....खिडकीतुन ती बाहेर बघत होती... पश्चिमेला झुकलेल्या सूर्याची लालीमा नभात पसरली होती.. किती मनोहारी दृश्य होते ते... आकाशात पक्ष्यानची घरी परतायची घाई सुरु होती.. निसर्गान आकाशात केलेली रंगाची मुक्त उधळण डोळ्यांना सुखावत होती... अशा प्रसन्न सायंकाळी तिचं मन मात्र थोडं उदास होतं....
...संध्याकाळची वेळ... कातरवेळ म्हणतात... ती हीच असेल का...??
..रात्रही होत आली... तरी श्रीधर चा काहीच पत्ता नव्हता.. खरं तर आजही तो येणार नव्हता, तिलाही माहित होतं... पण तिचं वेड मन.. काय सांगणार त्याला..??
"आss.."
वेदनेने ती विव्हळली. कड बदलताना पाठीला काहीतरी टोचलं तिच्या. कसंतरी हाताने बिछाना साफ केला होता तिने.. पण काहीतरी राहून गेलं असेल. आजूबाजूला पाहिलं.. बेडवर थो
डाफार पसारा होताच..
...आणि तिला आठवलं... किती नीटनेटकी राहायची ती... अंगावरची साडी साधीच पण स्वच्छ असायची.. सारवायचं घर होतं तीचं.. इतकं नेटकं.. अगदी सरळ एका रेशेत सारवायची ती.. बा तर नेहमीच म्हणायचा... अगदी पट्टीने रेषा आखल्यागत घर सारवते माझी चित्रा...
किती अभिमान माझा त्याला... खाटेवरचं अंथरून बघून पण म्हणायचा.. "कशी छान अंथरते माझी चित्रा.. एक छोटीशी घडी सुद्धा विस्कटत नाही हिच्या अंथरूनाची.... "
माझ्या लहान -लहान गोष्टींनी सुद्धा किती आनंदी व्हायचा तो..
बा.. कसला भारी होतास रे तू... पण मला नोकरी का नाही करू दिलीस..?? कदाचित नोकरी केली असती तर... तूझ्या चित्रा चं चित्र आज काहीतरी वेगळंच असतं रे... असं कुणावर अवलंबून तरी नाही राहावं लागलं असतं...
...श्रीधर तर कधी समजूनचं घेत नाही मला.. की कधी समजून घ्यायची गरजच वाटली नसेल का त्याला....??
...की त्याला माझी गरजच नव्हती का कधी...??
...अगदी लग्न केलं तेव्हाही...???
...लग्नाची आठवण झाली तसें आठवले तिला... विसाव संपत आलं तरी बा लग्नाचं नाव काढत नव्हता...तिला तरी कुठे लग्न करायचं होतं...? पण समाजरीत होती ती.. लग्न तर करावेच लागणार होते.. नाही म्हणायला अनेक स्थळ चालून येत होती.. पण कुणाचं शिक्षण कमी.. तर कुणाला नोकरी नाही... काही ना काही कमतरता काढून बा प्रत्येक स्थळ नाकारतच होता.. त्याला त्याच्या चित्रा साठी अजूनही योग्य स्थळ मिळालं नव्हतं...
...अशीच दोन -तिन वर्ष भुर्रकण उडून गेली... रघु आणि सुरेश बाहेर शहरात शिकायला होते. शहरात एक खोली भाड्याने घेऊन ते राहायचे.. सोबत काही मित्रही होते. कॉलेज लाईफ एन्जॉय करणे चालले होते.. मित्रा -मित्रात शेअरिंग -केअरिंग सर्व चालायचे..
अशातच एकदा उन्हाळ्यात रघु गावाला आला.. आपल्या एका मित्राला घेऊन..
"माय ss.."
रघुचा आवाज ऐकून बायजाबाई बाहेर आली. एवढ्या दिवसाने लेकराला बघून तिला भरून आलं. रघु नं तिला मिठी मारली..
मित्रानंही सदाभाऊच्या पायांना स्पर्श केला...
"अरे अरे... असू दे बाळा.. " सदाभाऊ म्हणाले.
"..आणि कोण म्हणायचा तू..? "
त्यांनी प्रश्न केला.
"मी..? मी श्रीधर... !"
मित्र हसून उत्तरला.
"..गुणांचा मुलगा आहेस. खूप मोठा हो.. "
सदाभाऊनी लगेच आशीर्वाद देऊनही दिला...
