Login

सहानुभूती नको समजूतदारपणा दाखवा

A story about fighting depression.

“बाबा बाबा, हे बघ मी कलर केलं,” श्रिया धावत येवून निरंजनला बिलगली. तिच्या धक्क्याने त्याच्या हातातील पाण्याचा ग्लास हिंदकळून त्याचा शर्ट ओला झाला. लगेच त्याचा पारा चढला आणि ग्लास बाजूला ठेवून त्याने श्रियाला एक धपाटा ठेवून दिला. अगदी मिनीटभरात हा सगळा घडला. घरातील सगळे अवाक् होवून पाहतच राहिले. श्रियाच्या रडण्याचा आवाज ऐकून ते भानावर आले. निरंजनची आईनेरडणाऱ्या नातीला जवळ घेत  मुलाला प्रश्न केला, “का मारलंस रे लेकराला, फक्त पाणी तर सांडले ना शर्टवर का पहाड कोसळला अंगावर?”

“कळत नाही का तिला मी पाणी पितोय म्हणून, थोडं थांबता येत नाही का, की कुठे पळून जात होतो?”

“तिला जर ते कळलं असतं तर चार वर्षाची ती आणि तुमच्यात काय फरक राहिला असता.” रागाने लाल झालेली उमा, श्रियाची आई, बोलली आणि मुलीला घेवून आत गेली. निरंजन आणि त्याची आई हताश होवून एकमेकांकडे पाहत बसले. 

“तू हल्ली थोडं जास्तच चिडचिड करतो आहेस असं नाही वाटत तुला?” शेवटी आई बोलली. 

“हो आई, मलाही समजतंय ते पण मला काही कळण्याआधीच मी रिअॅक्ट झालेलो असतो. किती पश्चाताप होतो नंतर पण काय फायदा त्याचा!” डोकं हातात पकडून निरंजन म्हणाला. 
गेले काही दिवस निरंजनची मानसिक अवस्था ही अशीच होती. त्याला छोट्या छोट्या गोष्टींचा प्रचंड राग येत असे. मग त्याचा स्वतःवर ताबा राहत नसे. लहानपणापासून तो एकलकोंडा होता. त्याला जास्त मित्र नव्हते. वडील लवकर निर्वतल्याने आईनेच छोट्या-मोठ्या नोकऱ्या करून त्याला वाढवले. आईला हातभार म्हणून थोडा मोठा झाल्यावर निरंजनही एका कपड्याच्या शोरूममध्ये पार्टटाईम नोकरी करू लागला. या नोकरीने त्याला काही चांगले आणि बरेचसे वाईट अनुभव दिले. त्याच्या भिडस्त स्वभावाचा फायदा घेवून त्याला जास्त काम लावणे, नसलेल्या चुकीचा आळ घेणे, मालकाकडे विनाकारण त्याची चुगली करणे असे प्रकार तेथील इतर नोकरवर्ग करत असे. पण आपल्याला असलेली नोकरीची गरज, मालकांचा चांगला स्वभाव आणि इतर ठिकाणी अशी नोकरी मिळेलच याची शाश्वती नसल्याने तो चुपचाप सारे सहन करायचा. त्याची घरची परिस्थिती आणि त्यातही शिक्षणाविषयी असलेली जिद्द पाहून शोरूमचे मालक परिक्षेच्यावेळी त्याला भरपगारी सुट्टी देत असत. खरंच अशा काही माणसांमुळे आपला माणुसकीवर असलेला विश्वास टिकुन राहतो! 
या परिस्थितीमध्येच निरंजनने आपले शिक्षण पुर्ण केले आणि शोरूमच्या मालकांनी आपल्या ओळखीच्या फर्ममध्ये त्याच्या नोकरीसाठी शब्द टाकला. त्यांच्या वशिल्याने आता निरंजनला नोकरीही लागली. घरी सुबत्ता आली. घरची आर्थिक घडी बसू लागली. विचार करायला रिकामा वेळ मिळू लागला आणि तिथेच घात झाला. तो फावल्या वेळात आपल्यावर झालेला  अन्याय, गरिबीमुळे मित्रांनी केलेली हेटाळणी, नातेवाईकांनी केलेला अपमान अशा गोष्टी उगाळत बसे. हळुहळू त्याची मनोवृत्ती नकारात्मक बनू लागली. या सर्व गोष्टींचा बदला घेण्याची तीव्र इच्छा होवू लागली. त्याच्या स्वभावात लक्षणीय बदल झाला. दिसेल त्याला डाफरणे, माझी वेळ आली की पाहून घेईन अशा धमक्या देणे इतकंच काय मनासारखी भाजी नाही बनवली म्हणून आईवर ओरडण्यापर्यंत त्याची मजल गेली. इतकी वर्ष शांत असणाऱ्या आपल्या मुलाला काय झाले आहे हे काय त्या माऊलीला समजेनासे झाले आणि एक दिवस या सगळ्याचा कडेलोट झाला. करपलेली पोळी पानात वाढली म्हणून निरंजनने ताट भिरकावून दिले जे जावून आईच्या कपाळावर लागले. खोच पडून भळाभळा रक्त वहायला लागले. ते पाहताच निरंजन खाडकन भानावर आला. आपल्या चुकीची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली. तो सुशिक्षित होता, त्याने मानसोपचार तज्ञाची मदत घ्यायचे ठरवले. 

