शोध....तिच्या अस्तित्वाचा.... भाग -9

ती... तुमच्या माझ्या सारखीच एक सामान्य स्त्री.. पण लहानपणापासून तर वार्ध्यक्यापर्यंतचा तिचा प्रवास खरंच सामान्य होता का... कळण्या साठी वाचा स्पर्धा कथामालिका... शोध... तिच्या अस्तित्वाचा...

.... उद्या धाकटी लेक नीतूच्या विवाह.... सगळीकडे लग्नसराईच्या कामाची धामधूम... घरात कसे प्रसन्न वातावरण होते... चित्रा च्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता... आनंद होता लेकीच्या लग्नाचा.. त्या पेक्षा जास्त आनंद होता लेक स्वतःच्या पायावर उभी आहे याचा... 

.... नीतू  चित्रा - श्रीधर चे शेंडेफळ... पण तिच्या वाट्याला चित्राचे प्रेम कमीच आलं.. अवघ्या तीन -चार महिन्यांची असताना चित्रा च्या सासूबाईना अर्धांगवायूचा झटका आला.. शरीराची एक बाजू पूर्ण निकामी झाली.. अशा अधू आईला जवळ कसे ठेवनार ना... देविकाने  आजारी आईची रवानगी श्रीधर कडे केली.   ".. नीट काळजी घे गं वहिनी.. आईची.. लवकर बरी व्हायला हवी आई. "  जातांना चित्रा ला बजावून गेली.. 

...पाळण्यात तीन -चार महिन्याच बाळ...   खाटेवर साठ-पासष्टी च्या सासूबाई... पुन्हा बाकीचीही लहान  मुलं... सर्वांचे करता - करता सूर्य माथ्यावर येऊन जायचा... सकाळचे जेवण दुपारी पोटात पडायचे... 

ओली बाळन्तीण ती...  पण तिचीच परवड् व्हायची.. आणि तिच्या सोबत तिच्या तान्हया  बाळाचीही... श्रीधरला त्याचे काही वाटायचं नाही... सासूची सेवा करणे,  सुनेचे तर आद्यकर्तव्यच असते ना...

सासूबाई बऱ्या झाल्या.... देविका लगेच घेऊन ही गेली....  

..बारकी नीतू हुशार होती. चाणाक्ष बुद्धीमत्तेची होती. एक - एक पायरी सर करीत गेली ती आणि मग पहिल्याच प्रयत्नात चांगल्या नोकरीला लागली.... चित्राच्या चारही लेकरांत नीतूच पाहिली, जी लवकर आपल्या पायावर उभी झाली.. त्यामुळे चित्राला तिचे  विशेष कौतुक होते.. तिला नेहमीच वाटायचे  मुलींनी लग्नाआधीच स्वबळावर कमवायला शिकाव... लग्नानंतर माझ्यासारखी फरफट नको व्हायला त्यांची... अशा हुशार नीतूचे लग्न येऊन ठेपले.. 

....हॉल सजला होता... तोरणमाला लागल्या होत्या.. सगळीकडे गजऱ्याचा... अत्तराचा सुगंध दरवरळत होता...  लग्न लागलं... भोजनावळी उठल्या... 

चित्राच्या हृदयात एक कळ उठली.... 

"...काय ग.. काय झालं...?? "

इशाऱ्यानेच श्रीधर ने विचारलं... 

ती हसली जराशी...... मानेनेच काही नाही म्हणून सांगितले.. 

...तिला वाटलं आलंय सुख दारात आता... 

चारही मुलांची लग्न झालीत...  नातवंड् ही आलीत.. आता फक्त आनंदात राहायचं... खूप झालेत कष्ट.. खूप झाले मन मारून जगणे.. आता मनासारखं जगून पाहायचं... 

.एव्हाना  श्रीधर रिटायर्ड झाला होता... तिला वाटलं तारुण्यात नाही पण  निदान आतातरी सुरु करूया राजा राणी चा संसार... त्याचीही मजा चाखून पाहूया जरा... 

... श्रीधरला  नवनवीन  शिकण्याची आधीपासूनच हौस...  रिटायर्डमेन्ट नंतर तरी तो घरी स्वस्थ कसा बसणार..??  पुन्हा त्याने नवीन जॉब शोधला.. जात्याच हुशार... आणि आता परिपक्वही.... लवकरच चांगल्या पगाराची दुसरी नोकरी मिळाली त्याला... 

...आता शहरात नवीन घर बांधण्याचा घाट घातला.. स्वतः च घर... प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचं एक खास स्वप्न... गावात घर होतच पण गाव त्यांनी केव्हाच सोडलेलं... चित्राला वाटलं शहरात घर... आपल्या हक्काचं.. स्वतः च...  ह्या घराची मी मालकीण.. हवं तसं घर सजवनार.. हॉल मध्ये मध्यभागी ह्या इथे मोठठा झुंबर लावणार... आता आयुष्य मनासारखं जगणार...

