शोध नात्यांचा भाग ८

Mission of searching relatives

    मागील भागाचा सारांश: राघवला त्याच्या नातेवाईकांपैकी एकेक जणाचा शोध लागत आहे. सर्वात पहिले राघवला सुजाता आत्या सापडली त्यानंतर राजेंद्र काकाचा शोध लागला. अजून संजय काका आणि सुशीला आत्त्याशी बोलणं होणे बाकी आहे, पण त्यांचा ठावठिकाणा लागला आहे. राघवला राजेंद्र काकाने सुशीला आत्त्याच लग्नानंतरचे नाव सांगितले, ते ऐकून राघव व त्याची आई दोघेही शॉक झालेत.

बाबा--- मला हे कळत नाहीये की तुम्ही दोघेही सुशिलाचे लग्नानंतरचे नाव ऐकून शॉक का झाले आहेत? सुशीला अनिरुद्ध मोहिते अस सरळसरळ नाव आहे त्यात शॉक होण्यासारखे काय आहे?

आई--- राघव तुच सांग तुझ्या बाबांना, कधीच वाटलं नव्हतं की त्या सुशीला मोहितेच परत तोंड पहावं लागेल.

बाबा--- राघव काय झालंय हे सांगणार आहेस का? तुझी आई अस का बोलत आहे?

राघव--- बाबा आम्ही तुमच्या पासून एक गोष्ट लपवली आहे. मी अकरावीत असताना श्रेया मोहिते नावाची मुलगी माझ्या क्लास मध्ये होती, माझा मित्र रोहित तिच्या घराशेजारी राहत असल्याने माझी आणि श्रेयाची ओळख झाली, श्रेयाला डॉक्टर व्हायचे असल्याने तिने maths घेतलेले नव्हते तर मला इंजिनिअर व्हायचे असल्याने मी biology घेतलेले नव्हते. माझी व श्रेयाची भेट व्हायची ती physics व chemistry च्या क्लास पुरतीच, मी रोहितच्या घरी अभ्यासाला जायचो त्यावेळी माझी व श्रेयाची अधूनमधून भेट होऊ लागली, हळूहळू आमच्यात खूप छान मैत्री झाली. तुम्हाला आठवतच असेल की बारावीची एक्साम झाल्यावर आम्ही सगळे मित्र मैत्रिणी लोणावळ्याला ट्रेकला गेलो होतो, आमच्यासोबत श्रेयाही होती, तेथून परत येताना आमच्या गाडीला अपघात झाला त्यावेळी तुम्ही मुंबईत नव्हता,आम्हाला सर्वांना थोडंफारच लागलं होतं, आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना आई आपली गाडी घेऊन मला घ्यायला आली होती. रोहित आणि श्रेयाही आपल्याच गाडीत आले. आम्ही श्रेयाला तिच्या घरी सोडवलं त्यावेळी तिच्या आईने आम्हाला चहा घेण्याचा आग्रह केला म्हणून आम्ही तिच्या घरी थांबलो, सुरवातीला श्रेयाची आई माझ्याशी व आईशी खूप छान बोलली, चहा घेतल्यानंतर आम्ही त्यांचा निरोप घेण्याच्या वेळी श्रेयाच्या आईने मला माझं पूर्ण नाव विचारलं, मी राघव देशमुख सांगितल्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया खूप जास्त वाईट होती, त्यांनी सांगितलं की इथून पुढे माझ्या मुलीशी मैत्री ठेवायची नाही, मी अस करण्याचे कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले की देशमुख नावाच्या लोकांनी मला खूप जास्त मनस्ताप दिला आहे म्हणून मला कुठल्याच देशमुखांशी संपर्क येऊ द्यायचा नाहीये. मला व आईला त्यांचे वागणे जरा विचित्रच वाटले. त्या दिवसानंतर श्रेया माझ्यासमोर बऱ्याचदा आली पण ती माझ्याशी एक शब्दही बोलली नाही किंवा मीपण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही.

बाबा--- सुशीलाला देशमुखांचा एवढा राग का? नक्कीच तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलेलं असेल पण काय? तुला रोहित कडून सुशीलाचा फोन नंबर मिळू शकेल का?

