Feb 27, 2024
स्पर्धा

शोध... तिच्या अस्तित्वाचा... भाग -5

Read Later
शोध... तिच्या अस्तित्वाचा... भाग -5

आज शनिवार... लतिका ला ऑफिस ला सुट्टी होती. पार्थ ही आज घरीच होता. विराज.. पार्थ चे पप्पा त्याच्या बिझनेस टूर वर होता. घरी आज दोघेच मायलेक होते. मस्ती.. मजाक... करत त्यांचे काम चालले होते. एरवी विराज घरी असला की एवढा गोंधळ नसतो घरात. 

लतिका -विराज... तसं बाहेरच्या साठी एक हॅपी -लकी जोडपं... पण घरातील चार भिंतीच्या आत काय घडतं हे लतिका, पार्थ आणि विराज लाच माहीत... म्हणून तो घरी नव्हता तर दोघांचा नुसता धुडगूस चालला होता... स्वातंत्र्याचा उपभोग घेण सुरु होतं.. 

लतिका आणि चित्रा एकाच बिल्डिंग मध्ये राहत होत्या. अगदी आजूबाजूलाच . त्यामुळे दिवसातून कित्येक चकरा चित्रा कडे व्हायच्या तिच्या... तिची काळजी घेणे... काही हवं नको ते बघणे... सर्व काही लतिका च करायची. चित्रा नेहमीच म्हणायची, "... लेक जवळ आहे म्हणून मी इतके दिवस जिवंत तरी आहे... नाहीतर... "आणि ते खरचं होतं. लतिका सारखी तिची काळजी कुणीच घेत नव्हते.. 

".. saturday - sunday... the bosses are out of the house... "लतिका हसत आत येत म्हणाली. 

"Let\"s  enjoy.. " पार्थ सोबत होताच. 

"कसलं रे एन्जॉयमेन्ट...? " उठून बसायचा प्रयत्न करीत चित्रा म्हणाली. 

"अगं आई.., तुझ्या आणि आमच्या घरचे दोन्ही बॉस घराबाहेर आहेत ना... म्हणून एन्जॉय गं.. "तिला बसायला मदत करत तो म्हणाला. 

... हो.. श्रीधर ही नव्हताच की दोन दिवस घरी... 

.. ती हसली.. पुसटशी... 

लतिका तिच्या साठी मस्तपैकी चिकन करी घेऊन आली होती. कितीही स्वादिष्ट जेवण असलं तरी अर्ध्या -एक पोळी च्या वर एक घासही जायचा नाही हल्ली तिच्या पोटात.. 

..जेवण आटोपलं तसा पार्थ नी रिमोट चा ताबा घेतला. कुठे न्युज.. कुठे कॉमेडी... कुठे एखादी मालिका.. रिमोट च्या बटना प्रेस होत होत्या. आणि त्या बरोबर कशा वरही कसलीही कंमेंट करून त्यांची हास्यमैफिल सुरु होती. अशातच एका म्युझिक चॅनल वर  पार्थ चा रिमोट थांबला. सलमा आगा चं एक जुने गाणे सुरु होते... 

"...फजा भी है जवा- जवा 

   हवा  भी है रवा- रवा, 

   सुना रहा ये समा

   सुनी -सुनी सी दास्ता..."

...गाणं ऐकून पार्थ एकदम हसायलाच लागला. 

"मम्मी कसलं गं हे गाणं... "हवा भी है रवा -रवा.. " असं कधी गाणं असते का?  हवा कधी रवा असतो का गं..? "

तो पुन्हा हसू लागला. त्याचा सोबत लतिका ही सामील झाली. 

"ये.. गप्पं बसा रे दोघेही.. चित्रा अचानक म्हणाली. 

" पार्थ..,  अरे प्रत्येक शब्दाचा एक विशिष्ट् अर्थ असतो... माहित असताना असं काहीही कंमेंट करणे योग्य नव्हे. "

ती काहीशी गंभीर होत म्हणाली. 

"...सॉरी आई.. " तिला तसे बघून  शांत होत तो म्हणाला. 

सलमा आगा चे गाणे चित्राला आवडायची...  तिच्या स्वरातील आर्तता... थेट हृदयाला भिडायची...  अगदी अलवारपणे हरवून जायची त्या आर्त स्वरात.. 

...आताही तिचं मन असंच हरवून गेलं.... भूतकाळात... अगदी अलवारपणे... 

  ... सायंकाळचे पाच -सहा वाजले असतील. बायजाबाई स्वयंपाकाची तयारी करीत होती. चित्रा तिच्या मशीनवर एक सुंदरसा फ्रॉक शिवत होती आणि रेडिओवर तोच आर्त स्वर गुंजत होता... 

