शो मस्ट गो ऑन....

प्रेरणादायी कथा

भीती ही माणसाला कमजोर बनवते... मनात भीती नावाचा बागुलबुवा शिरला की तो आपल्याला कमजोर बनवतो.. आपला आत्मविश्वास कमी होतो.. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आला तरी धीर न सोडता त्याचा सामना करायचा हे मी माझ्या बाबांकडून शिकले.... तरीही काही गोष्टी अशा असतात जेव्हा आपण खूप घाबरून जातो आणि भीती आपल्या मनावर राज्य करते.. असेच काही प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे...आज त्यांचीच एक प्रेरणादायी  कथा मी सांगणारं आहे...

लहान असताना आपण बऱ्याच गोष्टींना घाबरत असतो... मी पाण्याला, सायकल चालवायला आणि केस असलेल्या बाहुलीला तर एवढी घाबरायचे की विचारू नका... खुप् रडायचे त्या बाहुली वरून तर... माझे लग्न होईपर्यंत माझ्या भाऊ आणि बहिणींनी टेर उडवली आहे.... लग्नात तर त्यांनी मला एक केस वाली बाहूलीच गिफ्ट म्हणून दिली.. आणि त्याला वरून खूप गिफ्ट पॅक करून आत एक बाहुली... खुप् हसले तेव्हा सगळे..

पण आता जो कीस्सा मी सांगणार आहे तेव्हा तर आमचे अख्खं गाव ह्या भीतीच्या जाळ्यात अडकले होते... तो काळ दिवस होता २६ जुलै २००५ चा... ह्या दिवसाने खूप जणांना वाईट आठवणी दिल्या आहेत हे माहित आहे मला.. पण अजूनही भीती दाटून येते ह्या दिवसाची आठवण झाली की.. अन या दिवसापासून सर्वात जास्त भीती वाटते ती पावसाची अन येणार्या पुराची....

आम्हाला पाऊस आणि दरवर्षी येणारा पुर हा काही नवीन नाही..पण त्या वर्षी आलेला पुर हा वेगळाच होता... जोरात वाढलेले पाणी आणि त्यामुळे या पुराने त्याच्या मर्यादा सोडून त्याच रुपांतर हे महापुरात झाले होते...तेव्हा मी कॉलेज ला असले तरी तसे माझे वय १८-१९ होते... आमचे घर मुळात रस्त्यापासून ८-९ फुट उंच होते... रस्ताच्या समोर शेती आहे गावातील सगळ्यांची.. आणि रस्ता त्या पासून ३-४ फुट वरती... एवढी उंची असून देखील आमच्या घरात ४-५ फुट पाणी होते.. समोर सर्व शेते पाण्याने भरलेली... थोड्या अंतरावर वाहणारी नदीने तर रौद्र रूप धारण केले होते... लाईट नाही.. घर एवढ्या उंचावर असल्या मुळे कधीच घरात पाणी आले नव्हते,अन अचानक पाणी वाढत गेले त्यामुळे बऱ्याच वस्तू ह्या पाण्यात भिजल्या... पाण्याचा जोरच एवढा होता की काही हलवाहलव करायला अवधी मिळाला नाही... किराणा दुकान त्याचे नुकसान तर विचारू नका... भयाण शांतता..मुसळधार पाउस आणि वारा... त्यात कुत्र्यांचे ते कर्कश आवाज... नको वाटत होती ती रात्र... माझ्या आईचे बाबा म्हणजे माझे आजोबा नेमके त्या वेळेस आमच्या कडे राहायला आले होते... त्यांना एवढं पाणी बघायची कधी सवय नव्हती... त्यांना वयोमानाप्रमाणे भीती वाटली आणि त्यांचे पोट बिघडले.. थोडा घाम फुटु लागला... त्यांना आम्ही बोलुन धीर दिला... रात्रभर पाणी ठाम होते... ती रात्र गेली म्हणजे २५ जुलै ची... आता आला तो मंगळवार २६ जुलै... पाणी हळू हळू उतरले... पण तरीही पायाचा तळवा बुडेल एवढे पाणी घरात होते... म्हणजे समोर तर समुद्र वाटत होता... हळू हळू आम्ही साफसफाई करायला सुरुवात केली... सगळीकडे माती... घाण झालेलं सर्व... दुकानात तर कडधान्याची पोती भिजून त्याचा वास येत होता...