...घर बांधायला तिनेही आपल्याजवळ चे मनाला मुरड घालून... पै -पै जमवून ठेवलेली चार -पाच लाखांची रक्कम खर्च केली.. तीच्या  हक्काचं घर बांधल्या जात होतं....

घराचे काम पूर्ण झाले... 

          .....चित्रांगण.... 

श्रीधरने मोठया हौसेन नाव ठेवलं घराचं... चित्रा धन्य -धन्य झाली.. 

...तिचं घर... तिच्या नावाचं घर... 

....पण तिला तरी कुठे कळला अर्थ ह्या नावाचा....?? 

...घर तिचं नव्हतंच ते.. तिच्यासाठी तर फक्त आंगण होतं.... 

....चित्रांगण.... म्हणजे.....  चित्राचे आंगण.... !!

तिला अजून याचा पत्ताच नव्हता... आपल्याच मनात कितीतरी मनोरे रचत होती ती... स्वप्नात कितीदा हॉलच्या मध्यभागी झुंबर लावताना पाहत  होती ..... 

...गरिबीतुन वर आलेला श्रीधर... काहीसा मग्रुर झाला होता.. पैशाला काही कमी नव्हती आता त्याच्याकडे.... तरीही पैशाच्याच मागे धावत होता.. श्रीमंतीचे तेज आले होते चेहऱ्यावर... आता अहंभावही झळकत होता... हुशारी होतीच मुळात... आता त्याचा माज ही जाणवत होता...

.. त्याच्या स्वभावातील बदल मुलांना जाणवत होताच... पण आता चित्राला देखील जाणवू लागला होता... 

...का बदलतोय श्रीधर... उत्तर कुणाकडेच नव्हतं.. चित्राला वाटलं.... श्रीमंती अंगात येत असावी कदाचित.... 

"....सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं नाही.... "....कधी काळी हा विचार मनात आला होता तिच्या.. आता वाटलं.,  पैसा आला तर सगळी सोंग  आपोआपच वठवता येतात .... किती खरं आहे ना हे... 

....वास्तूपूजनाचा कार्यक्रम ठरला. सामनाची यादी झाली... पुन्हा एक आनंदसोहळा साजरा झाला.. तीनच वर्षात घरी दोन मंगल प्रसंग आले... चित्रा च मन आनंदात न्हालं... इतकी वर्ष आयुष्य हलाखित काढलं आता सुखाचे स्वागत करायची वेळ आली होती.. 

"..कुणाची नजर ना लागो माझ्या सुखाला... "

असं म्हणून हळूच डोळ्याच्या  काजळाचं बोट  तिने घराच्या भिंतीला लावलं...

कार्यक्रमातील पाहुण्यांच्या गर्दीत एक चेहरा मात्र तिलाच शोधत होता.. त्या नजरेनं हिची पोरकट कृती पाहिली.. अन  हलकं हसू उमटलं त्या चेहऱ्यावर....   एक छदमी हसू... !

पूजेचे ताट नेताना कुणी तरी धडकले तिला.. आणि "... माफ करा  " असं म्हणून निघूनही गेले.  कुणीतरी स्त्री होती ती... ओझरतीच चित्राला दिसली... तिनेही फारसं मनावर नाही घेतलं.. पाहुण्यांची गर्दी.... त्यात चालायचच... असं तिला वाटलं. ताट सावरत ती पूजेला जाऊन बसली.. 

.. तीन -चार महिने झाले.. जीवन मजेत चालले होते तिचे.. तिच्या तरी मते.. 

एक दिवस श्रीधर उशीरा एका स्त्री ला घरी घेऊन आला..

"..बाहेर गावची आहे बिचारी.. ट्रेनिंग ला आहे ऑफिस मध्ये.. आज उशीर झाला तर बस चूकली तिची.. आजची रात्र राहू दे आपल्याकडे.. " श्रीधर चित्राला सांगत होता... 

तिलाही वाटलं तरनीताठी पोर... कुठे जाईल येवढया रात्रीची. राहू दे इथेच. 

तसेही  'अतिथी देवो भव... ' धर्मच आहे आपला. तेव्हा आढेवेढे घ्यायचा प्रश्नच नव्हता... 

झोपताना वाटलं कुठेतरी पाहिलीय मी हिला... पण कुठे आठवत नव्हते.  मग तिनेही डोक्याला जास्त त्रान नाही दिला.. सकाळी ती स्त्री निघून गेली.. 

