मागील भागात आपण वाचलीत चित्रा आणि श्रीधर च्या लग्नाची गोष्ट.. आता पुढे.....
.... आज चित्राची धाकटी लेक नितु घरी आली होती. सोबत तिचं कन्यारत्न ही होतं... सारखं ते लहान लेकरु तिच्या मागे -मागे करत होतं. हे दे -ते दे.. नितु ही आता कंटाळली... त्यातच लेकीनं एकचं धोशा लावला... तुझ्या हातानेच जेवण चारून दे... आता नीतू चांगलीच चिडली...
"एवढी मोठी झालीस ना गं तू... मग जेव णा आपल्या हाताने.. केव्हा शिकणार.. "चिडून ती म्हणाली.
"...माझी ममूडि...प्लीssज दे ना गं चारून.. "
आपले दोन्ही हात नीतूच्या गळ्यात गुंफुन तोंडाचा चंबू करून ती पाच वर्षाची चिमूरडि बोलली तस नीतू चा राग कुठल्या कुठे पळाला.
"... झाला बरं का मस्का लावून.. ये चारून देते.. "
हसत तिचा मुका घेत म्हणाली...
हसत -खेळत त्या चिमणी चे जेवण चालू झाले. तिच्या गप्पा गोष्टीत आता नीतूही रमून गेली....
.... माय लेकीचा हा आनंद-सोहळा चित्रा लेटून बघत होती...
काही वेळाने लेक निघून गेली.. चित्रा च्या मनात आलं, ... हेच तर ते दिवस असतात जेव्हा मुलं आईच्या मागे मागे असतात. एकदा का मुलं मोठी झाली...त्यांना पंख फुटली... की मग उडून जातात आपापल्या दिशेने...
लहान मुलांसोबत किती छोट्या छोट्या गोष्टीमधेही आनंद मिळतो.. ती मनात म्हणाली...
...हळूच तिने आपल्या मनातील आठवणीचे गाठोडं उघडलं...
...आपल्या लहान मुलांना असंच हसत खेळत, गप्पा-गोष्टी करत चारून दिल्याचा आनंद त्या गाठोडयात ती शोधू लागली... पण ह्या आठवणी चा कप्पा मात्र रिकामा होता तिच्या गाठोडयातला.. तसा आनंद अनुभवाला कधी वेळ चं मिळाला नाही तिला...
... आनंदाचे क्षण आठवायचे म्हटले की तिला लग्नापूर्वीच्याच आठवणी आठवतात.. लग्नानंतर आनंदाचे क्षण आलेच नाही का तिच्या जीवनात..??
लग्नानंतर आयुष्यात तिच्या संघर्षच आला... त्या संघर्षात तिने आनंदच मानला.. स्वतः चं अस्तित्व विसरून आयुष्याची लढाई लढली ती... आपल्या संसारासाठी..
पण कुठाय तिचा संसार...??
...आणि...
...कुठे आहे तिचा श्रीधर...???
...तिला आठवला तिचा श्रीधर... आणि त्याच्यासोबत झालेला तिचा गृहप्रवेश...
...तिचे लग्न भर पावसात लागले... पाठवनीची वेळ झाली.. पाऊस अजूनही सूरूच होता.. सगळ्यांचे डोळे पानावले होते... भरल्या डोळ्यांनी ती कुणालातरी शोधत होती.. रघु.. तो नव्हताच तिथे.. बहिणीचं पुढील आयुष्य किती खडतर आहे हे माहिती होतं त्याला. घराच्या मागे जाऊन तो रडत होता...
सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन ती निघाली...मायची गळाभेट घेऊन... बा च्या डोळ्यातील अश्रू पुसून... कन्या सासुरासी जाये, मागे पलटून पाहे.. अशीच अवस्था झाली होती.. आता हे तिचं घर तिला परकं होणार होतं..
सासरी पोहचे पर्यंत रात्र झाली होती... पावसाचा जोर कमी झाला होता.. पूर्ण गावातून लग्नाची मिरवणूक काढली आणि मग वरात घरी आली...
....मापं ओलांडून तिने आत प्रवेश केला.. दिव्याच्या मिनमिन त्या प्रकाशात तिचं स्वागत झालं...
...लग्न घर ते... पण लग्नाचा फारसा आनंद दिसलास नाही तिथे...
थकली होती ती... त्या गजबजेत फारसं लक्षात नाही आलं तिच्या...
