श्वास घेण्यास कारण की... भाग 11

Story of pure souls

Note: मी समजू शकते, पार्ट पोस्ट करायला उशीर होतो, पण कामातून कसाबसा वेळ मिळतो..तरीही प्रयत्न करते लवकरात लवकर पोस्ट करण्याचा. कृपया समजून घ्या आणि सर्वांच्या प्रतिक्रिया लाख मोलाच्या आहेत माझ्यासाठी, कृपया त्यात कंजूशी करू नका..

-----

नचिकेत सानिका व्यवस्थित आहे की नाही बघायला म्हणून तिच्या खोलीत डोकावला होता..तिच्याच वडिलांनी त्याला खरंतर घरी जायला सांगितलं होतं..

"ओके काका, पण तुम्ही आहात इथे त्यामुळे जातोय मी घरी..तुम्हाला काही आणून द्यायचं आहे?"
"अं, एखादी चादर आणून दिली तर बरं होईल, म्हणजे मला इथे बेंच वर झोपता येईल.."
"इथे बेंच वर का काका? आत पेशंटच्या नातेवाईकांची पण सोय आहे ना .." 
"हो आहे, बट शी डोन्ट वॉन्ट मी टू स्टे देअर आणि तिच्या आईला घरचं बघायचं आहे त्यामुळे मीच थांबतोय इथे.." 
"म्हणजे, तुम्हाला तिथे बघायचं नाहीये म्हणजे काय..थांबा तुम्ही..मी येतो तिला समजवून.." 
"असू दे नची, ती आलरेडी स्ट्रेस मध्ये आहे, उद्या बघू काय करायचं ते.."
"मग काका, तुम्ही एक काम करा, मी थांबतो इथे, तुम्ही जा घरी.."
"नक्की? आणि तू आत थांबलास तरी काही हरकत नाही.." 
"नको काका, मला माहितीये तुमचा विश्वास आहे तेवढा माझ्यावर , पण मी असं आत थांबणं मलाच योग्य वाटणार नाही..तुम्ही थांबलात तर तुम्हालाच त्रास होईल..मला काही प्रॉब्लेम नाही, मी पप्पाना फोन करून नोकराकरवी माझं पांघरून मागवून घेतो म्हणजे तुम्हालाही उगाच दगदग नको.." 
त्याच्यापाठीवर थोपटून विश्वासाने ते आपल्या घरी निघून गेले.. 

रात्री तो सानिका व्यवस्थित झोपली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी म्हणून डोकावला..फोन वर बोलत बोलता तिला तशीच झोप लागली होती..तिच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरलं होतं.. खूप दिवसांनी ती खुलल्यासारखी वाटली..याने हळूच तिच्या डोक्यावरून भावाच्या मायेने हात फिरवला..खूप काळजीपूर्वक तिच्या अंगावरच पांघरूण नीट केलं.. हातातला मोबाईल तसाच होता..
तो मोबाईल बाजूला ठेवणार तेवढयात नोटिफिकेशन आलं मेसेज फ्रॉम डॉक्टर.. त्याला आश्चर्य वाटलं..
तिच्या मोबाईल वर खरंतर तिच्यापेक्षाही जास्त हक्क त्याचा होता.. लहानपणापासून आत्तापर्यंत सगळ्याच रोड रोमियोंपासून संरक्षण करणारा भाऊ झाला होता तो वेळप्रसंगी..
त्यांची मैत्रीच अशी होती आणि असायलाही पाहिजे...पाण्याइतकी पारदर्शक आणि निखळ.. 
तिच्या मोबाईलचा पासवर्ड त्याला माहिती होता, त्याने लगेच ओपन करून बघितला..
डॉक्टर आणि तिचे मेसेजेस.. त्याने न राहवून वाचले.. त्याच्या चेहऱ्यावर हलकेच हास्य उमलले...मोबाईल हलकेच बाजूला ठेवून तो खोलीतून बाहेर येऊन बेंचवर पडला.
---
इकडे सकाळी उठल्यावर आधी त्याने माईंना फोन लावला.
"माई, गुड मॉर्निंग.."
"व्हेरी गुड मॉर्निंग डॉक्टर अभिमान.."
"माई? चिडलीयेस? तू चिडली की मला डॉक्टर अभिमान म्हणतेस..हो ना.." तो हसत हसत म्हणाला.
"हो, तुला आत्ता आठवण आली माझी?" 
"सॉरी माई, अगं काल वेळच नाही .."
"कोणाला फसवतोयस तू अभिमान, आई आहे मी तुझी, मी तुला तिकडे पाठवलं म्हणून रागावलास हो ना..पण मला नको होतं तुझं इथे थांबणं..तूर्तास ती इथे असेपर्यँत तरी.."
"माई...?"
त्याला फारच आश्चर्य वाटलं..माई बेधडक स्पष्ट बोलून देणाऱ्या होत्या, त्यांच्यातलं नातंही तसंच होतं.. काही चुकलं की सांगायचं पण अभिमान ला वाटलंच नाही माई हा विषय इतक्या लवकर काढतील म्हणून..
"खरं बोलतेय ना मी, ती तिथे आहे आणि मी तुला नागपुरला पाठवलं म्हणून नाराज आहेस ना?" 
"माई, प्लिज..सानिकाचा काय संबंध.."
"अभिमान, तू मुलगा आहेस माझा, आईला मुलाच्या मनातलं ओळखायला येणार नाही असं होईल का? आणि बघ ना मी फक्त "ती" म्हणाले होते, नाव घेतलं नव्हतं..तू बरोबर सानिकाबद्दल बोलतेय हे ओळखलं, नाहीतर आधी तुझा हा प्रश्न असता..ती म्हणजे कोण? म्हणजे तुझ्या डोक्यात सानिकाच आहे..हो ना?"