..तो हसला.. डोळ्याच्या कोपऱ्यातुन बघितलं... चित्रा उभी होती...
...ही चित्राची श्रीधर सोबत झालेली पहिली भेट... ओझरती...
त्यानंतर ही तो वारंवार चकरा मारू लागला.. रघु असतांना... नसतानाही....
आता श्रीधरच्या चकरा वाढतच होत्या. दिवाळी.. उन्हाळा.. सुट्ट्या असल्या की स्वारी आपल्या गावाला जाण्यापूर्वी इकडे आधी यायचिस.
ह्या घरात रूळला तो लवकरच. घरच्यांनाही आता त्याची सवय झाली. परका वाटायचाच नाही तो कुणाला. चित्राच्याही मागे मागे असायचा. ताई ताई करायचा. घरच्यांना काही वाटायचं नाही. पण एका व्यक्तीला हे वागणं मात्र खटकायचे... ती व्यक्ती होती रघु...
आपला मित्र कसा आहे हे रघु ला चांगलेच माहीत होतं....
"...मला लग्न करायचे आहे चित्रासोबत.... तिचा हात देणार का माझ्या हातात...? "
श्रीधर सदाभाऊनां विचारत होता...
सदाभाऊना काय बोलावे कळत नव्हतं..
एवढासा पोरगा... आपल्या लग्नाची बोलणी आपणच करतोय..
पण त्याचा निर्भीडपणा आवडला त्यांना..
नाही म्हणायला काही होतचं नाही त्याच्यात...
लाघवी... बडबडनारा.. सदा हसरा चेहरा.. हुशार... कोणतेही काम करण्यास न लाजणारा.. मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर..
खरंच श्रीधर होताच गुणांची खाण..
बघायलाही सुंदर... गोरापान...
कोण त्याला नाही म्हणणार...?
पण एक होतं. वयाने तो लहान होता चित्रापेक्षा..
"...असं कसं लग्न करणार... नवरदेव कधी लहान असतो का नवऱ्या मुली पेक्षा.. "सदाभाऊनी प्रश्न केला.
"मला काहीच प्रॉब्लेम नाहीय या गोष्टीचा.. घेईन मी सांभाळून.. "
श्रीधर ने आश्वासन दिले.
"..का लग्न करायचे आहे तुला माझ्याशी...? "
तिने विचारलं..
"...संसारीक आहेस... माझ्या घराला सांभाळून नेशील याची खात्री आहे मला... "
तो आत्मविश्वासाने म्हणाला.
"..अरे.. पण मी मोठी आहे तुझ्यापेक्षा.. "
ती म्हणाली.
"..तर काय होते..?? Age doesn\"t matter... तुला माहित आहे. Shakespeare ची बायको पण मोठी होती त्याच्या पेक्षा... त्याला काही फरक नाही पडला... मला काय पडणार... "
इंग्लिश मध्ये बी. ए. सुरु होतं त्याच. दिले मग पुन्हा दोन तीन दाखले...
तीही थोडी इंप्रेस झालीच..
"...तू करशील न लग्न माझ्याशी..?? "
त्यानं पुन्हा विचारलं..
काय बोलावं तिला कळेना..
"बा च्या शब्दाबाहेर नाहीय मी.. "
ती लाजून आत पळाली...
.
.
.
"...पण बा..., घरात गरिबी आहे त्याच्या.. "
रघु सांगत होता..
"..गरिबीच माणसाला समृद्ध बनवते.. परिस्थिती ची जाणीव आहे त्याला.. "
सदाभाऊ म्हणाले..
"शिकतोय तो.. अजून...
नोकरीचा पत्ता नाहीये... कसं द्यायचे आपल्या ताईला त्या घरात.. "
रघु एक -एक आठवून बोलत होता...
"अरे.. मित्र आहे तो तुझा.. तरी ओळखलं नाहीस त्याला... हुशार आहे तो... लाथ मारेल तिथून पाणी काढेल.. अशी धमक आहे त्याच्यात...
आता तो गरीब असेल पण माझं मन सांगतोय मला.. तुझ्या आधी नोकरी ला लागेल तो... तेही चांगल्या पगाराच्या.... "
सदाभाऊ च्या बोलण्यात एक वेगळाच विश्वास होता..
काय बोलणार रघु आता... पण त्याला कुठेतरी वाटायचं चित्रा ने लग्नाला नकार द्यावा...
.
.
.... चित्राच्या नकाराचा प्रश्नच नव्हता...
