Feb 29, 2024
स्पर्धा

शोध... तिच्या अस्तित्वाचा... भाग -11

Read Later
शोध... तिच्या अस्तित्वाचा... भाग -11

.... आपले मन हलके करण्यासाठी चित्राने रघुला फोन केला... 

पण.. 

त्याचे बोलणे ऐकून तिलाच धक्का बसला.. 

.. कॉलेजमध्ये असताना मुलींच्या मागे मागे असायचा श्रीधर... .,

 रघु कडून तिला आत्ता कळलं होतं.. 

कॉलेज लाईफ ते... केले असेल एन्जॉय.. ते वयचं असते अवखळ...

पण आता काय..??  ह्या वयात... 

\" साठी बुद्धी नाठी.. \" म्हणतात..  ते यासाठीच का.. 

की तो तसाच आहे... जसा कॉलेज मध्ये होता.. 

मग माझ्या लक्षात कसे नाही आले इतकी वर्ष..?? की मीच त्याच्यावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवला.. 

विश्वास.... 

प्रत्येक नात्यातील एक अतिशय महत्वाची भावना... !

कोणतेही नाते विश्वासानेच टिकते.. प्रेम.,  पैसा.. जवळ सर्व काही असेल तरी विश्वासाच्या अभावी ते नाते कमजोर व्हायला वेळ लागत नाही... 

आपल्या चित्राचे ही हेच झालेय आता.. मनात एकदा विश्वासघाताचे शल्य असे  रुतून बसलेय की त्यातून बाहेर कसे पडायचे हेच तिला कळेनासे झाले.. मन मानायला तयार नव्हते.. आणि डोळे सत्य लपवायला.. 

ती आता भूतकाळातील घटना खोदून खोदून आठवू  लागली.. स्त्री यांच्या बाबतीत तो जरा जास्तीच लावून घेतो हे तिला आत्ता पटू लागलं. त्याचा बोलका स्वभाव... त्यामुळे चटकन कुणाशीही बोलायला पुढे असं तिला आधी वाटायचं.. पण आता कळतंय की स्त्रीयांशी च जास्त बोलतो तो.. 

पहिल्या नोकरीच्या वेळेस शहरात असताना शेजारच्या घरातील मुलीकडे कसा टक लावून बघायचा.. तीही हसायची ह्याला बघून.. पण त्या तसल्या नजरेने कुणाकडे हा बघू शकतो.., असा विचारही कधी शिवला नाही मनात.. किती तो विश्वास... !

गावात राहायला आल्यावर गावातल्या बायकांशी हसत हसत मारणाऱ्या गप्पा.. शेतात कामाला आलेल्या स्त्रियांशी बोलणे.. अंगावर कधी चिखल तर कधी पाणी उडवने.... ह्यात  तेव्हा मला काही वावगे वाटले नाही... पण हे करताना त्याचा हेतू वेगळा असायचा का.? हे प्रश्न मला आत्ता पडताहेत..,  तेव्हा तर असं काही डोक्यातही आलं नाही माझ्या...

..नाही म्हणायला एकदा  गावातील एका सभ्य स्त्रीने तिला समजावल होतं .., 

" चित्रा,  श्रीधर चे लक्षण काही ठीक दिसत नाही.. थोडी नजर ठेव त्याच्यावर... "

तेव्हा किती भांडली होती तिच्याशी.. 

आपल्या नवऱ्याला असं कोणी काही बोलू शकत...तिला ते सहन नव्हते झाले.. 

किती तो विश्वास.. आणि आता क्षणार्धात  त्याची जागा विश्वासघाताने घेतली... 

तो आत्ताच तसा नाही तर पूर्वीपासून तसाच आहे हे तिला पटायला लागलं... 

डोळे झाकून विश्वास ठेवला मी तुझ्यावर....  आणि फसवलंस तू मला.. 

...श्रीधर.... !

का वागलास माझ्याशी असं....?? 

