श्रध्दा

देव आपल्याला कोणत्या रूपात दिसावा हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग असतो .. श्रध्दा चांगली क??

" उद्या आषाढी एकादशी आहे .. लक्षात आहे ना वहिनी .. तयारी केलीय ना सगळी नीट ? " आत्येसासूबाईंनी सुमनबाईना विचारलं .. पण त्या बोलण्यात राधाला सुमनबाईंच्या सुनेला प्रश्न कमी खोचकपणा जास्त वाटला .. राधा नुकतीच लग्न होऊन घरात आलेली नवी नवरी होती .. आत्याबाईंच लक्ष नाहीसं बघत ती स्वयंपाक घरात गेली आणि सुमनबाईना हळूच विचारलं , " आईं , एवढी काय तयारी करायची आहे? आत्या असं का विचारताय ? " .. राधाचं बोलणं ऐकून सुमनबाईंना हसू आलं .. त्या का हसल्या राधाला कळेना .. तिने विचारलंच , " काय झालं आईं ? तुम्ही का हसताय ?" .. " काही नाही ग .. तू फक्त बघत रहा आता दोन दिवस .. तुला घरात नाही मंदिरात असल्यासारखं वाटेल .." सुमनबाई बोलतच आत्याबाईंकडे गेल्या .. तरीही राधाला काही कळलं नाही पण ती पुढे काही बोलली नाही .. " हो वन्स , केली सगळी तयारी .. देवघर स्वच्छ केलं.. देव उजळवले .. तूप वात भिजवल्या .. देवाची वस्त्र सुद्धा आणून ठेवलीय .. तुमच्या पारायणाची पोथीही ठेवलीय नीट स्वच्छ कोऱ्या कपड्यात बांधून .." सुमनबाईच्या तयारीने आत्याबाई खुश झाल्या .. राधा हे सगळं पहिल्यांदाच ऐकत आणि बघत असल्यामुळे तिला खूप विशेष वाटतं होतं .. आत्याबाईं गावाकडून काही कामासाठी आलेल्या होत्या आणि काम झाल्यावर सुमनबाईनी त्यांना आग्रहाने थांबून घेतलं होतं .. तेव्हाच , " बघ बाई वहिनी आषाढी एकादशी आली .. सगळी तयारी करावी लागेल तुला " त्यांनी सुमनबाई कडून सगळं वदवून घेतलं होतं .. ते राधाला आठवलं .. , " वहिनी , तुला तर काही सांगावच लागत नाही .. सगळं कसं मन लावून करते .. पण तू पूजा पाठ नियमित करत नाही ही गोष्ट मात्र खटकते बाई मला .. तू स्वतः करत नाही आणि तुझ्या घरातल्या माणसांचा तर आनंदी आनंद आहे .. पण त्यांनाही तू काहीच बोलत नाही .. अगं करून घ्यायचं माणसांकडून .. पूजा देव धर्म घरात होणं खूप पवित्र असतं .. सुख शांती नांदते त्यामुळे .. " ननंदेच बोलणं सुमनबाई निमूटपणे ऐकत होत्या .. पण बोलत काहीच नव्हत्या .. " हे बरं जमत हं वहिनी तुला .. नुसतं ऐकून घ्यायचं .. " आत्याबाई . " तसं नाही वन्स .. पण तुम्हाला माहितीये ना .. माणसांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात .. सकाळी गडबड असते .. नाही जमत त्यांना .. आणि मी करते की पूजा .. जमेल तशी .. " सुमनबाई . " जमेल तशी हेच आवडत नाही बघ मला .. अग श्रद्धा महत्वाची असते .. " नणंदबाई फणकाऱ्याने म्हणाल्या .. " वन्स तुमची श्रद्धा आहे ना देवावर .. आणि माझी तुमच्यावर .. " सुमनबाई नणंदबाईंची समजूत काढत होत्या .. हे सगळं राधा बसून ऐकत होती .. तिच्या थोडं थोडं लक्षात येवू लागलं होतं .. आत्या खूप देव देव करतात आणि आईं एवढं करत नाही .. त्यावरून दोघींचं बोलणं चाललंय हे तिने ताडलं .. दुसऱ्या दिवशी पहाटेच राधाला देवाच्या घंटी च्या आवाजाने जाग आली .. मंदारही वैतागून जागा झाला .. " यार या आत्या पण ना .." तो पुटपुटला आणि उशी कानावर दाबून पुन्हा झोपला .. राधा उठून आवाजाच्या दिशेने जाऊ लागली .. तिची चाहूल लागताच .. " अगं अगं अशी कुठं येतीये .. स्नान करून मग ये देवघरात .. " त्या जवळ जवळ ओरडल्याच .. राधा दचकली आणि मागे फिरली .. " बाई बाई बाई काय या आज कालच्या मुली .. साध्या साध्या गोष्टीही माहीत नसतात यांना .. " आत्याबाईच्या तोंडाचा पट्टा चालू झाला .. सुमनबाई तिथे घाई घाई आल्या .. " काय झालं वन्स ?" त्यांनी विचारलं .. " तूही काही शिकवलं नाही बघ सुनेला .. तुझ्यासारखच करून ठेवलंय तिला .. देवा तुला डोळे .. " सुमनबाई न बोलता स्वयंपाक घरात गेल्या.. " अगं वहिनी .. स्नान केल्याशिवाय स्वयंपाक घरात येवू नको सांग बाई तुझ्या सुनेला .. देवा तुला डोळे रे बाबा .. " त्यांनी पुन्हा त्यांची नापसंती दर्शवली .. सुमनबाई " बरं वन्स " एवढंच म्हणाल्या .. त्यांनी राधाला चहा दिला .. " इथंच बस राधा .. तुला काही हवं का चहा सोबत ? " त्यांनी विचारलं .. " नको आईं .. उपवास करतात ना आज ?" राधा ने विचारलं .. " "हो .. का ग ? " सुमनबाई .. " मी पण करते .. नाहीतर आत्या तुम्हालाच बोलतील त्यावरून .. " राधा हळूच म्हणाली .. " अग बाई तुझ्या लक्षात यायला लागलाय तर वन्सांचा स्वभाव .. पण मला बोलणे बसतील म्हणून नको करू उपवास .. तुझ्याकडून होईल आणि तुला मनापासून वाटत असेल तरच कर .. " सुमनबाई समजुतीने म्हणाल्या .. " हो आईं मी मनापासून करेल आणि होईल माझ्याकडून .. " राधा हसत म्हणाली .. वन्स पारायनाला बसल्या आहेत हे बघून त्याही मग जरा डायनिंग चेअर ओढून राधा शेजारी बसल्या .. " मनाने वाईट नाहीत ग वन्स .. पण देव धर्म , सोवळ ओवळ जरा जास्तच आहे .. इतकंच .. !! आणि आपल्यासारखच सगळ्यांनी करावं हा आग्रह असतो त्यांचा .. पण हे म्हणजे तुझे सासरे आणि मंदार दोघांनाही ते दांभिक वाटतं .. " सुमनबाई राधाशी बोलू लागल्या .. " हो आईं .. पण तुम्हीही एवढं सोवळ वोवळ .. पूजा नाही ना पटत .. म्हणजे .. " राधा कचरत म्हणाली .. सुमनबाईना राधाचं कौतुक वाटलं , " कमी दिवसांत सगळं छान लक्षात आलंय तुझ्या राधा .. हुशार आहेस .. " " नाही आईं तसं नाही .. मी सहजच .. " राधाने जीभ चावली .. " अगं घाबरायचं काय त्यात .. बरोबर बोलतेय तू .. मला खरंच नाही आवडत अती देव देव .. मुर्तीतल्या देवापेक्षा माणसांतला देव जास्त भावतो मला .. महत्वाचा वाटतो .. १०₹ दानपेटीत टाकण्यापेक्षा गरजूंना दिलेलं जास्त चांगलं नाही का? .. आधीच पोट भरून जेवून आलेल्या सवाष्णीला जेवू घालण्यापेक्षा कामवाली गरीब बाई आणि तिचे पोरं पोट भरून जेवतात तेव्हा खूप समाधान वाटतं बघ .. राहता राहिला प्रश्न देवपूजा आणि उपवासाचा तर मनोभावे हात जोडले तरी त्याच्यापर्यंत आपण पोहोचतो नक्की ही माझी श्रद्धा आहे आणि