Feb 25, 2024
स्पर्धा

शोध... तिच्या अस्तित्वाचा... भाग -8

Read Later
शोध... तिच्या अस्तित्वाचा... भाग -8

.... लतिका आता मोठी होत होती.... तिच्या बाललीलांनी  घरामध्ये एक वेगळेच चैत्यन निर्माण होत होते.. सावळीच होती ती...  पण चुनचुनित होती.. दीपक मात्र जरासा किरकिर करायचा.. चित्रा चा संसार आताही एकाच खोलीत सुरु होता... श्रीधर चे ऑफिस... देविका, तिची नणंद.. तिची शाळा... दिवसभराची काम.... आणि त्यात लहान दोन मुले...  दिवस कसा निघून जाई तिलाही कळायचं नाही.. सगळीच दगदग व्हायची तिची... पण तरीही एक रुटीन आयुष्य सुरु झालं होतं. अगदीच आनंददायी नाही पण तिचा संसार आता बरा चालला होता... 

... श्रीधरचे ऑफिस चे कामही बऱ्या पैकी सुरु होते. आधीच होतकरू... त्यात नवीन शिकण्याची आवड... त्यामुळे लवकरच तो बॉस चा आवडता बनला... नोकरीला लागून बघता -बघता दोन वर्ष संपत आली.. आणि एक दिवस ऑफिस मध्ये मोठाच प्रॉब्लेम झाला.. ऑफिसच्या एवढया वर्षात कधी नव्हे पण ह्या वेळेस पैशांचा मोठा घोळ झाला.. नेमके तेच डिपार्टमेंट श्रीधरच्या हाताखाली होते.. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या... खरं तर त्याची काहीच चूक नव्हती त्यात.. त्याची हुशारी... त्याचा होतकरूपणाच त्याला नडला... ह्या वर्षीची प्रमोशन लिस्ट डिक्लिअर झाली होती.. आणि बॉसने त्याच्या नावाची घोषणा केली होती... त्याच्या सहकाऱ्याना तेच खटकलं.. एवढ्या कमी कालावधीत एकदम प्रमोशन.... त्याच्याही नकळत.. अगदी अलगद त्याला त्यांनी जाळ्यात अडकवलं..

....प्रमोशन च्या घोषनेमुळे घरात आनंदी -आनंद होता.. देविका.. चित्रा.. दोघीन साठी त्यानं कपडे आणले आणि मुलांसाठी खाऊ.... तो दिवस खूप छान गेला होता सर्वांचा.. आईलाही पत्र लिहून कळवले होते... आणि अचानक ह्या घोळामुळे सगळ्या आनंदावर विरजण पडले.. बॉस ने त्याला आत बोलावलं आणि तडकाफडकी निलंबीत केल्याच सांगितलं.. कंपनीच्या रेपुटेशन पुढे त्यांना त्यांचे एम्प्लॉयी तेवढे महत्वाचे नव्हते... 

...त्याच्या डोळ्यसमोर अंधार दाटला...  स्वतः ची बाजू मांडण्याची संधीही त्याला मिळाली नाही... सुखी संसाराचं स्वप्न एवढयातच विरलं... आत्ता कुठे शून्यातून पुढे सुरुवात झाली होती आयुष्याची... पुन्हा आयुष्य शून्यावर येऊन ठेपलं... 

..आपली कच्ची बच्ची.. चित्रा... देविका... सर्वांना घेऊन पुन्हा गावची वाट धरली.. 

...गावात मन रमत नव्हतं आता.. खिशात जोवर पैसे होते तोवर ठीक चाललं होतं... पैसे संपले तशी घरात चनचन भासू लागली... गावात शेतीची कामे संपली होती... त्यामुळे गावातही कुठे काम मिळेना.. एक -दोन ठिकाणी मुलाखतिला जाऊन आला.. पण तिथेही नकारच मिळाला..

..आता आईही जरा तूसडेपणाने वागू लागली होती...

देविका.. ती आता मोठी होत होती... आपल्याच कोशात वावरायची ती... 

आई - बहीण.. बायको.. दोन लहान लहान लेकरं ... सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती.. काय करावं त्याला कळेना... 

...हळूहळू नैराश्याच्या गरतेत तो जाऊ लागला...

चित्रा ला त्याची अवस्था बघावत नव्हती... ती त्याला धीर देई... ह्या वेळेस आता तिच त्याचा आधार होती...

.... सगळी सोंग आणता येतात.. पण पैशाचं सोंग मात्र नाही आणता येत.. हे चित्रा ला जाणवत होतं.. 

...मनात काहीतरी विचार करून श्रीधरसह लेकरांना घेऊन ती माहेरी गेली...

बऱ्याच दिवसांनी ती आली होती... आगत - स्वागत यथासांग पार पडलं.. इथल्या वातावरनात श्रीधर देखील थोडा खुलंला.. मोकळा वागू लागला.. चित्राला हेच हवं होतं..

...दहा - बारा दिवसांनी घरी परतायची ती तयारी करू लागली....