...वाटले तिला खूप जोरात ओरडावे. ओरडून ओरडून पूर्ण घर डोक्यावर घावें.... पण आवर घातला तिने स्वतः वर.. 

फक्त दोनच महिने... नीतू चे बाळंतपण निर्धोकपणे पार पडले की मिळवलं...

त्यानंतर श्रीधर शी बोलून काय तो सोक्षमोक्ष लावायचाच... तिने ठरवलं... 

.

.

" ... श्रीधर. तू मुंबईला गेलेला तेव्हाचा हा  फोटो आहे ना...? "

चित्रा त्याला विचारत होती... 

"..अरे...,  तुझ्याकडे कसा आलाय...??  केव्हाचा मी शोधतोय..  "

नकळत तो बोलून गेला. 

".. का. ?? "

तिने विचारलं. 

"...हम्म.. "तो  गोंधळला थोडासा... 

"... का शोधत होता? ...  कशासाठी..?  "

पुन्हा तिने विचारलं... 

"..अगं ही आहे ना लिली... हिला द्यायचा होता... "

स्वतःला सावरत तो म्हणाला.. 

"..हीच्यासोबत तू मुंबईला गेला होता.? " - चित्रा. 

".. ऑफिस स्टाफ आहे ती. "

त्याच्यात आता धीटाई आली होती. 

" बाकी इतर कुणी दिसत नाही सोबत..  तुम्ही दोघेच गेला होता का..? " शांतपणे ती म्हणाली. 

".. काय म्हणायचंय तूला.. "

त्याने चिडून विचारले. 

"...मी तर शांतपणे विचारत आहे...  तू का चिडतोस एवढं..?  आणि म्हणायचं म्हणशील तर मला काहीच म्हणायचं नाहीये,  फक्त तू काय म्हणतोस ते ऐकायचे आहे .. तूच बोल.. !"

ती शांतच होती.. 

     " ..तुझा काहीतरी गैरसमज होतोय... तू समजतेस तसं काहीच नाहीये . "

 तो आता वरमला होता.. 

".. श्रीधर.. तू काय मला दूधखुळी समजतोस..??  तुझ्या वागण्यातील बदल दिसत नाहीये का मला..?  अरे नीतूची नाजूक प्रकृती होती म्हणून इतके दिवस मी गप्प बसले.. कधी तिला बाळ होईल आणि कधी ती तिच्या घरी परतेल असं झालं होतं मला.. बाळंतपणाच्या एका महिन्यातच मनावर दगड ठेऊन तिला तिच्या घरी पाठवले मी.. आणि तू म्हणतोस की माझा गैरसमज होतोय... 

मग काय आहे सत्य सांग ना तूच..  "

बोलून तिला थोडी धाप लागली.. 

तो शांत झाला. आता लपवण्यासारखे काही उरलेच नव्हते. 

"..ही लिली.. आपल्याकडे रात्रीची एकदा आली होती... आठवत असेल तूला.. 

तिला गरज आहे माझी.. 

नुकतीच पस्तीशी उलटलेली.., नवऱ्यान टाकून दिलेली..  एक गरीब बिचारी स्त्री आहे.. 

एक मुलगाही आहे अगं तिला दहा बारा वर्षाचा...  एकटीने सांभाळ करते त्याचा.. बिचाऱ्याला त्याचे वडील कोण आहेत ते देखील नाही गं माहीत..

बिचारी.. ! एकटीच कशी सगळं सांभाळते..,  तीच तिलाच माहित.. सहानुभूती वाटते गं तिच्याबद्दल.. म्हणून कधी करतो तिची मदत जमेल तशी... "

तो बोलत होता...,  

ती मध्येच म्हणाली.. 

"..कसली करतोस रे मदत तिला...?  पैशाची की शरीराची..?? \"

"..चित्रा sss.. "

त्याचा हात उठला... 

"...तूझ्या आयुष्यात आलेलली  प्रत्येकच असहाय्य स्त्री.., जी अबला आहे. नवऱ्याने टाकलेली आहे... गरजू आहे.. अशीच करतोस का  मदत त्यांना..??  "

त्याचा उठलेला हात झीडकारत ती म्हणाली. 

"... अरे ,  तिला हवी होती काही मदत तर मला बोलला असता. तिच्या मुलाच्या शिक्षनाचा खर्च केला असता ना आपण.. मलाही आनंदच झाला असता.. 

 .... पण  ही कसली रे मदत..??   हातात हात घालून असे फिरता.. शीss..  लाज वाटतेय मलाच.. काय नाते आहे रे तुमचे??  काय समजते ती तूला.. "

"...मित्र समजते ती मला.. " चित्रा चे बोलणे मध्येच तोडत तो बोलला. 

"... मित्र समजते ती मला... तिचा सखा समजते.. तिचा जिवलग.. तिचा प्रियकर....  तिचा नवरा समजते ती मला.. तिच्यासोबत घालवलेल्या क्षणापेक्षा आणखी आनंदी क्षण अनुभवले नाही मी कधीच..  "

तो आपल्याच प्रवाहात बोलत होता.. 

एक सनकन कानाखाली द्यावी असं वाटलं तिला. हातांच्या मुठी आवळल्या तिच्या..  श्वास फुलला... छातीत एक कळ दाटून आली.. 

"..... श्रीधर... प्रतारणा केलीस तू माझ्याशी...  "

एवढंच बोलू शकली ती... 

छातीला दाबून धरत बेडवर बसली.. 

"... श्रीधर..,  अरे आपलं लग्न झालंय..  देवा - ब्राम्हणांच्या साक्षीने  मंगळसूत्र बांधलेस तू माझ्या गळ्यात..! "

 कसाबसा आवंढा गिळून ती बोलली.. 

"...लग्न..??... "

छदमी पणे हसत तो बोलला.. 

"..आता विषय निघालाच तर जरा स्पष्टच तूला सांगतो.., तुझ्याशी केलेलं लग्न..  लग्न नव्हतंच मुळी. तो केवळ एक व्यवहार होता... तुझा उपयोग फक्त एक शिडी म्हणून केलाय मी.. 

तुझा भाऊ रघु....  कॉलेजमध्ये असताना  श्रीमंतीचा काय माज होता माहिताय तूला..?  दोन चारदा चहाची उधारी त्याच्या नावाने केली तर काय डाफरला होता माझ्या वर...  तेव्हाच मी ठरवलं याचा माज उतरवायचा.. तुमच्या घरी आलो.. गोड गोड बोलून तूझ्या वडिलांचा विश्वास संपादन केला.. तुझ्यावर किती प्रेम करतो हे पटवून दिले आणि मग थेट लग्नाची मागणीच घातली.. वेडा होता बाप तुझा.. त्याला वाटलं एवढा प्रेम करणारा नवरा भेटतोय आपल्या पोरीला.. आणखी काय हवं??.. 

लग्नानंतर गरिबीचे चटके सहन केलेस तू...  माझी नोकरी गेली तेव्हा एका हाती घर सांभाळलस.. कपडे शिवून मला,  माझी बहीण देविकाला शिकवलंस.  बाकी खरंच सांसारिक निघालीस हं तू.. अशा सगळ्या परिस्थितीत एखादी मुलगी घर सोडून निघून गेली असती. पण तू मात्र आमचे घर चालवलंस तेही स्वाभिमानाने..  नेटाने संसार केला. खरंच अभिमान आहे मला तुझा. आज मी जो काही आहे न तो केवळ तूझ्याच मुळे..  पण आता बस.. आता मला माझे आयुष्य माझ्या मर्जीने जगायचे आहे.. मला वाटेल तसे.. कुणाचीही आडकाठी नकोय मला आता... "

 "... श्रीधर...  नीचपणाच्याही खालची पायरी गाठलीस तू.. "

चित्रा म्हणाली. 

"..हो.. माहितीये मला.. "

तो गुर्मीत म्हणाला.. 

"... अरे,  आपल्या मुलीच्या वयाची आहे ती...याचे जरा भान ठेव.. 

तुला फसवून  सगळी संपत्ती ओरबडून घेईल तुझी.. आणि तूला कळणार पण नाही... वेळीच सावध हो.. एक दिवस नक्की  फसशील तू.. "

चित्रा त्याला समजावत म्हणाली. 

"...वयाचं म्हणशील तर..  प्रेमात वयाचे बंधन नसते...! तुलाही मी हेच बोललो होतो.. आणि तिलाही हेच सांगतलं. 

संपत्तीचे काय..?  माझा पैसा.. मी कसाही उधळून टाकील..

 आणि फसायचं म्हणशील तर तुला माहीत आहे.. श्रीधर ला कोणीच फसवू शकत नाही.. 

माझी काळजी करू नकोस तू...  आता स्वतःलाच सांभाळ.. ! "

निर्लज्जपणे तो बोलत होता. 

"..अरे ,  थोडी तरी लाज बाळग.. सभ्य समाजात राहतो आपण.. 

लोक शेण घालतील तोंडात.."

ती म्हणाली. 

  " लोकांचं सांगू नकोस मला काही.. मी कोणाला भीत नाही. माझं आयुष्य मला वाटेल तसं जगेन मी.. "

रागातच बोलत तो घराबाहेर पडला... 

तो गेला.. आणि तिच्या भावनांचा बंध फुटला.. 

इतका वेळ तिने कसेबसे थोपवले होते स्वतःला.  त्याच्या पुढे कमजोर पडायचे नव्हते तिला. तो गेल्यावर मात्र धाय मोकालून रडली ती... 

येवढया खालच्या पातळीला पोचला असेल तो तिने कल्पना ही केली नव्हती. आयुष्य एकदम एकाच ठिकाणी थांबल्या सारखे वाटले तिला. 

थोडयावेळाने ती उठायला गेली... 

"..आई गं.."

वेदनेची एक कळ उठली तिच्या गुडघ्यात... 

आत्ता पर्यन्त तर ठीक होतं अचानक काय झालं पायाला... तिला प्रश्न पडला. मन श्रीधरने घातलेल्या घावाने ठणकत होतं... तीच ठणक वेदना रूपाने शरीरावर घाव घालत होती... इतकी वर्ष नवरा...,  मुलं.. संसार ह्यातच ती अडकली होती.. श्रीधरच्या बोलण्याने ती भानावर आली..  नवरा तिचा नव्हताच मुळी... मग हा संसार.. ही मुलं.. हेही सगळं तिचे नाहीच का..?? 

ह्यातून बाहेर पडायला हवं.. मुलांशी बोलायला हवं..  तिने ठरवलं..  मुलांची साथ मिळेल मला..  तिचा विश्वास होता..  मुलं साथ देतील की नाही माहित नाही ..

पण  आता शरीराने साथ देणे कमी केले. मनावर झालेला आघात शरीर सहन करू शकले नाही.. चिंतेच्या वातरोगाने तिच्या सांध्यावर कबजा केला.. आठ दिवसांपूर्वीच चांगली असणारी ती.. आता साधा पाण्याचा ग्लासही पकडता येत नाहीय ठीक...  शरीर आकडलंय संपूर्ण.. तिच्या मनासारखं... 

तिला वाटलं हरली ती...  कडेलोट करून घ्यावा स्वतःचा..  चक्रव्यूव्हात अडकल्या सारखी स्थिती झालीय तिची..  

                                                              क्रमश : 

           ************************************

.

.

... मुलं देतील का साथ तिला..?? 

होईल का पुन्हा  सज्ज ती आयुष्याची लढाई लढायला.. 

घेईल का ती शोध तिच्या अस्तित्वाचा....

वाचा पुढील अंतिम भागात... 

आणि तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की सांगा.. 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//