    "...फजा भी है जवा -जवा, 

       हवा भी है रवा -रवा... "

आणि बायजाबाई फसकण हसली. 

" चित्रे... कसलं ग हे गाणं.. हवा कधी रवा असते होय.. "

"माय... असं नसते ग हसायचं.. त्या शब्दाचा काहीतरी अर्थ असेल.. " चित्रा म्हणाली.  

"तुले माहित हाये...? " माय नं प्रश्न केला. 

"नाही गं, पण हा आवाज ऐक न... कसा मनात घर करतोय... "

चित्रा म्हणाली. 

"हो  गं बाय... आवाजात एक वेगळीच जादू आहे ह्या... "

भारावल्यागत माय म्हणाली.  

दोघीही मायलेकी गाणं ऐकायला लागल्या. 

तेवढयात हातपाय धुवून बा आत आला. 

"काय सुरु आहे दोघी मायलेकींच... "आत येत ते म्हणाले. 

"अरे बा... आलायस तू.. थांब चहा टाकते. "

हातातला फ्रॉक बाजूला ठेवत चित्रा उठली. 

"थांब चित्रा... बघू फ्रॉक... वा ! काय सुंदर शिवलाय.. खूपच छान आहे "

आंनदाने ते म्हणाले. 

"आवडला तुला.. "तिने ही आनंदात विचारले. "शेजारच्या आजीने त्यांच्या नातीसाठी शिवायला दिला होता. "

ती म्हणाली. 

"हो गं खूप सुंदर शिवला आहेस. नाव ठेवायला कुठेच जागा नाहीये बघ.. "

ते हसत म्हणाले. 

"आहेच गुणांची पोर माझी... प्रत्येक काम कसं नीट काटेकोर पणे करते.. 

अशीच प्रगती करत रहा.. "

त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. 

ती पण खूष झाली. कुणी कितीही स्तुती करो पण जो पर्यंत वडिलांकडून तिच्या कामाची पावती मिळायची नाही तोपर्यंत तिला चैन पडत नसे. आनंदाने ती चहा करायला गेली...

जेवण झाल्यावर आनंदातच ती खाटेवर पहूडली.... 

  "..अननस अ ss"

  "अननस अ ss.. "

  "आगगाडी आ ss"

  "आगगाडी आ ss..."

एक सुंदरशी साडी नेसून चित्रा शाळेतल्या वर्गात लहानग्या मुलांना शिकवत होती... 

मुलंही तिच्या मागून म्हणत होती... 

...कोंबड्याने बांग दिली... तशी दचकून ती जागी झाली. अजूनही पूर्णपणे उजाडलं नव्हतं. तिने आजूबाजूला पाहिलं... ती खाटेवरच होती. 

...ती शाळा... 

...ती मुलं... 

स्वप्न होतं तर सगळं...  

ती  स्वतः शी च म्हणाली. 

"चित्रा काय झालं गं? लवकर उठलीस. "

माय न विचारलं. 

"माय... पहाटे पडलेली स्वप्न खरंच खरी होतात का गं...?? "

चित्रा अजूनही स्वप्नाचा विचार करीत होती. 

"अगंबाय... कोणतं स्वप्न पाहिलं माझ्या लेकीनं..? "

माय जवळ येत म्हणाली. 

"तस नाही गं.. पण सांग न होतात का खरी?? "

तिने पुन्हा विचारलं. 

"... तस नसतं गं बाय.. स्वप्न मिटल्या डोळ्यांनी पाय नायतर उघड्या... 

रात्री पाय नाहीतर पहाटे ला... ते खरी तेव्हाच व्हतात जेव्हा आपल्या अंगात ती पूर्ण करण्याची धमक  असते...

चित्रे...  अंगात धमक असल्याशिवाय  जे स्वप्न पूर्ण होणार नाही ती पाहूच नये आपण... "

लाख मोलाचं माय बोलली. 

..पण त्या स्वप्नांच् काय जे ती दोन वर्षापासून बघत होती... 

...मॅट्रिक् चा रिजल्ट लागला... तशी घरची सर्व मंडळी खुप खूष होती... एवढी शिकणारी चित्रा नातलगातच नव्हे तर त्यांच्या सम्पूर्ण गावातील पहिली मुलगी होती. रिजल्ट बघून सदाभाऊ चा उर अभिमानाने भरून आला होता. आता पुढे तिला खूप शिकायचं होतं.. 

...बायजा बाई ला  तिने विचारलं होतं, "माय किती शिकू?? "

"आभाळभर शिक.. खुप शिक... तुले पाहिजे तेवढं शिक... "

माय ने ही तीच उत्तर दिल होतं. आता खरंच चित्रा ला शिकायचं होतं आभाळभर... 

एक आठवडा असाच गेला निकालाच्या आनंदात... आणि मग एक दिवस अशाच एका सायंकाळी बा न तिला विचारलं, 

"काय मग चित्रा बाई काय ठरवलं पुढे शिकायचं.. "

"बा.. मला शिकायचं आहे पुढे.. "चित्रा म्हणाली. 

"काय शिकायचं आहे... "त्यांनी विचारलं. 

"...सायन्स घ्यावं वाटतंय.... 

...नाहीतर D.ed. करून मास्तरीण व्हावे असं वाटतंय... "

चित्रा म्हणाली. 

"...म्हणजे नोकरी करायची आहे तुला... " - सदाभाऊ.

"हो बा... आवडेल मला छोटया -छोट्या मुलांना शिकवायला... "

ती आनंदात होती. 

"नाही चित्रा.. पण मला नाही आवडणार तू नोकरी केलेलं.... "

सदाभाऊ गंभीर होत म्हणाले. 

"...पण का...बा.. "

चित्रा च्या डोळ्यात पाणी होतं. 

".. हे बघ चित्रा... तू शिकू नकोस असं नाही म्हणत आहे मी... तू शिक... तुला  हवं तेवढं शिक... अगं आनंदच आहे मला त्यात...  पण माझी मुलगी कुणाच्या हाताखाली काम करून गुलाम नको बनायला... 

म्हणून म्हणतो... तू नोकरी नाही करायचीस... "

गंभीर पण तेवढयाच मृदू आवाजात ते म्हणाले. 

"मग  काय शिकू मी..? "

चित्रा खाली बघत म्हणाली. 

काहीही शिक... ज्याने तू स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकशील.. 

ज्याने तुला कोणाच्या हाताखाली काम करावे लागणार नाही... 

तुझी तूच मालकीण असशील.. " सदाभाऊ बोलले. 

".. जसं की... " तिने विचारलं. 

"अम्म... जसं की टेलरिंग....??

चित्रा तू टेलरिंग शिक.. म्हणजे तू तुझा व्यवसाय पण सुरु करू शकशील... चार पैसे ही कमवशील.... "

विचार करत ते बोलले.

बा चे बोलणे थोडेफार पटले तिला... नोकरी करायची होती म्हणून तिला शिकायचं होतं.. पण नोकरी म्हणजे बा ला गुलामगिरी वाटत होती. मग पुढे शिकून काय फायदा... म्हणून पुढे न शिकण्याचा मार्ग तिने निवडला.

सदाभाऊ नी तिला शिकायची मनाई नव्हती केली पण तिलाच वाटलं नोकरी नाही तर  पुढे शिकून काय करायचं ... त्या पेक्षा बा म्हणतो तस टेलरिंग करूया.... 

...दूरच्या  एका नातेवाईकाकडे राहून तिने टेलरिंग पूर्ण केलं....

...आणि काल  त्याचीच कौतुकाची थाप बा कडून तिला मिळाली होती... ती खुश होती... 

...पण मग या पहाटे पडलेल्या स्वप्नाच काय...?? 

एक दिवस  अचानक सदाभाऊ ने तिला अंकलिपी आणून दिली. 

"...बा ही कशाला आता...?? "

तिने प्रश्न केला. 

"...चित्रे.. अगं आपल्या घरापाशीच एक आंगणवाडी सुरु होत आहे... 

तशीही तूला हौस होती न मुलांना शिकवायची.... जात जा दोन तास तिथे... तुलाही बरं वाटेल... "

ते म्हणाले. 

चित्रा चे मास्तरीण व्हायचे स्वप्न वेगळे होते.. आंगणवाडीची मास्तरीण होणे वेगळे... पण काही का असेना तीच स्वप्न अंशत : पूर्ण झाले होते... 

ती मुलांना शिकवत होती... 

"अननस अss

आगगाडी आ ss..."

....आज तिला हे सर्व क्षण आठवले..  वाटलं हे सर्व क्षण असेच मुठीत पकडून ठेवावेत...

आणि नकळत डोळे पानावले.. 

मनात सलमा आगाचा आर्त स्वर अजूनही गुंजत होता... 

    ... हर एक पल को ढुंढता 

     हर एक पल चला गया 

     हर एक पल  फिराक का

     हर एक पल विसाल का 

     हर एक पल गुजर गया 

    बना के दिल पे इक निशा 

     सुना रहा है ये समा-सुनी सुनी सी दास्ता

      फजा भी है जवा - जवा....

--------------------------------------------------------------------------------------

पुढील भाग लवकरच... 

तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा. 

आणि सलमा आगाचे गाणं एकदा ऐका.... हृदयात नक्की घर करेल.. 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//