तज्ञाने आधी त्याच्या आजाराचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. बालपणी, तरुणपणी झालेल्या अन्यायामुळे त्याचे मन अतिशय कडवट बनले होते. नेहमी नकारात्मक विचार करून, लोकांबद्दलची द्वेषाची भावना इतकी प्रबळ झाली होती की त्याचे मन अक्षरश: उकळत होते. त्यात भर म्हणून कामाचे टेन्शन होतेच. तिथला राग ही उफाळून येत असे. डाॅक्टरांनी औषधोपचाराबरोबरच त्याचे समुपदेशन सुरू केले. घडलेल्या गोष्टी बदलता येत नाहीत. ज्या लोकांनी आपल्यावर अन्याय केला त्यांना यथावकाश त्याचे फळ मिळेलच पण त्यांचा राग डोक्यात घालून घेवून नुकसान आपलेच होते. मानसिक त्रास फक्त आणि फक्त आपल्यालाच होतो कारण आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. अशा अनेक गोष्टी आणि उपाय सांगून डाॅक्टरांनी त्याला बरे केले. पण मानसिक आजार हे आपल्या मनोवृत्तीवरसुद्धा अवलंबून असतात तेव्हा भविष्यात परत अशी परिस्थिती येवू नये म्हणून काळजी घ्यायला सांगायला ते विसरले नाहीत. 

आता इतक्या वर्षांनी परत निरंजन त्याच वळणावर उभा होता. परत तशीच चिडचिड आदळआपट करत होता. आजचे त्याचे वागणे पाहून त्याला स्वतःलाच शंका आली परत समुपदेशन घ्यायची वेळ तर आली नाही. या विचारानेच त्याला धडकी भरली पण आधी एकदा या फेज मधून गेल्याने त्याला कसं सावरायचं याचा थोडा अनुभव होता. 
सगळ्यात आधी तो बेडरूममध्ये गेला. त्याने मुसमुसणाऱ्या श्रियाला जवळ घेतले तिची समजूत काढून तो उमाकडे वळला. त्याने तिची माफी मागितली कारण त्याने तिला आपल्याला आधी होणाऱ्या त्रासाबद्दल काहीच सांगितले नव्हते. आता तिला त्याबद्दल सांगून त्याला बरे वाटले. दुसरीकडे उमाला इतके दिवस आपल्या नवऱ्याच्या वागणुकीचे गुढ उकलत नव्हते. आता तिला समजले निरंजन कोणत्या मानसिक अवस्थेतून जात होता. तिने त्याला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याचे वचन दिले त्याचबरोबर डाॅक्टरांकडे जाण्यासही पटवून दिले. त्याने ते मान्य केले. 