राघव--- रोहितला विचारून बघतो. बरं बाबा संजय काकाचा फोन नंबर अमोलच्या काकूकडून मिळाला आहे त्यांच्याशी तुम्ही बोलता की मी बोलू?

बाबा--- मी बोलतो, तोपर्यंत तु सुशीलाचा फोन नंबर मिळव.

          राघवचे बाबा संजयला फोन करतात. संजय राघवच्या बाबांच नाव ऐकून फोन कट करतो. राघवचे बाबा खूप वेळेस संजयला फोन करतात पण प्रत्येक वेळी संजय फोन कट करायचा. राघवच्या बाबांनी राघवला संजय फोन कट करत असल्याचे सांगितले यावर राघवने विचार केला की आपणच फोन करून संजय काकांशी बोलावे, म्हणूनच राघवने संजय काकाला फोन लावला,

संजय--- हॅलो कोण बोलतंय?

राघव--- मी राघव बोलतोय.

संजय--- कोण राघव?

राघव--- मी राघव आनंद देशमुख तुमचा पुतण्या बोलतोय.

संजय--- माझा आनंद देशमुख नावाचा भाऊ होता, आता मला कोणीच भाऊ नाहीये, उगाच तु माझ्याशी नाते जोडण्याचा प्रयत्न करू नकोस.

राघव--- काका मला माहित आहे की तुमच्या डोक्यात बाबांबद्दल राग असेल पण तुम्ही माझ्याशी तर बोलूच शकता ना.

संजय--- बोल काय म्हणतो आहेस? कशाला फोन केलास?

राघव--- काका तुम्ही सगळे कसे आहात?

संजय--- आम्हाला काय धाड भरली आहे, आम्ही सगळे ठणठणीत आहोत.

राघव--- काका मला अस कळलंय की सावकार वाडा पाडणार आहे, हे खरं आहे का?

संजय--- त्या सावकाराला वाड्याआधी माझ्यावरून बुलडोझर फिरवावा लागेल मगच तो वाडा पाडू शकेल.

राघव--- काका आपल्याला असा आडमुठेपणा करून चालणार नाही, आपल्याला जे काही करायचे आहे ते कायदेशीर पद्धतीने करावे लागेल.

संजय--- वाडा कसा वाचवायचा किंवा त्याच काय करायच हे माझं मी बघून घेईल तुम्हाला त्याची काळजी करायची काहीच गरज नाहीये.

राघव--- काका तुम्ही अस कस बोलू शकता, तो वाडा माझ्या आजी आजोबांचा आहे, त्याच्याशी असलेला माझा संबंध तुम्ही काय कोणीच नाकारू शकत नाही.

संजय--- सरळसरळ म्हण ना की तुला वाड्यात वाटा पाहिजे आहे.

राघव--- काका मला नुसता वाडा नकोय तर त्यातील माणसे सुद्धा हवी आहेत, काका पहिल्यांदा आणि शेवटच सांगतो मला वाड्यात किंवा तुमच्या प्रॉपर्टीत काडीचाही रस नाहीये, मला पूर्ण देशमुख परिवाराला एकत्र आणायचे आहे, काही दिवस झालेत मी त्याचसाठी प्रयत्न करतोय, तुमचा फोन नंबर मला एवढा सहजासहजी मिळाला नाहीये, आता मला एवढंच सांगा की वाडा सावकाराच्या ताब्यात कसा गेला?