"माई.." तो निरुत्तर झाला

"हे बघ अभिमान, ती छान आहे, सुंदर आहे, चांगल्या घरातली आहे मान्य आहे मला पण ती लहान आहे अजून, तुझ्यापेकक्षा आठ वर्षांनी..अल्लड आहे .. परिपक्व नाहीये संसार करायला..तुझं वय आता लग्नाचं झालय म्हणून आपण तिची वाट नाही बघू शकत, तिची कळी आत्ता कुठे उमलते आहे आणि आत्ताच आपण तिला या बंधनात नाही अडकवू शकत.."
"माई, तू खूप पुढचं बोलतेय असं वाटत नाही तुला..अगं अजून कशाचं कशात काहीच नाहीये.., हो, मला आवडलीये ती, असं वाटतं या जगात मला कोणी पूर्ण करेल तर तीच.."
"हेच तुझं असं वाटणं नकोय मला अभिमान.. म्हणून इतका पुढचा विचार करावा लागतोय..तुझ्या सुखात माझं सुख आहे, पण क्षणिक सुखासाठी तुझ्या आयुष्यभराच्या दुःखात भागीदार नाही होऊ शकणार..त्यात आज नर्स ने सांगितलं, तो तिचा मित्र तिच्या खोलीतून मध्यरात्री बाहेर पडला..मी खूप जुन्या विचारांची आहे असं नाही पण इतकीही आधुनिक नाही की मुलीची शहानिशा न करता तुझ्यासोबत  लग्न लावून देऊ.." 
माईंचं असं बोलणं ऐकून त्याच्या हृदयात धडधडलंच.. काल मध्यरात्री तर ती माझ्याशी बोलत होती, आणि मग नंतर तिचा रिप्लाय नाही आला म्हणा..ओह..
"हे बघ अभिमान, मला डॉक्टर अपूर्वा तुझ्यासाठी आवडलीये...सुंदर आहे, शालीन आहे , हुशार आहे आणि समजूतदारही आहे, तशीही हॉस्पिटलमध्ये तुमच्या दोघांचीच चर्चा चालू असते..तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसेल म्हणून...मी तिच्या आईवडिलांना जेवणासाठी बोलावते आहे या आठवड्यात.. "
"माई माई माई..शप्पथ आहे तुला माझ्या आयुष्याचा हा निर्णय तू स्वतः घेतला तर..मला अपूर्वा कधीच इतकी क्लिक झाली नाही, लग्नासाठी तर नाहीच नाही..मी त्या दृष्टीने कधीच तो विचार केला नाही.." 
"मग कर ना.. मला खात्री आहे, तू त्या दृष्टीकोनातून विचार करशील तर तुला नक्क्की पटेल मी काय म्हणतेय ते..."
"तू म्हणतेस तर मी विचार करायला तयार आहे पण मला वेळ हवाय..आज विचार केला आणि उद्या लग्न केलं असं होणार नाही..कोणाचाही..मग ती अपूर्वा असो की सानिका.."
"किती वेळ हवाय सांग, मला खात्री आहे, विचार करशील तर बुद्धी अपूर्वच्याच बाजूने कल देईल कारण ती सगळ्याच बाबतीत सरस आहे.."
"आणि मनाचं काय माई.."
"ते आपल्याला तोडायचं नाहीये म्हणून बुद्धीने विचार करायचा आहे ना बाळा.."
"हम्म..मला फक्त दोन महिने हवेत माई..पण मला एक प्रॉमिस दे..या दोन महिन्यात तू माझ्या लग्नाचा विषय कोणाचकडे काढणार नाहीयेस.."
"दिलं  प्रॉमिस..खुश.."
"ओके माई, thanks, आज खूप प्रॉउड फील करतोय, तुझ्यासारखी माई मला मिळाली..इतकं छान गाईड करणारी, जीच्यासोबत मी काहीही बोलू शकतो.."
"बस कर मस्का मारणं.. आणि तयार हो आता.."
"Ok माई" म्हणत त्याने फोन ठेवला..
तेवढ्यात सानिकाचा मेसेज आला..
"हॅलो, gm, सॉरी काल झोप कधी लागून गेली कळलंच नाही.."