दुपारचे चार वाजले, जोरात आवाज आला...घराजवळ डोंगर कोसळून काही घरे त्या खाली आली... बरे २० तास होऊन सुद्धा रस्त्यावर ८-१०  फुट पाणी होते... समोर पाणी आणि वरून डोंगर आल्या मुळे ५० माणसे त्यात गेली... जे मागच्या पायवाटेने धावत आले तें आमच्या घरात शिरले... काहींनी आपल्या माणसांना डोळ्यासमोर मातीच्या ढीगार्यात जाताना पाहिले होते... खूप आक्रोश करत होते... आमचे घर हे RCC बांधकाम असल्यामुळे काही धोका नव्हता... त्या रात्री आमच्या घरात आजू बाजूचे मिळून ६०-७० जण होते... काही रडत होते... काहींची मुले, कोणाचा नवरा कोणाची आई त्यात गेली... तें रडत होते... अख्खी रात्र आम्ही भीती मध्ये घालवली...कोणीच झोपले नाही... पाणी अजूनही तेवढेच होते... त्यामुळे बाहेर जाणे शक्य नव्हते... मी रात्र भर अथर्वशिर्ष म्हणत होते... दाखवत नसले तरी मोठी माणसे सुद्धा घाबरून गेली होती....

२७ जुलै पाणी उतरले... आम्ही गुडघाभर चिखलातून बाहेरच्या रस्त्यावर आलो... परत कधी यायला मिळेल? काय करायचं काहीच माहित नव्हते,कळंत नव्हते... जवळच रहात असलेल्या माझ्या काकांकडे दुसऱ्या गावात गेलो....

बातमी पसरली तसे मामा त्याची माणसे मदतीला घेऊन आला... मावशी आम्हाला दोघींना घेऊन गेली त्यांच्या सोबत... मामा- मावशी एकाच गावात राहतात... मावशी आई पेक्षा मोठी असल्यामुळे आणि मामा गावात असल्यामुळे नेहमीं आजीकडे म्हणजे मामाकडेच राहणे व्हायचं... आता आजी नव्हती त्यामुळे काही न बोलता मावशी कडे राहायला गेलो...पहिल्यांदा... आणि तेव्हा जाणीव झाली " माय मरो अन मावशी जगो" असे का म्हणतात याची....

तरीही भीती कायम होती... आई-बाबा इकडेच होते... त्यात रस्ता वाहून गेला होता... दरड कोसळली होती त्यामुळे लोकं गाव सोडून जायचा विचार करत होते... दुकान चालेल की नाही काहीच कळत नव्हते... पण त्यांनी जिद्दीने या भीतीवर मात करायचे ठरवले... सर्व काही विस्कळीत झाले होते,ते पूर्वव्रत व्हायला बराच काळ जायला हवा होता...

त्यात खूप अफवा उठत होत्या... आता इथे कॊणी राहणारच नाही.. रस्ता नाही, त्यात ही दुर्घटना ज्यांच्या बाबतीत झाली होती त्यांचे मानसिक संतुलन तेव्हा व्यवस्थित नव्हते.. त्यामुळे आशेचा एक ही किरण दिसत नव्हता... मनात एकच भीती आता पुढे काय? लोकं नाहीत तर दुकान कसे चालणार? पुढे पोटा-पाण्याचे काय... सर्व नातेवाईक होतेच..सगळ्यांनी धीर दिला..लागेल ती मदत करायला तें तयार होते...

पण कोणाचे मिंधे राहणे बाबांना पटत नव्हते... दिवाळी पर्यंत वाट बघू आणि ठरवू असे म्हणून त्यांनी दुकान चालूच ठेवले... राहायला तात्पुरते दुसरे घर घेतले... ते आमच्या नातेवाईकांचेच होते... ८-९ महिने घर इकडे आणि दुकान तिकडे.. असे घालवले..धंद्यावर थोडा परिणाम झाला होताच... त्यात गाव म्हटल्यावर भूत आहेत अशी अफवा पण येत होती... वाचवा वाचवा असे आवाज ऎकु येतात असे देखील बरेच जण बोलायचे... तरीही त्यांनी काय करू कसे करू?? कसे होणाऱ असा विचार न करता प्रयत्न चालु ठेवले... आणि काळ हाच उत्तम उपाय ठरला... परत सर्व जनजीवन सुरळीत झाले... रस्ता बांधला गेला... आणि आता तर जिथे डोंगर खाली आला तिथे आधी रहात असलेली जी माणसे सुखरूप वाचली होती त्यांनी नवीन घरे देखील बांधली आहेत....

अजूनही पाऊस आला पूर आला की या आठवणी काळजावर घाव घालतात...

पण या निसर्ग संकटाला अन माणसांच्या अफवांना न घाबरता कोणतीच भीती न बाळगता धैर्याने समोर गेले माझे बाबा... वयाच्या ४५-५० ह्या टप्प्यात त्यांनी ह्या भीतीवर मात केली आणि आज अख्ख्या पंचक्रोशीत त्यांचे एक यशस्वी व्यापारी म्हणून नाव आहे.... "सलाम तुमच्या हिमंतीला पप्पा...." 

खरच आपल्या मनातल्या आवाज ऐकून जो पुढे जातो तो नक्की यशस्वी होतोच...

कसा वाटला लेख नक्की सांगा...

© अनुजा धारिया शेठ

🎭 Series Post

View all