श्वास घेण्यास कारण की... भाग 14

Story Of Different Souls


श्वास घेण्यास कारण की... भाग 14
-----
सानु डिस्चार्ज घेऊन घरी आली त्याला दहा पंधरा दिवस असेच निघून गेले. ती ठणठणीत बरी होत होती. पण नाराज नाराज आपल्याच कोषात राहायला लागली. जेवण म्हंटल की जेवणापूरतं येऊन जेवून निघून जायची..

सानुच्या आईवडिलांनाही आता तिची काळजी वाटायला लागली.
ती टि व्ही बघत होती, पण तिचं तिकडे लक्ष नव्हतं..त्यांनी तो बंद केला तरीही ती त्याच दिशेने बघत होती..

आता मात्र ते दोघेही घाबरले..
"सानु बेटा.."
ती भानावर आली.
"हं?"
"काही झालंय का तुला? कशाचा त्रास होतोय का?"
"कुठे काय डॅड? काहीच नाही"
"मग काय चाललंय तुझं? आल्यापासून बघतोय, काही प्रॉब्लेम आहे का? पूर्वीसारखी हसत खिदळत नाहीस...हट्ट करत नाहीस की कोणासोबत बोलतही नाहीस, एकटी एकटी राहतेस, कोणी काही बोललं का? माझा राग आलाय का तुला? हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रकारचं वाईट वाटतंय का तुला? हे बघ तसं असेल तर मीच तुझी माफी मागतो."

"तसं नाहीये डॅड, उलट मलाच तुमची माफी मागायची आहे..मी नको ते बोलले तुम्हाला..खरंतर माझंच चुकलं होतं, म्हणजे लहानपणापासून मीच चुकत आलीये का डॅड? सांगा ना..म्हणजे तुम्ही मला लहानपणापासून एका कोषात बंद करून ठेवलंय? खेळणं नाही, बागडणं नाही.. त्यामुळे मित्रमैत्रिणी जास्त नाहीत..माझी उंची पण कमी, अंगांतही जास्त भरले नाही मी..माझ्या वयापेक्षा लहान दिसते म्हणतात सगळेजण पण सुंदर नाही दिसत ना कारण मला अनुभव नाही बाहेरच्या जगाचा..कॉन्फिडन्स नाही येत..बाहेर मुली किती छान राहतात, छान कपडे घालतात, सजतात , मिरवतात...thankfully मी काही म्हणायची देर तर ती वस्तू, तो ड्रेस माझ्या हातात असतो पण मला तो मिरवता नाही येत ना.. तुम्हीच सांगा डॅड काय करू मी..मी पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे..कुठे जायचं कुठे नाही हे तुम्हीच ठरवता..आता उद्या नची तेवीस चा पूर्ण होईल आणि दोन महिन्यानंतर मी बावीसची.. नची एवढा श्रीमंत असूनही स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडतोय, आज उदयाला तो लागेलही नोकरीला, तोच काय, माझ्या वयाचे सगळे जण काही ना काही करत आहेत...पण माझं कर्तृत्व काय आत्तापर्यंत? काहीच नाही ना डॅड? असू द्या... बघते मी काय करायचं, मार्ग निघेल काहीतरी..."

म्हणत ती नाराज होत आत निघून गेली. जेव्हा पासून तिने अपूर्वाला पाहिलं होतं तेव्हापासून तिच्या बद्दल एका प्रकारची ईर्षा वाटायला लागली तिला..आपली हतबलता निदान डॅड च्या लक्षात यावी म्हणून ती सगळं बोलली , त्याचा कितपत परिणाम होईल माहीत नव्हतं तिला पण आता तिला बरंच हलकं हलकं वाटायला लागलं..उद्या नची साठी काय करता येईल याचा विचार ती करायला लागली.

इकडे अभिमानची अवस्था अशीच झाली होती. तिच्या खोलीसमोरून जाताना त्याचे पाय आपोआप थबकायचे.
तो येतील त्या कामात नेहमीपेक्षा जास्त इंटरेस्ट दाखवायला लागला कारण सानिका त्याच्या डोक्यातून जात नव्हती, तिचा विचार येऊ नये म्हणून त्याने स्वतःला कामात अडकवून घेतलं होतं.
पण आज रात्री कुणास ठाऊक इतकं दमलेलं असूनही झोप येत नव्हती.."आपण माईंना दोन महिने मागितलेत, या दोन महिन्यात आपण अपूर्वा ला समजून घेऊ जसं सांगितलं तसंच सानुच्या बाबतीतही विचार केलाच होता की..काय करत असेल ती आता, कशी असेल? बोलून बघायचं का थोडं?" म्हणत त्याने व्हाट्सएप मध्ये डोकावलं तर त्याला तिचं स्टेटस दिसलं.. त्यात नची आणि तिचा फोटो..आणि caption टाकलं होतं.. "हॅपी बर्थडे टू माय बेस्ट बडी.. देव तुला या जगातली सर्व सुखं बहाल करो."
अभिमान ने गपकन स्क्रीन बंद केली.. "का असं होतं प्रत्येक वेळेस? मी तिला बघायला जातो आणि नचिकेत दिसतो प्रत्येक वेळेस तिच्यासोबत ..May be she is not my destiny.." त्याने डोळे बंद करून विचार केला आणि दुसऱ्याच क्षणी अपूर्वाला मेसेज केला..
"Hey Apoorva, Let\"s meet tomorrow, let\"s have a dinner together.. I have something to talk with you. Hotel Green Park? 8 pm? "

---
"सानु बघ कोण आलंय?"
"हो मम्मा.."
तिने दार उघडलं.
"नची तू? हॅपी बर्थडे बडी.. पण तू इथे कसा काय आज ? तू तर .."
"हो आम्हीच बोलावलंय त्याला.. तू नाराज होतीस ना..आणि त्यात नची चा वाढदिवस..मग आजचा दिवस तो तुझ्यासोबत नाही तर आणखी कोणासोबत सेलिब्रेट करणार.." सानु ची आई म्हणाली.
"अगं पण मम्मा तो.." सानुला पुढे काय बोलावं सुचलं नाही..तिला हे माहीत होतं की आपण कितीही बेस्ट फ्रेंड असलो तरी आता नचीच्या आयुष्यात कोणीतरी स्पेशल आलंय..आणि तो वाढदिवस पण तिच्यासोबत सेलिब्रेट करणार आहे. आता हे आईला कसं सांगणार.
"बरं केलं आंटी तुम्ही मला बोलावलंत नाहीतर ही बया अशीच कुढत, कुंथट बसली असती..माझयासाठी काही आहे का खायला? जामच भूक लागलीये..आंटी.."
"हो रे आणते खायला..तुझ्या आवडीचे डोसे केलेयत आज.."
"वा..आंटी मज्जानू लाईफ छे.." नचिकेत आणि सानुच्या घरच्यांचं एकमेकांशी गुळपिट मस्त जमायचं..अगदी चुलते असल्यासारख..सानु नचीच्या घरीही तशीच वागायची जसा नची सानुच्या घरी वागत होता..

"काय यार नची तू पण ना..माहीत असतं तू येणार आहेस तर केक नसता का मागवला.." सानु म्हणाली..

"माहीत असतं तर म्हणजे? सानू.. दरवर्षी तूच माझ्या वाढदिवसाचं प्लॅनिंग करते ना मग यावर्षी असं काय आभाळ कोसळलय.."

"हो पण नची यावर्षी हा अधिकार माझा..." ती बोलणार तेवढयात नचीने तिला चूप बस म्हणून खुणावले कारण आत सानुच्या आईला सगळं ऐकायला जात होतं..

"ऐ चल माझ्या खोलीत जाऊन बसू निवांत.."
म्हणत ते दोघेही तिच्या खोलीत गेले..

नची धपकन तिच्या खोलीतल्या बिन बॅग मध्ये बसला..

"हळू, बाहेर येईल आतल मटेरीयल..आणि काय रे गधड्या तू सिरियसली माझ्यासोबत नको होता आज..की तिला भेटून आला आहेस की जाणार आहेस?"

"अगं हो हो माझी आई..माझी ईच्छा तीच होती, दिवसभर तिच्यासोबत टाईम स्पेन्ड करण्याची..पण तुला माहिती आहे ती दिवसभर माझ्यासोबत नाही राहू शकणार..तिच्या घरी आपल्या इतकं मोकळं वातावरण नाहिये..म्हणून मग आमचं रात्री डिनर एकत्र करण्याचं ठरलंय.."

