Login

शोध.... तिच्या अस्तित्वाचा.... भाग -10

ती.. आपल्यासारखीच एक सर्वसामान्य स्त्री.. पण तिचा लहानपणापासून तर वार्धक्यापर्यंतचा प्रवास खरंच सामान्य होता का..?? कळण्या साठी वाचा स्पर्धा कथामालिका शोध... तिच्या अस्तित्वाचा...

"...काकू ss ..., गरम -गरम पोळी टाकलीय तुमच्यासाठी... खाऊन घ्याल. साहेब तर काही आज घरी येणार नाही आहेत.. मगाशीच फोन आला होता मला. 

उशिरा होतोय... निघते मी... तेवढं जेऊन घ्याल... "

...सावी..  चित्राच्या घरची कामवाली... पटापट काम आटोपून ती निघून गेली.. 

आपलं दुखणे सांभाळून हळुवारपणे उठायचा प्रयत्न करीत होती चित्रा.. सावीचे बोल तिच्या कानात फिरत होते.. 

"..साहेब तर काही आज घरी येणार नाहीत... मघाशीच फोन आला होता मला... "

"..आss.."  वेदनेने विव्हळली ती.. 

शरीराच्या दुखन्याबरोबरच सावी च्या शब्दानी तिच्या मनातील जखमेवरची खपली निघाली होती... 

घरी यायचं नसलं की सावीलाच फोन करून सांगणे हे आता नित्या चेच झाले होते.. 

"... लग्नाची बायको असूनसुद्धा मला कळवायची साधी तसदीही घेतली नाहीस तू..? 

तू घरी येणार नाहीस हे मला घरातील कामवाली कडून कळतं.. तुझ्यासाठी मी आता काहीच महत्वाची नाही का रे..?? 

श्रीधर... ! किती बदललाहेस तू... !! "

ती स्वतःशीच बोलत होती. डोळ्यातलं टिपूस अलगद गालावर ओघळलं...

  .... त्याच्यात झालेला बदल... ,  त्याच्यात होणारा बदल... रोजच तर ती बघत होती.. अनुभवत होती... 

"..हा असा का वागतोय..??  कधी एकटाच हसतो.. कधी गाणंच गुणगुणत असतो... 

विचारायला जावं काही तर एकदमच   चिडतो... काय झालंय याला?? 

असा का वागतोय..??? "

मनात शंभरदा तरी हा प्रश्न पडायचा तिला.. 

"..घरात गरोदर  लेक खाटेवर पडलेली...,    आणि याला कसला एवढा आनंद होतोय...? "

  सारखा मनात विचार यायचा.. 

..खाटेवरच्या नीतू ला मायेनं कधी गोंजारताना त्याला पाहिलं नव्हतं तिने.. 

" घाबरू नको गं.. नीतू..  मी आहे सोबत तुझ्या.. " असं म्हणून कधी तिला धीर देतांना पण पाहिलं नव्हतं तीने... 

स्वतः च्याच धुंदीत.. ,  स्वतःच्याच मस्तीत  असायची स्वारी... !

का वागतोय हा असं..? 

तिचं कोडं काही सुटत नव्हतं.. 

वडिलांच्या वागण्यातील बदल मुलांनाही जाणवायला लागला होता... 

महिना - महिना साधे केस कापायला कंटाळा करणारा  तो.. आता थोडेही वाढलेले केस पटकन कापायला जाऊ लागला.. आता केसांसोबत मिशीही दर आठ - दहा दिवसात काळी होऊ लागली.. दुसऱ्यांच्या पर्फुम ला नावं ठेवणारा.. स्वतः डिओ च्या सुगंधात न्हाऊ लागला... 

...तासनतास हळू आवाजातील चाललेलं त्याचं मोबाईलवरचं बोलणं..,  हळूच मिश्किल हसणं... ती जवळ आली की फोन बंद करणं... 

".. का वागतो हा असं..??  काय झालंय याला..??  "

उत्तर नसलेले हे  प्रश्न तिला पुन्हा पुन्हा पडायचे...

