शोध.. तिच्या अस्तित्वाचा.. भाग -12 अंतिम.. ( बोनस भाग )

ती तुमच्या माझ्या सारखीच एक सर्वसामान्य स्त्री... Pn. लहानपणापासून तर वार्ध्यक्यापर्यन्तचा तिचा प्रवास खरंच सामान्य होता का..? कळण्यासाठी वाचा स्पर्धा कथामालिका.. शोध... तिच्या अस्तित्वाचा..

टिंग.. टॉंग.. 

चित्रामहालाची डोअर बेल वाजत होती.. 

".... आज्जी.. दार उघड गं... मी इशाss  "

"आले गंss... "  दार उघडत ती चित्रा म्हणाली.. 

".. इशू अग आज तर क्लास ला सुट्टी आहे ना??  मग कशी आलीस??  आणि ही गं कोण तूझ्या सोबत आलीय..? "

"... अग्ग आज्जी.. ही माझी फ्रेंड आहे.. नेहा.. माझ्या या क्लासबद्दल तिला सांगितलं तर ती म्हणली की तिला पण लावायचा आहे तर मग मी घेऊन आले.. 

ये नेहा,  आज्जी ला नमस्कार कर गं..  तूला मी घरी सांगितले ना तसं.. "

.... इशू. 

"..अगं बाळा.. असू दे.. तू एकटीच आली का..? "

चित्रा तिला गोंजारत म्हणाली.. 

" नाही.. मम्मी पप्पा पण आलेत हे बघा.. "

तेवढयात तिथे पोहचलेल्या आपल्या पालकांकडे बोट दाखवत  ती म्हणाली. पस्तीस चाळीशीतील एक जोडपं होतं. गोरीशी , नाजूकशी ती.. आणि सावळासा, सुंदर.., चेहऱ्यावर तेज असलेला तो...

ती काही बोलणार तेवढयात तिच्या पायाना स्पर्श करीत तो म्हणाला...

" नमस्कार करतो चित्रा मॅडम... "

"खूप खूप मोठा हो.. "

आपसुकच तिच्या तोंडून निघालं.. त्याच्याकडे तीआश्चर्याने  पाहतच होती.. मग म्हणाली.. 

"... श्री... तू  इकडे कुठे...?? "

"तुमच्या कडेच आलोय.. "  हसत तो म्हणाला.. 

" तुम्ही ओळखता एकमेकांना...?? "

त्याच्या बायकोने विचारलं.. 

"अगं..  ओळखता का म्हणून काय विचारतेस..??  आज मी जे काही आहे ना ते फक्त याच्यामुळे.. "...  चित्रा. 

"काही काय मॅडम.. मी फक्त निमित्तमात्र होतो.. ह्या वयात तुम्ही स्वतः लढायला तयार झालात त्यामुळेच तर सगळं शक्य झालं... "... श्री. 

"एक मिनिट.. मला काही समजेल असं बोलणार आहात  का तुम्ही... "

विनी... त्याची बायको बोलायला लागली तसे दोघे हसले. 

"...या आधी आत तर या... मग बोलूया... "  त्यांना आत घेत ती म्हणाली. 

"...इशू,  नेहाला घेऊन आत जा आणि बरणी मध्ये लाडू आहेत ते घ्या.. आणि खेळा तिकडेच... "  .. चित्रा. 

ओके आज्जी... म्हणत दोघी आत पळाल्या... 

इकडे तिघे गप्पामध्ये बुडाले... 

.

.

.

.

..... दीपक म्हणाला होता, क्षमेसारखं दुसरं अस्त्र नाही...  चित्रा ला ते नव्हतेच पटले पण तरीही  श्रीधर ला एक चान्स द्यायचा असे ठरवले तिने.. तिलाही होती वेडी आशा की कदाचित श्रीधर ला उमगेल त्याची चूक...  एक दीड वर्षाचा काळ लोटला..,  पण ते खोटे ठरले.. त्याचा अहंकार... त्याचा घमंड वाढतच गेला.. आणि त्याच्या विचारात चित्रा पार खंगत गेली... दीपक ने तर आपला निर्णय दिला होता. वडिलांबदल त्याच्या मनात आधीच एक सॉफ्ट कॉर्नर होता.. बाकी उरल्या मुली.. तर त्याही आपापल्या संसारात मग्न होत्या.. मन तर आतून सर्वांचेच दुखत होते पण उपाय सुचत नव्हता.. चित्रा ला वाटलं.. संपलंच आता सगळं.. कदाचित आपल्या कहाणीचा हाच शेवट असावा... 