तो मेसेज पाहून मनातच म्हणाला..कशाला खोटं बोलतीयेस सानिका..
 रिप्लाय न करता तसाच मोबाईल बेडवर ठेवून तो त्याची तयारी करायला निघून गेला. 
----
इकडे नचीला झोप लागत नव्हती..ही नक्कीच सानुच्या प्रेमाची नांदी आहे त्याला कळून चुकलं..खरंतर इतक्यात त्याला कुठल्याच निष्कर्ष पर्यंत पोहोचायचं नव्हतं पण मेसेज मधलं त्यांचं हळुवार बोलणं..विशेषतः सानुचं.. त्याने चांगलंच observe केलं..आणि त्यानेच तो सुखावला होता..
काहीतरी विचार करून त्याने केयु ला मेसेज केला.. 
"हे डार्लिंग.. झोपलीस का?"
"नाही रे झोपत होते, आणि डार्लिंग वैगरे काय? कोणी बघितला असता माझा मोबाईल मग?"
"बघितला असता तर तू सांगितलं असतं की माझ्या होणाऱ्या नवरुने केलाय म्हणून.."
"हो, छान आयडिया आहे बरं.."
"बरं ऐक, तुझा तो डॉक्टर अंकल कसा आहे?"
"ऐ अभिमान दादाला अंकल नाही बोलायचं हँ सांगून ठेवते.."
"बरं बाई, तो कसा आहे?"
"एक नंबर, स्वभाव आणि हुशारीच्या बाबतीत तर काही बोलायचीच गरज नाही..का रे?" 
"हम्म..आणि लग्नाचं काय त्याच्या? मोठा दिसतोय, दोन तीन पोरं तर असतीलच..हा हा हा.."
"मला कळत नाहीये, तू का त्याच्या हात धुवून मागे लागलाय?" 
"अगं सहज टाईमपास म्हणून विचारतोय..किती मुलं आहेत मग त्याला , चार पाच की सहा? हा हा हा .."
"ऐ काहीही काय? अजून त्याचं लग्नच झालेलं नाहीये.." 
"मग गर्लफ्रेंड ची भानगड वैगरे.."
"ते मला नाही माहीत बाबा पण सगळीकडे चर्चा आहे, डॉक्टर अपूर्वा त्याला खूप शोभून दिसतात म्हणून..आणि काकीलाही पसंत आहेत त्या सून म्हणून पण अभि दादा बद्दल खरंच काहीही कल्पना नाही.."
"हम्म.."
 त्याने विचार करतच मोबाईल बाजूला ठेवला..
"हम्म..डॉक्टर अपूर्वा.." 


क्रमशः
©नेहा गोसावी

🎭 Series Post

View all