Mar 01, 2024
वैचारिक

दुसरयाला 'सीमोल्लंघन' करू द्यायचं का ?

Read Later
दुसरयाला 'सीमोल्लंघन' करू द्यायचं का ?
बऱ्याच लोकांना 'बाउंड्रीज' या टर्मचा नव्याने आयुष्यात वापरण्यात येणारा अर्थ कदाचित माहित नसावा. 'बाउंड्रीज' म्हणजे सोप्या भाषेत- बाहेरच्या जगाने आणि जवळच्या लोकांनी आपल्याला दिलेल्या वागणुकीला असणारी आपली परवानगी 'व' मर्यादा !
ही टर्म तेव्हा अमलात आणली जाते, जेव्हा एखाद्या मनुष्याच्या चांगुलपणाचा एका सीमेपलीकडे उपभोग घेतला जातो व ज्यामुळे समोरच्याला मदत करताना एक प्रकारे त्याला समोरच्याकडून 'व्हायोलेटेड' (अपमानजनक) वाटते.
स्वतःचा दुसऱ्यांसाठी असणारा चांगुलपणा जेव्हा लोकांच्या विशिष्ट वागणुकीमुळे स्वतःला हानिकारक ठरतो, तेव्हा 'बाउंड्रीस' प्रस्थापित करणं महत्त्वाचं आणि प्राधान्याचं ठरतं.
'बाउंड्रीसची' एक खासियत आहे, त्याला नाण्याप्रमाणे दोन बाजू असतात. एक आपली आणि एक समोरच्याची.
'स्वतःची' बाजू अशी की, 'बाउंड्रीज' ही गोष्ट कटू वाटत असली, आचरणात आणायला अवघड जात असली, तरीही आपल्या मनशांतीसाठी ही गोष्ट करणं महत्त्वाचं आहे, याची तीव्र जाणीव असते. म्हणून कडू औषध जसं न टाळण्याजोगं असतं, तशा आपल्या मनस्वास्थ्यासाठी 'बाउंड्री' पाळाव्या लागतात.
ह्यात 'समोरच्याची' बाजू अशी की, जो व्यक्ती स्वतःच्या सोयीचा विचार न करता, आपल्या करिता नेहमी उपलब्ध असे, तो आता पहिल्यासारख्या आपल्यासाठी 'अवेलेबल' नाही, याचा धक्काही बसतो आणि त्याचा राग घेऊन समोरचा आपल्याला 'स्वार्थी' म्हणून मोकळा होतो.
'बाउंड्रीज' या प्रत्येक व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या असतात.
समोरचा व्यक्ती आपल्याला कशी वागणूक देतो, प्रत्येक वेळी आपण मदतीला हजर राहिलो पण समोरचा व्यक्ती आपल्याला संकटकाळी मदत करतो का व कशी मदत करतो, स्वतःचं काम झाल्यावर समोरचा व्यक्ती आपल्याशी कसे संबंध ठेवतो, अशा अनेक व्यक्तीगत व व्यक्ती सापेक्ष गोष्टींवर 'बाउंड्रीज' अवलंबून असतात.
ही संकल्पना समजण्यासाठी काही उदाहरणे देत आहे.
उदा क्रमांक 1. समोरचा व्यक्ती अतिशय चिडका आहे व रागाच्या भरात व्यक्तिगत पातळीवर येऊन तो बोलत असेल तर त्याच्याशी किती, कधी व काय बोलायचं हा झाला 'कॉमन सेन्स' व त्या व्यक्तीशी त्याच्या वागणुकीबद्दल शांत वातावरणात, त्याची तुमच्याशी असणारी वागणुक तुम्हाला नापसंत आहे, हा सुस्पष्ट संवाद साधणे म्हणजे 'बाउंड्री' प्रस्थापित करणे होय.
उदा क्रमांक 2. एखादा व्यक्ती तुम्हाला सतत कमी लेखत असेल व तुम्ही मनात कुढत असाल किंवा त्या व्यक्तीशी वाद घालत असाल तर ही तुमची 'रिएक्शन' (प्रतिक्रिया) झाली.
या व्यक्तीच्या बोलण्याचा माझ्यावर मी परिणाम होऊ देणार नाही हा ठाम निर्णय म्हणजे 'बाऊंड्री' होय.
उदा क्रमांक 3. एखादा व्यक्ती, तुम्ही त्याची मदत करावी म्हणून अति प्रमाणात गयावया करत असेल व ती करताना तुमची दरवेळी गैरसोय होत असेल आणि ह्या उलट तुम्ही त्याला कधी मदत मागितली तर तो सरळ काढता पाय घेत असेल, तर पुढच्या वेळी समोरच्याला मदत करताना स्वतःची सोय अगोदर पाहणे हा 'स्वार्थीपणा' नाही तर या 'बाउंड्रीज' आहेत.
उदा. क्रमांक 4. तुम्ही समोरच्याशी चांगल्या भावनेने वागत आहात, मदत करत आहात व तो व्यक्ती सतत तुमच्याशी विसंगत, अपमानकारक वागत असेल तर त्या व्यक्तीपासून अंतर ठेवणं ही 'टोकाची वागणूक' नसून, या 'बाउंड्रीज' आहेत.

दसऱ्याला 'सीमोल्लंघन' करायची प्रथा आहे, पण तुम्ही ठरवलेल्या सीमांचं उल्लंघन दुसऱ्यांनी करायचं नाही, ही प्रथा ज्याने त्याने आपापल्या मनात ठरवायला हवी. सोबतच, आपल्या 'सीमा' काय व 'दुसरे' कोण, हे सुद्धा ठरवायला हवं !


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr. Prapti Gune

MBBS Intern

I have profound love for marathi language and for everyone speaks in Marathi. Assal Marathi mulgi at heart.

//