काही दिवसांनी दीपक... श्रीधर च्या मुलाची त्यांच्याच शहरात ट्रान्सफर झाली. मुलगा -सून ह्यांच्याकडे राहायला आली.. घरात माणसं आली.. आता घर कसं भरल्या -भरल्या सारखं वाटत होतं. दोन चिमण्या नातीची चिवचिव दिवसभर सुरु राहायची... आत्ता कुठे घराला घरपण येत होतं... चित्राने दोन्ही हातांची बोट कडाकडा मोडली... 

"कुणाची नजर ना लागो माझ्या घराला.... "

...श्रीधरने मुलासाठी एक फ़र्म उघडून दिले.. दीपक चे ही आता नीट चालले होते.. 

श्रीधर च्या चेहऱ्यावर  घमंडाचे वलय निर्माण होत होते.. पैशाची रग वाढतच होती..

...माझे शेत... माझं घर ...माझी संपत्ती... माझा पैसा...

सगळं आता फक्त ' माझं '  झालं होतं. एक आपले पणाची भावना त्याच्यातुन निघून गेली  होती... नाती ची गोड वाटणारी चिवचिव रटाळ वाटू लागली.. सुनेच्या हातचे जेवण बेचव होऊ लागले.. मुलगा नसायचा दिवसभर घरी.. रात्री आला की थोडी कुरबूर होऊ लागली... 

एक दिवस बायकोच म्हणाली दीपक ला,  " नको राहूया आपण इथे.. इतके वर्ष त्यांना आपली सवय नव्हती आणि आपल्याला त्यांची.. त्यामुळे जुळवून नाही घेता येताहे मला. त्यापेक्षा वेगळे राहिलो तर संबंध चांगले तरी राहतील.. "

दीपक लाही तिचे म्हणणे पटले.. लवकरच दोघांनी आपला वेगळा संसार थाटला... 

... छोट्या चिमण्यानची चिवचिव बंद झाली होती .... चित्राच्या मनात कालवाकालव झाली.. हृदयात पुन्हा एक छोटीशी कळ उठली... 

साठ - पाचष्टी ला पोहचलेली ती... शरीर आता नीटशी साथ देत नव्हतं.. तारुण्यात हाडाची काड करून घर सावरले होते तिने.. आता शरीर थकले होते.. आता फक्त एकच काम करायचे... आराम.. आणि फक्त आराम... तीने स्वतःला बजावले होते... शेजारीच राहणाऱ्या  लतिका च्या मदतीने घरकामाला एक बाई ठेवली होती... सावी... 

...आराम करायचा विचार डोक्यात आला फक्त... अंमलबजावनी बाजूलाच राहिली ... नीतू तिची धाकटी लेक पहिलटकरीन होती.. तिला उलट्यानचा त्रास सुरु झाला.. एवढा त्रास की कुणी म्हणावं आपल्या शत्रू लाही असं होऊ नये. गोलगुटगुटीत नीतू हाडाचा सापळा होऊन गेली..

आईचेच हृदय ते... चित्रा तिला आपल्या घरी घेऊन आली.. नऊ महिन्यांचा जीवघेणा त्रास...मृत्यूच्या दारात घेऊन जाणाऱ्या गरोदरपणातील यातना.. नीतू सोबत चित्रानही भोगल्या.... एकदाची डिलिव्हरी झाली  चिमुकली परी घरी आली आणि चित्रा ने एक मोकळा श्वास घेतला...

पोरीच्या अंगावरचे संकट टळले होते... ती आता आनंदी होती... 

...खरंच ती आनंदी होती??...  ह्या नऊ महिन्यांच्या काळात घराचे वासे उलटे फिरले होते... तिला दिसत नव्हते असं नव्हतं... पण ह्या वेळेस तिचं प्राधान्य मृत्यूला टेकलेली तिची मुलगी होती.. नीतू ची प्रेग्नन्सी खूप क्लेशदायक होती.. डाक्टरानी abortion करायला सांगितलं होते... ह्या कठीण परिस्थितीत चित्राने तिच्या लेकीला निवडलं... कारण ती एक आई होती.. ह्याच  कठीण परिस्थितीत नीतूनेही आपल्या जन्माला न आलेल्या बाळाला निवडलं....कारण तीही एक होणारी आईच होती....

... ह्या सर्वात कस लागला तो चित्राचा.. तिच्या सुखी स्वप्न रंगवनाऱ्या संसाराचा.... 

....कसा....???? 

वाचा पुढील भागात... 

....आणि तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की सांगा... 

           *****************************************

ही कथामालिका फ्री आहे... तेव्हा हिला subscription ची गरज नाहीय.... 



🎭 Series Post

View all