Jan 26, 2022
सामाजिक

शौर्य

Read Later
शौर्य

"श्वेता, आवरलीस का?" मनूने हाक मारली.

"हो. आलेच." असे म्हणत श्वेता तिचे आवरून बाहेर आली आणि पाहते तर काय? मनू पांढरा ड्रेस घालून, डोक्यावर केसरी फेटा आणि हातात भगवा झेंडा घेऊन आली होती. ती जणू झाशीची राणी शोभून दिसत होती. श्वेता सुध्दा अगदी तशीच दिसत होती. दोघी अगदी शूर वीरांगना स्वराज्याच्या शिवबाच्या लेकी दिसत होत्या.

श्वेता आणि मनू या बाल मैत्रिणी होत्या. त्या दोघींची कायम सोबत असायची. कुठेही गेल्या तरी दोघीच जायच्या. पण त्या दोघीही अगदी तडफदार व्यक्तिमत्वाच्या होत्या. त्यांनी कराटे तसेच स्वरक्षणाचे धडे घेतले होते. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी त्या दोघी समर्थ होत्या. कोणतीही परिस्थिती आली तरी त्याला कसे हाताळायचे? हे त्या दोघींना चांगलेच माहीत होते. स्त्री अत्याचार आणि स्त्री वर होणारा अन्याय यासाठी त्या सामाजिक कार्य करत होत्या. स्वराज्याच्या लेकी म्हणून त्या गावभर मिरवत होत्या.

शिक्षण जरी झाले असले तरी समाज सेवा करण्याच्या वेडाने त्यांना झपाटले होते. त्या अगदी वेड्यासारख्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी फिरत होत्या. समाजात सुधारणा व्हायला हवी, स्त्री ताठ मानेने जगायला हवी, तिचे रक्षण व्हायला हवे या तळमळीने त्या दोघी काम करीत होत्या. त्यांच्या या कार्याचे सर्वांनाच कौतुक होते.

स्त्री ही फक्त शोभेची पुतळा नसून वेळप्रसंगी ती दुर्गा आणि काली सुद्धा बनते हे त्या दाखवून देत होत्या. संकटात सापडलेल्या स्त्री ला त्या आवर्जून मदत करायच्या अगदी कोणताही मोबदला न घेता. वेगवेगळे शिबीर, स्त्री शक्तीचे आंदोलन त्या करत होत्या.

आज मोठी रॅली निघणार होती. दोघीही त्यासाठीच आवरून जात होत्या. केसरी फेटा आणि भगवा झेंडा हे मात्र कंपलसरी होते. त्या दोघी गाडी घेऊन रॅली साठी जात होत्या. त्या जात असतानाच एका ठिकाणी त्यांना एका स्त्रीच्या ओरडण्याचा आवाज आला. आवाज आल्यावर लगेच श्वेताने गाडी थांबवली. दोघी गाडीवरून खाली उतरल्या आणि आवाज कोठून येत आहे याचा शोध घेऊ लागल्या. त्या दोघी आवाजाच्या दिशेने वाटचाल करू लागल्या.

तोच फायनली त्या आवाजाच्या ठिकाणी त्या येऊन पोहोचल्या आणि पाहतात तर काय? दोन पुरूष एका स्त्रीला ओढत घेऊन जात होते, ते पाहून मुळातच शूर असलेल्या त्या दोघी रणरागिणीं मध्ये आदीमाया अवतरली आणि त्या दोघींनी बाजूला पडलेल्या काठीने त्या दोघांना मारायला सुरूवात केली. अचानक झालेल्या वारामुळे ते दोघे घाबरून पळून गेले.

त्या दोघींनी त्या बाईला उठवले आणि पिण्यासाठी पाणी दिले. तेव्हा ती बाई त्यांच्या पाया पडू लागली.

"तुमच्या रूपात देवीनेच मला वाचवले." असे ती स्त्री म्हणाली.
तेव्हा श्वेताने भगवा झेंडा हातात घेतला. तर तो सुध्दा ताठ होऊन फडफडत होता. आता ह्या शिवबाच्या लेकी शोभून दिसत होत्या. त्यांनी हसतमुखाने रॅलीमध्ये सहभाग घेतला.

©®प्रियांका अभिनंदन पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..