श्रावणमासी... हर्ष मानसी!

About Shravan Month


श्रावणमासी हर्ष मानसी 

हिरवळ दाटे चोहीकडे,क्षणात येते सरसर शिरवे 

क्षणात फिरुनि ऊन पडे 


बालकवींनी या गीतातून वर्णिलेला श्रावण हा मनामनात चैतन्य पेरणारा पाचूसारखा हिरवागार महिना!

श्रावण म्हटला की निसर्गाचं मनमोहक रूप डोळ्यासमोर उभं राहतं.


श्रावण म्हणजे हिरवळ

श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस

श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ

आणि श्रावण म्हणजे सणांचा राजा!


श्रावण म्हणजे एक मांगल्याचे प्रतीक असलेला महिना....

श्रावण हा शब्द येताचं आठवते 

\"श्रावणात घननिळा बरसला

रिमझिम रेशीमधारा,उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा.\"


श्रावण हा ऋतुच आपल्याला प्रेमाचा गोड संदेश देत असतो.सारा निसर्ग जणू नवचैतन्याने न्हाऊन गेलेला असतो.


श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन


या काळातच सृष्टी बहरते आणि नवे रूप लेवून सजते.. या वेळी अवनी धारन करत असते निसर्ग दत्त सौदर्याचा आविष्कार आणि आकाश ही तिला साथ देत असत...

ऊन पावसाच्या खेळात नभात साकारतं... सप्तरंगी इंद्रधनुष्य..

हा सर्व मनमोहक निसर्ग पाहून आपल्याला ही नवा उत्साह मिळतो आणि जगण्याची उमेद मिळते.

शेतशिवाराला चिंब करणारा, झाडा-फुलांना बहरून टाकणारा,पशुपक्ष्यांना सुखावणारा, मनामनांना फुलवणारा,मन उल्हासित करणारा,सर्व चराचराला नवं रूप देणारा.....श्रावण !

श्रावणाचा महिना म्हणजे रिमझिम पावसाचा महिना...

तसाच तो सणासुदीच्या दिवसांचा महिना.

भारतीय वर्षगणतेतील पाचव्या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते;म्हणून श्रावण नाव पडले.


श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथीला आणि वाराला कोणते ना कोणते धर्मकृत्य असते,महत्त्व असते.

सोमवारी उपवास करून शिवाची पुजा करतात.

मंगळवारी मंगळागौरीची पुजा केली जाते.शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करतात. शनिवारी संपत शनिवार व्रत करतात.रविवार म्हणजे आदित्यवार ,या दिवशी आदित्याची म्हणजेच सूर्याची पूजा करतात.

शुद्ध पंचमीला नागाची पूजा करून नागपंचमी साजरी होते.श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात.या दिवसाला राखी पौर्णिमा ही म्हणतात .बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन साजरा होतो.

श्रावणातल्या वद्य अष्टमीला श्रीकृष्णांचा जन्मदिन.जन्माष्टमी किंवा कृष्णाष्टमी साजरी होते.नवमीला गोपाळकाला, दहीहंडी चा उत्सव साजरा होतो.श्रावणी अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हटले जाते.या दिवशी बैलपोळ्याचा सण साजरा करतात.

या सर्व सणासमारंभामुळे घरोघरी उत्सवाचे,आनंदाचे वातावरण असते.

वसंतऋतुपेक्षा वेगळ्या प्रकारच्या पावसाळी फुलांनी,हिरव्या गार झाडाझुडुपांनी,रिमझिम पावसाने,सोनेरी ऊन्हाने ,सप्तरंगी इंद्रधनू ने श्रावणात निसर्ग सुंदर दिसतो,मनाला भावून जातो...

कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे तर 

हासरा नाचरा जरासा लाजरा,सुंदर साजिरा श्रावण, कवींना भुरळ घालणारा,सृजनाला आवाहन करणारा श्रावण.

आनंदाचा धनी असलेला श्रावण हा मनमोहक,मनभावन आहे.....


आला श्रावण,आला श्रावण

करण्यास आनंदी आपले मन

आला श्रावण,आला श्रावण 

घेऊनि आला साजरे करण्यास सण