संजय--- राघव तु आनंद दादासारखाच गरम डोक्याचा दिसतोय. मी सगळं काही थोडक्यात सांगतो, बाहेरून बघताना सगळ्यांना हेच वाटायचं की अण्णांची आर्थिक परिस्थिती छान आहे पण अस काहीच नव्हतं, सुरवातीला शेतीत पिकांचे उत्पादन चांगले व्हायचे त्यावेळी पिकांचा मुबलक पैसा घरात यायचा, अण्णांची इच्छा होती की आनंद दादाने शेतीत लक्ष घालावे पण दादाला हे मान्य नसल्याने त्याने घर सोडले त्यानंतर आमची आई म्हणजे आम्ही तिला ताई म्हणत असू, तिची तब्येत खालावली, जवळजवळ दोन वर्षे आईला दवापाणी चालू होता त्यात त्यावेळी बराचसा खर्च लागला, अण्णांची जी काही जमापुंजी होती त्यातील काही जमापुंजी ताईच्या आजारपणात संपली, हळूहळू शेतीतील उत्पादन कमी होऊ लागले होते, पुढे जाऊन राजुचे शिक्षण जरी स्कॉलरशिप मधून झाले असले तरी त्याला थोडाफार खर्च लागायचाच, सगळ्यांना वाटतंय की संजयच शाळेत डोकं न चालल्याने तो पुढे शिकला नाही पण सत्य परिस्थिती अशी होती की अण्णांची आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली होती म्हणून मी स्वताहून शिक्षणातून माघार घेतली त्यानंतर सुशिलाच लग्न डॉ अनिरुद्ध मोहिते सोबत झालं, अण्णांनी सुशीलाच लग्न धुमधडाक्यात केलं त्यावेळी अण्णांनी वाडा सावकाराकडे गहाण ठेवला, अण्णा जमेल तसे थोडेथोडे करून सावकाराला पैसे देत असायचे, पुढे जाऊन राजू सरकारी नोकरीत रुजू झाला त्यावेळी अस वाटलं होतं की आतातरी आपली गरिबी हटेल पण झालं उलटंच, राजूचं लग्न झाल्यानंतर राजूने एक नवा पैसा सुद्धा घरी दिला नाही, एके दिवशी राजू घरी आला होता तेव्हा अण्णांनी वाडा सावकाराकडून सोडवण्यासाठी काही पैशांची मागणी केली त्यावेळी राजूने अण्णांना विचारले की तुम्ही मला विचारून वाडा गहाण ठेवला होता का?, मी तुम्हाला पैश्यांची मदत करू शकत नाही, अण्णांनी राजूला सांगितले की इथून पुढे वाड्यात पाऊल ठेवायचा नाही, मी मेलो तरी दारात यायचे नाही त्या दिवसानंतर राजू परत कधीच आला नाही. माझे लग्न साध्या सरळ पध्दतीने झाले, सुजाताने प्रेमविवाह केल्याने तिला अण्णांनी घरात प्रवेश दिला नाही, एकदा डॉ अनिरुद्ध व अण्णांमध्ये वादावादी झाली त्यामुळे त्यांनी सुशीलाला माहेरी येऊच दिले नाही, अशा रीतीने हळूहळू मी सोडून सर्वच जण घरातून निघून गेले ते पुन्हा कधीच माघारी आले नाहीत. काही दिवसांतच ताई आणि अण्णा देवाघरी गेले. सलग तीन वर्ष पाऊस न पडल्याने कुठलेच पीक आले नाही, सावकाराने पैश्यांचा तगादा लावला होता, मधल्या काळात मला दारूचे व्यसन जडले होते, गावातील सर्वांना असच वाटतंय की मी दारूच्या व्यसनामुळे वाडा गहाण ठेवला, मी वाडा सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केला पण माझ्याच्याने ते काही शक्य झाले नाही, सावकाराच्या मुलाला कोणीतरी सांगितले की वाड्यात खजिना दडलेला आहे म्हणून त्याला वाडा पाडायचा आहे पण त्याला हे कोण सांगणार की जर वाड्यात खजिना असता तर इतक्या वर्षांपासून वाडा गहाण राहिलाच नसता.

राघव--- काका जे झालं ते आपण बदलू शकत नाहीये पण वाड्याला मी काहीच होऊ देणार नाही, सावकाराचे किती पैसे द्यायचे आहेत ते मला हिशोब करून सांगा, लॉकडाउन उघडले की मी तिकडे येऊन जाईल तोपर्यंत काहीही अडचण आली तरी मला फोन करा.

संजय--- तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं, खूप दिवसांनी आपल्या माणसाशी बोलल्यासारखं वाटलं.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all