"...जावई बापू.. चित्रा... थांबा काही दिवस इकडेच.. नवी नोकरी मिळेपर्यंत... "

सदाभाऊ म्हणाले... श्रीधर ची अवस्था जाणली होती त्यांनी..

"..नाही बा... दहा - बारा दिवसांचं माहेरपण पुरे झाले आता... "

चित्रा म्हणाली..

"..अगं.. जावयांची अवस्था बघतेस न... थांबा काही दिवस.. तुम्ही काही जड  नाही होणार मला.. "

ते पुन्हा म्हणाले.. 

" .. नाही रे बा... एवढे दिवस बास झाले आता... दोन -चार दिवसांच माहेरपण... जास्त दिवस राहिले तर लोक तुलाच म्हणतील... सदाभाऊ च्या पोरीला आपल्या संसाराची घडीही नाही बसवता आली... 

आणि माझ्यामुळे तूला कुणी बोल लावलेल चालणार नाही मला... "

ती निर्धाराने म्हणाली.. 

सदाभाऊ ह्यावर काही बोलू शकले नाही.. त्यांना वाटलं माझी चित्रा परिपक्व झाली आहे आता.. 

"..बा... तुझी काही हरकत नसेल तर एक विचारू...? "

थोडयावेळाने तिनेच प्रश्न केला.. 

"..काय..? "

प्रश्नार्थक मुद्रा करून त्यांनी विचारलं... 

"...बा.. माझी मशीन घेऊन जाऊ का मी..?? .. तशीही ती इथे धूळ खात पडलीये... 

शिलाईचे काम सुरु करीन म्हणते... "

ती बोलून गेली. 

"...अगं,.. असं काय विचारतेस..?  तुझीच मशीन आहे ती... जा घेऊन.. "

त्यांनी होकार दिला... 

...दुसऱ्यांच दिवशी श्रीधर चित्रा मुलांना घेऊन गावी परतले... सोबत मशीन घेऊन... 

...आता जवळपास वर्ष होत आलं होतं... चित्रा चे शिवन काम सुरु झाले होते.. आजपर्यंत गावाने पुरुष शिंपी पाहिला होता... पण कपडे शिवनारी चित्रा गावातील पाहिलीच महिला होती.. तिच्या कडे बऱ्यापैकी कपडे शिवायला येत होते.. कुणाचे झपंर... कुणाचे झबले... कुणाचा परकर... तर कुणाच्या लेकराची लंगोट... सगळ्यांना  ती वेळेवर शिवून द्यायची... श्रीधर ही कधी कधी काच बटन करण्यास मदत करायचा...  दोन पैसे मागे पडू लागले होते... सासूबाईच्या वागण्यात थोडी नरमाई जाणवत होती... 

...बा ने तिला व्यावसाईक शिक्षण घ्यायला लावले... त्याचा आता फायदा होत होता... 

श्रीधर च्या नोकरीचा अजून काही पत्ता नव्हता.. देविका ची दहावी झाली... तिला कॉलेज ला ऍडमिशन घ्यायची होती.. पुन्हा पैशाचा प्रॉब्लेम सुरु झाला पण ह्या वेळेस मात्र चित्रा खंबीर होती... तिने श्रीधर ला उच्च शिक्षनासाठी बाहेर पाठवले... देविका ला D. ed. ला पाठवले... 

देविका ची चिडचिड होत होती.. तीला कॉलेज करायचे होते.. वहिनीमुळे कॉलेज करता येत नाहीये याचा राग मनात होता.. 

नवरा बाहेर गावी शिकायला... घरी सासूबाई आणि देविका ची चिडचिड... शिवनकाम.. शेतीचे काम.... आणि पदरात पुन्हा तिसरं लेकरू....  जीव मेटाकुटिला यायचा तीचा...  लहानच्या जिवाला दुध पाजायला पण वेळ मिळायचा नाही कधी कधी... 

पायात पाळण्याची दोरी.... आणि हातात शिलाई मशीन.... 

...ह्याच काळात एक घटना घडली... रघु ने लग्न केले.. प्रेम विवाह.. 

सदाभाऊना ही गोष्ट रुचली नाही.. त्यांचा लग्नाला कडकडून विरोध होता... कारण मुलगी जेमतेम शिकली होती.. रघुने वडीलांचा रोष पत्करून लग्न केले... स्वाभिमानी सदाभाऊनचा स्वाभिमान दुखावला...  रघुने त्यांच्या दुखऱ्या नसेवर पाय दिला होता...  त्यांनी त्याला संपत्तीतुन बेदखल केले... 

पोटुशी असणाऱ्या एका वेडसर महिलेसोबत त्यांनीही विवाह केला.. 

खूप मोठा धक्का होता हा सर्वाना.... 

त्यांच्या या कृतीने रघु नाही पण इतरांना चांगलाच त्रास झाला.. लहान सुरेश... कॉलेजला होता... खूप हुशार... पण भाऊ आणि वडीलांचया कृत्याने  त्याने शिक्षण सोडून दिले...

