Login

श्रद्धेचे वारकरी_भाग १

जीवन जगण्यासाठी श्रद्धा
श्रद्धेचे वारकरी_ भाग १

"अगं दहा मिनिटात पोहोचेन मी. सरु तू अजूनही तशीच उतावीळ आहेस. गेल्या तासाभरात किती फोन केलेस."

"अगं म्हणजे काय मिनू, तुला जितका उशीर होईल तितक्या आपल्या गप्पा कमी होतील ना. एक तर किती महिन्यांनी आपण भेटणार आहोत. चल ये लवकर. तुझी आवडती कुरकुरीत अळूवडी वाट बघतेय."

सरूने दरवाजा उघडाच ठेवला. आत शिरल्यावर पाठमोऱ्या सरूचे डोळे मीनलने झाकले.

"मिनू तुझी मी कधीची वाट बघतेय आणि तू डोळे काय झाकतेस. आ गले लग जा." अगदी फिल्मी स्टाईलने सरू म्हणाली. मीनल आणि सरोज दोघी अगदी जीवलग मैत्रिणी होत्या. आज सरूच्या घरचे सगळे बाहेर गेले होते म्हणून दोघींनी भेटण्याचा प्लान केला होता. जेवताना दोघींच्या गप्पा रंगात आल्या होत्या. इतक्यात दारावरची बेल वाजली.

"अरे यार आता कोण कबाबमे हड्डी बनायला आलं आहे."

"ए बाई आधी बघ तरी कोण तुझे नातेवाईक आले असतील."

सरून दार उघडलं. बघते तर तिचा मामेभाऊ मिहिर आला होता. सरुची आणि त्याची खूप गट्टी होती. तो डायरेक्ट तिला म्हणाला,

"ए सरू लवकर वाढ मला खूप भूक लागली आहे.
बाकी गप्पा नंतर." असा म्हणून तो डायनिंग टेबल जवळ आला आणि मिनलकडे एकटक बघत राहिला. मीनल खूप देखणी नसली तरी चारचौघीत उठून दिसणारी होती. गव्हाळ वर्ण, सरळ नाक, बदामी डोळे आणि सर्वात आकर्षक असे तिचे सरळ रेशमी केस. तिने परिधान केलेला आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस तिला खुलून दिसत होता. मिहिर मीनलकडे एकटक पाहत असल्याचं पाहून सरूच्या लक्षात आलं ह्याची तर विकेट गेली.

"काय रे आता पण जेवणाची भूक आहे ना की कोणाला तरी पाहून तहानभूक हरपली."

सरूचे बोलणं ऐकून मीनल लाजली. मिहिरचे व्यक्तिमत्व पण भुरळ घालणारे होते. पावणेसहा फूट उंची, सावळा वर्ण, बोलके डोळे, चेहऱ्यावर कोरीव दाढी त्याला शोभून दिसत होती. सरु त्याला म्हणाली,

"चल हातपाय धुवून घे आणि आमच्याबरोबर बस जेवायला. बाय द वे तू इथे कसा काय!"

"अगं इथे जवळच कामानिमित आलो होतो म्हटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून जावं. कुठे गेले सगळे?"

"सगळे बाहेर गेले आहेत. अरे हो तुझी ओळख करून द्यायची राहिली. ही माझी खास मैत्रीण मीनल आणि हा माझा मामेभाऊ मिहिर."

मिहिर आणि मीनलने एकमेकांना ' हाय ' केले. मिहिर मस्करीत म्हणाला,

"खास म्हणजे तुझा शब्द खाली पडू देत नसणार."

"हो कळलं मला तुला काय म्हणायचं आहे ते"

मिहिरने सरूकडून मिनलची सगळी माहिती घेतली. मीनलला पण मिहिर आवडलाच होता. सरूने दोघांच्याही घरी सेटिंग लावली. तोपर्यंत दोघं बाहेर भेटत होते. एकमेकांच्या प्रेमात ते आकंठ बुडाले होते. नंतर सर्व रीतसर बोलणी, मुहूर्त पाहून दोघांचे एका सुमूहूर्तावर लग्न झालं. सरु दोघांच्याही गळ्यातला ताईत झाली होती. सरु दोघांना उद्देशून म्हणाली,

"आता दोघं एकत्र आला आहात. मला विसरलात तर महागात पडेल."

"सरु दुनियाकी कोई भी ताकद हमारी दोस्ती मिटा नहीं सकती."

"बघूया कळेलच."

(मीनल आणि मिहिरच्या जीवनात लग्नानंतर काय फरक पडेल पाहूया पुढील भागात)