शोधू कुठे ग भाग ४

Relation Between Mother And Son

शोधू कुठे ग भाग ४


"जेसीला चौथा महिना सुरु असताना तिला ऍनिमिया आहे हे कळलं होतं. जेसीला डॉक्टरांनी पूर्णपणे आराम करायला सांगितला होता. जेसी घरुनचं काम करत होती. मी तिची पुरेपूर काळजी घेत होतो. मला त्यावेळी वाटत होतं की, माझं बाळ बघितल्यावर आई बाबा मला नक्कीच माफ करतील. ते माझ्यावर रागावू शकतील, पण त्या एवढ्याशा जीवावर रागावणार नाही. 


देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. जेसीला सातवा महिना लागल्यावर तिच्या पोटात दुखायला लागले होते, तेव्हा मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. आमचं बाळ जेसीच्या पोटात मृत पावलं होतं, त्यावेळी जेसीला खूप जास्त रक्तस्त्राव झाला होता. जेसी आधीच ऍनेमिक असल्याने तिला खूप त्रास होत होता. 


डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जेसीला वाचवण्यात त्यांना यश आले नव्हते. निशांत त्यावेळी मी खचून गेलो होतो, पूर्णपणे कोलमडलो होतो. मला तेव्हा आईची गरज होती. मी घरी फोन केला होता, आईने माझा आवाज ऐकून फोन कट केला. माझं बोलणं एकदा तिने ऐकून घ्यावं असं वाटत होतं.


मी त्या काळात बऱ्याचदा घरी फोन केला, पण दरवेळी फोन कट व्हायचा. मलाही नंतर राग आला होता. मी फोन करणेच सोडून दिले. माझा पहिल्या कंपनीतील प्रोजेक्ट पूर्ण झाला होता, पण मला घरी परत जाण्याची इच्छा होत नव्हती, मग मी इकडे दुसऱ्या कंपनीत जॉईन झालो." अमितला बोलता बोलता भरुन आले होते.


"सॉरी यार. तू एवढ्या दुःखातून गेला असशील असं मला कधी वाटलंच नव्हतं. अमित तुझ्या घरच्यांना जेसी तुझ्या आयुष्यात नाहीये, हे कळायला हवं. तू लवकरात लवकर तिकीट बुक कर आणि आईला भेटून ये. किती दिवस मनात असं दुःख साठवून ठेवणार आहेस." निशांतने सांगितले.


"हो. आता विचार करण्यात वेळ घालवणार नाही. जास्तीत जास्त काय होईल? मला घरात घेणार नाहीत, माझ्याशी कोणी बोलणार नाही, पण मी प्रयत्नचं केला नाही असंतर होणार नाही ना." अमित म्हणाला.


अमितने लगेच तिकीट बुक केलं. ऑफिस मधील राहिलेलं काम त्याने पूर्ण केलं. एक महिन्याची सुट्टी त्याने घेतली होती.


भारतात येणाऱ्या विमानात बसल्यावर अमितच्या डोक्यात अनेक विचार सुरु होते, 'आई माझ्याशी बोलेल का? मला घरात कोणी येऊ देईल का? पाच वर्षांत सगळं बदललं असेल. घरात काही नवे चेहरे असतील, ते मला ओळखतील का? माझ्यामुळे नातेवाईकांमध्ये बाबांची मान खाली गेली असणार, ते तो राग विसरुन मला माफ करतील का?' 


अमितचं घर पुण्यात होतं. अमित मुंबईच्या विमानतळावर उतरला होता. पुण्याला जाणारी टॅक्सी अमितने आधीच बुक करुन ठेवली होती. टॅक्सीमध्ये बसल्यावर अमितच्या पोटात भीतीने गोळा आला होता.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all