देव काय ग वासाचा भुकेला .. तो स्वतःही खात नाही आणि आपल्यालाही उपाशी रहा .. खावू नका किंवा उपवासाला हेच खा .. अमुक एका दिवशी हे खाऊ नका असं नाही सांगत तो .. हे सगळं पूर्वजांनी ठरवलं आणि आपण ते पुढे चालू ठेवलय .. इतकंच .. " राधा मग्न होवून ऐकत होती .. " राधा काय ग ? " सुमनबाईंनी तिला हलवल .. " आईं किती छान बोलतात तुम्ही .. किती चांगले , पवित्र आणि मुख्य म्हणजे पटणारे विचार आहेत तुमचे .. मला फार अभिमान वाटतोय तुमचा .. माझ्या मनातला तुमच्या बद्दलचा आदर अजूनच वाढलाय .. !! " राधा मनापासून बोलत होती .. " काय ग तू .. किती कौतुक करतेस .. मी फक्त माझ्या मनातले विचार आणि माझं मत सांगितलं .." सुमनबाई पुढे म्हणाल्या .. " आता तुला प्रश्न पडला असेल ना की मी वन्सना का हे सगळं सांगत नाही ..?" " हो आईं आता तेच विचारणार होते मी .." राधा मोठे डोळे करून म्हणाली .. " कसं असतं राधा माणूस कायम समाधान शोधत असतो .. कुणाला देवपूजा , उपवास तापास , पोथी पारायण आवडतं , त्यात समाधान मिळतं .. हे अमान्य करून चालणार नाही .. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे .. आणि कुणाच्या श्रद्धेला आपण कमी जास्त , चांगलं वाईट अस नाही ठरवू शकत .. लहानपणापासून मनावर झालेल्या संस्कारांचा भाग असतो तो .. नाही का ? " सासू सुनेच्या गप्पा छानच रंगल्या होत्या .. " हो ना .. खरंय .. माझ्या माहेरीही एवढं नसतं .. रोज देवपूजा केली बस .." राधा . " हो ग .. ठाऊक आहे मला .. चल तू तुझं आवरून घे .. आणि ये मला मदतीला .. तोपर्यंत मी आपल्या फराळाची तयारी करते .. " सुमनबाई उठल्या .. " पण आईं आत्या फराळ कधी करतील? त्यांचं कधी पूर्ण होईल देवाचं? " राधाला प्रश्न पडला .. सुमनबाईनी डोक्याला हात लावला आणि म्हणाल्या , " अग वन्स कडकडीत उपवास करतील .. फराळ नाही की पाणीही पिता की नाही कोण जाणे .. आता उद्या दुपारीच जेवतील .. तेही देवाला द्वादशीचा नैवेद्य झालं की मग .. " " काय सांगता आईं ..!!! " राधाला धक्काच बसला ऐकून .. " त्यांना त्रास झाला तर .. हे अतीच नाही का ?" .. राधा काळजीने म्हणाली .. " मी म्हणलं ना राधा हा श्रध्देचा भाग आहे .. आणि त्यातून समाधान मिळतं .. त्रास नाही होत .. वन्स नेहमीच करतात असे उपवास .. त्यांच्या घरी .. " सुमनबाईनी पुन्हा राधाला समजावलं .. पण ती विचार करू लागली .. तेवढ्यात " राधा माझे कपडे कुठे आहेत ?" मंदार ने तिला आवाज दिला .. " आले आले .." राधा. आणि त्याच वेळी आत्याही .. " वहिनी , तुम्ही घ्या हो फराळाचं करून .. मी निर्जलाच करेन म्हणते .. आणि हो .. अगं उद्याच्या पुरणाच्या नैवेद्याची तयारी करू ग .. माझं पारायण झालं .. आता जप करते आणि येते ग तुला मदतीला .. पांडुरंगा कृपा करा .. " आत्याबाईंनी पुकारा केला .. " बरं वन्स .. " असं म्हणून सुमनबाई आणि राधा एकमेकींकडे बघून हसल्या .. आणि कामाला लागल्या .. सौ. गायत्री प्रशांत देशपांडे