...ह्या प्रश्नांची तिला  उकल होत नव्हती...  पडलेलं कोडं उलगडत नव्हतं... विचार करून डोक्याचा नुसता भुगा व्हायला लागला... 

एका बाजूला बिकट अवस्थेत असलेली नीतू... 

दुसऱ्या बाजूला नवतरुणासारखा वागणारा श्रीधर... 

... तिने  नीतूला  निवडलं...लेकीला त्यावेळी तिची गरज  होती... 

...श्रीधरचं चांगलंच फावलं... मनासारखं वागायला मिळू लागलं... 

.

.

....  एके दिवशी अचानक त्याचे  कपाट आवरताना तिला एक लीफाफा दिसला. सहज म्हणून तिने ते उघडून बघितले.... त्यात एक फोटो होता... आणि  ती  त्याकडे बघतच राहिली... एकाएकी तिला गरगरल्यासारखं झालं.. डोळ्यापुढे अंधार दाटून आला.. पायाखालची जमीन हलल्यागत झाली.. ती मटकन बेडवर बसली.. डोळे मिटून घेतले गच्च...

पाच - दहा मिनिटानी तिने स्वतःला सावरलं..परत एकदा तो  फोटो तिने पाहिला... चार एक महिन्यापूर्वीचा फोटो होता तो... तिला आठवलं..,  त्याच कालावधीत श्रीधर मुंबईला गेला होता.. पुन्हा एकवार फोटो तिने निरखून पाहिला... 

"..हो,  मुंबईच ही.. ते अरबी समुद्राचं निळेशार पाणी.. ती फेसाळलेली लाट.... आणि.. समुद्रकिनारा... 

आणि.. तिथे उभा असलेला श्रीधर... त्याचा हसरा चेहरा... त्या चेहऱ्यावरचे तेज... !

पण... 

त्याच्या बाजूला ही कोण...??... 

कशी त्याला खेटून उभी आहे...  

आणि त्यानेही तिचा हात पकडलाय... घट्ट... !!.. "

ती पुन्हा पुन्हा त्या दोघांना बघत होती... तिची नजर त्या स्त्री वर स्थिर झाली.... 

"..कोण आहे ही..??  कुठे बघितलंय मी हिला...?? 

सारखं सारखं असं का वाटतेय की मी भेटले आहे हिला..?? 

कुठे भेटले मी...?  "

प्रश्न... 

प्रश्न... 

फक्त प्रश्न... 

.... कसलीच उकल होत नव्हती.. ती डोकं गच्च पकडून बसली.. 

कुठेतरी काही गवसते का?  विचार करून थकली... 

मग अचानक तिला आठवली ती रात्र.... श्रीधर एकदा  ऑफिस च्या एका तरुणीला घरी घेऊन आलेला.., तिची बस चुकली म्हणून आजची रात्र आपल्याकडे राहू दे.. असं सांगणारा... 

फोटोतील चेहरा ती पुन्हा निरखून पाहू लागली... आणि तिला पटलं... 

..... \" ती \"  हीच होती... 

.... वास्तूपूजनाच्या दिवशी तिला धडकनारी..,  ओझरती दिसलेली  

\" ती \" देखील हिच होती... 

.

.

   " ... म्हणजे... श्रीधर रिलेशनमध्ये आहे..? 

म्हणून असा वागतोय तो..?? 

त्याच्या राहण्या - वागण्यातील बदल... त्याचे नटने.. मुरडने.. त्याचा टापटीपपणा....

...  हिच्यासाठी सगळं...?? 

मोबाईलवर तासंतास मारलेल्या गप्पा.. ते हसणे - खिदळने... 

...हिच्याशी..?? 

सनकण डोक्यातून एक तिडीक गेली... 

... चित्राने डोके घट्ट पकडले....  तिचे   सर्वांग थंड पडले होते...

घशाला कोरड पडली.. 

कसेबसे कपाट आवरून ती किचनमध्ये आली.  घटाघटा तांब्याभर पाणी घशात ओतलं... 

... तेवढयात नीतूच्या ओकारीचा आवाज आला...  ती धावतच लेकीकडे आली... 

आपल्या संसारातील विस्तवापेक्षा लेकीचं वास्तव जास्त महत्वाचं होतं तिच्यासाठी... 

.

.

.... दिवसभर लेकीच्या चिंतेत.. रात्रभर श्रीधरचा विचार.. डोळ्यावरची झोपच उडाली तिच्या.. 

आणि हा बाजूच्या खाटेवर घोरत पडलेला... त्याच्या आवाजाने डोकं ठणकायचं तिचं... वाटलं बाजूच्या उशीने आवाज बंद करून टाकावा याचा... 

कायमचा... 

मनात आलेल्या विचाराची तिलाच लाज वाटली.. स्वतःच्या नवऱ्याबद्दल असा कसा विचार करू शकते मी ? 

...पण तो तरी का वागतोय माझ्याशी असं..?? 

...विचारातच सकाळी कशी झाली....  तिला कळलेचं नाही... 

पक्ष्याच्या किलबिलाटाने ती भानावर आली.. 

तो अजूनही घोरतच होता.. 

.... चेहऱ्यावर पाणी घेता - घेता तिने पहिल्यांदा स्वतःला निरखून पाहिलं.. 

... डोक्यावरचे केस अर्ध्याहून जास्त पांढरे झालेले होते.. 

खोल गेलेले तिचे डोळे..,  बसलेले गाल.., चेहऱ्यावर सुरकुत्या... !

ती पाहतच राहिली.. 


"... खरंच किती लवकर म्हातारी झालीय मी..? 

अवघया  पासष्टी मध्ये म्हातारपण आलय मला... आणि हा केवळ तीन वर्षांनी लहान असूनदेखील  किती तरुण दिसतोय... 

वयाने.... आणि  मनाने सुद्धा.... "

" ...म्हातारी झाले... म्हणून दुरावलास का रे...? "  त्याच्याकडे पाहत तिने मनातच प्रश्न केला... 

... डोळ्यातील पाणी तिने पुसून घेतलं... 

" नीतूसाठी काहीतरी बनवायला हवं... "

परत डोक्यात लेकीचा विचार आला... 

.

.

.... ती किचन मध्ये गेली... 

.

.

...कुणाशीतरी बोलावं या विषयावर... सारखं मनात यायचं तिच्या.  पण कुणाशी बोलायचं कळेना.. 

मुलांना तरी काय सांगणार ना??  आपले वडील असे वागताहेत कोण सहन करेल..??? 

...तिला आठवला तिचा बा... 

तिचा बा तिचा अभिमान होता....  पण पडत्या वयात त्यानं ही हेच केलं होतं... 

ती सल.... 

आयुष्य भर तिच्या सोबत होती. 

बा च्या करतूदीने खचलेली तिची माय... 

त्या साध्या -सरळ बाईच्या वाटेला आलेलं अवघडलेपन... 

तिने स्वतः ला माय च्या ठिकाणी ठेऊन पाहिलं... अन मग श्रीधरच्या वागण्याने तिलाच मेल्याहून मेल्यासारखं वाटलं.. 

माय च्या माय न सांगितलं होतं...,   "... बायजे...  नवरा हा उशाखालचा साप असतो...  कधी डंक मारेल...  नेम नाही.... !"

बायजा बाई चा विश्वास नव्हता यावर... नाकासमोर चालणारा आपला नवरा असं काही करेल... तिने विचारही केला नव्हता..  पण जेव्हा तिने हे  सगळं अनुभवलं तेव्हा तिने ही चित्राला मायेचं तत्वज्ञान सांगितलं.. 

"... चित्रे... खरच गं बाय.. नवरा हा उशाखालचा सापच असते.. कधी डंक मारेल नेम नाही.... सांभाळून राहा गं बाय माझे.... "

मायचं तत्वज्ञान ऐकून तिला थोडा राग आला होता... पण वाईट जास्त वाटले होते.. 

बा असा वागेल तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता..,  पण म्हणून श्रीधरही तसाच वागेल.... तिला पटण्यासारखे नव्हते... 

तिचा विश्वास होता तिच्या श्रीधरवर... त्याच्या प्रेमावर.... !

" ... नाही... श्रीधर असे करणं शक्यच नाही.. 

त्याचे प्रेम आहे माझ्यावर... त्याशिवायच का त्याने लग्न केले माझ्याशी...??  त्याने  तर स्वतःच   बा समोर माझा हात मागितला होता... ते काय उगाच..??? 

वयाने मोठी आहे मी त्याच्यापेक्षा... पण त्याला तर हे माहित होतं. मीच त्याच्याशी बोलले यावर..  तर तो काय म्हणाला...? 

म्हणाला...,  " age doesn\"t matter... "

काय तर म्हने.. शेक्सपिअर ची बायको त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठी होती... 

प्रेमात वयाचा काय संबंध... 

किती हूरळून गेले होते तेव्हा मी... आपण कुणालातरी  आवडतो... ही भावनाच किती भारी होती... 

पण... 

काय केलंस तू हे श्रीधर..?? 

Age doesn\"t matter...,  प्रेमात वयाचचा काही संबंध नसतो वगैरे.. 

तिलाही तू हेच सांगितलं असशील  का ..???? 

ती पुन्हा वर्तमानात आली... 

तरी भूतकाळातील आठवणी  तिला सोडायला तयार नव्हत्या.. 

...लग्नापूर्वी त्याचे सारखे घरी येणे...,  सतत तिच्या मागे - मागे करणे.. 

तो मुसळधार पाऊस... आणि पावसातिल  लग्न...  ती पाठवनीची वेळ... 

आणि.. 

घरामागे एकट्यात जाऊन रडणारा रघु... 

रघु.... 

त्याची आठवण झाली अन तिला वाटलं... त्याच्याशी बोलून बघावं... 

...वेळात वेळ काढून तिने रघु ला फोन केला.. त्याला सर्व सांगितलं...  ऐकून तो रडायलाच लागला... 

"..ताई मला माफ कर गं.."

तो म्हणाला.. 

"... अरे.. , पण यात तुझी काय चूक...?  तू का माफी मागतोस??  "

तिने गोंधळून विचारलं... 

"... ताई...  अगं..,  श्रीधर कॉलेजमध्ये असल्यापासूनच मुलींच्या बाबतीत थोडा भावुक होता.. कोणत्या ना कोणत्या मुलीच्या मागे सतत असायचा तो.. 

म्हणून तो जेव्हा तूझ्या मागे मागे करायचा... नाही आवडायचं ते मला.. 

तुझं त्याच्याशी लग्न होऊ नये म्हणून बा ला पण समजावलं...पण हे खरं कारण नाही सांगू शकलो... "

".. का त्यावेळी  नाही काही बोललास रघु तू..? "

कापऱ्या स्वरात तिने विचारलं.. 

"... ताई...  माझं इंदूवर प्रेम होतं.. आम्ही लग्न करणार होतो...  पण घरात तू मोठी होतीस.. आणि तुझंच लग्न व्हायचे होते तर आम्ही कसे लग्न करणार? 

मग मलाही वाटलं...  तुझं लग्न झाल्यावर मी लग्न करायला मोकळा... त्यामुळे मी खरं कारण बा ला नाही सांगितलं... 

ताई... खरंच माफ कर गं मला... "

रघु भरल्या डोळ्यांनी माफी मागत होता.... आणि ती भरल्या मनानं ऐकत होती...

स्वतःच मन हलके होईल म्हणून तिने त्याला फोन केला होता... पण तिलाच खूप मोठा धक्का बसला होता... 

"...  मम्मी....  पाणी दे गं... "

नीतूचा  क्षीन स्वर तिच्या कानावर आला.. 

...आणि..


ती लेकीकडे गेली.... 

                                                      क्रमशा:  

         ***************************************

...काय करेल चित्रा पुढे....  इनफॅक्ट  काय करावं तिने पुढे... 

कथा शेवटच्या टप्प्यावर आली आहे.. शेवट तुम्हीच सुचवून बघा... आणि आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा..... 


🎭 Series Post

View all