दुसऱ्या दिवसापासून सुरु झाला तिचा संसार..
तीन लहान खोल्याच्या घरात... राकेलच्या दिव्याच्या मिनमिनत्या उजेडात...
पण..
ज्या संसाराची स्वप्न कधी तिने बघितली असतील तसा नव्हता तो...
माहेरची गर्भश्रीमंत नव्हतीच ती... पण एक समृद्धी होती माहेरी..
धान्याच्या राशी बघितल्या होत्या घरात तिने...
पण.. इथे तस काहीच नव्हतं. तिने तशी अपेक्षाही केली नव्हती...
इथे गरिबी आ वासून समोर होती तिच्या..
गरिबीतच संसार करायचाय ... माहिती होतं तिला... पण एवढी गरिबी असेल... वाटलं नव्हतं...
मनात आलं... का रे बा येवढया गरिबीत दिली मला... एवढी का मी जड झाले होते...
...डोळ्यांसमोर आठवला मग रघु... श्रीधर शी लग्न नको व्हायला म्हणून धडपडनारा...
.... डोळ्यांपुढे उभा राहिला तेव्हाच बा.... श्रीधर च्या हातात धमक आहे हे सांगणारा....
तिने ठरवलं...
जे आहे ते स्वीकारायाचं... नवऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून आपणही उभी राहायचं... कुणासमोर हात पसरायचे नाही...
अगदी बा समोर ही...
तिच्या या स्वाभिमानी वृत्तीचा कस लागला पुढल्या दोनच महिन्यानंतर..
...गावात सगळीकडे शेतात भाताची रोवनी सुरु झाली होती... संपतही आली होती..
एकच शेत होत ज्यामध्ये ही कामं सुरूच व्हायची होती.. ते शेत होतं श्रीधर चे.
एक -दीड एकर जमिनीचा तुकडा तो... पण तेवढयाही भागाची रोवनी करायला त्यांच्या कडे पैसे नव्हते...
उभे रोप वाया गेले असते.. पण चित्रा ला तसे होऊ द्यायचे नव्हते..
.... एवढे दिवस रोप उभे होतेच.. पुन्हा आठ दिवस...
तिने एक निश्चय केला... श्रीधर ला घेऊन ती माहेरी आली..
सदाभाऊना सांगितलं.. त्यांच्याकडेही रोवनी सुरूच होती. सदाभाऊनी तिला पैशानची मदत देऊ केली...
"...पैसे तर हवेतच बा मला.. पण असे नकोत.. "
चित्रा म्हणाली.
"...म्हणजे... "
तिचा बोलण्याचा रोख त्यांना कळला नाही.
"..बा.. मला माझ्या हक्काचे पैसे हवेत.. "
ती म्हणाली..
...लग्नाच्या दोन च महिन्यात पोरगी हक्काची भाषा बोलतेय... !
"..हक्क...??... लग्न मानवलं बरं का चित्रा... तूला "
न समजून ते म्हणाले.
"..मला काय म्हणायचे ते तूला कळलं नाही बा...
तूला आठवते.??. .. काकाच्या गावाला राहत असतांना रोवने शिकले होते मी...
आता तुझ्याकडे रोवनीच सुरु आहे तर आठ दिवस मलाही येऊ दे मजुरीला..
मग माझी मजुरी... माझे हक्काचे पैसे मला दे... "
सदाभाऊ तिच्याकडे बघतच राहिले...
एवढं शहाणपण कुठून आलं हिच्यात..
ते एकटक तिच्याकडे बघत होते ते पाहून ती म्हणाली..
"..काय बघतोस बा..?
...अरे तुझीच मुलगी आहे मी... तुझ्याकडूनच शिकलेय सर्व.. "
त्यांना तिचा पुन्हा एकदा अभिमान वाटला...
पुन्हा एकदा वाटलं... ही माझा मुलगा असती तर...
....वडिलांडेचं मजुरी केली तिने... श्रीधर ही तिथे नांगर चालवायला शिकला...
...त्याच पैशानीं आपल्या शेतातील रोवनी केली....
....स्वाभिमानाने..... !
"..हेही दिवस जातील... लवकरच चांगले दिवस येतील... "
बा न धीर दिला..
तीही चांगल्या दिवसांची वाट पाहू लागली..
...संसारात रमु लागली ती आता.. घरातील कामे.. सासूबाईनची सेवा... लहानग्या नणंदेची शाळेची तयारी.. अभ्यासात मदत.. तिला चारून देणे... ह्यातच वेळ जायचा.. नणंद तिला लहान बहीणच वाटायची... नव्हे ती तिला तिची मुलगीच वाटायची...
...लग्नाला एक -दीड वर्ष होत आलेला... अजून तिची पाळी चुकली नव्हती.. सासूबाईच्या मनात तिच्या बद्दल एक अढी सुरवातीपासून होतीच... पुन्हा त्यांना बोलायला चान्स मिळू लागला.
"...वयानी एवढी मोठी... लग्नाला दीड वर्ष होत आलं.. अजून पाळणा हलला नाही.. नक्कीच हिच्यात दोष आहे.. "
त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू राहायचा..
..तिलाही आता बाळाची आस लागली होती...
पण सासूबाईच्या बोलण्यामुळे तिलाही वाटायचं ती वांझ तर नाही न...??
...आणि एका महिन्यात पाळी आलीच नाही....
मळमळ.. उलट्या सुरु झाल्या..
ह्या त्रासाने तब्येत खालावली तिची...
...पण घरात सर्व आनंदी -आनंद होता....
...नऊ महिने झाले... सदाभाऊ तिला माहेरी घेऊन आले...
... गर्भारपणाचे तेज चेहऱ्यावर झळकु लागले होते तिच्या...
बायजाबाईला तिला कुठे ठेऊ नी कुठे नाही असं होऊन गेले होते..
.... एके दिवशी बाळंतपणाच्या कडा सुरु झाल्या तिला... सदाभाऊ तिला तालुक्यातील मोठया दवाखान्यात घेऊन गेले....
..काही तासातच एका गोंडस बाळाला तिने जन्म दिला....
सगळे आंनदी होते....
सासूबाई आनंदी होत्या... कारण त्यांच्या घराला कुलदीपक मिळाला होता...
ती आंनदी होती... कारण तिच्या वांझोटेपणाचा डाग मिटला होता....
बाळाचं नाव ठेवलं... दीपक..
....दोन -तीन महिन्यात पुन्हा एक आनंदाची बातमी घरी आली...
श्रीधर ला नोकरी लागली होती... चांगल्या पगाराची...
सदाभाऊनचा विश्वास सार्थकी लागला होता...
रघु च्या आधीच श्रीधर ला नोकरी लागली होती...
घरात आता चांगले दिवस येणार होते... सगळ्यांचे दिवस पलटनार होते...
...काही दिवसांनी श्रीधर नोकरीच्या ठिकाणी रुजू झाला... सोबत चित्रा आणी दीपक लाही घेऊन गेला.. लहान बहीण पण होतीच सोबत.. आई शेतीच्या कामामुळे गावाकडेच थांबली...
..चित्रा च्या मनात हूरहूर होती... नवीन शहरात... नवीन संसार...
सगळं कसे स्वप्नागत वाटत होते तिला... !!
शहरातील खोलीवर गेल्यावर मात्र तिचे स्वप्न भंग पावले...
दहा बाय बारा च्या खोलीतील त्यांचा संसार..
सकाळी -सकाळी नवऱ्या च्या ऑफिस ची घाई..
नणंदेची शाळेची तयारी....
लहानग्या बाळा ची किरकिर...
जीव अगदी मेटाकुटिला यायचा तिचा...
...अशातच तिला कळलं... तिच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार...
...नऊ महिन्याची पोटुशी ...सदाभाऊ तिला परत माहेरी घेऊन गेले...
ह्या खेपेला मुलगी झाली...
नाजूकशी... काळी -सावळी.... चुनचुनित...
...काळीशी मुलगी बघून श्रीधर ने नाक मुरडलं..
...सासूबाईही खुश नव्हत्या...
ती मात्र आनंदी होती.. तिला हवी तशी मुलगीच जन्माला आली होती...
नाजूक चनीची.. तेजस्वि चेहऱ्याची...
त्या छोट्याशा जीवावरून तिची नजर हटत नव्हती..
नाव ठेवलं त्या चीमन्या परीचं...
....लतिका..
*******************************************************
चित्राचे आयुष्य लागले का मार्गी...?? की पुढचा टप्पा अजून पार व्हायचाच आहे... कळण्या साठी वाचा पुढील भाग..
.
.
.ही कथामालिका फ्री आहे. याला subscription लागणार नाही..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा