Login

श्रावणी मोहोर

श्रावणी मोहोर


घननाद निनादती,
सुमधुर साद घाले...
भान हरपून पाहती...
पाखरं तहानलेले...

सर-सर सर-सर
थेंब हे घणे टपोरे
ओंजळीत ते लेऊन
धरा विसावली स्वरे

भिजवून धरा ओली
साद घाली ओली माती
सुगंधाने मोहरली
सृष्टीवर फुले प्रीती

छान नटले नक्षत्र
नद्या,डोंगर,ओहोळ,
पसरली ही सर्वत्र
शाल ओढी हिरवळ

आभा सारी नटवूनी
गाई उतराई गाणे
माय धरणी सजूनी
आनंदाने गुणगुणे...

नेत्री सजले हे रूप
सारी सृष्टी बागडते
झाडे,वेली,सरीसृप
गाई पावसाळी गीते

नव्या ह्या नवलाईने
प्राणी पक्षी नृत्य करी
बागडतो आनंदाने
शेतकरी कष्टकरी

राग मल्हार घेउनी
आल्या ह्या श्रावणधारा
आसमंत भिजवुनी
जीव चिंब चिंब झाला...