"अरे वा, ग्रेटच.." तिने हलकंस स्मितहास्य चेहऱ्यावर आणलं..

"यु टेल, what happened, चेहऱ्यावर आजकाल बारा का वाजलेले असतात...काही तरी खदखदतय मनात तुझ्या तरीही सांगत नाहीयेस..काकांचाही फोन आला होता..तुझ्या अश्या वागण्याबद्दल बोलले ते.. म्हणून लगेच निघून आलो इकडे..काय झालंय नेमकं?"

"काही नाही रे, काहीच नाही.." ती मान खाली घालत, कसनुस हसत म्हणाली..

"मग काय झालंय? मी कारण आहे का? मी केवू ला वेळ देतोय आजकाल तुला नाही म्हणून नाराज आहेस का? सी, मी माझा पार्टनर शोधलाय, तूला ही शोधून देऊ का? म्हणजे तेवढं मन रमेल.. तुला माझा संकेत भाई माहिती आहे ना? माझा मावस भाऊ? तो तुला लाईक करतो..म्हणजे त्याने तुला घरी पाहिलेलं आणि तेव्हाच मला सांगितलं तू त्याला आवडलीयेस ते.. पण मी तुला सांगितलं नाही कारण तुला या विषयावर बोलायला आवडत नाही..पण मला आताशा असं वाटायला लागलंय की तू संकेत भाईला एकदा भेटावंस समजून घ्यावंस.. छान आहे तो, कर्तृत्ववानही , इतका मोठा बिजनेस टायकून आहे पण डाऊन टू अर्थ आहे..आणि विशेष म्हणजे तू त्याला आवडलीयेस."

"नचिकेत, पहिली गोष्ट..मी तुझ्यासाठी आज जितकी हॅपी आहे ना तितकी दुसरी कोणीही नसेल.. त्यामुळे तू हे मनात नको ठेऊस तू मला वेळ देऊ शकत नाहीये म्हणून मी नाराज नाराज राहते, माझ्या नाराज असण्याचं कारण मी डॅडला सांगितलंय आणि तेच खरं आहे..दुसरी गोष्ट मला माझं मन रमवायचं असतं तर चिक्कार मुलं होते आणि आहेत, इव्हन मी तुझ्यावरही अवलंबून राहिले असते, तुझ्याशी निखळ मैत्री केली नसती..तू माझा बेस्ट बडी झालाच नसतास..त्यामुळे आजकाल मुली जसं करतात.. टाइमपास ..तसा मला टाइमपास वैगरे करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये ना की मी संकेत बद्दल तसा विचार करू शकतेय.."

"मग कर ना डियर..मला तुझी काळजी वाटतेय ग,तू ना एकटी राहू नकोस.."

"तो विषय सोड..तू बोल, मला कधी भेटवतोयस केयु ला.."

"तू म्हणशील ल तेव्हा.. ऐ मला एक चांगली आयडिया सुचली आहे.."

"काय?"

"तू चलतेस आज आमच्यासोबत? डिनर ला? माझ्या दोन आवडत्या सोबत बर्थडे सेलिब्रेशन झक्कासच होईल..ऐ चल ना..प्लिज प्लिज प्लिज.."

"नाही नाही नाही..मी येणार नाही..मी कशाला कबाब मे हड्डी?"

"मग संकेत भाईला बोलावून घेतो..तू आहेस म्हंटल्यावर तो नाही म्हणणार नाही.."

तिने नकारार्थी मान हलवली तेवढयात तिची आई दोघांच्या खाण्याच्या प्लेट्स घेऊन आली.

"आंटी मी आणि सानु आज डिनर ला जातोय..म्हणजे माझे एक दोन फ्रेंड्स पण येणार आहेत.."

"हो जा की, तेवढाच तिला ही विरंगुळा..पण कुठे जाणार आहात?"

"हॉटेल ग्रीन पार्क.. आठ नंतर" त्याने डोश्याचा एक घास तोंडात टाकत सांगितलं..

क्रमशः
©नेहा गोसावी

🎭 Series Post

View all