श्रावनसरी ..

श्रावनसरी ..

         श्रावनसरी ...
 

     " श्रावणमासी.... हर्षमानसी .....
                    हिरवळ दाटे चोहीकडे.......
                        क्षणात येते सरसर शिरवे....
                            क्षणात फिरुनी ऊन पडे "......

            श्रावण म्हणलं की पाहिलं मनात येत ते "बालकवी" ची ही सुंदर रचना ... काय छान वर्णन केलंय ना बालकवींनी श्रावणाचं  यात ...  जणू काही पूर्ण श्रावण  .. पूर्ण पावसाळा ... सारा हरितऋतू यात सामावला आहे  ..... साऱ्या श्रावणाचं वर्णन तुम्हाला या कवितेत बघायला मिळेल ... कशी जोड कशी सांगड घातलेय त्यांनी यात श्रावण आणि सभोवतालची सृष्टी तीच सौंदर्य... आहा ... मन अगदी प्रसन्न होऊन जातं...
         श्रावण आहेच असा मनाला नवी चेतना.. प्रसन्नता .. नाविन्याची उमेद देतो ... मन अगदी बहरून जातं ... कारण त्याच्या जोडीला धरतीचा सखा ... ज्याची ती एवढ्या प्राणपणाने वाट पाहत असते तो "पाऊस" तो असतोचं ... सगळ्या जीवांना शांत करणारा तो .. त्याच्या मुळेच तर धरती आपलं रूप बदलते ...नव्या नवलाईचा .. नव्या हिरवाईचा ...हिरवा शालू  पांघरून नटून बसते अगदी ...आपले मन मोहण्यासाठी...
          श्रावण म्हणला की पावसाळा त्याच्याबरोबर आलाच .. आणि पावसाळ्याशिवाय श्रावणाच यमक जुळत नाही ... "श्रावण महिना आणि पाऊस "..... एकमेकांबरोबर असे घट्ट बांधले गेलेत हे दोघे ... पूर्णच होत नाहीत  एकमेकांशिवाय .... 
             मला ना श्रावण  शुद्ध ... सात्विक ... पवित्र वाटतो...  बघा ना ! नावातचं किती सात्विकता आहे त्याच्या..  अगदी देवभक्तीचा महिना म्हणलात तरी चालेल ... मुली-बाळींचा... सख्या-मैत्रिणींचा .. अगदी जिव्हाळ्याचा महिना म्हनलात तरी चालेल .... याच महिन्यात त्यांच्या सणांना ,व्रत वैकल्याना सुरवात होते .... 
             श्रावणी सोमवार येतात ... नागपंचमी येते ... मुली बायकांची सर्वात प्रिय व्यक्ती तिचा जिवलग भाऊ त्याचा उपवासही येतो...  अगदी मनोभावे आपल्या भावाच्या रक्षणासाठी त्या उपवास करतात .. भाऊ सुखात राहूदे म्हणून देवाजवळ प्रार्थना करतात  .. त्याच अनुषंगाने नागोबाला ही भाऊ मानतात त्या .. त्यालाही नागपंचमी दिवशी दूध ,लाह्या अर्पण करतात .. सजून धजून जातात अगदी ... झिम्मा-फुगडी , फेर धरून श्रावण सणाचा आनंद लुटतात.. रोजच्या धकाधकीच्या जीवनात एवढीच कुठे त्यांना विश्रांती...
         बदलत्या राहणीमानानुसार जरी हे सगळं आताच्या पोरा-पोरींना हे माहीत नसलं तरी गावच्या स्त्रियांनी आपली परंपरा अगदी जपून ठेवलेय... रानात काबाड कष्ट करून ,हे सर्व सण ,उत्सव अगदी आनंदाने करतात त्या..
     मी ही जायचे मैत्रिणींबरोबर .. लहान असल्यामुळे उंची छोटी .. मग आईची एवढी मोठी साडी येतेय का गुंडालायला.. तरीही आईजवळ हट्ट .. मला तुझी साडी नेसायचीच आहे..साडी नेसवली तरच जाईन नागोबाला पुजायला... आई मग बिचारी लेकीच्या हट्टापुढे काय चालतय तिचं.. गुंडाळायची कशीबशी साडी मला .. जा म्हणायची ..
    एकदा अशीच नेसून गेलेले साडी ... अर्धी करून गुंडाळली असल्यामुळे निऱ्याच्या जागी खूप मोठा खोचा तयार झालेला ... सगळे हसायला लागले... बघायला लागले माझ्याकडे .. रडत रडत घरी आले .. पहिलं आईला म्हणलं साडी काढ.. तेव्हापासून अगदी मोठी होइपर्यंत म्हणजे आईची साडी पूर्ण माझ्या उंचीला बसेपर्यंत .. साडीला हात काही लावला नाही ...
      खूप आठवणी आहेत ...मग जरा मोठं झाल्यावर अगदी सजून धजून जायचो,मैत्रिणी मिळून नागोबाला पुजायला .. चढाओढी ना ! तुझी साडी सुंदर की माझी ... दूध ,नेवैद्य घेवून जायचो.. गावच्या वेशीवर दगडावर कोरलेला एवढा मोठा फणी काढून उभा असलेला.. नाग .. तोच आमचा नागोबा ...  वाटेत मग पाऊस यायचा घरी येताना .. शिरायचं मग कोनाच्याही घरात.. पावसापासून आडोसा म्हणून... सोमवारी शंकराच्या मंदिरात जायचं .. आणि लवकर जायचं म्हणजे गर्दी नसते .पूजा करण्यास लवकर नंबर मिळतो .. जरा जास्तवेळ थांबता येतं त्या भोलेनाथ च्या पिंडीजवळ.. डोळ्यांत साढवता येते त्याची काया ... म्हणून ...
     रक्षाबंधन ही येतं श्रावण महिन्यातच .. भावाच्या हातात राखी बांधून .. भावाबहिनीच प्रेमाचं नात अजून दृढ करायचं... आपल्या सदैव रक्षणाची मागणी करायची त्याच्याकडे..
     खरं तर खूप काही देऊन जातो श्रावण आपल्याला...  घरातून बाहेर पडलं की हिरवगार धरतीचं सौंदर्य .. मनाला प्रसन्न करत..  तप्त झालेल्या धरणीला .. शांत करतो तो पाऊस ... गावच्या बाया-बापड्यांच्या थोडा वेळ का होईना ...मनोरंजनाचं .. सुखाचं  कारण बनतो श्रावण ...  सुखाचे दोन घास मिळतात त्यांना ... त्यांची लावलेली पीक बहरतात.. फुलतात.. जोम धरतात ... जेव्हा श्रावणसरी मुक्तहस्ते बरसतात ....  गाई गुरांना चारा उगवतात.. मुक्या जनावरांचं पोट भरतात या श्रावणसरी .. म्हणून म्हणतेय मी खूप काही देऊन जातो हा श्रावण ... खूप साऱ्या आठवणी... खूप सारं प्रेम... सर्वांच्या आयुष्यात असाच सुखाचा श्रावण बरसत राहो ... हीच त्या जगतविधात्याजवळ प्रार्थना ! .... तुमचा श्रावण ... आमचा श्रावण ... श्रावण श्रावण ... चोहीकडे श्रावण ...

                " रंग रंगात रंगला श्रावण ....,
          नभ नभात उतरला श्रावण ......,
      पान पानात लपला श्रावण .....,
फुल फुलातला श्रावण ....,
       
                   
 

(काही गोड आठवणी माझ्या आणि श्रावणाच्या... )

   © vaishu patil