श्राद्ध
गणपती बाप्पाला निरोप देऊन झाला आणि श्राद्ध पंधरवाडा सुरू झाला. सगळी कडे एकच तयारी सुरू आहे आपल्या पितरांना घास द्यायची. काही ठिकाणी खरंच श्रद्धा आहे तर काही ठिकाणी बडेजाव. काही मनापासून करतात तर काही जगरीत म्हणून.
बरेच वेळा तर असं पाहलं आहे की म्हातारी माणसे किंवा व्यक्ती घरात असताना त्यांची देखभाल व्यवस्थित केली जात नाही. आजारी असेल तर शुश्रुषा इत्यादी बरोबर केले जात नाही. त्यांना जेवायला ही बरोबर दिल्या जात नाही. अन व्यक्ती जर अंथरुणावर खिळली असेल तर नको वाटतं. अशी व्यक्ती देवाघरी गेल्यावर मात्र अशा व्यक्ती च्या नावाने मोठमोठे यज्ञ केले जातात. दान केले जातात. श्राद्ध केले जातात. हजारो लोकांच्या पंगती उठतात. अरे ज्या व्यक्तीला तो जिवंत असताना चांगले पाहिले नाही, त्याला मरणयातना सोसाव्या लागल्या, जेवायला दिले नाही, तो व्यक्ती तुम्हाला शिव्याशाप देणार कि आशिर्वाद. एखादी व्यक्ती महान असेलही कि जाऊ द्या आपलेच काही चुकले असेल म्हणत सगळं विसरून जातील. पण असा व्यक्ती होणे विरळाच.
याऊलट असेही बरेच जण आहेत की ज्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला त्रास झालेला बघवत नाही. त्यांना काय हवं नको सगळं व्यवस्थित पार पाडतात. जितेपणीच त्यांना त्रुप्त झाल्यासारखे वाटते. मग जर श्राद्ध किंवा अखरपक केले किंवा नाही फरक नाही. ते नेहमीच आपल्या प्रियजनांना आशिर्वादच देतात.
काही जणांना इच्छा असूनही परिस्थिती अभावी काही केल्या जात नाही मग त्यांना ऊगाच मनात चुटपुट लागून राहते. आपण श्राद्ध नाही केले तर काही होईल काय हा विचार सतत त्रास देत राहतो. शेवटी कित्येक जण कर्ज काढून सगळं आटोपतात. व कर्ज फेडत राहतात. त्याचा परिणाम म्हणजे आहे ती परिस्थिती सुध्दा अजून हलाखीची होते.
असो श्राद्ध करणे किंवा न करणे हा ज्याचा त्याचा वयक्तिक मामला आहे. विचार एवढाच व्हावा की मेल्यानंतर त्या व्यक्तीला काय काय करता किंवा त्या व्यक्तीच्या नावाने काय काय करता हे पाहायला तो व्यक्ती काही हजर नसतो. त्यामुळे जिवंत असतानाच त्याला सगळं सुख दिले तर नक्कीच आत्मशांती मिळेल.
वरील लेखात मांडलेले विचार हे माझे व्यक्तीगत मत आहे कुणाच्याही भावनांना दुखवायचा हेतू नाही, तसे वाटल्यास क्षमस्व.
✍ शितल इंगळे पारधे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा