम्ही आमच्या घोड्यावर बसा. आपण वाड्यावर जाऊ."
" शिवबा, आज बाजीवरून थेट आजोबा. अरे दोस्त म्हणवतोस ना मला? मग हे आजोबा काय?"
" आजोबा, ही थट्टेची वेळ नाही. रक्त वाहते आहे."
" वाहू दे रे पोरा. या शरिराला घावांची सवय आहे. तू मांडी दे मला.. तुझ्यासारख्या सवंगड्याच्या मांडीवर मरण येणे भाग्याचे हाय बघ. समदे म्हणायचे म्हातारा शिंग मोडून वासरात शिरलाय म्हणून. पण स्वराज्यासाठी मरण्यात काय मजा असतो तो तू मला शिकवलास.." बोलता बोलता बाजींनी प्राण सोडला. शिवबाच्या डोळ्यातून एक अश्रू निखळला. बाजी पासलकरांसाठी..

" महाराज, आवताण द्याया आलोया.."
" कसले तानाजी?"
" रायबाचे लगीन काढले आहे. मासाहेब तुम्हीपण यायचे बरं का? सूनबाईंचा निरोप आहे तुम्हास्नी.."
" तानाजी. मासाहेब येतील. आम्हांस जमणार नाही."
" का?"
" आम्ही कोंढाण्याची मोहीम काढतो आहे."
" राजे आपल मैतर लहानपणापासूनच?"
" काही शंका?"
" मग जे मागीन ते देशीला?"
" मागून तर बघ."
" कोंढाणा द्या मला.."
" तानाजी.. घरात लग्नाची तयारी सुरू आहे.. आणि मोहिम?"
" राजं.. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे.."
महाराजांच्या डोळ्यातून दुसरा अश्रु घरंगळला..
"मासाहेब.. आपला गड आला पण सिंहासारखा तानाजी गेला."


" राजे, राजे किती वेळा तुम्हास सांगावे? तुम्ही तीनशे मावळ्यांस घेउन पुढे विशाळगडाकडे कूच करा. आम्ही उरलेल्या तीनशेजणांसोबत खिंड लढवतो."
" बाजी हे शक्य नाही."
" राजे, का शक्य नाही? गनीम तोंडावर आहे, तुमचा जीव धोक्यात आहे, अशाप्रसंगी तुम्ही पुढे जाणेच योग्य आहे. तुम्ही जा. तोफ झाल्याशिवाय आमच्या जीवास  शांती लाभायची नाही.."

घोडखिंडीचे नाव पावनखिंड करणाऱ्या बाजी प्रभू देशपांड्यांसाठी महाराजांचा तिसरा अश्रु घरंगळला..

" जिवा काहिही झाले तरी तू सय्यद बंडावरची नजर हटवू नकोस."
" जी महाराज."
" जिवा, जिवा तुझ्यामुळे तो सय्यद बंडा माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही.."
" राजं म्हणून आता लोक म्हणत्यात,होता जिवा म्हणून वाचला शिवा.." येसाजी म्हणाला..


" तुमची माणसे एवढी शूर आहेत ?" कुतुबशहाने विचारले..
" माझा एकेक माणूस मौल्यवान आहे.." महाराज अस्वस्थ झाले.
" हा लढेल माझ्या हत्तीशी?" कुतुबशहाने येसाजीकडे बोट दाखवत विचारले..
" हो." येसाजी हत्तीशी लढून येईपर्यंत महाराजांची नुसती चुळबुळ चालली होती.. येसाजी वर येताच महाराजांनी त्याला घट्ट मिठी मारली..
" महाराज.. एका सरदाराला तुम्ही मिठी मारली?" कुतुबशहाला आश्चर्य वाटले.
" तो फक्त एक सरदार नाही. माझ्या जीवाला जीव देणारा जिवलग आहे.. तुमच्या मनोरंजनासाठी माझ्या फक्त एका शब्दावर तिथे उतरलेला माझा सवंगडी सुखरूप आला म्हणून त्याचे मानलेले ते आभार होते." महाराजांचे शब्द ऐकून कुतुबशहाने मान खाली घातली. महाराजांच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर उमटली.


"आबासाहेब." पाठून आवाज आला..
" कधीचे इथे आहात? महालात चलावे."
" शंभूराजे.. "
" हो आबासाहेब.. कधीचे पाहतो आहे कसलातरी गहन विचार करत होता. मधूनच हसत होता , मधूनच रडत होता. शेवटी धीर केला तुम्हाला विचारायचा. सांगाल का? लक्ष्मीघरातून पण निघून गेलात?"
" तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? आम्ही आठवत होतो आमच्या जीवाला जीव देणाऱ्या सवंगड्यांना. असे म्हणतात की राजाला मित्र नसतात, फक्त सहकारी असतात.. पण आम्ही नशीबवान .. आमचे मित्रच आमचे सहकारी बनले. हे स्वराज्याचे शिवधनुष्य त्यांच्या मदतीशिवाय पेलणे शक्यच नव्हते. आता या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांची कमतरता फार भासते."
" एवढे महत्त्वाचे असतात मित्र आयुष्यात आबासाहेब?"
" हो शंभू.. चुकल्यावर रस्ता दाखवणारे, संकटात साथ देणारे, चांगल्या गोष्टींचे न बोलता पाठीवर कौतुकाची थाप देणारे मित्रच असतात.. त्यांच्याशिवाय आयुष्य अपुरे असते.."
" आबासाहेब, तुमच्यासारखेच जीवाला जीव देणारी मैत्री आम्ही सुद्धा करू.."
" चला. महालात जाऊ.." महाराज शंभूराजांच्या खांद्यावर हात ठेवून निघाले..


दरीत बाजी पासलकर, तानाजी, बाजी प्रभू आणि महाराजांचे अनेक मित्र आत्मस्वरूपात जमा झाले होते.. आपल्या मृत्युनंतरही आपल्याला न विसरणार्या आपल्या राजाला अंहं मित्राला अभिवादन करायला..
" श्वासात राजं , ध्यासात राजं
घावात राजं रं भावात राजं
जगन्यात राजं रं मरन्यात राजं
हे सिवबा रं....


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई