शोधू कुठे ग भाग ५(अंतिम)

Relation Between Mother And Son

शोधू कुठे ग भाग ५(अंतिम)


अमित घरी पोहोचला तेव्हा सकाळचे सात वाजले होते. अमितने खोल श्वास घेऊन घराची बेल वाजवली. 


"आपल्याला कोण हवंय?" दारात उभ्या असलेल्या स्त्रीने आळस देत विचारले.


"मी अमित, आई आहे का?" अमितने मोठ्या हिंमतीने विचारले.


"आई म्हणजे नेमकं तुम्हाला कोण हवंय?" समोरुन विचारण्यात आलं.


"मी वैशाली व राजेंद्र देशमुखांचा मुलगा आहे, त्या दोघांपैकी घरात कोणी आहे का?" अमितच्या बोलण्यात हतबलता जाणवत होती.


तेवढ्यात घरातून आवाज आला,

"अनू एवढ्या सकाळी सकाळी कोण आलंय ग?" 


अमितला दारात बघून कुणालच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसून येत होते.


"अनू आमच्या दोघांसाठी चहा ठेव. अमित आत ये ना. अनूने तुला ओळखलं नसेल. तू भारतात कधी आलास?" कुणालने विचारले.


अमित घरात येत म्हणाला,

"आत्ताच आलो आहे. घरात बाकीचे कोणीच नाहीयेत का?" 


"नाही सगळेच बाहेर गेलेले आहेत. तू फ्रेश होऊन येतोस का? इतक्या लांबून आला आहेस तर…" कुणाल बोलत असतानाच अमितचे लक्ष भिंतीवर टांगलेल्या आईच्या फोटोकडे गेले. आईच्या फोटोला घातलेला हार बघून तो म्हणाला,


"कुणाल आई?" पुढे त्याला काही बोलताचं येईना.


अमितच्या खांद्यावर हात ठेवून कुणाला म्हणाला,

"सहा महिन्यांपूर्वी आई हे जग सोडून गेली." 


"अरे पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिचे पत्र आले होते ना." अमित भरलेल्या आवाजात बोलत होता.


"अमित स्वतःला सांभाळ. पत्र आईने लिहिलेले होते, पण पोस्ट मी केले होते. आई तसं मला सांगून गेली होती. आईने तुझ्यासाठी अजून एक पत्र ठेवलेले आहे, ते मी आणून देतो." कुणाल पत्र घेण्यासाठी रुममध्ये गेला. 


कुणालने पत्र अमितच्या हातात टेकवले.


"अमित मी गेल्याचं तुला आत्ता कळलं असेल ना. तुला कोणी कळवलं का नाही? हा प्रश्न तुला पडला असेल. मी गेल्याचा निरोप तुला कोणीही द्यायचा नाही, हे मीच त्यांना निक्षून सांगितलं होतं. 


अमित आम्ही सगळे तुझ्यावर रागावलो होतो, पण तुला स्वतः येऊन आमचा राग कधीच घालवावा वाटला नाही का? मी दरवर्षी न चुकता तुला पत्र पाठवायचे, कारण तुला ते पत्र वाचून घरी येण्याची ओढ निर्माण व्हावी म्हणून.


अमित मी तुझी आतुरतेने वाट बघत होते, पण तुला न बघताच मला या जगातून जावं लागतं आहे. आईला कितीही राग आला तरी आपला मुलगा आपल्यापासून दूर व्हावा हे मान्य नसते. 


तुझे बाबा व तुझ्यामध्ये असणाऱ्या मतभेदांमुळे माझं मात्र मरण झालं. चार महिने आधी ओळख झालेली मुलगी तुला माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाची वाटली का? मी मान्य करते की, तुझीही काही बाजू असेल, पण तू ती सांगण्याचा एकदा तरी समोरासमोर येऊन प्रयत्न करायला हवा होता.


असो झालं ते झालं. गेलेले दिवस परत येऊ शकणार नाही आणि आपण काहीच बदलू शकणार नाही. तुला आठवतं असेल की, तू लहान असताना आपण दोघे लपाछपी खेळायचो. बऱ्याचदा तुला मला शोधता आलं नाही, तर तू भोकाड पसरायचा आणि नाईलाजाने बाहेर यावं लागायचं.


चार वर्षांपूर्वी आपल्यात तोच खेळ पुन्हा सुरु झाला होता. तू लपून बसला होता आणि मला इच्छा असतानाही तुला शोधता आलं नाही. आता मी अशा ठिकाणी लपून बसले आहे की, तू कितीही भोकाड पसरलं तरी मी बाहेर येऊ शकणार नाही."


आईचे पत्र वाचल्यावर अमित धाय मोकलून रडला. कुणालने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. अमित रडता रडता एकच म्हणत होता,

"आई मी तुला शोधू कुठे ग."


अमितने कुणालला जेसी व त्याच्या बाळाबद्दल सांगितले. अमितचे वडीलही गावावरुन घरी आले होते. घरातील सगळ्यांनीच अमितला माफ केले होते, पण ज्या घरात आई नाही, त्या घरात अमितला करमत नव्हते. आई असताना आपण का तिला भेटायला आलो नाही? याची खंत त्याला लागून होती. एक महिन्यानंतर अमित अमेरिकेत परत गेला.

समाप्त.

©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all