आज पर्यंत तिने बा च्या एकाही गोष्टीला कधी विरोध केला नव्हता..
बा म्हणेल तीच पूर्व दिशा...
तो कोणाला ओळखन्यात कधी चुकणार नाही याची खात्री होती तिला...
चित्रा आता पंचविशीत प्रवेशली होती... खूप सौंदर्यवती अशी नव्हतीच ती.. पण तिच्या काळ्या -सावळया चेहऱ्यावर एक वेगळे च तेज होते...
सदाभाऊना वाटलं हीच योग्य वेळ आहे लग्नाची...
आणि...
हाच योग्य वर.... !
श्रीधर ची घरची परिस्थिती अगदीच बेताची होती..
कधीकाळी गर्भश्रीमंत असणार त्यांचे घराणे आता गरिबी च्या खाईत लोटले होते... वडिलांचा केव्हाच मृत्यू झाला होता.. बहिणीचे लग्न झाले होते.. आई... तो... आणि एक लहान बहीण... एवढंच त्याच कुटुंब होतं...
सदाभाऊला वाटलं गरिबी काय आज आहे... तर उद्या नाही... पण माणूस महत्वाचा...
माणूस म्हणून श्रीधर त्यांना खूप चांगला वाटला... त्यांनी ठरवलं... आता चित्रा च लग्न होईल तर श्रीधरशीच....
श्रीधर च्या आईला मात्र चित्रा सून म्हणून पसंत नव्हती...
आधीच काळी -सावळी... त्यातही वयान मोठी....
तिला वाटायचं पोराला वेड बीड लावलंय की काय या बयेन....
नाहीतर एवढा माझा हुशार लेक.... का अशा मुलीशी लग्न करेल....??
...लग्नाआधीच तिच्या मनात होणाऱ्या सुनेबद्दल एक अढी निर्माण झाली..
लग्नाला ठाम विरोधच होता तिचा....
...पण श्रीधर च मात्र पक्क होतं... लग्न करेन तर चित्राशीच....
..आणि मग ठरलं...
बैठकीत श्रीधर -चित्राच्या लग्नाची सुपारी फुटली...
..चित्रा च्या अंगाला श्रीधर च्या नावाची हळद लागली...
..लग्न... प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस...
तो एक दिवस... आणि त्यानंतर तीच आयुष्यच बदलून जात.ज्या घरात इतकी वर्ष हक्काने वावरली तेच आता उदयापासून आपल्याला परके होणार या विचारानेच तिला भरून येत होतं..
लग्नाचा आनंद...आणि माहेर सोडण्याच दुःख... दोन्ही भावना एकत्रच अनुभवन्यासाठी खरंच मुलीचाच जन्म घ्यावा लागतो..
तिच्या डोळयांत पुन्हा पुन्हा आसवं दाटत होती...
सदाभाऊनची अवस्था फार वेगळी नव्हती... चित्रा त्यांचा अभिमान होती... आजपर्यंत तिने कधी त्यांच्या नावाला बोल लागू दिले नव्हते. त्यांना नेहमीच वाटायचे ही एवढी हुशार... स्वाभिमानी मुलगी माझा मुलगा असती तर... तिला आपल्या पासून दूर करण्यास त्यांचं काळीज धजावत नव्हतं... पण जनरीतीला धरून चालावे लागते. म्हणून त्यांनी तिच्या लग्नाचा घाट घातला...
..श्रीधर शी जोडलेलं तिचं लग्न.. म्हणजे त्यांनी टाकलेला जुगाराचा एक डावचं होता... श्रीधरची हुशारी... आणि मेहनत करण्याची जिद्द पाहून....
"...शुभ मंगल सावधान.... "भटजीनी मंगलाष्टके म्हटली... श्रीधर -चित्रा ने एकमेकांच्या गळ्यात माला टाकल्या.. सनई चे मंगल स्वर वाजू लागले....
...आणि बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता.... जणू काही तोही आपली उपस्थिती दर्शवित होता ह्या मंगलसोहळयाला...
....का केले असेल श्रीधर ने चित्रा सोबत लग्न... खरंच त्याच प्रेम होतं का तिच्या वर की पुन्हा काही... कळण्यासाठी वाचा पुढील भाग...
----------------------------------------------------------------------------------आवडला का चित्रा च्या लग्नाचा भाग..?? नक्की सांगा.. आवडल्यास share करा. पुढील भाग लवकरच....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा