शोध नात्यांचा भाग ९

Mission of searching relatives

   मागील भागाचा सारांश: राघवचे संजय काका सोबत सविस्तरपणे बोलणं झालं. आता फक्त सुशीला आत्त्यासोबत बोलणं होणं बाकी होते.

      राघवने मंजिरीला संजय काका सोबत बोलण झाल्यावर सविस्तर वृत्त सांगितले तसेच राजेंद्रही सुजाता सोबत व्हिडिओ कॉल द्वारे बोलला. सुजाता डॉक्टरांच्या ट्रीटमेंटला प्रतिसाद देऊ लागली असल्याने मंजिरी व तिचे बाबाही प्रचंड खुश होते. राघवच्या प्रयत्नांना यश आले होते, सुशीला आत्या सोडून राघवचे सगळ्यांशीच बोलणे झाले होते. राघवला अस झालं होतं की लॉकडाउन कधी उघडत आणि मी सर्वांना जाऊन भेटेल. राघवने रोहित कडून सुशीला आत्त्याचा फोन नंबर मिळवला आणि त्याने तो नंबर बाबांकडे दिला. बाबांनी सुशीला आत्त्याला फोन लावला त्यावेळी राघव व त्याची आई बाबांकडे टक लावून बसले होते कारण त्यांना कल्पना होती की सुशिलाचा प्रतिसाद वाईट असू शकतो.

सुशीला--- हॅलो कोण बोलतंय?

बाबा--- हा नंबर डॉ सुशीला मोहितेंचाच आहे ना.

सुशीला--- हो मी डॉ सुशीला मोहिते बोलतेय, तुम्हाला जर माझी अपॉइंटमेंट पाहिजे असेल तर हॉस्पिटलच्या नंबर वर फोन करून घ्या.

बाबा--- मला तुमची अपॉइंटमेंट नकोय, तुमचा थोडा वेळ हवा आहे थोडं महत्त्वाचे बोलायचे आहे.

सुशीला--- तुम्ही कोण बोलत आहात?

बाबा--- मी आनंद देशमुख बोलतोय.

सुशीला--- कोण आनंद देशमुख, मी आपल्याला ओळखत नाही.

बाबा--- आपण विनायक देशमुखांना ओळखतात का? मी त्यांचा मोठा मुलगा आहे.

सुशीला--- दादा तु? एवढ्या वर्षांनी माझी कशी काय आठवण काढलीस? दाद तुला कल्पना नसेल पण मधल्या काळात इतकं काही घडून गेलंय की मला देशमुखांपैकी कोणाशीच बोलण्यात इंटरेस्ट राहिलेला नाहीये.

बाबा--- सुशीला एवढं काय झालंय?

सुशीला--- ते राहुदेत उगाच मला मनस्ताप होईल, तु फोन कशाला केला होतास?

बाबा--- आपल्या वाड्याला आणि सुजाताला आपली गरज आहे.

सुशीला--- वाड्याच नको सांगूस पण सुजाताला काय झालंय ते सांग.

बाबा--- सुजाता गेले दोन महिन्यांपासून कोमात आहे.

सुशीला--- काय? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे?

बाबा--- मी तुला तिच्या नवऱ्याचा फोन नंबर पाठवतो, तुला उर्वरीत माहिती तेच सांगतील.

सुशीला--- ठीक आहे, अजून काही बोलायचंय का?

बाबा--- तुझ्या मनात देशमुखांबद्दल एवढी कटुता का?

सुशीला--- दादा मला त्या विषयावर बोलायच नाहीये, तुला जर जाणून घेण्यात एवढा इंटरेस्ट असेल तर संजयला विचार तो सर्व सांगेल.

बाबा--- मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, संजय माझ्याशी बोलायला तयार नाहीये, प्लिज सांग ना.

सुशीला--- ठीक आहे, तुला कळलंच असेल की माझं लग्न डॉ अनिरुद्ध मोहिते सोबत झालं, माझं लग्न झालं त्यावेळी मी बारावी झालेली होते, अनिरुद्धच्या घरच्यांनी अण्णांना सांगितलं होतं की ते लग्नानंतर मला पुढे शिकवतील तस त्यांनी पुढे शिकवलेही, माझ्या आणि अनिरुद्धच्या वयात भरपूर अंतर होते, मी सुरवातीला अनिरुद्ध सोबत लग्न करायला नकार दिला होता पण अण्णांनी मला सांगितलं की ते तुला डॉ करणार आहेत, तुला पुढे शिकवण्याची माझी ऐपत नाहीये, तुला जर पुढे शिकायचं असेल तर अनिरुद्ध सोबत लग्न करावेच लागेल, त्यामुळे मी लग्नाला तयार झाले, डोळ्यात खूप स्वप्न घेऊन सासरी आले पण इथे आल्यावर कळाले की अनिरुद्धचे आधीच एक लग्न झालेले होते, त्यांना एक मुलगीही होती, त्यांच्या पहिल्या बायकोला कॅन्सर झाला असल्याने त्यांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला, अनिरुद्धच्या पहिल्या लग्नाबद्दल अण्णांना पूर्व कल्पना होती, एवढी मोठी गोष्ट अण्णांनी माझ्यापासून लपवली होती, एवढेच नाही तर अनिरुद्ध सोबत माझे लग्न लावून देण्याच्या बदल्यात अण्णांनी अनिरुद्ध कडून पैसे घेतले होते कारण अण्णांना सावकाराकडे गहाण असलेला वाडा सोडवायचा होता, हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती, लग्नानंतर मी पहिल्यांदा जेव्हा माहेरी गेले त्यावेळी मी या सर्वाचा अण्णांना जाब विचारला त्यावेळी अण्णांनी सांगितले की आता तुझे लग्न झाले आहे, तुझ्या नशिबात जे लिहिले होते तेच घडले आहे, आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात जे काही घडेल त्याला सामोरी जा, नवरा किंवा सासरच्या इतर कोणाबद्दलही माझ्याकडे तक्रार करायची नाही. त्यावेळी माझ्या मनात अण्णांबद्दल खूप द्वेष निर्माण झाला तो कायमचाच. अनिरुद्धने सांगितल्या प्रमाणे पुढे मला BAMS ला प्रवेश घेऊन दिला, मी होस्टेलला राहत असे, माझा आणि घरच्यांचा एवढा संबंध यायचा नाही, अनिरुद्ध नावाजलेला डॉ असला तरी त्याला बाई आणि बाटलीचा शौक होता, माझ्या लग्नानंतर एक वर्षाच्या आतच अनिरुद्धच्या पहिल्या बायकोचा मृत्यू झाला, अनिरुद्धची मुलगी त्याच्या आई वडिलांकडे वाढत होती, माझे BAMS झाल्यावर ती मुलगी माझ्या व अनिरुद्ध कडे राहू लागली, मला त्या मुलीलाही एकमेकींचा चांगलाच लळा लागला होता, अनिरुद्ध घरी रोज दारू पिऊन यायचा, मी अनिरुद्धच्याच हॉस्पिटलमध्ये नोकरी करू लागले, काही दिवसातच मला मुलगा झाला, अनिरुद्ध व त्याच्या घरचे खूप खुश होते, अनिरुद्धने मुलगा झाल्याची बातमी अण्णांना कळवली त्यावेळी अण्णा मला भेटायला आले ते रिकाम्या हातानेच, येताना सोबत ताईला घेऊन यायचे तर संजयला घेऊन आले, संजयलाही दारूचे व्यसन असल्याने अनिरुद्ध व संजय सोबत दारू पिऊन घरी आले आणि घरी खूप तमाशा घातला, त्यानंतर संजय वारंवार आमच्या घरी येऊ लागला, तो आला की अनिरुद्धचा व त्याचा प्लॅन ठरलेला असायचा, एक दिवस मी स्वतः संजयचा हात धरून त्याला घराबाहेर काढलं, अण्णांना या गोष्टीचा खूप राग आला ते माझ्या घरी येऊन मला खूप घालून पाडून बोलले, त्या दिवशी अनिरुद्ध व त्यांच्यात खूप वादविवाद झाले, नातेसंबंध तुटले ते कायमचेच, मला ताईला भेटायचे होते पण संजयने आणि अण्णांनी मला ताईला भेटूच दिले नाही. पुढे जाऊन अनिरुद्ध दारूच्या खूपच आहारी गेला होता, बाजारू बायांना घरी घेऊन यायचा, माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली होती, मनातलं बोलण्यासाठी प्रेमाच एकही माणूस जवळ नव्हते, मुलांवर वाईट संस्कार व्हायला नको म्हणून मी अनिरुद्धचे घर सोडून वेगळी राहू लागली, अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये यायचा नाही म्हणून मी त्याचे हॉस्पिटल चालवू लागले, दोन मुले, घर, हॉस्पिटल खूप ओढाताण व्हायची. काही वर्षातच अनिरुद्धने व्यसनापायी आपला जीव गमावला, अनिरुद्धने कर्ज भरपूर करून ठेवले होते, ते फेडायला माझं अर्ध आयुष्य निघून गेले. अण्णांनी काय विचार करून माझं अनिरुद्ध सोबत लग्न लावून दिले असेल, एखाद्या शेतकऱ्याच्या गळ्यात बांधलं असतं तरी चाललं असतं. आता कुठे जाऊन माझ्या आयुष्यात चांगले दिवस आले आहेत, माझी मुलगी MBBS झाली आहे तर मुलगा MBBS च्या पहिल्या वर्षात आहे. बाहेरून बघताना सगळ्यांना वाटत असेल की एवढी प्रसिद्ध डॉक्टर आहे, पैसा असेल किती सुखात असेल पण त्यांना खर थोडंच माहीत आहे कायकाय भोगलय मी.

बाबा--- सुशीला मला तुझा खूप गर्व वाटत आहे, श्रेया तुझी सावत्र मुलगी आहे का?

सुशीला--- हो ते फक्त बोलण्यापुरतच, ती मला व मी तिला कधीच सावत्र मानलं नाही, पण तुला श्रेयाच नाव कस माहीत?

बाबा--- श्रेया बारावीत असताना देशमुख असल्याने ज्या मित्रासोबत मैत्री तोडायला लावलीस तो राघव देशमुख माझाच मुलगा आहे.

सुशीला--- हा आठवलं, राघव तुझा मुलगा आहे तर.

बाबा--- सुशीला आपापल्या आयुष्यात जे घडलं ते विधिलिखित होत असे म्हणून सोडुयात, त्यात कोणाचा काहीच दोष नव्हता, आता आयुष्याच्या या टप्प्यात तरी आपण सगळे एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे, जुने राग रुसवे सर्व सोडून देऊयात, अण्णांनी गहाण ठेवलेला वाडा आपण सोडवूयात.

सुशीला--- दादा मला या सगळ्याचा विचार करावा लागेल. मी श्रेयाचा फोन नंबर तुझ्या फोनवर मॅसेज करते तो राघवला दे आणि सांग की श्रेयासोबत मैत्री केलेली तिच्या आईला आवडेल.

बाबा--- बर ठीक आहे, तुझे विचार चक्र पूर्ण झाले की फोन कर.

सुशीला--- हो नक्कीच.

       बाबांनी फोन स्पीकरला ठेवलेला असल्याने राघव व त्याच्या आईला सर्व आधीच कळाले होते.

राघव--- बाबा लॉकडाउन उघडले की आपण गेट टूगेदर प्लॅन करूया.

बाबा--- हो पण गेट टूगेदर आपल्या वाड्यावरच करूयात.

राघव--- हो अगदी माझ्या मनातलं बोललात.

बाबा--- तुझ्यात आणि संजयमध्ये जे बोलणं झालंय ते राजूला सांगितलं का?

राघव--- नाही बाबा, मी सगळं कळवतो त्यांना.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all