...पण हरणाऱ्यातली नव्हतीच ती... एकदा असेच बेडवर बसून  ती बाहेर  बघत होती.. अचानक नभ दाटून आले आणि काही कळायच्या आत धो धो पाऊस बरसू लागला. निसर्गाचे असे अचानक बदलते रूप ती न्याहाळत होती... आणि.. तिच्या डोळ्यासमोरून लहानपणापासून तर आत्तापर्यँतची तिचीच सारी रूपं दिसायला लागली.. ती बालपणीची शाळा शिकण्याचा हट्ट करणारी चित्रा.. बा न शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून काकाच्या गावाला पाठवतांना मनातच मूकपणे रडणारी चित्रा... बा ला त्रास होऊ नये म्हणून रोवणी शिकणारी चित्रा.. मॅट्रिक् च्या रिजल्ट नंतर धाय मोकालून रडणारी चित्रा.. इच्छा असूनही केवळ नोकरी करायची नाही म्हणून मनावर दगड ठेऊन कॉलेज न शिकणारी चित्रा.. कपडे शिवतांना सायंकाळी माय सोबत रेडिओ ऐकणारी चित्रा .. लग्नानंतर स्वाभिमानाने संसार करणारी चित्रा....

तिच्या मनात राहणारी चित्रा हार मानणारी नव्हतीच. पण कधी कधी परिस्थितीमुळे तडजोड करणारी होती.. परिस्थितीच भान ठेवणारी होती.. आजपर्यंत स्वतःची मान खाली जाईल असं ती कधी वागली नव्हती..

तिचा पूर्ण जीवनपट डोळ्यासमोरून सरकत होता तसे तिच्या मनातील विचारही स्पष्ट होत होते.. एव्हाना पाऊस थांबला होता.. काळे मेघ जाऊन आकाश एकदम स्वच्छ दिसत होते. कितीतरी दिवसांनी तिच्या डोळ्यावरची काजळी दूर झाली होती.. आता तीची दृष्टी अगदी क्लिअर झाली होती... बेडवरून ती खाली उतरायला गेली,  जरा घाईतच.. "आss " वेदनेची एक लहरपूर्ण शरीरात उठली.. तीने ठरवलं.. आता मागे हटायचे नाही पण जास्त घाई करून चालणार नाही... हळू हळू मनाला समजूत पटली आणि श्रीधर चा  विचार करणे कमी होऊ लागले.. तो असा कसा वागू शकतो यापेक्षा मी यातून बाहेर कशी पडू शकेन हे विचार मनात घोळायला लागले... तिच्या आजारपणा बद्दलही ती असाच विचार करायला लागली... ह्यातून बाहेर पडायचंय... 

मनाला थोडी उभारी यायला लागली ,  तसं शरीरही साथ द्यायला हळूहळू का होईना पण तयार होत होतं.. वजणाने हलकी असणारी साडी नेसून बघण्याचा कार्यक्रम दोन तीन दिवस फेल पडला पण नंतर थोडया वेळासाठी का होईना , साडीचे वजन पेलायला शरीराने तयारी दर्शवली...  हे सगळं घडायला दोन महिन्यांचा कालावधी गेला.  एक दिवस मनानं कौल दिला...  

"चित्रा.. आता ट्रायल करून बघायची वेळ आलीये... "

.

.

"लतिका.. अगं तूझ्याकडे रिक्षावाल्याचा नंबर असेल तर बोलावतेस का जरा.. " 

लतिका ला ती विचारत होती.. चित्राला साडी नेसून बघून लतिका शॉक झाली.. 

" ममा..,  कुठे जायचंय का..??  चल मी सोबत येते.. "

ती म्हणाली. 

" जायचं तर आहे ग पण मी एकटीच जाणार आहे... तू फक्त रिक्षा बोलव.. "     ..... चित्रा. 

"... ममा.. एकटीने कुठे जाणारेस तू ??  मला येऊ दे सोबतीला.. "

....लतिका. 

"... नको अगं.. एकटीने सुरुवात करून तर बघू दे... नाहीच जमलं तर आहेसच की तू.. पण आज मलाच जाऊन बघू दे.  "... चित्रा. 

थोडयावेळाने ती निघाली रिक्षात बसून.. एकटीच.. नव्या प्रवासाला.. 

"..थोडं सावकाश घे रे बाबा.. आता तरुण नाही राहिले मी.. "

रिक्षावाल्याला हसून ती म्हणाली तसा "हो.. " म्हणत तोही हसला. 

..मोठी हिम्मत करून तर ती इथे यायला निघाली होती.. पण रिक्षातुन उतरल्यावर तिथली चहलपहल पाहून चेहऱ्यावर घाम फुटला. 

" शहान्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात.. ते काय उगाच नाही.. " चेहऱ्यावरचा घाम टीपत ती स्वतःशीच म्हणाली. 

एवढा मोठा तो न्यायालया चा आवार बघून ती गोंधळली.. 

"जाऊया का इथून परत... रिक्षावाला असेलच.. " मनातील गडबड चालूच होती... पण हिम्मत करून शरीर तिला पुढे ढकलत होतं. 

"..फॅमिली कोर्ट कुठे आहे..?? " मनाचा हियया करून तीन एकाला विचारलं. त्यानं तिला एकवार वरून खाली आणि खालून वर बघितलं आणि हसून पुढे गेला.. 

होतं नव्हतं अवसान तिचं गळून पडलं... तोंडाला थोडी कोरड सुटली.. तिच्या हाताची पकड सैल झाली आणि हातातील फाईल खाली पडली.. उचलायला ती वाकेल तेवढयात एका तरुणाने उचलून तिला दिली.. सावळाच वर्ण..पण एक तेज होते चेहऱ्यावर... 

" फॅमिली कोर्ट कुठे आहे., सांगाल का मला..? " त्याला तिने विचारलं. 

".. एकट्याच आहात का तुम्ही ..? तिच्याकडे रोखून बघत तो म्हणाला. "हो.. " ती म्हणाली.

, " चला मग माझ्याबरोबर.. मी तिकडेच निघालोय. "    .. तो. 

जाऊ की नको या संभ्रमातच ती त्याच्यासोबत चालू लागली.. 

आत आल्यावर आपल्या डेस्कसमोरच्या चेअरवर तो बसला आणि तिलाही बसायला लावलं.. 

"..हं.. बोला आता.. थांबा थांबा मी पहिले माझी ओळख करून देतो. 

मी ऍडवोकेट श्रीरंग जोशी..  तसं तुम्ही मला श्री म्हणू शकता.  बोला आता,  काय केस आहे..?? "    ... श्री. 

 त्याच्याकडे बघून  ती कसंनुस हसली. नंतर धीर एकवटवून सर्व सांगून टाकलं.. तिच्या तोंडाला कोरड पडल्याच त्याला जाणवलं. त्यानं  पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला. 

" आधी तुम्ही पाणी प्या आणि थोडं रिलॅक्स व्हा.. " तो म्हणाला. 

ती घटाघटा पाणी प्याली. आत्ता कुठे तिला थोडं बरं वाटलं. 

 " मग आता तुम्ही काय ठरवलंय..? "   श्री ने विचारलं. 

"...माझं ठरलंय.. मला घट्स्फ़ोट हवाय... " ती शांतपणे उत्तरली. 

" काय ss.. " जवळ जवळ तो ओरडलाच. आणि नंतर मोठयाने हसायला लागला. 

"...तुम्ही जोक तर करीत नाही आहात ना..?? "

त्याने हसतच विचारलं. 

"  माझ्याकडे बघून मी खरंच जोक करतेय असं वाटतेय का तूम्हाला.. "

ती त्याच शांत स्वरात म्हणाली. तो ही थोडा सिरीयस झाला. 

"  या वयात घटस्फ़ोट घेऊन काय करणार तुम्ही..? "

त्यानं विचारलं.. 

" काही करेन की नाही माहित नाही.. पण किमान समाधानाने शेवटचे डोळे तरी मिटेल.. " ती म्हणाली.. 

 "पण तुमचे मिस्टर का म्हणून घटस्फ़ोट देणार.. "      ... तो. 

" का नाही देणार..? "       ... ती. 

" काही ठोस पुरावा आहे तुमच्या कडे?.. "         ... तो. 

" मी शोधेल.. "       .... ती. 

" ठीक आहे मग.. पुढल्या आठवड्यात या मग.. "    ... तो. 

तशी ती जायला उठली.. 

" अरे तुमची फीस तर मी विचारली नाही... काय फीस आहे तुमची..?  "

"असू दया हो.. नंतर बघूया.. "       ... तो. 

" नाही आता मला कुणाची सहानुभूती नकोय. तुम्ही माझं  काम तुमची फीस घेऊनच करा... "         .... ती. 

" हाडाचा वकील आहे मी... आपला पैसा नाही सोडणार कधीच.. पण यावर नंतर बोलूया.. " तो हसून म्हणाला. 

" धन्यवाद.. " ती म्हणाली.. 

"मोस्ट वेलकम..!  आणि हो.. तुम्ही मला केवळ श्री म्हटलं तरी चालेल.. "      ..... तो. 

" नाही..  मी तुम्हाला वकील साहेबच म्हणणार. " ती म्हणाली. 

" अहो तुमच्या श्रीधर सारखा नाहीये मी..  असं समजा  की तुमच्या श्रीधर पासून मुक्त होण्यासाठी त्या वरच्या श्री हा श्रीरंग तुमच्या पदरात टाकलाय... !"         ... तो हसत म्हणाला. 

" नको, वकील साहेबच ठीक आहे.. ". बोलून ती निघाली. 

" काकू ss,  अहो  काकू ss "  आवाज देत तो पुन्हा तिच्या कडे आला. 

"काकू म्हणून माझ्याशी कसलंच नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका.. 

आता कोणतंच दुसरं नातं निभवायची ताकद नाहीये माझ्यात.. "

ती आपल्याच नादात बोलली. 

"हं ss..?  " त्याला काही कळलंच नाही. 

" काही नाही. मला काकू न म्हणताही तुम्ही माझ्याशी बोलू शकता.. !" ती म्हणाली. 

" असं आहे होय. आलं लक्षात...

चित्रा मॅडम., एक सजेशन आहे...  आज बाहेर पडलाच आहात तर एक नवी साडी घ्या... म्हणजे अंगावरची साडी छानच आहे.. पण घ्याच एक.. " बोलता बोलता त्यानंच दुकानाचे नावही  सुचवले.. 

...घरी जायला ती रिक्षात बसली खरी , पण तिच्या कानात श्री चे शब्द फिरत होते... तिने विचार केला..  "खरंच घ्यायची का एक साडी..?? "

ते दुकान शहराच्या मध्यभागी गजबजलेल्या ठिकाणी होते. तिने रिक्षा तिकडे वळवायला सांगितले..

दुकानात तर ती गेली खरी.. पण तिथल्या झगमगाटात तिला बुजल्या सारखं वाटलं..   थोडी बावरलीच ती.

"  काय दाखवू?? "

दुकानातल्या मुलीच्या आवाजाने ती भानावर आली.. तिने आठवून बघितलं.. तिच्या आवडीची शेवटची साडी केव्हा घेतली??  आणि तिच्या डोळ्यासमोर ती बा न आणलेली जांभळया बारीक फुलांची पांढरी साडी उभी राहिली.. 

" काय दाखवू..?? " त्या मुलीनं पुन्हा विचारलं. तशी ती दचकली.. 

" जांभळया बारीक फुलांची पांढरी sadi..."

तिच्या तोंडून पटकन बाहेर पडलं.. ती मुलगी काहीशी विचित्र नजरेने पाहू लागली तशी ती ओशाळली..

अर्ध्या एक तासाने तिच्या आवडतील अशा दोन साड्या घेतल्या. 

"वाटलं तेवढंही अवघड नाहीये हे काम.. "

 हसतच ती  स्वतःशी म्हणाली. मनोमन श्रीला धन्यवादही  दिले.. 

.

.

."ममा तू साडी घ्यायला गेली होती?? "   लतिका तीला आश्चर्याने विचारत होती..  

" हो..  आवडल्या तूला..???"      ... ती.. 

"  हो , छानचं आहेत पण तू एकटीने जाऊन घेतल्या हे जास्त आवडलं.. " लतिका म्हणाली...

 तीही हसली.. जराशी.. 

.

.

.

"... हे बघा.. हे पुरावा म्हणून उपयोगी पडतील ना आपल्याला..? "

ती श्री शी बोलत होती.. 

"एक्सलेन्ट जॉब..  !  चित्रा मॅडम आता तुमच्या श्रीधर ला कोणीही वाचवू नाही शकणार.. तुम्ही जिंकला च म्हणून समजा... "

तो आनंदाने म्हणाला. 

"  हरण्या जिंकण्याचा खेळ नाही खेळायचा मला.    मला फक्त मोकळे व्हायचंय.. "   ... ती म्हणाली. 

"आणखी.. " त्यानं विचारलं. 

"  तो माणूस मला माझ्या डोळ्यासमोरही नको.. " ती म्हणाली. 

" ठरलं तर  डिवोर्स पेपरवर सही घेण्यापूर्वी  चित्रागण.. तुमचं घर तुमच्या नावाने करून मागा.. 

आणि पोटगी म्हणून महिन्याची एक घसघशीत रक्कम मागा. "    

...  श्री. 

" मला त्याची भीक नकोय... मुलं आहेत सांभाळतील मला.. "

   ... ती म्हणाली. 

"  भीक नाहीये ही. आयुष्याची एवढी वर्ष तुम्ही स्वतःच अस्तित्व विसरून त्याच्यासाठी वाया घालवलीत त्याची नुकसानभरपायी समजा. हवं तर तो  पैसा तुम्ही खर्च करू नका एखाद्या अनाथाश्रमाला दान देत जा.. पण पोटगी घ्या..

आपल्या जवळ असणारा  हा पुरावा  हुकूमाचा एक्का आहे.. त्याला असंच चालवा. "

तो काकूळतिने म्हणाला..   तिलाही त्याच म्हणणं पटलं. 

"  श्री...  हुशार आहेस तू.. "  ती म्हणाली. 

 तो हसला.. म्हणाला..,  "चित्रा मॅडम .. श्री म्हटलंत बरं  तुम्ही मला.. "

" हो रे.. आणि तुही मला काकू म्हणू शकतोस हं.. " ती म्हणाली. 

"काकू एक रिक्वेस्ट होती.. ... तो. 

"कसली रे..?? " .. चित्रा. 

" आलिया भट्ट माहितीये..?? "

तिने नकारार्थी मान हालवली.. 

 "  घरी गेल्यावर पार्थला तुमच्या नाताला मोबाईल वर हे गाणं ऐकवायला लावाल..

लव्ह यू जिंदगी.. 

लव्ह मी जिंदगी..... ! "

" नक्कीच... !"       .... ती म्हणाली. 

.

.

.

...चित्रा, विनी आणि श्री हसत होते.. 

"  अशी ओळख आहे तर तुमची.. "

विनी हसत म्हणाली.. 

" हो न..  काकूनां पहिल्यांदा पाहिलं आणि मला माझ्या आईची आठवण आली. ती ही अशीच होती.. काळी सावळी.. भोळी..  मग तेव्हाच मनात ठरवलं काही झालं तरी यांची साथ सोडायची नाही.. यांना न्याय मिळवूनच दयायचा.. 

पण खरी लढाई तर त्या लढल्यात आणि जिंकल्याही... " 

तो भावनिक झाला. 

"पप्पा झाली का इथल्या क्लास मध्ये माझी ऍडमिशन..?? "

नेहा आणि इशू खेळून परतल्या होत्या... 

"... हो जायचं मग..?? " त्यानं विचारलं. 

"  हो.. बाय बाय आज्जी.. "  नेहा म्हणाली. 

"थांब गं विनी.. पहिल्यांदाच आलीयेस.. कुंकू लावते.. "   असं म्हणत तिने कुंकू लावलं.. 

.

.

.   ..... श्रीरंग,  विनी , नेहा  केव्हाच निघून गेले... 

तिच्या ओठावर मात्र तेच  गाणं रेंगाळत होते... 

लव्ह यू जिंदगी... 

      लव्ह मी जिंदगी...... !!

                                                           समाप्त... 

कथेचा शेवट वाचायला वाचा भाग -12 अंतिम.. 

****************************************************

   .... खरं तर कथेचा अंतिम भाग कालच आला.. पण अनेकांना वाटलं की कथा आणखी मोठी होऊ शकली असती.. आणि personally मलाही तसेच वाटत होते.. म्हणून कालच्या भागाचा आज एक बोनस भाग लिहिलाय.. आता मलाही वाटतय की कथा पूर्ण झालीय.. 


🎭 Series Post

View all