..बायजाबाई.... ती तर पार कोलमडूनच पडली.. लग्न करून आल्यापासून तिने कधीच सदाभाऊ ला अंतर दिले नाही . त्यांच्या प्रत्येक निर्णयात तिचा होकार होता. कधीच मान वर करून तिने त्यांना जाब विचारले नाही.. आणि आता अचानक त्यांच्या ह्या वागण्याने तिच्या आयुष्याचे चक्रच  उलटे फिरायला लागले... कधीकाळी तिच्या आईने तिला सांगितलं होत... ". बायजे... नवरा म्हणजे उशीखालचा साप असतो... कधी डंक मारेल... नेम नाही... "

बायजाबाई चा पक्का विश्वास होता सदाभाऊ वर... पण त्यांनी खरंच डंक मारला तिला.... 

चित्रा... पार खचून गेली होती ती... सदाभाऊ तिचाअभिमान होते...  आदर्श होते.... आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात त्यांनी तीला साथ  दिली होती.... पण त्यांच्या या निर्णयाने तिच्या पायाखालची जमीन सरकली... कधीकाळी  आपल्या जीवापेक्षा जास्त  प्रेम करणाऱ्या बा शी तिने बोलणे टाकून दिले....

हृदयाच्या कप्प्यात न भरनारी जखम घर करून राहू राहिली... आयुष्यभर पुढे.... ठसठसत राहिली.... 


कधी काळी अतिशय स्वच्छ राहनारी  ती... आता स्वतः कडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळायचा नाही... 

..हाही काळ संपेल...  ती स्वतःचीच समजूत घालायची... 

...दोन वर्ष असेच निघून गेले... 

श्रीधरचे शिक्षण पूर्ण झाले... देविका चे ही d.ed कंप्लिट झाले.. 

काही दिवसांनी  श्रीधर ला नवी नोकरी लागली.... देविका ला पण शाळेतून ऑफर आली... 

आता पुन्हा जीवनात आनंदाचे दिवस येणार होते... 

...देविका चे लग्न झाले.. तिला आवडणाऱ्या मुलासोबतच... लग्नानंतर ती आई ला सोबत घेऊन गेली...  आपल्या मदतीला.... 

चित्रा आणि श्रीधर.. मुलांना घेऊन गावालाच राहात होते.. त्याची नोकरी सुरु होती... बहिणीच्या लग्नाचे कर्ज झाले होते डोक्यावर.. 

हळूहळू इतर दुसऱ्या गोष्टी साठी कर्ज घेणे सुरु झाले... कधी शेती साठी..... कधी मुलांच्या शिक्षणासाठी.... 


...मुलं आता मोठी झाली.. त्यांचा शिक्षणाचा खर्च वाढला होता.. नोकरी चे पैसे पुरेनासे झाले... कर्जाचा डोंगर वाढतच गेला... 

चित्रा ही मदतीसाठी इतर कामे करू लागली.. कधी आपल्या शेतावर.. 

तर कधी दुसऱ्याच्या... 

अनेक व्याधीनीं तिला ग्रासले होते.. पण स्वतः कडे लक्ष द्यायला कधी वेळ च तीला मिळाला नाही... श्रीधर ने तर तिचा कधी विचारच केला नाही... आपली नोकरी... आणि दिवसेनदिवस वाढनारी त्याची शेती.. आणि त्या सोबत वाढणारे कर्ज.. घरात वसुली करायला येणारे सावकारा ची माणसं... स्वाभिमानी चित्रा हळूहळू कमकुवत होत होती...

तरीही मन म्हणत होते.... हे ही दिवस लवकरच पलटतील...  

....थकलेली बायजाबाई आता आजारी राहू लागली... चित्रा तिला आपल्या घरी घेऊन आली... त्यातच बायजा बाई ला स्मृतीभ्रमाचा आजार जडला... क्षणभरापूर्वी काय घडले तिला आठवायचे नाही.. भ्रमीश्टा सारखी काहीही बडबडत राहायची... श्रीधर तिला रागे भरायचा... शेवटी सुरेश तिला घेऊन गेला... काही दिवसांनी मायच्या मृत्यू चीच बातमी आली... चित्रा आतून खचून गेली.. 

तिचे माहेर आता पोरके झाले होते... 

...मुलांचे शिक्षण  आटोपत आली... एव्हाना लतिका चे लग्न झाले... 

दीपक इंजिनियर झाला... मोठया शहरात तो आता कामाला लागला.. शिकत असतानाच वर्गातील मुलगी आवडत होती त्याला.... कालांतराने त्याचेही लग्न झाले .. 

डोक्यावरच एक - एक ओझे उतरू लागले होते आता... 

हळूहळू कर्जाचा डोंगर ही कमी होत होता... चित्रा  ला वाटलं  उशिरा का होईना.... हळूहळू सुख येतेय माझ्या दारात.... 


खरंच सुख आले होते का तिच्या दारात..... की नेहमीप्रमाणेच आताही हूलकावनी देईल..... 

        *******************************************

पुढील भाग लवकरच... तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की सांगा... 

.

.

...ही कथामालिका फ्री असल्यामुळे subscription ची गरज नाहीय.... 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//