निरंजनने ठरवले होते या तणावातून स्वतः बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा. आधी त्याने ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो त्या लिहून काढल्या. लिहितालिहिता त्याच्या लक्षात आले यातील बऱ्याच गोष्टी तर अशा आहेत ज्यांच्यावर आपले नियंत्रण नाही किंवा ज्या आपण बदलू शकत नाही जसे उशिरा येणारी बस, लेट असणाऱ्या ट्रेन्स, रविवारी खाली गोंधळ घालणारी मुले, ट्रॅफिक जॅम इत्यादि. मग जर या गोष्टी आपण बदलू शकत नाही तर कशाला त्यांच्याबद्दल उगाच डोक्याला शाॅट लावून घ्यायचा... किती बरं वाटलं त्याला हा विचार मनात येताच. हे त्याने उमाला सांगताच तिने एक कल्पना सुचवली, जेव्हा बस ट्रेन लेट असतात, ट्रॅफिक जॅम असतो तेव्हा तुम्ही आजुबाजुला दिसणाऱ्या व्यक्ती, घटना यांचे निरीक्षण करायचे आणि जमले तर लिहून काढायचे, मनातल्या मनात त्यांच्या जागी स्वतःला ठेवून प्रसंगाची कल्पना करायची. रविवारी खाली खेळणाऱ्या मुलांवर वैतागण्यापेक्षा तुम्हीही त्यांना जाॅईन झालात तर वेळही जाईल आणि व्यायामही होईल. निरंजनला ही कल्पना खूप आवडली. 
आॅफिसमध्ये नुकतीच नवीन भरती झाली होती. हे नवीन लोक कामात खूप चुका करत आणि त्यांचा काम करण्याचा वेगही खूप कमी होता. निरंजन सिनीयर असल्याने या गोष्टींची जबाबदारी त्याच्यावर होती. कधीकधी त्याला याबद्दल बाॅसकडून बोलणी ही ऐकून घ्यावी लागत. बाॅसला उलट उत्तर देता येत नाही, हाताखालच्यांना जास्त बोलता येत नाही अशा कात्रीत तो अडकला होता. या गोष्टीचा त्याला राग येई. घरी येईपर्यन्त त्याचा ज्वालामुखी होई आणि छोट्याशा गोष्टीवरून त्याचा तोल जाई. याबाबत त्याने बाॅससोबत बोलायचे ठरवले. एक  दिवस संधी मिळताच योग्य शब्दात आपली बाजू बाॅससमोर मांडली. त्याच्या या समस्येची त्यांना काहीच कल्पना नव्हती. यावर उपाय म्हणून मॅनेजमेंटने एक अनुभवी सहकारी त्याच्या मदतीला दिला. निरंजनचे काम थोडे हलके झाले. बायकोच्या सल्ल्यानुसार तो समुपदेशनही घेत होताच. आपले छंद जोपासणे, खटकणाऱ्या गोष्टी योग्य शब्दात मांडून आपल्या भावना संबंधीत व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, जास्त ताण आला तर सरळ बघू नंतर असा विचार करणे या गोष्टी त्याला जमायला लागल्या. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आयुष्यात समस्या सगळ्यांना असतात, प्रत्येक समस्येचे उत्तरही असते हा सकारात्मक विचार त्याने मनावर बिंबवला. आई आणि बायकोने प्रत्येक पावलावर आम्ही तुझ्या सोबत आहोत असा विश्वास त्याला दिला. या सर्व गोष्टींचा चांगला परिणाम होवून निरंजन लवकरच नैराश्यातून बाहेर आला. 

नैराश्य, डिप्रेशन यावर सध्या खूप काही बोललं जातंय. अगदी आजच्या पीढीला तणाव झेपत नाही पासून ते माझ्या आईने चार घरी भांडी घासून आम्हाला वाढवलं, ती किती महान, तुम्ही थोडं काही झालं की हातपाय गाळून बसता असे म्हणण्यापर्यंत लोकांची मजल जाते. मुळात हा विषयच इतका अवघड आहे की जो यातून जातो किंवा गेला आहे तोच याचे गांभीर्य समजू शकतो. फुकटचे सल्ले देणारे आणि प्रौढी मिरवणारे त्या व्यक्तीला अजून कमजोर बनवतात. एकच सांगावेसे वाटते, अशा व्यक्ती गरज असते फक्त मी तुझ्यासोबत आहे या दिलाशाची आणि यदाकदाचित तिला व्यक्त व्हावे वाटले तर उत्तम श्रोत्याची. डिप्रेशनवर वेळेत लक्ष दिलं तर तो बरा होवू शकतो. We make it worse by ignoring it and judging the depressed person. So guys love your folks and help them to lead a happy life. 
©️Savita Kirnale