श्रावण
हिरवी छंद हिरवी यमके,
निवडून हिरवे वृत्त नेमके
हिरव्याकंच कविता आता
झरतील ठाई ठाई
श्रावण बसला लेखणी मध्ये
भरुन हिरवी शाई
-गुरु ठाकूर
श्रावण महिन्याचे किती नेमके वर्णन केले आहे कवीने नाही! श्रावण महिन्यात सृष्टी हिरवा शालू पांघरते, पाना , फुलांना बहर येतो, डोंगरावर हिरवे गालिचे अंथरले जातात, पावसाचा धुडगूस कमी होऊन मनाला अल्लाद देणाऱ्या सरी सर सर येतात. बालकवींनी श्रावणाचे वर्णन इतके सुंदर केले आहे की आपल्या साऱ्यांनाच ते पाठ झाले आहे.
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात पडती सरसर शिरवे
क्षणात फिरुनी उन पडे
-बालकवी
असा हा लहान मुलांसारखा, तर कधी आकाशात ढगांशी पकडापकडी , तर कधी ऊन पावसाचा लपी- छपी चा खेळ खेळणारा श्रावण.
श्रावण महिन्यात सणही खूप सारे असतात. जिवतीची अवस, नागपंचमी, नववधूची मंगळागौर आणि झिम्मा फुगड्या घालून रात्र जागवणे, बहीण-भावांचा सण -राखी पौर्णिमा , कोळी बांधवांची नारळी पौर्णिमा, आपल्या आवडत्या नंदलाला ची गोकुळाष्टमी , बैलपोळा यासोबतच पूर्ण भारतभर साजरा केला जाणारा स्वातंत्र्याचा उत्सव-स्वातंत्र्य दिन.
महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किंवा खेड्यांमधे ही पूर्वी आणि आता ही काही ठिकाणी नागपंचमीला मुली माहेरी जातात, हसतात खेळतात झाडाला उंच उंच झोके बांधून मनाच्या हिंदोळ्यावर सहज बागडून येतात.अशा या अल्लड ,अवखळ श्रावणाचे वर्णन गदिमा अगदी समर्पक शब्दात करतात-
हासरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला
तांबुस कोमल पाऊल टाकीत
भिजल्या मातीत श्रावण आला
असा हा आसमंतात भरून राहिलेला , केशर शिंपणारा, इंद्रधनुच्या कमानी बांधणारा, मनाला फिरून नवतरुण करणारा, रोमारोमात चैतन्य पसरवणारा, अंग -अंग पुलकित करणारा श्रावण.
शांता शेळके या श्रावणाच वर्णन अगदी समर्पक ओळीत करतात त्या लिहितात
जल थेंबांनी कधी चमकते
सृष्टी ही साजरी
कधी हासऱ्या, कधी लाजऱ्या
आल्या श्रावण सरी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा