.... डिओ चा सुगंध नाकात दरवळला. तस तिने चेहऱ्यावरचं पांघरून बाजूला केलं. खरं तर हा सुगंध नकोसा होता तिला. असल्या तीव्र वासाने डोकं दुखायचं. डोळे किलकीले करून पहिले, घड्याळात आठच वाजले होते. एक आनंदमय शीळ कानात ऐकू येत होती. श्रीधर... आपल्याच धुंदीत तयार होत होता. गोऱ्यापान शरीरावर घातलेला गडद निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातलेला तो... किती सुंदर दिसतो याही वयात. बासष्टी ला पोचला तरी सविशीतील तरुणासारखा उत्साह आहे अंगात.चेहऱ्यावर पावडर लावून bag घेत तो "येतो " म्हणून बाहेर पडला. तिने एक दीर्घ श्वास सोडला. आपले कान.. नाक.. डोळे.. ह्या अवयवाच्या संवेदना आपल्याला वाटलं तेव्हा बंद करता आल्या असत्या तर.. त्याचा चेहरा नव्हता बघायचा पण बघितलाच... त्याने वाजवलेली शीळ... वाटलं कुणी गरम शीसे कानात ओततय. ह्या संवेदना नको तेव्हा आणखी तीव्र होत असतील का? स्वतःलाच तिने विचारलं. आठ वाजताच bag घेऊन गेलाय म्हणजे दोन दिवस येणार नाही बहुतेक. तिने अनुमान लावला. ती पुसटशी हसली. त्याच्या वागण्या वरून तिने काढलेले अनुमान बहुधा चुकत नसत.
हळूहळू तिने आपली आन्हीकं उरकली. हळूहळूच.... कारण कोणतेच काम ती आता वेगाने करू शकत नव्हती. हाता पायात त्रान च उरले नव्हते तिच्या. वाताचा आजार जडल्या पासून ह्या दोन वर्षात पार खंगली होती ती. पत्यपाणी... औषध... किती केले पण हवा तसा गुण येत नव्हता. ब्रश, आंघोळ, कपडे घालणे.. ह्या साध्या साध्या गोष्टी करायलाही फार त्रास व्हायचा. जीव रडकुंडी ला यायचा. पूर्ण आयुष्य इतरांच करण्यात गेलं आणि आता या वयात स्वतःच ही करता येऊ नये ही खूप दिनवाणी गोष्ट होती तिच्या साठी. कोणापुढे कधी मदतीसाठी हात पसरले नव्हते तिने आणि आज छोट्या छोट्या गोष्टी साठी दुसऱ्या वर अवलंबून राहावं लागतंय याची चीड यायची तिला... स्वतःचीच.. आणि मग श्रीधरची ही...
तिने एक पेनकिलर गोळी घेतली. अगदीच असह्य त्रास झाला कि घ्यायची अधे मध्ये. तेवढाच एक -दोन तास.. कधी तीन तास बर वाटायचं. मग पुन्हा दुखणे जोमात वर यायचे. ती हळूहळू चालत आतल्या रूम मध्ये आली. एका ट्रन्केशेजारी उभी राहिली.
"आई.. "आरोळी देतच पार्थ आत आला. कॉलेज मधून आल्यावर पहिले तिला भेटणं हे त्याचे रोजचेच काम होते. "काय करते आहेस? " त्यानं विचारलं. "बरं झालं बाबा आलास ते. ही ट्रन्क जरा उघडून दे. नाही जमत आहे मला. " हं ss खजिना बरोबर आहे की नाही ते शोधत आहेस तर.. "हसून म्हणत ट्रन्क उघडून तो फ्रेश व्हायला गेला.
त्या ट्रन्केत काय होते... काही कागदपत्रे आणि तिच्या चार -पाच साड्या. आपल्या इतर साड्या तिने केव्हाच मुलींना देऊन टाकल्या होत्या. ह्या होत्या आवडतात म्हणून ठेवलेल्या. एकादी चा रंग आवडलेला तर एखादी चा पोत.. एका गडद गुलाबी साडीवर तिचा हात फिरला. चार वर्षांपूर्वी रघु ने.. तिच्या भावाने घेतलेली साडी... माहेर च्या मायेच्या लोकांपैकी एकटाच काय तो उरला होता आता. बाकी केव्हाचे च कालवश झाले होते सगळे. परत तिचा हात साडीवर फिरला... माहेरची साडी... खजिना च तर आहे हा... पण आता काय कामाचा.
. तीनं एकवार आपल्या शरीराकडे पहिले . कृश.. कीडमीडित.. देह तिचा. शरीर म्हणायला केवळ हाडान्चा सांगाडा नुसता ह्या शरीरावर साडी पेलवनारच नव्हती. आणि तिला आता नेसताही येत नव्हती. कपड्याचा भार सहन व्हायचा नाही तिला. सर्व शरीर वेद्नेने ठणकत रहायचं. अंगावर ब्लाउज आणि पेटीकोट घातलेली ती.. नाही म्हणायला वरून मुलीची ओढणी लपेटली होती लाजेखातर. आपले कपडे बघून एक दयनीय हसू आलं तिला. लहानपनीची चोळी परकर घालून घरभर फिरणारी चित्रा आठवली तिला. "आताचे माझें कपडे चोळी परकर च वाटतात मला." मनात आलं तिच्या. आठवायला लागल्या पासून ती स्वतः ला चोळी परकर मध्ये च आठवते. चोळी परकर पासून चा तिचा प्रवास साडी पर्यंत पोचला तेव्हा बाल्यावस्थेतुन तिच तारुण्यात पदार्पण होत होतं... आणि आता साडीतून परत चोळी परकर मध्ये ती परतली होती. पण... ही बाल्यावस्था नव्हती तिची . बाळपणीचा काळ सुखाचा म्हणतात तस म्हातारपणीचा काळ कशाचा असतो....??? म्हातारपनाला पण दुसरं बालपण म्हणतात, पण हे असले बालपण.... नको देऊ रे देवा कुणाला. मनातून तिने हात जोडले. परत तिचा हात त्या साडीवर फिरला.... आणि डोळ्यासमोर उभा राहिला तालुक्यातील साडीचं दुकान.....
"...चित्रा.. तुला आवडेल त्या साडीवर हात ठेव. किंमती कडे बघू नको. तुला आवडेल ती साडी घेऊया बघ आज.. " सदाभाऊ चित्रा ला घेऊन साडीच्या दुकानात आले होते. खूप छान छान साड्या होत्या दुकानात. पण बा ला जास्त खर्च होऊ नये म्हणून ती मुद्दाम कमी किमतीच्या साड्या बघत होती. पण तिची एक नजर काचातुन दिसणाऱ्या जांभळया बारीक फुले असलेल्या साडीवर जात होती... शेवटी दुकानदाराशीं घासाघीस करून दोन साड्या पॅक केल्या. "तू निघ.. मी येतो पैसे देऊन. " असं म्हणून सदाभाऊ ने तिला बाहेर पाठवले. थोडं सामान घेऊन नंतर ते घरी पोचले. माय ला खरेदी दाखवताना तिला तिच साडी दिसली.
"बा.. ही साडी.. " ती म्हणाली.
"आवडली तुला " बा नं विचारलं.
"बा... ही साडी आपण नव्हती घेतली... "-चित्रा.
"हो ग.. पण मला आवडली म्हणून घेतली. " ते हसत म्हणाले.
"...पण उगाच एवढा खर्च.... कशाला केला बा? " ती म्हणाली.
"चित्रा... नेहमीच दुसऱ्यांचा विचार करतेस. एखादी मुलगी असती तर तीन अक्ख दुकान घरी आणलं असतं बघ. आणि तू काय केलंस... स्वस्तातल्या दोन साड्या तेवढ्या घेतल्या. तू बोलली नाहीस काही पोरी.. पण तुझ्या डोळ्यांनी सांगितले बघ ही साडी तुला आवडली म्हणून. " तिच्या हातावर साडी ठेवत ते म्हणाले.
"बा... कसं रे कळलं तुला.. या साडीला तर मी एकदाच बघितलं होतं." त्यांच्या गळ्यात हात गुंफत ति म्हणाली.
ते हसले. म्हणाले, "ते एक काय म्हणता तुम्ही तस.. सिक्रेट.. हा.. सिक्रेट आहे. कळतात मला काही गोष्टी.. आपोआपच. "
तिच्या डोक्यावर हात ठेवत ते पुन्हा म्हणाले, "चित्रा बाळा... नेहमीच तू दुसऱ्यांचा विचार करतेस... कधीतरी स्वतः साठी ही जगायला शिक बाळा... "
"...स्वतः साठी जगणे....
बा चं ऐकलं असत तर किती बर झालं असतं नं. पण स्वतः साठी जगताच नाही आलं कधी मला. कधी परीस्थिती मुळे तर कधी इतर कोणत्या कारणाने. नेहमीच स्वतः आधी इतरांचाच विचार केला मी... आणि आता परिस्थिती ठीक आहे तर मी अशी... " खिन्न मनाने ट्रन्क बंद करून ती आपल्या बेड कडे आली.
".... माझ्या केवळ एका नजरेने माझी आवड ओळखनारा माझा बा... आणि तीस -पस्तीस वर्ष एकत्र संसार एकत्र करूनही मला कधी न ओळखणारा माझा नवरा..." नकळत तिच्या मनानं तुलना केली. नवऱ्याची... आणि बापाची... तसंही प्रत्येक मुलगी आपल्या नवऱ्याचा आदर्श आपल्या वडिलांताच शोधत असते...
...तिच्या डोळ्यापुढे ती जांभळया फुलांची पांढरी साडी पिंगा घालत होती आणि मनाने ती पोचली होती काकाच्या गावाला.... त्या धूरकट खोलीत...
"...चित्रा ss चित्रा ss लवकर बाहेर निघ.शाळेत जायला उशीर होतोय.. " - ही रत्ना.. काकाच्या गावाला आल्यापासून तिची जिवाभावाची बनलेली एकमेव मैत्रीण. ही मैत्री मात्र तिने शेवट पर्यंत निभावली.
"रत्ना.. अग मला साडी घालता च येत नाहीये. काय करू? "
आतून चित्रा ओरडली.
"काय...?? " रत्ना आपल्या इतर दोन मैत्रिणी ना आत घेऊन येत म्हणाली.
"सगळ्यात पहिले म्हणजे साडी घालत नाही.... नेसतात. .. कळलं.? आणि दुसरी गोष्ट आपल्याला उशीर होतोय. लवकर आवरा. " असं म्हणत मैत्रिणीच्या मदतीने रत्ना तिला साडी नेसायची शिकवली. अभ्यासात कची होती, पण इतर गोष्टीत खमकी होती.
... हा चित्रा चा साडी नेसायचा पहिला दिवस... त्यानंतर मात्र मग कुणाची मदत घ्यावी लागली नाही... अभ्यास... शाळा... ह्या तिच्या आवडणाऱ्या गोष्टी. शाळेत हुशार.. एकपाठी...गणितात तिचा हातखंडा कोणी धरत नसे . पाढे अगदी मुखपाठ... आजही..
कशी बशी साडी सांभाळून ती शाळेत गेली. आठवी ला होती ह्या वर्षी. आणि आठवी पासून साडी नेसने कॉम्पल्सरी होते. वर्गात श्रीमंत मुली नाजूक साजूक शिफान च्या साड्या घालून मिरवायच्या. पण गणितात अडल्यावर जेव्हा तिची मदत घ्यायच्या तेव्हा त्यांच्या पेक्षा तिला जास्त श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं..
...दोन वर्ष भुर्रकण उडून गेली. चित्रा आता मॅट्रिक ला होती. महत्वाचे वर्ष होते आणि नेमकं परीक्षेच्या काही दिवसापूर्वी तिला टॉयफॉइड झाला. सदाभाऊ न आपल्या ट्रीटमेंट नी तिला बर केले पण तिचे बरेच दिवस वाया गेले.
..आज परीक्षेचा पहिला दिवस. पहिला पेपर इंग्लिश. पेपर तर तसा बरा गेला. रूमवर येऊन मार्कांची guessing काढून पाहीली.. चौतीस वर काही मार्क्स जाईना. हिने डोकं पकडल.तेवढ्यात शेजारचा दादा आला. "बघू पेपर.. आs फक्त चौतीस मार्क्स... चित्रेs तू काही पास होत नाहीस बघ आता. "बाँम्ब टाकून तो गेला आणि तिच्या मनात हे पक्क झालं. त्यामुळे इतरही पेपर बिघडले ...
...पंधरा दिवसांनी रिजल्ट लागेल.. आणि आजपासूनच तिच्या मनात धाकधुक वाटतेय. होईल का मी पास....???
मलाही धाकधुक वाटत आहे... तुम्हाला काय वाटते.. होईल का आपली चित्रा पास की.... वाचा पुढील भागात...
...साडीखरेदी... हा जवळपास प्रत्येक साडीप्रेमी स्त्रीचा आवडीचा विषय.. तोच मांडायचा आज प्रयत्न केला. तुम्हाला आठवते का तुमच्या आवडीची पहिली साडी केव्हा खरेदी केली ते.?? आठवत असेल तर कंमेंट करून नक्की सांगा आणि आजचा भाग कसा वाटला तेही कळवा....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा